कोलकाता असो, बदलापूर असो की नवी मुंबई… स्त्री अत्याचाराच्या एकामागोमाग एक घटना समोर आल्या आणि जनक्षोभ आंदोलनात बदलला. हे जनआंदोलन टिकलं तर अत्याचारित मुलींना, स्त्रियांना न्याय मिळू शकेल, मात्र वर्षानुवर्षं स्त्रीदेहावर सुरू असलेल्या क्रूर अन्यायाच्या विरोधात आता स्त्रीनेच उभं राहायला हवंय. शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी प्रत्येकीला ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ मोठ्या प्रमाणात व सातत्यानं मिळणं गरजेचं आहे.
‘स्त्रियांची सुरक्षा’ हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी दोन वर्षांची मुलगी असो की वयोवृद्ध स्त्री, पुरुषाच्या अत्याचाराला बळी पडली की सगळी यंत्रणा, सरकार, प्रशासन, माध्यमं सर्व जण जागे होतात. काही वेळा समाज पेटून उठतो. काही ठिकाणी आंदोलने, निदर्शने होतात आणि काही काळानंतर सगळं शांत होतं, पुन्हा तशीच एखादी घटना घडेपर्यंत. अशा घटना कठोर व शीघ्र निर्णय देणाऱ्या कायद्याने काही प्रमाणात रोखता येऊ शकतील; परंतु कायदा हा गुन्हा घडल्यानंतर बोलू लागतो. पण गुन्हा होऊच नये किंवा अशा घटनांना, प्रसंगांना सामोरे जावे लागल्यास त्या प्रसंगी काय करावं, याचं कठोर प्रशिक्षण सर्व वयांतील मुलींना, स्त्रियांना दिलं, तर काही प्रमाणात तरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल. निदान मुलींमध्ये आत्मविश्वास, धाडस येऊ शकेल.
हेही वाचा – शिक्षणाचे ‘निपुण’ उद्दिष्ट!
अलीकडे अनेक जणी आपल्या पर्स, बॅगमध्ये मिरची पूड, पेपर स्प्रे, पर्फ्युम स्प्रे इत्यादी गोष्टी स्वसंरक्षणासाठी ठेवू लागल्या आहेत. पण या गोष्टी किती प्रभावी ठरतील, हे प्रत्येकीच्या प्रसंगावधानावर, ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’वर आणि धाडसावर अवलंबून असतं. कायम इतर कोणी तरी (पुरुषच?) येऊन आपला बचाव करेल, अशी आशा बाळगण्यात अर्थ नाही. त्यामुळे सर्वांत महत्त्वाची आहे ती स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, अर्थात फिटनेस. त्यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयातूनच स्वसंरक्षणाचे धडे जाणीवपूर्वक दिले गेले पाहिजेत, डावपेच शिकवले गेले पाहिजेत.
एकीकडे स्त्री-पुरुष समानता वाढते आहे असं आपण म्हणतो आहोत, मात्र दुसरीकडे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यास आठ वर्षांचा कालावधी लागला. आपल्या देशात बलात्काराच्या, विनयभंगाच्या इतक्या घटना घडत असतात, मग त्याचा निकाल लागण्यासाठी जर इतका कालावधी लागणार असेल तर गुन्हेगारांना त्याचा वचक कसा बसणार?
स्त्रियांवर अत्याचार का होतात यावर अनेकदा बोलले गेले आहे. त्याची कारणमीमांसाही अनेकदा झालेली आहे. मात्र अत्याचार थांबत नाहीत, हे वास्तव आहे म्हणूनच स्वसंरक्षण हा एक मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील ‘क्रीडा व युवक सेवा संचालनालय’ यांच्या वतीने ‘स्वयंसिद्धा’ या योजनेअंतर्गत मी बालेवाडी येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ‘स्वयंसिद्धा प्रशिक्षण’ विविध ठिकाणी राबवलेही. मात्र काही वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाची ही योजना थंडावली; परंतु आम्ही तयार झालेल्या प्रशिक्षकांमार्फत ही योजना अविरतपणे सुरू ठेवली. मुलींच्या स्वयंसंरक्षणासाठी शासनाने ही योजना पुन्हा सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. या प्रशिक्षणात स्त्रियांना स्वत:चा बचाव कसा करायचा यासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. तायक्वांदो, कराटे, योगासने, एरोबिक्स, लाठीकाठी, पंचेस, विविध डावपेच आदींचा यात समावेश होतो. यामुळे मुली, स्त्रियांमध्ये धाडस येतं, ती कोणत्याही ठिकाणी भयविरहित काम करू शकते. मुख्य म्हणजे स्वत:च्या संरक्षणासाठी तिला कुणाच्या मदतीची अपेक्षा राहत नाही. अर्थात त्यासाठी सतत सतर्क आणि फिट राहणं हीच काळाची गरज आहे.
