गेल्या जवळपास ६० वर्षांत मराठी रंगभूमीवरच्या ‘ती’च्या भूमिकांमध्ये बराच फरक पडला. प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करत निर्णयाची सूत्रे स्वत:च्या हाती घेणाऱ्या, तर काही काळाच्या खूप पुढच्या स्त्री भूमिका नाटककारांनी लिहिल्या. आजच्या काळात सामाजिक संदर्भ बदललेले असतानाही त्यातल्या अनेक स्त्री व्यक्तिरेखा आपल्या वाटतात. प्रेक्षकाला विचारात पाडतात. अशा निवडक स्त्रीनाट्यभूमिकांचा आविष्कार ‘लोकसत्ता’ आयोजित ‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमात नुकताच सादर झाला.
रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण स्त्री व्यक्तिरेखांमधून काळानुसार उत्क्रांत, प्रगल्भ होत गेलेल्या ‘ती’चं दर्शन घडवणारा, ‘लोकसत्ता’ आयोजित ‘‘ती’ची भूमिका’ हा कार्यक्रम नुकताच हा खास कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात रंगला. ‘ती’च्या मनोभूमिकांचं अवलोकन करण्याचा हा एक प्रयत्न. या कार्यक्रमात कालप्रवाहाचे विविध टप्पे आणि त्या त्या काळानुसार नाटककारांनी मांडलेल्या ‘ती’चा पाच निवडक नाट्यप्रवेशांतून वेध घेतला गेला.
समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब त्या त्या काळातल्या कला-साहित्यातून उमटतं. नाटक त्याला अपवाद नाही. काळाच्या एकेका टप्प्यात नाटककारांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण स्त्री व्यक्तिरेखांमधून बदलत गेलेले तिचे विचार, प्राप्त सामाजिक, कौटुंबिक, राजकीय परिस्थितीशी जुळवून घेत तिनं केलेला संघर्ष, स्वत:साठी घेतलेले निर्णय आणि त्याचे तिच्यासह भवतालावर उमटलेले पडसाद या सगळ्याचा धांडोळा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमातून घेण्यात आला. गेली काही वर्षं सातत्यानं सुरू असलेला हा कार्यक्रम एका अर्थी या स्थित्यंतरित होत गेलेल्या स्त्री भूमिकांच्या आढाव्याचा दस्तावेज ठरतो आहे. पुरुष नाटककारांनी मांडलेले स्त्रीत्वाचे विविध पैलू, शिक्षणापासून नातेसंबंधांपर्यंत आपली एक भूमिका घेऊन जगू पाहणाऱ्या स्त्री मनातली आंदोलनं, वेगवेगळ्या नात्यांच्या रंगात न्हाऊन निघतानाही स्वत्वाचा रंग जपण्यासाठी धडपडणारी स्त्री, असे विविध पैलू या प्रवासात उलगडत गेले. यंदा ‘‘ती’ची भूमिका’अंतर्गत सादर झालेले नाट्यप्रवेश हे स्त्रीनं वेळोवेळी स्वत:साठी घेतलेल्या निर्णयांचं स्वरूप आणि त्यांची व्यापकता यांचं यथार्थ दर्शन घडवणारे होते.
हेही वाचा : धूम्रपानातही स्त्रीपुरुष भेद!
स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत:ला घेता यावेत, इथपासून ते आयुष्याचा जोडीदार निवडताना तो लैंगिकदृष्ट्याही अनुरूप असायला हवा, हे स्पष्टपणे सांगणाऱ्या स्त्रीच्या निर्णायक भूमिकेचे विविध आयाम रसिकांसमोर मांडणारे नाट्यप्रवेश ‘लोकसत्ता’ आणि मुख्य प्रायोजक ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’च्या सहकार्यानं आयोजित ‘‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमात रसिकांच्या गर्दीनं भरलेल्या कालिदास नाट्यगृहात सादर झाले. ‘वीणा वर्ल्ड’, ‘उज्ज्वला हावरे लेगसी’ सहप्रायोजित, पॉवर्ड बाय ‘जमीनवाले प्रा. लिमिटेड’ असलेल्या ‘‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमाचं संयोजन उत्तरा मोने यांच्या ‘मिती क्रिएशन्स’नं केलं होतं. ढोबळमानानं काळाच्या दोन टप्प्यांवर स्त्रीच्या मनोभूमिकेचा वेध नाटककारांनी कसा घेतला होता, याची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या या कार्यक्रमाचं संहितालेखन हर्षदा बोरकर यांनी केलं होतं. पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर ते अगदी अलीकडच्या काळात रसिका जोशी, मिलिंद फाटक, श्वेता पेंडसे, या नाट्यकर्मींपर्यंतच्या लेखनातून उतरलेल्या नाटकांमधले पाच निवडक नाट्यप्रवेश रसिकांना बघायला मिळाले.
