डॉ. अंजली जोशी
शहरात मल्टिनॅशनल कंपनीत आपल्या मुलांना नोकरी लागणं आई-बाबांसाठी खूप प्रतिष्ठेचं असतं. असं घडलं, की ते चार जणांना सांगितलं जातं, मुलांचं प्रचंड कौतुक केलं जातं, पण मोठय़ा कंपनीत लागलेली नोकरी नेहमीच आनंदाची नसते. कित्येकदा नोकरदार मुलंमुली नोकरीतला ताण ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशा विचित्र अवस्थेत असतात. आपली आई-बाबांच्या मनातली प्रतिमा उध्वस्त व्हायला नको आणि त्यांना टेन्शन नको, या कारणास्तव मनातच ठेवलेली त्यांची ‘अंतरीची व्यथा’ कुणी समजून घेईल का?..
आईचा फोन परत वाजला. काल रात्रीही दोनदा येऊन गेला. पण कामातून डोकं बाहेर काढता येत नव्हतं. समोर आमचा प्रोजेक्ट मॅनेजर सुमित दिसत होता. त्यानं दिलेली डेडलाईन पाळल्याशिवाय गत्यंतर नाही. फोन तर सोडाच, पण मेसेज करायलाही वेळ मिळाला नव्हता. झोपही धड लागली नाही. कितीदा सांगितलंय आईबाबांना, की ऑफिसमध्ये फोन करत जाऊ नका म्हणून! इथे सगळे जण ‘पीसी’मध्ये डोकं खुपसून गंभीरपणे बसलेले असतात. ‘कामात आहे’ असा मेसेज आईला केला. तरी काही र्अजट तर नसेल, अशी चुटपुट लागून राहिलीच. लंच टाइम झाल्या झाल्या आईला फोन केला. ‘‘विशेष काही नाही रे! चार-पाच दिवसांत फोन केला नाहीस. काळजी वाटत होती.’’ ती म्हणाली.
‘‘फक्त तेवढय़ासाठी एवढय़ा वेळा फोन केलास?’’ मी जाम उखडलो. माझा चढलेला स्वर तिला कळला असणार. ‘‘तसं नाही रोहन.. फोन नाही, मेसेजही नाही! एकटा राहतोस एवढय़ा मोठय़ा शहरात.. काळजी वाटणार नाही का?’’ ती पडत्या स्वरात म्हणाली. ‘‘नका ना करू मग काळजी! नोकरीला लागलोय आता. कामात असलो की नाही वेळ मिळत.’’ मी अजून घुश्शातच होतो. ‘‘मेसेज करायलाही वेळ नसतो?’’ तिनं परत नेटानं विचारलं.
‘‘हं! नवीन प्रोजेक्ट आहे.’’ मी फोन आवरता घेत म्हटलं.
इथलं काम म्हणजे जोक वाटतो का आईबाबांना? वाटलं, काही र्अजट असेल, तर इतकं फुसकं कारण! माझी चिडचिड वाढत चालली.
सुमितला भेटायला गेलो, तर त्याच्या कपाळावर आठय़ा होत्या. ‘‘असा असतो रिपोर्ट? ‘बेंच’वर होतास ना इतके दिवस? मग वेळेचा सदुपयोग करायचा की! का नुसताच टाइमपास करत होतास?’’ तो फूत्कारत म्हणाला. मला काय बोलावं हेच सुचेना.
‘‘अरे, नुसता बघत काय राहिला आहेस? कामाला लाग. मी खुणा केल्या आहेत. त्या दुरुस्त करून परत दाखव.’’ त्यानं कामाची दुसरी फाइल उचलत म्हटलं.
