डॉ. नंदू मुलमुले

लौकिक यशाइतकीच कौटुंबिक, सामाजिक नाती जपणं, माणसं जोडणं, यासाठी तडजोड करावी लागते. अहंभाव सोडून द्यावा लागतो. हे ज्यांना कळलं त्यांना ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदानही कळलं, असं म्हणायला हरकत नाही. माणसाचा मूळ स्वभाव, त्याचं वाढतं वय, कुटुंबातील बदलतं स्थान, निवृत्तीनंतर वाट्याला येणारा घटता प्राधान्यक्रम आणि सातत्याने बदलणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात वर्षभर कथारूपी लेख वाचकांना या सदरात वाचायला मिळाले. आयुष्यात असणारं स्थैर्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…

‘असे हे जगाचे फिरे चक्र बाळा… हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा…’ गदिमांनी चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत सहज सोप्या शब्दांत या विश्वाचं एक चिरंतन सत्य सांगून जातं. हे विश्व चक्राकार गतीनं चालतं. उत्पत्ती, स्थिती, लय हा या विश्वातील प्रत्येक घटकाचा नियम आहे. प्रत्येक प्रारंभ ही अंताची वाटचाल. ‘सांधा बदलताना’ या सदराचा पहिला लेख प्रसिद्ध झाला, ६ जानेवारीला. वर्षभर त्यात नव्या-जुन्या पिढीतील संघर्षाच्या कथा येत राहिल्या, आणि आज हे सदर शेवटाला येतंय.

सुरुवातीला वाटलं, वयाचा एकच गट, संघर्षाचा एकच कंगोरा, समस्येचा एकच सूर, सारं एकसुरी नाही ना होणार? पण लिहिता लिहिता लक्षात आलं, असंख्य कहाण्या लपलेल्या असतात या परस्पर नातेसंबंधांच्या आलापीत. कधी सुरेल, कधी बेसूर. माणसाचा मूळ स्वभाव, त्याचं वाढतं वय, कुटुंबातील बदलतं स्थान, विशेषत: निवृत्तीनंतर वाट्याला येणारा घटता प्राधान्यक्रम (सकाळी सकाळी न्हाणीघर अडवून नका ठेवू, पोरांना सारं आटोपून कामावर जायचंय!- हे त्यांना ऐकावं लागणं), त्या प्राधान्यक्रमाशी जुळवून घेताना होणारा त्रास, एक ना दोन. या साऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आत्यंतिक वेगानं अंगावर येऊन आदळणारं नवनवं तंत्रज्ञान.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले…!:  राजीनामा

तांत्रिक प्रगतीने मनोरंजनाचं एक नवं खेळणं आमच्या हाती दिलं, मात्र तेच खेळणं नव्या पिढीसाठी घातक ठरत आहे. सहज दूर-संपर्क हे त्याचं मूळ उद्दिष्ट, मात्र ते झाकोळलं जाऊन त्याचं दक् -श्राव्य वैशिष्ट्य हे व्यसनाचं कारण ठरत आहे. त्याची उपयुक्तता एके काळच्या ‘चैन’ या सदरात मोडत होती, मात्र पूर्वीच्या सगळ्या चैनीच्या गोष्टी आता ‘आवश्यकता’ या सदरात मोडतात हेही वास्तव. या आभासी दुनियेनं वास्तवातील प्रश्न सुटत नाहीत, उलट नव्या समस्या पुढ्यात येऊन उभ्या राहतात.

वाढतं जीवनमान हे वरदान की शाप? निसर्गात प्रजननक्षमता ओसरलेले प्राणी (एक-दोन अपवाद वगळता) फार काळ जिवंत राहत नाहीत. उपयुक्तता संपल्याने उत्क्रांतीच्या दृष्टीने ती निरुपयोगी ठरतात. माणूस मात्र अधिक जगतो. ही सारी वर्षं अनुत्पादक, निष्क्रिय असण्याची गरज आहे का? ‘आता काय, आम्ही रिटायर्ड!’ खरं तर ‘निवृत्त’ हा शब्दच चुकीचा. तुम्ही सेवामुक्त केले जाता, आता ‘आत्मवृत्त’ झालो म्हणा. या वयात शरीराची निगा राखली तर ही सारी हयात माहिती, ज्ञान, अनुभवाने संपन्न झालेली असते, सुज्ञतेने समृद्ध होऊ शकते. माणसाच्या विचारी अवस्थेचा हा सगळ्यात परिपक्व काळ. पण ‘आता काय, आपण निवृत्त’ या मानसिकतेच्या दडपणाखाली बहुसंख्य लोक अकारण हतबल झाल्यासारखे दिसतात.

