प्रत्येकालाच आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. काही जण मुलाची नोकरी, आजारपण, मुलीचं लग्न, धंद्यातील भरभराट, अपत्यप्राप्ती अशा एक ना अनेक प्रश्नांना भिडताना, त्याची झटपट उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात कुणा भोंदू बुवा-बाबाच्या आहारी जाऊन त्याच्या शोषणाला बळी पडतात. अशा प्रसंगांत स्त्रियांचं शोषण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आवश्यकता असते ती सावध आणि सजग असण्याची…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोंदू बुवा-बाबांच्या दरबारात होणारं लोकांचं शोषण हा अतिशय चिंतेचा विषय आहे. समाजात आरोग्यविषयक सुविधांची वानवा, दैववादी मानसिकता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. या तथाकथित बुवा-बाबा-माता यांच्या भोंदुगिरीविरोधात समाजात आवाज उठवण्याऐवजी त्यांच्याकडून दैवी उपचार करून घेणारे एका बाजूला स्वत:चं शारीरिक, आर्थिक नुकसान तर करून घेतातच, परंतु यामुळे समाजात चुकीचा संदेशही जातो. वैफल्यग्रस्त स्त्रिया अशा लोकांच्या भूलथापांना लवकर बळी पडण्याची शक्यता असते. प्रसंगी त्यातून अनेकदा त्या शारीरिक शोषणाचीही शिकार होतात. त्यातलाच हा एक अस्वस्थ करणारा अनुभव.

रविवारची सकाळ. चळवळीतील ज्येष्ठ सहकाऱ्यांचा फोन आला. म्हणाले, ‘‘आमच्या परिसरात जालव नावाच्या भोंदू बाबाचा खूप सुळसुळाट झाला आहे. कुणाला मूल होत नाही, घरात कुणी सतत आजारी पडतंय, कुणाला नोकरी लागत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, या कारणांवरून हमखास उपचाराच्या नावाखाली आर्थिक, शारीरिक शोषण करतो आहे. एका तरुणाने त्याची तक्रार केली आहे.’’

मी त्या तरुणाचा दूरध्वनी क्रमांक घेतला. त्याच्याशी चर्चा केली. त्याने त्याच्याच गावातील आणखी दोन प्रकरणे सांगितली. तो म्हणाला, ‘‘माझ्या बहिणीचं लग्न जमत नाही, म्हणून आई त्या बाबाकडे तिला घेऊन गेली. बाबाने लिंबू आणि उदी दिली. पुढे पाच खेटी (पाच वेळा येण्याबाबत) मारण्याबाबत सांगितलं.’’ पैकी दुसऱ्या खेटीस तो म्हणाला की, ‘‘तुमच्या मुलीला पौर्णिमेला संगमावर अंघोळ घालावी लागेल.’’ त्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी प्रवरा-गोदा संगमावर माझ्या बहिणीला अंघोळीसाठी आई घेऊन जाणार असल्याचं मला समजलं. मी विरोध केला, मात्र आईने न जुमानता पौर्णिमेच्या दिवशी बहिणीला संगमावर नेऊन अंघोळीसाठी बाबाच्या हवाली केलं. पुन्हा पुढच्या पौर्णिमेला तोच प्रकार. त्यापुढच्या पौर्णिमेला मात्र मी आईला समजू न देता संगमावर जाऊन थांबलो. बाबाने बरोबर दुपारी बाराच्या दरम्यान एका तरुणीला अंघोळ घातली. ते दृश्य आक्षेपार्ह होतं. त्यानंतर बरोबर सात मिनिटांनी माझ्या बहिणीला अंघोळीसाठी नदीपात्रात नेलं. मी तातडीनं तिथं जाऊन अंघोळ घालण्यास हरकत घेऊन बहिणीला घरी घेऊन आलो. आमच्या घरात वाद झाले. मी त्या बाबाचे काही फोटोही काढले आहेत.