जागेवर जाऊन मी रिपोर्ट उघडला आणि काम सुरू केलं. चुका सुधारायला गेलो, तर परत नवीन चुका होतील का? या धास्तीनं परत चुका व्हायला लागल्या. रात्रभर जागून हा ड्राफ्ट तयार केला, पण सुमितनं शब्दांच्या एका फटकाऱ्यानं मेहनतीचा कचरा केला. कसा रिपोर्ट अपेक्षित आहे, याचं काहीच ब्रीिफग नाही. त्याच्याबद्दलचा राग मनात ठासून भरला जाऊ लागला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधून या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली तेव्हा स्वर्ग दोन बोटं उरला होता. बाबांनी तर अख्ख्या गावाला पेढे वाटले होते. आता नोकरीसाठी शहर गाठायचं होतं. कंपनीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा हरखूनच गेलो. प्रशस्त आवारातली काचेची सुबक इमारत. ‘‘पंचतारांकित हॉटेलसारखी दिसतेय रे तुझी कंपनी!’’ व्हिडीओ कॉलवरून परिसर दाखवला तेव्हा बाबा म्हणाले होते.
ट्रेिनग महिनाभर चाललं होतं. महिन्याअखेरीस कुठला प्रोजेक्ट हातात पडेल याची उत्सुकतेनं वाट पाहत असतानाच ‘एच.आर.’चं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं- ‘सुयोग्य प्रोजेक्ट उपलब्ध नसल्यामुळे सध्या तुम्हाला ‘बेंच’वर ठेवत आहोत.’ माझ्या सगळय़ा उत्साहावर पाणी पडलं. मोठय़ा कंपनीत काही जणांना ‘बेंच’वर राहावं लागतं, हे ऐकलं होतंच. पण ती वेळ प्रत्यक्षात स्वत:वर येईल अशी मात्र कल्पना केली नव्हती. कंपनीत नुसतं यायचं, ९ ते ७ बसायचं, पण काम काहीच नाही. प्रोजेक्ट कधी मिळेल याची वाट पाहत बसायची.
माझ्यासारखे ‘बेंच’वर कमी-जास्त कालावधी असलेले अजून काही जण कंपनीत होते. एकत्र भेटलो की प्रत्येक जण काहीबाही सांगायचा. मोहित म्हणायचा, ‘‘या कालावधीत जितके ऑनलाइन कोर्स करता येतील तेवढे करून घेऊ.’’ मी काही केलेही. पण नुसतं शिकून उपयोग काय? त्यांचा अवलंब करायला प्रोजेक्टच मिळाला नाही तर शिकण्यावर गंज चढतो. सूरज म्हणायचा, ‘‘काय मजा करायची ती आताच करून घ्या. मोबाइलचा सदुपयोग करायची हीच तर वेळ आहे!’’ पण मला हे कधीच अमलात आणता आलं नाही. रिकाम्या वेळेची मजा रिकामपणात नसते, तर कामात असताना असते. जेवढा एक एक दिवस ‘बेंच’वर काढायला लागतोय, तेवढं जगाच्या बाजारात आपलं मूल्य कमी होतंय, ही बोचरी जाणीव मनाला कुरतडत असताना अशी मजा करणं अशक्य होतं.
दुसऱ्या कंपनीत अर्ज केला, तर तू आधीच्या कंपनीत काय केलंस? कुठले प्रोजेक्ट केलेस? इतकी नावाजलेली कंपनी का सोडत आहेस? याचं काय स्पष्टीकरण देणार? ‘बेंचवर होतो, थोडक्यात निरुपयोगी होतो’ हे उघड करून स्वत:च्या पायावर धोंडा कसा मारून घेणार? इतक्या लवकर कंपनी का सोडलीस, हा प्रश्न येणारच! ‘छोटय़ा-मोठय़ा कारणांसाठी तुम्ही नोकऱ्या बदलता, संयम बाळगत नाही,’ असे शिक्के आधीच आमच्या पिढीवर बसले आहेत. त्यावर अधिक शिक्कामोर्तब होण्याखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही.