मी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील, विशेषत: रायगड जिल्ह्यातील ४५ हजार किशोरवयीन मुलींना आणि स्त्रियांनाही स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या अनेकींकडून त्यांचे स्वानुभव ऐकल्यानंतर या प्रशिक्षणाची गरज लक्षात येते. त्यामुळेच मला असं वाटतं की, प्रत्येक शाळेत, ग्रामपंचायतीमध्ये, शासकीय कामांच्या ठिकाणी स्त्रियांना दर आठवड्यातून किमान एक दिवस आणि किमान दोन तास तरी संरक्षणाचे धडे, डावपेच शिकवले गेलेच पाहिजेत.
एका शिबिरामध्ये स्त्रियांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी मी गेले होते. शिबिरामध्ये काही जिल्ह्यांतील महाविद्यालयीन मुली सहभागी झाल्या होत्या. आठवडाभराचं हे प्रशिक्षण पार पडलं. शेवटच्या दिवशी मुलींनी डावपेच करून दाखवले. तेव्हा एका मुलीनं प्रश्न केला. ‘तुम्ही एवढं चांगलं प्रशिक्षण आम्हाला दिलं, पण ते वाया जाऊ नये असं वाटतं.’ त्या वेळी मी म्हटलं, ‘एक वेळ ते वाया गेलं तरी चालेल, पण वापरण्याची वेळ कुणावर येऊच नये. मुख्य म्हणजे कोणतंही शिक्षण कधीच वाया जात नाही. तुम्हाला ते वाया जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही घेतलेलं प्रशिक्षण तुमच्या मैत्रिणी, आजूबाजूच्या स्त्रियांना शिकवा.’ दुसऱ्या दिवशी सायंकाळी मला त्या मुलीचा फोन आला. ती म्हणाली, ‘‘प्रशिक्षण कामी आलं. काल प्रशिक्षणानंतर आम्ही सहा जणी रात्री रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो. साधारणत: रात्री ११.२० वाजता आमच्या डब्यात चार तरुण शिरले आणि घाणेरडे चाळे, इशारे करू लागले. सुरुवातीला आम्ही घाबरलो, पण नंतर तुम्ही सांगितलेली गोष्ट आठवली, ‘बचाव करता येत नसेल, तर पळायला शिका आणि पळता येत नसेल तर लढायला शिका.’ आम्ही जोरात ओरडून त्यांना घाबरवलंच आणि मग एकत्र येऊन त्या रोमियोंना असं काही बदडलं की पुढच्या स्टेशनवर गाडी थांबताच ते पळून गेले.’’
एका मुलीचा अनुभवही असाच. दररोज शाळेतून घरी परतताना एक मुलगा तिचा पाठलाग करायचा. तिनं घरी सांगितलं तर तिला घरच्यांनी रस्ता बदलायला सांगितला. पण जेव्हा तिनं हे प्रशिक्षण घेतलं तेव्हा तिनं त्या पाठलाग करणाऱ्या मुलाला रस्त्यात अडवून जाब विचारला. तो मुलगा चांगलाच घाबरला. नंतर तिच्या वाट्याला कधी गेला नाही. जोपर्यंत आपण या बाबतीत ‘अरेला कारे’ करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास सहन करावा लागतो, असा अनेकींचा अनुभव आहे.
हे प्रशिक्षण घेणाऱ्या एका स्त्रीचा अनुभवही महत्त्वाचा आहे. तिचा नवरा दारू पिऊन रोज मारतो, अशी तिची तक्रार होती. तिचं म्हणणं होतं की, पोलिसांत तक्रार केली तर लोक आणि नातेवाईक मलाच हसतील. पण घरातल्या रोजच्या मारामारीचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतोय. ती कायम घाबरलेली असतात. आमचा प्रेमविवाह असल्यानं मला माहेर बंद झालेलं आहे. त्यामुळे मी रोज मार सहन करते. कधी कधी तर आत्महत्या करावीशी वाटते, पण मुलांकडे बघून प्रत्येक दिवस ढकलते. मी त्यांना एकच सांगितलं, ‘तुम्ही माझ्याकडे प्रशिक्षण घेतलं आहे. आता रणरागिणी बना.’ दुसऱ्याच दिवशी अगदी हसत येऊन तिनं सांगितलं, ‘नवऱ्याने दारू सोडली.’ तो यापुढे तिला मारणार नाही असा बंदोबस्त तिनं केला होता.
