स्त्रियांचं जसजसं सक्षमीकरण होत गेलं, तसतसं या पारंपरिक लिंगभावाधारित चौकटीही मोडायला सुरुवात झाली. पूर्णवेळ गृहिणीपदाकडून नोकरदार अशी स्त्रियांनी घेतलेली झेप समाजव्यवस्थेला मुख्यत: कुटुंब व्यवस्थेला धक्का देऊन गेली. त्यातूनच एक महत्त्वाचा ट्रेंड दिसू लागला तो म्हणजे, पुरुषांचं ‘हाऊस हसबंड’ असणं. या संकल्पनेची सुरुवात आज नव्हे तर, विसाव्या शतकाच्या पूर्वाधापासून सुरू झाली. ‘डोमेस्टिक हसबंड’, ‘स्टे अॅट होम डॅड’ आदी संकल्पना समाजगळी उतरू लागल्या. अर्थात पुरुषार्थाचं, पुरुषत्वाचं काय असा प्रश्न एकीकडे पडत असला तरी मुलांची, कुटुंबाची काळजी घेणं हेही आनंदाचं काम असू शकतं असं काही पुरुषांना तरी वाटत आहे, हीच बदलाची सुरुवात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

शीर्षकामध्ये ‘हाऊस हसबंड’ हा शब्दप्रयोग वाचून ‘तिच्या’ विश्वात ‘त्याचं’ काय काम?, असं वाटू शकेल. पण स्त्री जशी घडवली जाते. तसा पुरुषही घडवलाच जातो. तिने काय करावं, कसं राहावं, कसं जगावं याबद्दलच्या जशा ठोस धारणा असतात, तशाच धारणा त्याच्याबद्दलही असतात. विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यात या लिंगभावाधारित साचेबद्ध भूमिका महत्त्वाच्या ठरतात. नवरा-बायकोचं नातं हे रक्ताचं नसतं, आणि त्यामुळेच त्याला काळजीपूर्वक घडवणं महत्त्वाचं असतं. या प्रवासात कोणी कोणत्या भूमिका निभावाव्यात हेही कुठेतरी कळत नकळत मुरत जातं, त्याअनुषंगाने दोघांमधले सत्तासंबंध आकाराला येत असतात. वर्षामागून वर्षं जातात, तशा या भूमिका आणखीनच घट्ट होत जातात. त्यामुळे एक बायको म्हणून स्त्री जशी विकसित होते, तसंच नवऱ्याच्या भूमिकेत पुरुष कसा घडत जातो, याचं विश्लेषण करणं रोचक ठरतं. ‘पती’ असलेल्या पुरुषाचं आचरण आणि एकूणच जीवन कसं असावं, याबाबतच्या कल्पना अजूनही फारशा बदललेल्या नाहीत. आणि हे सगळ्या जगभरात लागू पडतं. अर्थात कालानुरूप या धारणांमध्ये काही वर्गात बदलही होताना दिसतात.

achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
vandana gupte article Freedom only for freedoms sake
‘ती’च्या भोवती…! स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्यासाठीच!
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
women empowerment challenges women experience in society
स्त्रियांचं नागरिक असणं!
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?

हेही वाचा >>> बुद्धिदेवता ओंकारब्रह्म

आपल्याकडे हल्ली किमान शहरी भागांमध्ये नवरा-बायकोचं नातं हे पूर्वीपेक्षा अधिक मोकळं आणि समान झालेलं आहे, हे मुद्दे पुढे येतीलच. आणि ते रास्तही आहेत. परंतु तरीही काही कळीचे प्रश्न उरतात. जसं की, रोज स्वयंपाक कोण करतं? या स्वयंपाकाचं नियोजन करणं ही कोणाची जबाबदारी असते? मुलांची सर्वाधिक जबाबदारी कोण उचलतं? त्यांच्या वेळापत्रकाचं नियोजन मुख्यत: कोण करतं? घरातल्या आजारी माणसांची सेवा करणं हे कोणाकडून अपेक्षित असतं? स्त्रियांनी पैसे कमावणं हळूहळू सर्वमान्य होत असताना तिने उत्तम गृहिणीही असावं, ही अपेक्षा अजूनही असते का? अगदी तशीच अपेक्षा पुरुषांकडून ठेवली जाते का? या सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तरं असतील, त्यावरून आपल्या मनातल्या नवरा-बायकोच्या भूमिका आणि एकूणच लिंगभावाधारित संकल्पनांना पडताळून पाहता येईल. आपले याबाबतचे विचार आणि समाजात प्रत्यक्ष दिसणारं चित्र यांची सांगड घालून पाहणंही आवश्यक आहे. आणि म्हणूनच, ‘बाहेर पडून पैसे कमावणारा पती’ आणि ‘घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारी पत्नी’ अशा सरधोपट तरीही खोल रुजलेल्या चौकटींना आव्हान देणं अजिबात सोपं नाही. परंतु त्याला आव्हान देणारं असं काही सगळ्याच समाजांमध्ये रुजत चाललेलं आहे, हेही नाकारता येत नाही. जागतिकीकरण, वाढतं स्थलांतर, रोजगार क्षेत्रातील स्त्रियांची वाढती टक्केवारी, लग्न आणि कुटुंब याबाबतीतल्या बदलत्या संकल्पना, बाजारपेठेचा आपल्या एकूण आयुष्यावर असलेला प्रभाव, नवीन माध्यमं आणि तंत्रज्ञान या सगळ्यांमुळे गेल्या काही दशकांत ‘जेंडर रोल्स’ म्हणजेच लिंगभावविषयक कल्पनांमध्येही मूलभूत बदल होताना दिसतात. त्यामुळे ‘हाऊस वाइफ’ म्हणजेच गृहिणींची जागा आता ‘हाऊस हसबंड’ म्हणजेच पूर्णवेळ गृहस्थ घेताना दिसत आहेत. अनेक सिनेमा-वेब सिरीजमध्ये यांचं चित्रण केलं जातं. संपूर्ण जगामध्ये आढळून येणारा हा एक महत्त्वाचा ‘ट्रेंड’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हेही वाचा >>> हात जेव्हा डोळे होतात…