प्रताप म्हणाला, ‘‘अरे, इथे दोन-दोन वर्षही ‘बेंच’वर बसवतात.’’ ते आठवलं तरी धडकी भरायची. पुढे काय, हा प्रश्न ‘आ’ वासून उभा असायचा. प्रोजेक्ट मॅनेजरकडे फेऱ्या मारायचो. काही तरी फुटकळ कामं मिळायची, पण ‘सी.व्ही’वर दाखवण्यासारखी नाहीत. मन निराशेनं काळवंडून जायचं.
प्रोजेक्टवर काम करणारे तुच्छतेनं पाहायचे. ‘‘आम्ही इथे मरमर मरतो आणि हे बघा फुकटे! काम न करता पगार घेतात..’’ एकदा कॅन्टीनमध्ये एकाचं बोलणं कानावर पडलं आणि कानशिलं तापून निघाली. जोरात ओरडून सांगावंसं वाटलं, ‘‘फक्त बेसिक पगार मिळतो आम्हाला. पर्क्स नाहीत, इन्क्रिमेंट नाही, प्रमोशन नाही. नोकरकपातीची वेळ आली की पहिल्यांदा ‘बेंच’वर असलेल्यांना काढणार.. आणि यात आमचा काही दोष नसताना! सहानुभूती दाखवण्याचं सोडून वर टोमणे मारता?’’
घरी आलो की आईबाबांचा ठरलेला फोन असायचा. ‘‘काम जमतंय ना?’’ बाबा विचारायचे.
‘‘छान चालू आहे.’’ मी उसनं अवसान आणायचो. ‘‘कंपनीतले लोक कसे आहेत? सांभाळून घेतात ना रे?’’ आई विचारायची.
‘‘हो. मदत करतात खूप.’’
‘‘रोहन, अरे पूर्वीसारखा बोलत नाहीस.. टेन्शनमध्ये आहेस का? बोल आमच्याशी मोकळेपणानं.. आम्ही येऊ का तिथे?’’
आई विचारायची.
काय काय सांगू शकणार होतो मी त्यांना? या शहराची स्वत:पुरतं बघणारी अलिप्त संस्कृती? खाण्यापिण्यासाठी दामदुपटीनं मोजावे लागणारे पैसे? बेचव अन्न? ज्या छोटय़ा खोलीत
पेइंग-गेस्ट म्हणून राहतोय, तिथल्या रोजच्या कटकटी? आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे धन्य आणि कृतार्थ वाटतंय त्या कंपनीत काम नसल्याचं बोचरं दु:ख?..
मग मी म्हणायचो, ‘‘सगळं छान चालू आहे. तुम्ही यायची गरज नाही.’’ पण छानपणाचे हे खोटे मनोरे कधी तरी कोसळून पडतील याची भीती सरसरून वर यायची. ती मनाचा पुरता कब्जा घेण्याआधीच मी फोन ठेवून द्यायचो. शेवटी आठ महिने प्रतीक्षा करून हा प्रोजेक्ट मिळाला, तेव्हा जिवात जीव आला. पण टेन्शन काही कमी होत नाही.
रिपोर्ट सुधारून मी सुमितला पाठवला आणि पाचव्या मिनिटाला त्याचा मेसेज झळकला, ‘तातडीनं भेट.’ धडधडत्या अंत:करणानं मी त्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यानं अशा काही नजरेनं माझ्याकडे पाहिलं की मी जागच्या जागी गोठून गेलो.
‘‘काम मनापासून केलं पाहिजे. पाटय़ा टाकल्यासारखं नव्हे. तुमची पिढीच मुळी शॉर्टकट मारण्यात तरबेज आहे. पुढे क्लायंटकडे गेल्यावर प्रॉब्लेम येईल याचा विचार नाही. टाइमपास करण्यात लक्ष, म्हणून असा परफॉमन्स दिसतोय.’’ त्याचा थयथयाट चालूच होता. कॉलेजमध्ये मी पहिल्या पाचांत होतो, हे त्याला सांगण्याची हिंमत झाली नाही. मला हे कळत नव्हतं, की रिपोर्टमध्ये मी नक्की काय सुधारायला पाहिजे.