‘काळाच्या एकेका टप्प्यावर संघर्ष करून बदलासाठी ठाम वैचारिक भूमिका घेणाऱ्या, प्रसंगी क्रांतिकारी निर्णय घेतलेल्या स्त्रियांची जाज्ज्वल्य परांपरा आपल्या प्रांतानं अनुभवलेली आहे. या स्त्रियांची ओळख समाजाला व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशानं ‘‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं,’ अशा शब्दांत या खास रंगमंचीय आविष्कारामागचं प्रयोजन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी स्पष्ट केलं.
१९५८ मध्ये रंगभूमीवर पहिला प्रयोग झालेल्या पु. ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रवेशानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या ‘बेबी राजे’ आणि ‘दीदी राजे’ या दोन बहिणींची घुसमट आपल्यापर्यंत पोहोचवत अखेर आपल्याला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून वडिलांच्या तथाकथित प्रेमाचा हा पिंजरा तोडून बाहेर पडण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या या दोघी! त्यांच्या मनातली आंदोलनं अभिनेत्री अदिती देशपांडे आणि मानसी जोशी यांच्या अप्रतिम अभिनयातून रसिकांपर्यंत पोहोचली. पाठोपाठ विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचा प्रवेश सादर झाला. रंगभूमीवर वादळ उठवलेल्या या नाटकातील ‘लक्ष्मी’ आणि ‘चंपा’ या दोन भिन्न स्वभावाच्या स्त्रियांची गोष्ट रंगमंचावर जिवंत झाली. परिस्थितीमुळे सखारामसारख्या दारुड्या व्यक्तीबरोबर राहण्याची तडजोड स्वीकारणाऱ्या या दोघींची ‘मन की बात’ अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अदिती सारंगधर यांच्या अभिनयातून बोलकी झाली.
हेही वाचा : सांधा बदलताना : सिसिफस
दिग्गज नाटककारांच्या या दोन नाटकांबरोबर आधुनिक काळातल्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अलीकडच्या काळातल्या दोन नाटकांचे प्रवेशही सादर झाले.
डॉ. श्वेता पेंडसे यांनी लिहिलेल्या आणि त्यांचीच मुख्य भूमिका असलेल्या ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकातला प्रवेश त्यांनी डॉ. गिरीश ओक यांच्या साथीनं सादर केला. तर डिजिटल काळात भलेही अॅपच्या खिडकीतून खोट्या नावांनी एकमेकांशी संवाद साधत असली, तरी जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबद्दल प्रामाणिकपणे, थेट संवाद साधणारी नायिका रसिका जोशी-मिलिंद फाटक लिखित ‘व्हाइट लिली अँड नाइट राडयर’ या नाटकातून अनुभवता आली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता मिलिंद फाटक यांच्या सहज अभिनयानं हा प्रवेश बहारदार झाला.
नाटककार विश्वास सोहनी यांनी नाट्यरुपांतर केलेल्या आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘सांगते ऐका’ या दीर्घांकानं ‘‘ती’ची भूमिका’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
‘‘ती’ची भूमिका’ या कार्यक्रमात सादर झालेले नाट्यप्रवेश, त्यामागची नाटककारांची भूमिका अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या ओघवत्या निवेदनातून रसिकांपर्यंत पोहोचली.
reshma.raikwar@expressindia.com