या ‘हाऊस हसबंड’मुळे एकूणच पुरुषत्वाच्या संकल्पनेला मोठंच आव्हान दिलं जात आहे. पुरुष म्हटलं की तो कुटुंबाचा पालनकर्ता-तारणहर्ता असावा, त्याने घरात वचक ठेवावा, शक्यतो स्वयंपाकघरात पाऊल टाकू नये अशा काही संकल्पनांना याद्वारे मोडीत काढलं जातं. मात्र ‘हाऊस हसबंड’ म्हणतात, की पुरुषत्व गाजवण्यासाठी तुमच्या हातात सगळी सत्तासूत्रं असणं गरजेचं नाही. घरातल्यांची, मुलाबाळांची काळजी घेणं, स्वयंपाक करणं, खास ‘स्त्रियांसाठी’ म्हणून ठरवल्या गेलेल्या कामांमध्ये गुंतणं यामुळे तुमच्या पुरुषत्वाला जराही धक्का लागत नाही. काही अभ्यासांमध्ये असंही आढळून आलंय की, या नव्या भूमिकांमध्ये अनेक पुरुष समाधानी आणि आनंदी आहेत. उलट घराला आणि मुलांना वेळ देता येण्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यामध्येही बरीच सुधारणा झालेली आहे. आपली बायको घरी पैसे कमावून आणते, यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही. उलट आपल्या मुलांच्या संगोपनात आपण महत्त्वाचं योगदान दिल्याचं समाधान त्यांना मिळतं.

‘हाऊस हसबंड’ ही संकल्पना आज रूढ होत असली, तरी त्याची मुळं विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आहेत. इतिहासकार मार्गारेट मार्श लिहितात, ‘जशा स्त्रिया अधिकाधिक संख्येने राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या, घराबाहेर पडू लागल्या, तशा त्या आपल्या नवऱ्यांनीही कसा त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनांमध्ये बदल करायला हवा याबद्दल बोलू लागल्या. हळूहळू पुरुषांमध्येही ‘डोमेस्टिक हसबंड’ होण्याकडे कल वाढू लागला. म्हणजेच ते पूर्णत: घरात थांबू लागले, असं नाही. परंतु आपल्या घरात ते अधिकाधिक लक्ष मात्र देऊ लागले. आपल्या बायकोच्या, मुलांच्या गरजा समजून घेऊ लागले. स्त्रियांनी वेगवेगळ्या कारणांसाठी घराबाहेर पडल्याने हे बदल काही प्रमाणात का होईना, पण दिसायला लागले. एक नमूद करायला हवं, की हे बदल बरेचसे श्वेतवर्णीय, मध्यमवर्गीय घरांमध्येच मुख्यत: दिसून येत होते. रिचर्ड हार्डिंग डेव्हिस या प्रसिद्ध अमेरिकी लेखकाने तर अशीही तक्रार त्याच्या लेखात केली होती की, त्याच्या बऱ्याच मित्रांचा वेळ आपल्या सहचरासोबत घरात काम करण्यात आणि त्यांच्या सामाजिक वर्तुळात रमण्यातच जातो. ही गोष्ट एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडची. त्यावेळेस या सगळ्यामुळे पारंपरिक ‘पुरुषत्वाला धक्का लागतोय की काय, अशा चर्चाही केल्या गेल्या. परंतु एक मात्र नक्की, की स्त्रियांचं जसजसं सक्षमीकरण होत गेलं, तसं या पारंपरिक लिंगभावाधारित चौकटीही मोडायला सुरुवात झाली. हे अधोरेखित करायला हवं, की हा ‘ट्रेंड’ म्हणजे अजूनही एक नवलाईच आहे. लिंगभावाच्या मुरलेल्या कल्पना बदलणं हे सोपं काम नाही. पण अत्यल्प प्रमाणात का होईना, पुरुषसुद्धा पूर्णवेळ ‘केअर-गिव्हर्स’ची (काळजी घेणाऱ्याची) भूमिका आनंदाने निभावत आहेत, याची नोंद घ्यायला हवी.