‘‘प्रत्येक गोष्ट काय मी सांगायला पाहिजे? कॉमन सेन्स नाही का वापरता येत? आणि मीच जर सगळं करायचं असेल तर तू कशाला हवास? शेवटची संधी देतोय. उद्या सकाळपर्यंत सबमिट कर. त्यातही चुका निघाल्या तर मला ‘एच.आर.’ला कळवण्याशिवाय गत्यंतर नाही.’’ त्याचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. ‘एच.आर.’ला कळवणार म्हणजे ‘पी.डी.पी.’ लागणार? ज्यांचा परफॉमन्स समाधानकारक नाही, त्यांना पी.डी.पी. देतात. ‘पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन’ असं कितीही गोंडस नाव दिलं, तरी पी.डी.पी. म्हणजे ‘आम्ही तुम्हाला काढणार आहोत; पण त्यापूर्वी दोन महिन्यांचं जीवदान देत आहोत,’ असा सरळ अर्थ. एका सहकाऱ्याला सुमितनं पी.डी.पी. दिला होता, हे मी ऐकलं होतं. मला पण तसंच केलं तर? माझे हातपाय थरथरू लागले.
परत रिपोर्ट घेऊन बसलो. घरी परतल्यावरही काम करत होतो. पोटात खड्डा पडला होता तो जातच नव्हता. मध्येच अक्षरं दिसेनाशी होत होती. मेंदूला अर्थबोधच होत नव्हता. तेवढय़ात फोन वाजला. नंबर माहितीतला नव्हता. अनवधानानं तो उचलला. पलीकडून एका मुलाचा आवाज आला. ‘‘रोहनदादा, मी कुमार बोलतोय. तुझ्या बाबांनी नंबर दिला. तुझ्याकडून मार्गदर्शन हवंय.’’ मी फोन कट केला.
हा एक नवीनच उद्योग बाबांनी चालू केला होता. अमुक आपल्या गावातला आहे, अमुक मित्राचा मुलगा आहे, नाही तर नातेवाईक आहे, असं सांगून त्यांना माझ्याकडे मार्गदर्शनाला पाठवत होते. म्हणाले, ‘‘रोहनसारखं यश मिळवायचंय, म्हणून माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. मग मी सांगतो, रोहन नक्की मदत करेल.’’
इथे माझा आत्मविश्वास कोसळायची वेळ आली आहे आणि मी काय मार्गदर्शन करणार? मी कशाकशातून जातोय याची थोडी तरी कल्पना आहे का आईबाबांना? नेहमीप्रमाणे घरचा फोन आलाच. बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती पण तरी मी घेतला, नाही तर ऑफिसमध्ये फोन करत बसतील.
बाबा बोलत होते, ‘‘काय रे, त्या कुमारशी बोलला का नाहीस? आपण इतरांना मदत करायला नको का? नाही तर मग यशाची घमेंड आली आहे असं म्हणतील सगळे!’’
‘‘मलाही बोलायचं आहे.’’ आई फोन स्वत:कडे घेत म्हणाली, ‘‘अरे, देवीच्या पूजेला येणार आहेस का, ते विचारायचं होतं. तुला चांगली नोकरी लागू दे, म्हणून नवस बोलले होते.’’
कोंडलेली वाफ कुठल्याही क्षणी बाहेर पडेल अशी भीती मला वाटू लागली. माझ्या तोंडून काही तरी वेडंवाकडं बोललं गेलं तर? आईबाबांच्या मनातलं माझ्याबद्दलचं चित्र उद्ध्वस्त झालं तर? नाही! नाही! तसं नाही होऊ द्यायचं मला.. मग कसंबसं स्वत:वर नियंत्रण ठेवत मी एवढंच म्हणालो, ‘‘नंतर फोन करतो. आता घाईत आहे.’’