‘‘बायको घरीच असते म्हणून तिच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते आपल्याला. तिच्या वेळेची, आवडी-निवडीची, तिच्या दिसण्याचीच काय तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नसते. एवढं होऊनही कधी कुरबुर नसते तिची. जी आपली इतकी काळजी घेते, आपल्यासाठी आयुष्य वेचते तिच्याचकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो.”
‘‘का य रे, काय म्हणतंय तुझं रिटायरमेंट?’’ फोन लागल्या लागल्या मी दे.ना.ला विचारलं.
दे.ना. म्हणजे देविदास नामदेव फतफते. पण सगळेच त्याला लाडाने दे.ना.च म्हणायचे. जवळजवळ अठ्ठावीस र्वष सोबत काम केलेला माझा सहकारी. आमच्या ऑफिसमधून निवृत्तीची पहिली केस त्याचीच! माझ्यापेक्षा आठेक वर्षांनी तो मोठा असल्यानं तो लवकर निवृत्त झाला होता.
‘‘काही नाही रे, बसलो होतो. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल्स जरा व्यवस्थित लावून ठेवू या म्हटलं!’’ तो उत्तरला.
‘‘कागदपत्रं म्हटल्यावर व्यवस्थितच ठेवायला हवीत,’’ मी.
‘‘दररोज एकेक फाइल क्लीअर करतोय. काल घराचे कागदपत्र, घरपट्टी, मेंटेनन्सच्या पावत्या, शेअर सर्टिफिकेट, वगरे सगळे व्यवस्थित लावून घेतले. आज बँकेच्या खात्यांची झाडाझडती सुरूकेलीये. ड्रावर चेक करता करता कपाटात एक जुनं पासबुक मिळालं. पासबुकातल्या ३२ वर्षांपूर्वीच्या एंट्री बघून हसायला आलं.’’
‘‘ते कशामुळे?’’ मी.
‘‘चेकने कुणाला वीस रुपये दिलेय, कुणाला पंचवीस! ७६ सालातली पहिल्या पगाराची स्लिपही सापडली ३७५ रुपयांची! मग जाम जिवावर आलं अशा पावत्या फाडणं.’’  
‘‘जिवावर येणारच! ऋणानुबंध काय माणसांशीच असतात? ’’  मी.
‘‘खरंय ते! सध्या छान एन्जॉय करतोय मी माझी निवृत्ती! दररोजचा कार्यक्रम म्हणशील तर, सकाळी मस्त साडेसहाला उठावं. आंघोळ, चहा वगरे आटोपून हिला मदतीसाठी किचनमध्ये हजर व्हावं. साडेआठनंतर नाश्ता, मग गाठतो तोच आपला नेहमीचा स्टेशनचा रस्ता! नोकरीधंद्याला जाणारे नेहमीचे लोक भेटतात. बरं वाटतं. तासाभरानं रमतगमत कधी भाजी, कधी छोटा-मोठा किराणा घेऊन; तेही बायकोनं दिलेल्या लिस्टप्रमाणे बरं! जाम गडबड होते. दोनदा दोनदा चेक केलं तरी काही तरी विसरतोच आपण! तेव्हा हिचा पारा असा चढतो ना; बघण्यासारखंय एकेक! बाहेरून आलं की, हिला जरा भाजी वगरे कापून द्यावी. मग अकरा ते एक तुझी वहिनी हार्मोनियमच्या क्लासला जाऊन येते. ती आली की जेवण. मग पुढचं आपलं आहेच.’’
‘‘एकंदरीत बोअर होत नाहीये तर?’’ मी.
‘‘बोअर? दोन-चार वर्षांत तरी नाही होणार. आजपर्यंत मी एकदाही पिठाच्या गिरणीत गेलो नव्हतो..पण परवा तो योग आला. इतकं ऑकवर्ड वाटलं नाऽ.. डोक्यावर डबा घेणं बरं वाटेना म्हणून काखेत धरला. मिनिटांवरच्या गिरणीपर्यंत जाताजाता डबा दोनदा हातातून सटकला. तिसऱ्यांदा पडलाच! गहू सांडतासांडताच राहिले. माझी धडपड पाहून गल्लीतल्या टपरीवरली चार टाळकी आली धावत! त्यातल्याच दोघांनी – काय काका, साधा डबा धरता येत नाही? असं म्हणून माझी टांग खेचणं केलं सुरू! मलाही त्यांची फिरकी घ्यावी वाटली. म्हटलं, ‘बोलू नका! काखेत धरून गिरणीपर्यंत नेऊन दाखवा’, असं म्हटल्यावर कसंनुसं हसायला लागले.’’
‘‘मग?’’ मी विचारलं.
‘‘त्यातलाच एक पुढे आला.. पठ्ठा चारच पावलं चालला असेल की, त्याच्या हातूनही डबा धप्पदिशी पडला. डब्याचा घेर मोठा होता ना! गहूही सांडले. खि खिऽ करून बाकी तिघं त्याला चिडवू लागले, ‘गन्या, काकांपेक्षा तुलाच म्हातारा म्हनायला पाहिजे!’ मीही मनसोक्तहसलो. अख्ख्या गल्लीत तमाशा झाला, पण पोरांची मस्ती मात्र जिरली! त्या दिवसापासून बायकोला  सांगून टाकलं, पुढच्या वेळी गिरणीत मी दिवसा जाणार नाही म्हणून!’’
बोलताबोलता तो एकदम भावुक झाला.
