गेल्या काही वर्षांत स्त्रियांनी केवळ सत्त्व रक्षणासाठी किंवा स्वतच्या मानभंगाचा सूड घेण्यासाठी केलेली हिंसा आणि निव्वळ स्वार्थातून थंड डोक्याने केलेले गुन्हे यातील अंतर कमी होताना दिसत आहे. व्यक्तिगत स्वरूपात हिंस्र गुन्ह्य़ांमधली ही वाढ भयकंपित करणारी आहे.. आजच्या बदलत्या स्त्री प्रतिमेचं हे आणखी एक रुप, ते शुंभकर व्हावं ही अपेक्षा व्यक्त करणारं ..
दूरचित्रवाणीवरील कुठलीही वाहिनी लावा, त्यावर एक तरी ‘पोलिसी’ मालिका- रहस्यपट- गुन्हेगारी विश्व दर्शविणारा कार्यक्रम असतोच असतो. काहींचं चित्रण वास्तवदर्शी असतं तर काहींचं भडक, बटबटीत! या मालिकांचा गेल्या काही वर्षांतील बदलता चेहरा पाहिला तर एक ठळक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे पूर्वीपेक्षा या मालिकांमध्ये स्त्रियांची गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी वाढत्या प्रमाणात चित्रित झालेली दिसते. त्याचंच मूळ रूप प्रत्यक्ष आसपासच्या जगातही बघायला मिळतं.
* राजीव गांधींच्या हत्येतला नलिनी आणि धनूचा सहभाग.
* महाराष्ट्रात गाजलेला अंजनाबाई गावित आणि रेणुका यांच्यावरचा बालहत्येचा खटला..
* गेले ३ र्वष चर्चेत असणारा ‘आरुषी तलवार’ हत्येतील नूपुर तलवारवरचा संशयाचा बाण..
* बलात्कारासारख्या स्त्रीच्या दृष्टिने अत्यंत तिरस्करणीय कृत्यालाही थंडपणे प्रोत्साहन-पाठिंबा दिल्याबद्दल प्रिया पटेलची कोर्टातील वारी..
हळूहळू ही यादी आणि त्यातल्या गुन्ह्य़ांची गंभीरता वाढत गेलेली दिसते. भारतातील राष्ट्रीय गुन्हे नोंदीकरण विभागाची आकडेवारी दर्शवते की, २००५ मध्ये ३४३९, २००७ मध्ये ३०१२ तर २०११ मध्ये ४००० हून अधिक स्त्रियांना ‘खुनाच्या’ आरोपाखाली अटक झालेली आहे. थोडक्यात ‘गंभीर गुन्हेगारी’ हेसुद्धा आता पुरुषांची मक्तेदारी असणारं क्षेत्र राहिलेलं नाही!
काही वर्षांपूर्वी आलेला ‘फूल बने अंगारे’.. चित्रपट आठवतो ना? स्वत:वर झालेल्या अन्यायाचा सूड उगवताना एका सौम्य, वत्सल, ऋजू स्त्रीचं रूपांतर एका त्वेषानं, रागानं भरलेल्या- हिंसेची भीड न बाळगणाऱ्या आक्रमक स्त्रीमध्ये झालेलं त्यात दाखवलं आहे. त्याला तरीसुद्धा एक किंचित सकारात्मकतेची किनार आहे, जी आपल्या दुर्गा-काली-महिषासुरमर्दिनी अशा पारंपरिक अन्याय/ अत्याचारांचा विरोध करणाऱ्या, सत्वरक्षणासाठी उग्रावतार धारण करणाऱ्या देवतांच्या रूपाची आहे. मुळात ऋजू-सहनशील असणारी पृथा (भूमी)सुद्धा पापाचा भार असह्य़ झाला की, डळमळते- क्रुद्ध होते- संहार करते- हा प्रतीकात्मक संदेश त्यात आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेली किरणजीत अहलुवालियाची कथा (ज्यावर  ‘प्रोव्होक्ड’ चित्रपट निघाला..) त्याच वळणाची आहे. पतीचा अन्याय, शारीरिक-मानसिक अत्याचार असह्य़ झाल्यावर एका क्षणी त्याला बेसावध गाठून तिने त्याला ठार केलं. हा खटला प्रचंड गाजला. कनिष्ठ कोर्टात दोषी ठरवलेल्या किरणजीतला नंतर स्त्री संघटनांच्या पाठराखणीमुळे- सामाजिक रचनेच्या ढोंगाचा बुरखा फाडल्यामुळे न्याय मिळाला. अगदी काही वर्षांपूर्वी जिच्या नावानं मध्य प्रदेशातील चंबळ खोरं चळाचळा कापत होतं, त्या ‘दस्युसुंदरी’ फूलनदेवीचा पूर्वेतिहासही हेच दाखवतो. कोवळ्या वयातील जबरदस्तीचं लग्न, जाणत्या वयात तथाकथित उच्चवर्णीयांनी दिलेला मानभंगाचा, बलात्काराचा उद्ध्वस्त करणारा अनुभव यातून तिची सूडभावना प्रबळ झाली आणि एकदा हिंसेच्या दरवाज्यातून आत शिरलेली फूलन नंतर शरण येऊन- राजकारणात पडून ‘नेती’ झाली तरीही त्याच पेरलेल्या हिंसेची स्वत: शिकारही झाली.