दर रविवार, सोमवार, अमावास्या, पौर्णिमेला या बाबाचा दरबार भरतो. पुढच्याच आठवड्यातील रविवारी बाबाच्या या दरबारात पाहणीसाठी जाऊन येण्याचं ठरलं. पहाटे चार वाजताच मी घरातून बाहेर पडले. कारण सकाळी दहा वाजेपर्यंत दरबार गाठायचा होता. ठरल्याप्रमाणे सकाळी सुमारे १५० कि.मी.चा प्रवास करत बाबाच्या दरबारात सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान पोहोचले. तालुक्याच्या गावापासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या शेतात बाबाचा दरबार भरला होता. आज फक्त दरबाराची पाहणी करायची होती. तीसुद्धा लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं. सुमारे दोन तास दरबाराच्या परिसरात फिरले. बाबाच्या अनेक भक्तांकडून बाबाचा ‘करिश्मा’ ऐकत होते. बाबाची कार्यपद्धती जाणून घेतली. दुसऱ्या दिवशी सहकाऱ्यांसोबत या प्रकरणाबाबत चर्चा केली आणि पुढील रविवारी बाबाच्या दरबारात पुन्हा जाऊन भांडाफोड करण्याचं ठरलं. दरम्यान, तक्रारदार तरुणानं त्या अंघोळीचे फोटोही मला पाठवले होते.

दिवस ठरल्याप्रमाणे पुढील रविवारी सकाळी ८ वाजता तालुक्याच्या गावी जाऊन संबंधित पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांना अर्ज देऊन पोलीस मदत मिळण्याबाबत विनंती केली. पोलीस मदत मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये सकाळचे ११ वाजले. सोबत साध्या वेशातील दोन पोलीस, एक स्त्री सहकारी कार्यकर्ता, अन्य सात कार्यकर्ते आणि मी असे सर्व दरबाराच्या दिशेने निघालो. सकाळी ११.३०च्या दरम्यान सर्व कार्यकर्ते व पोलिसांना काही विशिष्ट अंतरावर थांबायला सांगून मी आणि दोन कार्यकर्ते बाबाच्या दरबारात पोहोचलो. तिथं भली मोठी रांग लागलेली होती. आमची वेळ येण्यापूर्वीच तेथील एका सेवेकऱ्यानं मला बेल-फूल विकत आणून तेथील महादेवाच्या पिंडीवर वाहायला सांगितलं. मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर बेल-फूलवाला बसला होता. त्याच्याकडे बेल-फूल घ्यायला जात असतानाच माझ्या मागावर कुणी तरी येत आहे याची मला जाणीव झाली. बेल-फूलवाल्याने मला कुठून आलात? काय प्रश्न आहे वगैरे… सविस्तर माहिती विचारली.