शहरी, निमशहरी नोकरदार स्त्रियादेखील या प्रशिक्षणात सहभागी होतात. प्रवास करताना येणाऱ्या वाईट प्रसंगापासून ते ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी बॉसकडून होणारा त्रास असं काहीही त्यांच्या बाबतीत घडू शकतं. याविषयी घरी, नवऱ्याला सांगितलं, तर नवरा कामाला जाऊ देणार नाही आणि जर काम सोडलं तर मुलांची फी व इतर खर्च कसा सुटेल या चिंतेने कायम दबावाखाली आणि नाइलाजाने अनेक जणी नोकरी करतात. एका प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एका प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या स्त्रीनं आपला एक अनुभव सांगितला. ती म्हणाली, ‘‘मी रुजू झाल्यानंतर लगेचच माझ्या लक्षात आलं की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नजर फार वाईट आहे. सतत रोखून पाहणं, कोडभाषेत बोलणं, सतत कामात जाणूनबुजून चुका काढत त्या सांगायला केबिनमध्ये बोलावणं, हात पकडणं असा त्रास बरेच दिवस सहन केला, पण या प्रशिक्षणामुळे माझ्यात धीर आला, शेवटी एके दिवशी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला स्पष्ट आणि ठाम स्वरात सांगितलं, तुमचं वागणं मला आवडत नाही. ते घाबरले, ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसलं. नंतर मात्र पुन्हा तसं वागण्याची त्यांची हिंमत झाली नाही.
‘स्वयंसिद्धा’ प्रशिक्षणात सहभागी झालेली १९ वर्षांची मुलगी. एकदा बसने प्रवास करीत असताना तिच्या शेजारी एक तिशीतला तरुण येऊन बसला. आणि जवळजवळ सरकायला लागला. तेव्हा तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, ‘नीट बसायचं असेल तर बस, नाही तर ड्रायव्हरला तुला उतरवायला सांगते.’ तिचा कडक आवाज ऐकून प्रवासी आणि कंडक्टर सगळेच जमले आणि त्यांनी त्याला चांगलंच झापलं. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही अन्याय सहन करत नाही, त्याविरुद्ध स्पष्टपणे आवाज उठवता तेव्हा आसपासचे लोक आपल्या मदतीसाठी धावून येतात.
मुलींना/स्त्रियांना या प्रशिक्षणातून केवळ स्वसंरक्षण करणं एवढंच शिकवलं जात नाही, तर आयुष्यात शारीरिक सबलतेबरोबरच मानसिक सशक्तपणाची आवश्यकता सांगितली जाते. यातून त्यांना विविध करिअरच्या संधीदेखील उपलब्ध होतात. मला आठवतं, आपल्यावरील अन्यायाला धीरोदात्तपणे सामोऱ्या गेलेल्या अनेक मुली पोलीस खात्यात रुजू झाल्या आहेत. तसेच आमच्या संस्थेच्या प्रशिक्षित हजारो मुली पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. काही क्रीडा क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवीत आहेत.
हेही वाचा – पंचतारांकित पर्यटनाचा ‘प्रलय’
सरकार स्त्रियांच्या स्वसंरक्षणावर काही कोटी रुपये खर्च करतं. तो खर्च योग्य आणि योजनेबरहुकूम असेल तर त्याचं फलित नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी जे तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत, ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यांच्या माध्यमातूनच स्वसंरक्षण प्रशिक्षण राबविलं गेलं पाहिजे. तसंच हे प्रशिक्षण किमान दहा दिवसांचं असणं आणि त्यात सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये एक दिवसाचा स्वसंरक्षण उपक्रम राबवला जातो, त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन मुलीला किमान दहा दिवसांचं ‘बेसिक टू अॅडव्हान्स’ प्रशिक्षण मिळायला पाहिजे. तसेच दर सहा महिन्यांनी शासनाच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये उजळणी प्रशिक्षण वर्ग ठेवला गेला पाहिजे. तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल.
सरकारने स्त्री-सुरक्षेबरोबरच पुढील उपाययोजना करणं आवश्यक आहे.
१. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणं बंधनकारक केलं पाहिजे.
२.अत्याचारग्रस्त मुली, स्त्रियांबाबतीतले खटले जलद गती न्यायालयात चालविणं. गुन्हा उघड असल्यास गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा देणं.
३. इंटरनेट- समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या आणि आहार-विहाराकडे दुर्लक्ष झालेल्या तरुण पिढीला चांगले शारीरिक संस्कार मिळावेत यासाठी जास्तीत जास्त मुलींना अगदी लहानपणापासूनच खेळांसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. ज्यामुळे शरीर आणि मन बळकट होण्यास मदत होईल.
हो, आपल्याला हे विसरून चालणार नाही की, नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके ही एका मुलीनेच, मनू भाकरने मिळवून दिली.
शेवटी हेच महत्त्वाचं – सशक्त व्हा, खंबीर बना.
tapaswi888 @gmail.com
(लेखिका राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.)