अमेरिकेत पूर्णत: पालकत्व आणि घराची जबाबदारी घेणाऱ्यांना ‘स्टे अॅट होम’ पालक म्हणायची पद्धत रूढ आहे. यात अर्थात ‘स्टे अॅट होम मदर्स’ची म्हणजेच गृहिणींची संख्या अधिक आहे. परंतु यात अनेक ‘स्टे अॅट होम डॅड’ (वडील) देखील आहेत. २०१० मध्ये बोस्टन कॉलेजने केलेल्या एका अभ्यासानुसार अशा ‘स्टे अॅट होम’ पालकांची संख्या दशकभरात वाढली असल्याचं नोंदवण्यात आलं. परंतु त्यातले तीन टक्केच वडील होते. त्यात असंही म्हटलं गेलं की, हे वडील त्यांच्या या नव्या भूमिकेत स्वत:हून आलेले होते आणि आनंदी होते. आपल्या पाल्याकडे ते पूर्ण लक्ष देत असल्याने त्यांच्या सहचरही आनंदात होत्या. २०१३ मध्ये अशाच प्रकारचा अहवाल ‘इलिनॉय विद्यापीठा’ने प्रकाशित केला. त्यात मात्र त्यांनी असं नोंदवलं की, बहुतेक पुरुष हे गृहस्थ होणं पत्करतात कारण त्यांना बाहेर कुठेही रोजगार मिळू शकत नाही, किंवा ते अपंग असतात. स्वत:हून ‘केअर-गिव्हर’ ची भूमिका बजावायला तयार असणारे पुरुष अत्यल्पच होते आणि आहेत.

वाचकांना आठवत असेल तर, काही आठवड्यांपूर्वी याच लेखमालेत आपण मातृत्वाच्या रजेची चर्चा केली होती, ज्यात पितृत्वाच्या रजेबद्दलही विश्लेषण होतं. अशी रजा घ्यायलाही बरेच पुरुष फारसे उत्सुक नसतात, कारण त्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी गमवायची भीती असते. तीच टांगती तलवार स्त्रियांवरही असते, पण त्यांना मात्र अनेकदा ‘स्टे अॅट होम मॉम’ झाल्याशिवाय पर्याय उरत नाही. लिंगभावी चौकटींना धक्का देणं अवघड असतं. ते असं.

मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवर ‘द वे ऑफ हाऊस हसबंड’ ही एक अॅनिमेटेड सीरिज प्रदर्शित झाली. त्यावर बरीच चर्चा घडली होती. या जपानी अॅनिमेटेड सीरिजमधला ‘तात्सु’ हा नायक ‘हाऊस हसबंड’ आहे. तो त्याच्या पूर्वायुष्यात खरंतर ‘सिस-मॅन’ म्हणजेच पारंपरिक बलवान पुरुष असतो, नावाजलेला गँगस्टर असतो. पण काही घटना अशा घडतात की, तो घरात राहण्याचा निर्णय घेतो. त्याची बायको करियर करणारी, घरकामात फार लक्ष न घालणारी आहे. तात्सु त्यांच्या गँगस्टरच्या आयुष्यात मिळवलेले धडे हळूहळू घरात लागू करायला लागतो. जसं की, ‘आपण घातलेला गोंधळ आपणच सावरायचा असतो.’ हे तत्त्व. स्वयंपाकघरात झालेली सांडलवंड असू दे किंवा अचानक घरात उद्भवलेली आणीबाणीची परिस्थिती. एक ‘गृहस्थ’ झालेला उंच पीळदार पुरुष हे सगळं कसं निभावतो, हे फार मनोरंजकरीत्या दाखवलेलं आहे. या मालिकेमध्ये स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक लिंगभाव भूमिका अगदी सहजरीत्या बदललेल्या दाखवल्या आहेत. विनोदी आणि उपरोधिक शैलीचा खुबीने वापर करत घरकाम हे इतर कामांपेक्षा कमी नाही, यावर केलेलं हे हल्लीच्या काळातील प्रभावशाली चित्रण आहे.

एवढं सगळं असूनही, ‘पूर्णवेळ गृहस्थ’ होणं हे पूर्णवेळ गृहिणी होण्याइतकंच सर्वमान्य नाही. ‘तिच्या’ विश्वात ज्या झपाट्याने बदल होत आहेत, त्याच वेगाने ‘त्याच्या’ जगात बदल घडायला हवे आहेत. स्त्री-पुरुषांच्या बदलत्या भूमिकांबाबत समाजात मोकळं वातावरण निर्माण व्हायला हवं. एखाद्या पुरुषानं अशी ‘वेगळी’ निवड केल्यास त्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहायला नको. आपण एकत्रितरीत्या असा दृष्टिकोन कसा विकसित करू शकतो, यावर विचार करायला हवा.

gayatrilele0501 @gmail.com