‘‘बरं, वहिनी काय म्हणताहेत?’’ मी विषय बदलला.
‘‘तीच तर म्हणते! आपण फऽक्त ऐकायचं! कालचीच गोष्ट घे; जरा बसलो होतो पेपर चाळत. तो हिने ढीगभर कपडे टाकले पुढय़ात! मोजले तर वीस होते. ‘मोजता काय; इस्त्री करा!’ वरून फर्मान.’’
‘‘एवढय़ा कपडय़ांना तू घरी इस्त्री केली?’’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘‘काय करणार? इस्त्री न करण्याचं एक्सक्यूजच नव्हतं ना!’’
‘‘पुढे तर ऐक,’’ म्हणून तो पुन्हा बोलू लागला, ‘‘इस्त्री झाल्या झाल्या ठेवले ऐंशी रुपये तिने माझ्या हातावर! ही घ्या तुमची कमाई; संध्याकाळी मस्त आईस्क्रीम खाऊन या.’’
‘‘छान, काम केल्याचा काही तरी फायदा!’’
‘‘आपण नुस्ता फायदा-तोटाच बघतो मनू.’’  
‘‘म्हणजे?’’ मी.
‘‘सांगतो. असंच एके दिवशी तिला सहज म्हटलं; ‘दात जरा व्यवस्थित घासत जा, पिवळे दिसतायेत.’ ‘पुरेसा वेळच मिळत नाही हो!’ ती. ‘वेळ मिळत नसतो, काढायचा असतो. आता तर माझा डबा करायचाही प्रश्न नाहीये,’ मी असं म्हटल्यावर म्हणते कशी; ‘तुम्ही एक वेळचं जेवण बंद केलंय का? नाही ना; डबा नाही याचा अर्थ खायला लागत नाही असं थोडंच आहे. तुम्ही नसला तरी अनंताचा डबा आहे, त्याचं कॉलेजला जाणंही आहेच! निवृत्त तुम्ही झालायेत; मी नाही! तुम्ही घरी असल्यानं उलट डोक्याचा ताप मात्र वाढलाय.’ तसं हे ती वैतागून म्हणाली; पण खूप लागलं माझ्या मनाला. विचाराअंती लक्षात आलं. जिथं तिथं आपण फक्त फायदाच बघत असतो. संसारात तिच्यासारखं समरसून जाणं सात जन्मांत नाही जमणार आपल्याला.. पहाटे उठल्यापासून रात्री अंथरुणावर पडेपर्यंत जरा विश्रांती नसते तिला. चहा कर, डबा कर, पोरांच्या शाळा-कॉलेजचं बघ, कपडे धू, कपडे आवर, भाजी आण, बँकेत जा, सफाई अन् भांडीवाली नाही आली तर ते वेगळं टेन्शन! इलेक्ट्रिकचं बिल, बाबांची औषधं, दळणाचं बघ, अरे हो.. दळणावरून आठवलं, हिला तर पोटाचाही त्रास आहे. मग गिरणीत ही डबा कसा नेत होती देव जाणे! दिवस संपतो, रात्र अर्धी उलटते; हिच्या कामांची जंत्री मात्र काही संपत नाही! रोजची ही अशी सतराशे साठ कामं न चुकता करायची. या सगळ्या गोंधळात स्वत:चे केस िवचरायलाच काय रोजचा पेपर चाळायलाही तिला सवड मिळत नाही. जगातली बित्तंबातमी कळावी म्हणून चॅनल सìफग करीत असतो, पण घरात गहू संपलेय का तांदूळ; याचा आपल्याला पत्ताच नसतो! मला नेहमी वाटायचं रे; संध्याकाळी आपण ऑफिसमधून येतो त्या वेळी हिनं मळक्या गाऊनऐवजी मऽस्तपकी साडी घालून, गजरा-बिजरा माळून दारात आपली वाट पाहावी. तशी गोष्ट फारच छोटी.. पण  इतक्या वर्षांत एकदाही तसं जमून आलं नाही. या सगळ्यांचा एकदा अभ्यास केला तेव्हा बऱ्याच काही गोष्टी जाणवल्या.
ती घरीच असते म्हणून तिच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते आपल्याला. तिच्या वेळेची, आवडी-निवडीची, तिच्या दिसण्याचीच काय तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नसते. आपल्यासाठी आयुष्य वेचते तिच्याचकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो.’’  
‘‘खरंय तुझं म्हणणं! संसारगाडय़ाची दोरी तिच्या हाती सोपवून आपण होतो नामनिराळे,’’ मी.
‘‘नेभळटासारखं..हं! जे गेलं; ते आता जाऊ दे. निदान आयुष्याच्या उत्तरायणात तिच्यासारखं स्वत:ला झोकून देणं जरी शिकलो, तरी पन्नास टक्के तिला आराम मिळेल. राहून गेलेल्या गोष्टी करता येतील. तशी घरकामातनं पूर्ण रिटायरमेंट तर तीही घ्यायची नाही. मुळात घर म्हणजेच ती असते अन् ती म्हणजेच घर! ती असू दे तर झोपडीही चंद्रमौळी होते अन् ती नसू दे तर करोडोचे फ्लॅटही दगड-मातीच्या िभती ठरतील. चल चल चल, ठेवतो फोन. शेडय़ूल नको बिघडायला. अजून झाडझुड करायचीये,’’ असं म्हणून बोलता बोलताच त्याने फोन ठेवला.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Story img Loader