वृद्धापकाळ काही शारीरिक मर्यादांना घेऊन येतो यात तथ्य आहेच, ते कुणी नाकारण्यात अर्थ नाही. ‘चाळिशीपर्यंत होती तशी चपळाई आता वाटत नाही, झटक्यानं उठता येत नाही, पूर्वीसारखं सफाईनं वाहन चालवणं जमत नाही, वेगानं चालवायला भीती वाटते. एके काळी गाडी चालवणं हा शौक, त्यामुळे कधीच चालक सोबत घेतला नाही. आता मात्र तो जरुरी वाटतो,’ माझ्या कथेतील आप्पा, नाना ही मंडळी मला सांगतात. ‘लक्षात कमी राहतं, नव्या ओळखी कराव्याशा वाटत नाहीत, पार्टी-चित्रपटांना पूर्वी ज्या उत्साहानं जावंसं वाटायचं तसा जोश जाणवत नाही,’ एक ना दोन. पण याच जोशाच्या अभावाचे काही फायदेही लोक लक्षात घेत नाहीत. ‘चांगल्या-वाईट घटनांनी आता फारसा धक्का बसत नाही. कुणी मनाविरुद्ध बोललं तरी पटकन उलटून उत्तर द्यावं वाटत नाही. आता भांडणं नको वाटतात.’ न्याय्य हक्कांसाठी उभं राहणं जरुरी, भांडलंच पाहिजे असं नाही हे लक्षात यायला लागतं.

आणखी वाचा-माझी मैत्रीण : कृतज्ञता

पंधरवड्याला एक याप्रमाणे २६ कथारूपी लेख लिहिले, त्यावर उदंड प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांतून जाणवलेले मुद्दे साररूपाने मांडायचे तर एक शब्द महत्त्वाचा; स्थैर्य. आयुष्याचा तिसरा प्रहर शांतीचा, समाधानाचा, स्थैर्याचा व्हायला हवा. हे स्थैर्य चार प्रकारचे; आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. यातला पहिला मुद्दा महत्त्वाचा. आर्थिक स्वावलंबन नसेल तर कुठलंच स्थैर्य लाभणार नाही. पैशाचं सोंग आणता येत नाही, आणि खर्चासाठी मुलासमोर हात पसरण्याइतकं वेदनादायक दुसरं काही नाही. ‘मुलगा तत्पर असतो हो, पण सुनेच्या कपाळावर सूक्ष्म आठी दिसली की वाईट वाटतं.’ या वयात मन संवेदनशील झालेलं असतं. ‘नटसम्राट’ नाटकात एक संवाद आहे, ‘माणसानं पुढ्यातल्या जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट कुणालाही देऊ नये!’.

अर्थात या स्थिरतेची तरतूद कमावत्या वयातच सुरू व्हायला हवी. नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारा पैसा हे केवळ उत्पन्न, मात्र खर्च वजा जाऊन उरलेल्या पैशांची केलेली गुंतवणूक हा नफा, तीच भविष्यकाळासाठी केलेली बचतही. हे कलम दोन्ही पिढ्यांना लागू आहे. ‘माझा मुलगा हल्ली फार तुटक वागतो,’ अशी एका बापाने तक्रार केली. मुलगा तसा समंजस दिसत होता. ‘का?’ विचारल्यावर त्याने सांगितलं, ‘आमच्या वडिलांनी आजोबांचे गावाकडचे घर विकून टाकले, आणि त्यातून मिळालेले पैसे उधळणं सुरू आहे. आता आमच्या नावे वारशाने मिळणारी कुठलीही स्थावर मालमत्ता नाही. पैसे जाऊ देत, आजोबांची आठवण राहील, अशी वास्तू ठेवली नाही. मी स्वत:च्या पैशाने सदनिका घेतली, आणि बचत सुरू केली आहे.’ सगळ्या नातेसंबंधांच्या मुळाशी आर्थिक बाबी असतात, हे वास्तव अशा उदाहरणांनी अधोरेखित होते.

शारीरिक स्थैर्य तेवढंच, किंबहुना अधिक महत्त्वाचं. ते असेल तर ज्येष्ठ वयातही माणूस तशी वेळ आली तर अर्थार्जन करू शकेल. खेड्यात अनेक शेतकरी वृद्धपणीही काम करीत राहतात. (बरेचदा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना करावे लागते.) नियमित व्यायाम, आहार नियंत्रण, निर्व्यसन, आणि किमान वर्षातून एकदा आवश्यक प्रतिबंधक तपासण्या, ही उत्तम प्रकृतीची चतु:सूत्री. पैशांसारखी त्याची तरतूदही तरुणवयात सुरू झाल्यास उत्तम. या वयातील बहुतांश विकार हे जीवनशैलीशी निगडित असतात, त्यामुळेच आरोग्यपूर्ण सवयींनी ते टाळता येणं शक्य. मात्र माणसे प्रकृतीची हेळसांड करतात, व्याधी ओढवून घेतात, मग आपल्या विकलांग शरीराचा भार मुलांवर सोडून त्यांचे आयुष्य कष्टमय करून सोडतात. मुले बिचारी या युगातली गळेकापू स्पर्धा आणि आपली कौटुंबिक कर्तव्ये या द्वंद्वात सापडतात. अनेकदा त्यांना वेळ देणं शक्य होत नाही. एक अपराधभाव त्यांच्या मनाला टोचत राहतो. ‘आईला मधुमेह झाला, मग कुठल्याशा स्वयंसिद्ध उपचारपद्धतीमागे लागून तिने सगळ्या गोळ्या बंद करून टाकल्या, आणि व्हायचं तेच झालं. मधुमेह-रक्तदाब हाताबाहेर गेला आणि ती दोन वर्षांपूर्वी बेशुद्ध पडली, ती आजतागायत. पाण्यासारखा पैसा गेला, उपयोग शून्य.’ सगळी काळजी घेऊनही अशी स्थिती आली तर एकवार समजून घेता येईल, पण ओढवून आणलेल्या स्थितीला काय म्हणणार? ‘खूप पाळलं हो पथ्य जन्मभर, आता नका सांगू संयमाच्या गोष्टी!’ असं म्हणून सूनेकडून आंब्याच्या रसाची वाटी हिसकावणारी जबर मधुमेही सासू मी पाहिली आहे. ‘आता या वयात तुम्हाला काय झिरो फिगर व्हायचंय?’ अशी हेटाळणीवजा वाक्य फेकून नवऱ्याच्या फिटनेस प्रेमाची खिल्ली उडवतानाही पाहिलं आहे. स्त्रियांमध्ये व्यायामासाठी वेळ काढणं दुरापास्त, त्यात ‘आम्ही घरची सगळी कामं करतो, आम्हाला नाही गरज व्यायाम- फियामाची’ ही समजूत. भांडी घासणं आणि झाडझूड करणं म्हणजे व्यायाम नव्हे. श्रम आणि व्यायाम यातला फरक समजणं महत्त्वाचं.