गेल्या काही वर्षांत स्त्रियांनी  केवळ सत्त्व रक्षणासाठी किंवा स्वतच्या मानभंगाचा सूड घेण्यासाठी केलेली हिंसा आणि निव्वळ स्वार्थातून थंड डोक्याने केलेले गुन्हे यातील अंतर कमी होताना दिसत आहे. व्यक्तिगत स्वरूपात हिंस्र गुन्ह्य़ांमधली ही वाढ भयकंपित करणारी आहे, हे नक्की!
गुन्हेगारीमधली स्त्रियांची वाढती संख्या, क्रौर्याची विविध उदाहरणं यातून दिसतं की, यातही स्त्रिया आपली जुनी प्रतिमा मागे टाकून पुरूषांच्या तोडीस तोड बनत आहेत. या साऱ्यामागे कोणती कारणं आहेत? लोम्ब्रोसो या एका अभ्यासकाच्या मतानुसार काही पुरुषांप्रमाणे काही स्त्रियाही जन्मजात गुन्हेगारी वृत्तीच्या असू शकतात. त्याच्या मते, अशा स्त्रियांमध्ये गुन्हेगारी वृत्ती दर्शवणारे काही पुरूषी (मॅस्क्युलाइन) गुण आणि मत्सर, भावनिक अस्थिरता अशा तथाकथित बायकी (फेमिनाइन) ‘नकोशा-हीन’ गुणांचा मिलाप झालेला असतो. आज अर्थातच हे कारण शंभर टक्के कुणीच मानत नाही. काही अभ्यासकांच्या मते स्त्रिया अनेकदा क्रूरपणे, दुष्टपणे वागत असतात. पण ते चार भिंतींच्या आड! त्यामुळे त्याचा फारसा गाजावाजा होत नाही आणि समजा एखादी स्त्री पकडली गेलीच तर अशा स्त्रियांकडे पाहण्याचा ‘पुरुषी न्यायव्यवस्थेचा दृष्टिकोन’ (पोलीस, न्यायाधीश इ.) काहीसा उदार किंवा संशयाचा फायदा देणारा असतो. ‘बायकांनी असे गंभीर गुन्हे करण्यामागे काहीतरी सबळ कारण असावं’, असं बहुतेक लोकांना सामान्यपणे वाटत असतं. या विधानातला पहिला अर्धा भाग बराचसा खरा आहे, असं मला वाटतं. अनेक परीकथा, लोककथांमधून स्त्रियांच्या अशा वृत्तीचं चित्रण दिसतं! शिवाय अजूनही ‘सासुरवाशिणी’च्या छळामागे ‘सासू-नणंद..’ इत्यादीचा काही ना काही वाटा असल्याचंही अनेक जळिताच्या, हुंडाबळीच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या अन्य उदाहरणांमधून दिसतं. ‘ ते वागणं’ मुळात  ‘पुरुषी सामाजिक व्यवस्थेचाच’ एक भाग असतं. म्हणजे घरातल्या पुरूषांच्या सत्तेला आव्हान देता येत नसल्याने आपल्यापेक्षा खालचं सामाजिक स्थान असलेल्या स्त्रीला त्रास देणं, असा तो पवित्रा असतो. पण त्या स्त्रिया कळत-नकळत त्यातून काहीशा क्रूर, असंवेदनशील बनायला शिकतात हेही खरं आहेच.