मागावर आलेली व्यक्ती तिथंच होती. मी मंदिरात जाऊन बेल-फूल वाहात असताना मला महादेवाच्या पिंडीवर १०१ रुपये ठेवण्यास सांगण्यात आलं. फूल वाहून १०१ रुपये ठेवून मी रांगेत येऊन बसले. रांग पुढे-पुढे सरकत होती. माझ्या मागेही रांगेत येऊन थांबलेल्या लोकांची खूप मोठी रांग लागली होती. लोक स्वत:चे प्रश्न न सांगताच बाबाला त्यांचे काय प्रश्न आहेत ते कळत होतं. कुणाला उदी, लिंबू देत होता, तर कुणाला २१ खेटी घालण्यास सांगत होता, कुणाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र पुटपुटत होता, तर कुणाला संगमावर जाऊन अंघोळ करावी लागेल असं सांगत होता. मला बोलावल्यावर मी बाबासमोर जाऊन बसले. मला बाबाने माझ्या काही प्रश्नांबाबत विचारले. मी म्हणाले, ‘‘माझे हे प्रश्न नाहीत.’’ कारण मी फूल विक्रेत्याला सांगितलेलीच माहिती बाबा पुन्हा मला विचारत होता. मी जाणीवपूर्वक फूल विक्रेत्याला वेगळीच माहिती सांगितली होती. मी त्या बाबाला सांगितलं की, ‘‘माझ्या लग्नाला १८ वर्षं झाली. मला मूल-बाळ नाही, नवरा व्यसनी आहे, रात्रंदिवस नशेत असतो, मला झोप येत नाही.’’ त्यावर बाबाने डोळे मिटून मंत्र पुटपुटला. माझ्या कपाळाला उदी लावली आणि विचारलं, ‘‘आता कसं वाटतं?’’ मी बरं वाटल्याचं सांगितलं. बाबा म्हणाला की, ‘‘तुम्हाला ११ खेटी कराव्या लागतील. नवऱ्याला एक वेळ खेटीला आणावं लागेल.’’ मी म्हणाले, ‘‘नवरा खेटीला येणार नाही. तो चांगला असता तर मी कशाला इथं आले असते ?’’ त्यावर बाबाने मला खेटी घालायला सांगितल्या. तोपर्यंत मी विशिष्ट खूण करून कार्यकर्त्यामार्फत पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी बाबाला ‘‘गाडीत बस आणि पोलीस ठाण्याला चल’’ असं म्हणताच बाबा म्हणाला की, ‘‘माझ्याविरुद्ध कोणी तक्रार केली?’’ ‘‘मी तक्रार केली,’’ असं मी म्हणताच आजूबाजूच्या लोकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. जमावात चलबिचल झाली. जमाव आक्रमक होण्याच्या आत कार्यकर्ते व पोलिसांनी बाबाला गाडीत बसवलं व आम्ही सर्व पोलीस ठाण्याला आलो. तोपर्यंत दुपारचा एक वाजत आला होता. पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक कक्षामध्ये भोंदू बाबा व आम्ही कार्यकर्ते बसलो असताना बाहेर भोंदू समर्थकांची गर्दी जमली होती. ६०० ते ७०० लोक बाहेर जमा झाले होते. इकडे आत आम्ही भोंदू बाबावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती.

‘‘ मी कुणी तुझी भक्त नसून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती व वकील आहे,’’ असं त्यास सांगितलं. त्याच्या तोंडून पोलीस निरीक्षक आणि आम्ही महत्प्रयासाने सत्य वदवून घेतलं. त्यावरून कळलं की, हा माणूस भोंदूगिरी करण्यासाठी वापरत असलेल्या शेतीचा भाग पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या एका हवालदाराचाच आहे. त्याची बदली दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे. त्याच्या शेतात महादेवाचं मंदिर त्या दोघांनी मिळूनच बांधलं होतं. फूल विकणारा त्या हवालदाराचा भाऊ आहे. ‘‘आम्ही हा व्यवसाय पातीमध्ये (भागीदारीत) करतो. मी अंदाजे ठोकताळ्यावर उत्तर देतो. काही लोकांच्या घरीही मी जातो,’’ असं त्यानं आम्हाला सांगितलं. आम्ही त्याला हाच मजकूर स्टॅम्पपेपरवर लिहून देण्यास सांगितलं. बाहेर बाबा समर्थक जमाव गोंधळ घालत होता. बाबाने सांगितल्याप्रमाणे सर्व सविस्तर स्टॅम्पपेपरवर लिहून दिलं व यापुढे मी भोंदूगिरी बंद करेन, असंही लिहून दिलं.