आणखी वाचा-‘भय’भूती : कुणी तरी आहे तिथं!

तिसरं स्थैर्य मानसिक, भावनिक. आता वृत्तीची निवृत्ती जरुरी. लहानसहान गोष्टींवरून मनाचा त्रागा करून घेणं, उसळून बोलणं, संताप करून घेणं, सूडभावना बाळगणं (आणि शारीरिक मर्यादांमुळे तो उगवता येत नसल्यानं चडफड होणं), असूया, मत्सर सारेच भावनिक विकार. ‘पोराने सुनेची बाजू घेतली की ही लगेच गळा काढते. पोरगा कचाट्यात सापडतो. एकीकडे बायको, दुसरीकडे आई, त्याची कोंडी होते. आता या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत,’ एक वृद्ध मला सांगत होते. ‘समजवायला गेलं की म्हणते, तुम्ही सुनेची बाजू घेता, मला एकटी पाडता.’ विवेकाचा सल्ला देणं सोपं, तो अंगीकारणं कठीण, अमलात आणण्यास पटवणं त्याहून कठीण!

अखेरचं स्थैर्य सामाजिक. आप्त-स्वकीय-मित्र यांच्याशी स्थिर, मधुर, समंजस परस्परसंबंध या संदर्भात आठवतो. मानसशास्त्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा, सगळ्यात प्रदीर्घ प्रयोग. तो सुरू झाला १९३८ मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील २६८ विद्यार्थ्यांवर. संशोधनाचा विषय होता ‘माणसाला आयुष्यात आरोग्य आणि सुखसमाधान प्राप्त करून देणारे घटक कोणते? प्रत्येकाच्या दर पाच वर्षांनी शारीरिक चाचण्या, दर दहा वर्षांनी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. यातल्या अनेकांनी लौकिक जीवनात प्रचंड प्रगती केली. त्यातला एक, जॉन एफ केनेडी अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. बेन ब्राडली हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्राचा मालक झाला, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, वकील झाले. काही कफल्लक, व्यसनी, मनोरुग्णही झाले. संशोधन सुरू झालं तेव्हा त्यांचा बुद्ध्यांक, व्यक्तिमत्त्व, शरीराचं आरोग्य महत्त्वाचं मानलं गेलं. त्यात परस्परसंबंध, भावना यांना अजिबात महत्त्व नव्हतं, मात्र हळूहळू लौकिक यश-अपयश, रक्तातील साखर, रक्तदाब कोलेस्टेरोल यापेक्षा अंतिम समाधानासाठी कौटुंबिक नातेसंबंध, मित्र परिवार आणि समाजाभिमुखता हे आवश्यक घटक असल्याचं संशोधकांच्या लक्षात येऊ लागलं. हे प्रदीर्घ संशोधन अंतिम टप्प्यावर नेणारं या संस्थेचे चौथे आणि सांप्रत डायरेक्टर रॉबर्ट वाल्डींगर यांनी या ८२ वर्षांच्या संशोधनाचा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष सांगितला तो असा, की ज्यांनी लौकिक यशाइतकीच कौटुंबिक, सामाजिक नाती जपण्याचा प्रयत्न केला, माणसं जोडली, जपली, ते आरोग्यपूर्ण, दीर्घायुषी आणि समाधानी ठरले. अशी नाती जपण्यासाठी आनंददायी तडजोड करावी, अहंभाव विसर्जित करावा आणि काही गोष्टी सोडून द्याव्या हे ज्यांना कळलं, त्यांना ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पहिलं पसायदानही कळलं असं म्हणायला हरकत नाही; ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे…’

nmmulmule@gmail.com

(सदर समाप्त)

Story img Loader