पूर्वीचं हे चौकटीतील क्रौर्य आता चौकट मोडून बाहेर पडू पाहात आहे, उलथापालथ होते आहे, तेही वाढत्या प्रमाणात- असं दिसतंय. काय असतील यामागची कारणं?
काही अभ्यासकांच्या मते बदलत्या समाजरचनेत सर्वच पारंपरिक भूमिकांची जबरदस्त उलथापालथ होते आहे. साचेबद्ध भूमिकांना चिकटलेली परंपरागत मूल्यं, नैतिक बंधनं ही सर्वदूर ढिली पडत आहेत, तेच स्त्रियांच्या बाबतीत घडतं आहे. शंभर टक्के कोमलता, पडतं घेणं, दबून राहाणं अशी ठाशीव मूल्यं केवळ समाज दबावामुळे स्वीकारायला किंवा मनात बिंबवायला स्त्रियांचा मनातून आणि प्रत्यक्षही विरोध होत आहे, त्याचं एक प्रत्यंतर वाढत्या गुन्हेगारीत किंवा समाजविघातक कृतींतून दिसत आहे. त्याच वेळी ‘मी सुद्धा शक्तिमान-सत्ताधारी-ताकदवान – पॉवरफुल- आहे’ हे पडताळून बघण्याचाही प्रयत्न यातून दिसतो. ‘खुदकी खुशी के लिए कुछ भी करेगा!’ ही वृत्ती तर एकूणच समाजात वाढलेली दिसते, त्याचं प्रतिबिंब स्त्री समाजातही दिसणारच!
मध्यंतरी पुण्यात-हैद्राबादमध्ये घडलेल्या दोन घटना आठवा. आपल्या प्रियकराच्या/ मित्राच्या नियोजित वधूचा आणि त्या प्रियकराचाही खून अत्यंत थंडपणे करणाऱ्या अभियंता तरुणी ंना असं का करावंसं वाटलं असेल? इतक्या उच्च शिक्षणातून त्यांना काहीच नैतिक धडे मिळाले नाहीत/ नसतील असंच म्हणायचं का? का ‘तू हाँ कर या ना कर’ यातील ‘मालकी हक्क’ शाबीत करण्यासाठी असं क्रौर्य त्यांना न्याय्य वाटलं?
स्त्रीवादी विचारांचा जसा स्त्रियांच्या अनेक समस्या पृष्ठभागावर आणण्यामध्ये, त्यांना न्याय देण्यामध्ये मोठा वाटा आहे, तसं एकूणच पारंपरिक मूल्यव्यवस्थेला आव्हान दिल्याचा एक अनाहूत परिणाम म्हणजे स्त्रियांच्या आक्रमकतेत- सर्वच बंधनं झुगारण्याची वृत्ती वाढण्यामध्ये पडलेली भर हे नाकारता येणार नाही. हा स्त्रीवादी विचारांचा/  चळवळीचा पराभव किंवा दोष नक्कीच नाही, पण त्या प्रभावाला अधिक रचनात्मक, सुष्ट वळण देण्याची गरज आपल्याला दाखवून देणारी वस्तुस्थिती आहे, हे नक्की ओळखायला हवं! मुलीही आपल्याला ‘रफटफ’ हव्यातच, पण त्यातून क्रौर्याचा आणि असंवेदनाशीलतेचा जन्म होत असेल तर त्यावर वेळीच योग्य ते मूल्यसिंचन करायला हवं!
सर्वत्र वाढत्या उपभोगवादाची बाधा स्त्रियांना झाल्यावाचून कशी राहील? वैध-अवैध मार्गानी मिळणारा पैसा, सत्ता स्त्रीलाही मानवी स्वभावानुसार मोहात पाडणारच! मग अशा वेळी सैल झालेल्या नैतिकतेला झुगारणं कितीसं अवघड आहे? त्यातून शहरी भागात तर आता तर प्रकारची ‘बिन चेहेऱ्याची’ (फेसलेस) ओळख मिळत असल्यामुळे अन्य लोकांचं/ कायद्याचं दडपण कमी वाटणंही सहजशक्य आहे. एकूणच बाजारपेठेतील व्यवहारांच्या रोखठोक चौकटी सगळ्याच वागण्यावर परिणाम करताना आपण पाहात आहोत. व्यसनं, गळेकापू स्पर्धा आणि या सर्वावर प्रसारमाध्यमांतून क्षणोक्षणी दिसणारा क्रौर्याचा भडिमार यातून सर्व समाजावर होणाऱ्या परिणामापासून स्त्रियाच अलग कशा राहतील?