या बाबाने लिहून दिलेला स्टॅम्पपेपरवरील मजकूर एका हवालदारामार्फत आम्ही जमावाला वाचून दाखवला. कारण जमावात त्याच्या फसवणुकीचा आणि भोंदूगिरीचा संदेश जाण्याच्या दृष्टीने ते गरजेचं होतं. त्यानंतर मात्र लगेचच जमावातील लोक पांगण्यास सुरुवात झाली. लोकांची गर्दी ओसरली. योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून आम्ही तेथून बाहेर पडलो. बाबाचा दरबार बंद झाला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या आल्या. अनेक लोकांचे दूरध्वनी आले. अनेकांनी समाधान व्यक्त केलं. या कारवाईनंतर अनेक लोकांनी बाबाकडून झालेल्या फसवणुकीचे आणि शोषणाचे किस्से ऐकवले. कुणाला मूल होत नाही म्हणून धरबंधन करायला बाबा त्यांच्या घरी जाऊन राहायचा, तर तरुण मुलींचं लग्न जमावं म्हणून मुलींना मंदिरात ध्यानाला बसवायचा, कुणी दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीस धागे-दोरे देऊन व खेटी घालून पूर्ण रोगमुक्त करण्याचं आश्वासन द्यायचा. प्रश्नकर्त्याच्या घरी जाऊन उपचार करण्याचे दरही ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचे होते. पुत्रप्राप्तीसाठी बाबाच्या हातून संगमावर अंघोळ केलेली एक तिशीतील स्त्री त्याच दिवशी त्याच गावात मला येऊन भेटली होती. बाबाच्या हातून सलग दोन वेळा तिनं अंघोळ केली. बाबाचा हेतू चांगला नसल्याचं तिनं सांगितलं. त्या दोन अंघोळीनंतर बाबाने सलगी वाढविण्याचा प्रयत्न केल्यामुळे खेटी बंद केल्याचं तिने सांगितलं. ‘‘अनेक लेकी-बाळींना तुम्ही बाबाच्या तावडीतून वाचवलं,’’ असंही ती म्हणाली कारण संगमावर तो फक्त स्त्रियांनाच अंघोळघालत असे, पुुरुषांना नाही. त्यानंतर भोंदूगिरीसंबंधाने वर्तमानपत्रात लेख लिहिणं, समाजात जाऊन बोलणं, कार्यक्रम घेणं हे सातत्यानं चालणारं काम सुरूच आहे.

आजच्या गतिमान युगात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अनेकांना मुलाची नोकरी, घरातील आजारपण, मुलीचं लग्न, धंद्यातील भरभराट, अपत्यप्राप्ती अशा एक ना अनेक प्रश्नांना भिडताना, सामोरं जाताना योग्य उत्तर शोधणं, योग्य उपाय योजणं आवश्यक असतं; परंतु अज्ञानामुळे झटपट उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात अशा भोंदूच्या आहारी अनेक लोक जातात आणि शोषणाला बळी पडतात. स्त्रिया असतील तर त्यांचं शारीरिक शोषण होण्याची शक्यता जास्त असते.

आजूबाजूला घडणारे प्रसंग, वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांमुळे मुली-स्त्रियांवर होणारे आश्रमातील, भोंदू बाबाच्या दरबारातील अत्याचार, शोषण हे सर्व आपण वाचत असतो. ऐकत असतो. महाराष्ट्राला संतपरंपरा लाभलेली आहे. ‘‘ऐसे कैसे जाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू। अंगी लावूनिया राख। डोळे झाकुनी करती पाप।’’ असे संत तुकारामांनी भोंदूगिरीवर झोड उठवताना म्हटलं आहे. परंतु यातून बोध घेऊन समाजाला भोंदूंपासून सावधगिरी बाळगत दूर राहणं आवश्यक आहे. बहिणीला भोंदूकडे नेणं, संगमावर अंघोळ घालणं, या कारणाने अस्वस्थ झालेल्या तरुणामुळे या भोंदूगिरीला तोंड फुटलं. अशा सजग तरुणांची आणि तरुणींचीही संख्या समाजात वाढणं गरजेचं आहे.

(या लेखातील व्यक्तीचे नाव बदलले आहे.)