गेल्या काही काळातील स्त्रियांनी केलेल्या क्रूर गुन्ह्य़ांकडे पाहिलं तर काही ठळक बाबी जाणवतात.
* त्यांनी गुन्हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केले.
* स्वत:च्या प्रियजनांचाही त्यात विचार केलेला नाही.
* बरेचसे गुन्हे आर्थिक फायदे किंवा ‘मालकी हक्का’साठी केले गेले.
* त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्यंत सफाईने वापर केला.
अशा व्यक्तींचा जेव्हा मानसशास्त्रीय अभ्यास केला गेला तेव्हा आढळलं की, या स्त्रिया भावनिकदृष्टय़ा अस्थिर, असुरक्षिततेची भावना असलेल्या, धिक्कारल्याची भावना असलेल्या किंवा बालवयापासून नैराश्यानं घेरलेल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं की, आपण ‘स्त्री’ असल्यानं ‘संशयाच्या सुई’पासून सहज दूर राहता येईल किंवा हा गुन्हा करणं आपल्यापुढचा अंतिम पर्यायच कसा होता हे आपल्याला न्यायव्यवस्थेला पटवून देता येईल.
या विचारांकडे पाहिलं की, स्त्रियांचा आंतरिक गोंधळ लक्षात येतो. एकीकडे तथाकथित पुरुषी भूमिकांमधील आक्रमकता नीतीचा विधिनिषेध न ठेवता आत्मसात करायची तर दुसरीकडे आपण ‘स्त्री’ आहोत म्हणून कायद्यानं आपल्याला सहानुभूती दर्शवावी अशी चुकीची अपेक्षा ठेवायची. सुदैवाने भारतीय दंडसंहिता ही ‘सेक्स ब्लाइंड’ म्हणजेच गुन्ह्य़ांबाबत स्त्री-पुरुषांत भेद न करणारी असल्याने तसे घडत नाही. पण तरीही हा प्रश्न मुळात उपस्थित होतो की, मग ‘स्त्री-पुरुषांची’ समानता प्रस्थापित करू पाहणारी, त्या दिशेने हळूहळू का होईना प्रवास करणारी समाज रचना, शिक्षण रचना यातच काही त्रुटी राहून जात आहेत का? तथाकथित पुरुषी गुणांना आत्मसात करण्याच्या स्पर्धेत, स्वत:ची सत्ता-ताकद सिद्ध करण्याच्या स्पर्धेत स्त्रिया काही महत्त्वाचे-शाश्वत असे व्यक्तिगुण मागे सोडून देत आहेत का?
भारतीय पुराणांमध्ये इंद्राणी ही म्हणायला इंद्राची पत्नी पण खरं तर देवांची सेनापती म्हणून मानली गेली आहे. तिच्या अनेक घोषणांपैकी एक म्हणजे ‘अहं उग्रा विवाचनी!’ म्हणजे- ‘गरज पडल्यास मी उग्र रूपानंही प्रश्न मांडणारी, सोडवणारी आहे!’
स्त्रीचं उग्र रूप हे प्रासंगिकरीत्या स्वागतार्हच आहे, कारण त्याशिवाय तिच्या आणि समाजाच्याही काही समस्यांना उत्तरं मिळणारच नाहीत. पण हे उग्र रूप जर अहेतुक हिंसेचं, क्रौर्याचं दर्शन घडवत असेल तर त्यावर सखोल विचार व्हायला हवा. १९७५ मध्ये फ्रेडा अ‍ॅडलर नावाच्या अभ्यासिकेनं म्हटलं होतं, ‘पुढील काळातील प्रौढ वयातील गुन्हेगारांमध्ये स्त्री व पुरुषांच्या गुन्हेगारीतील संख्येची तफावत दूर होत जाणार आहे, कारण स्त्रिया आता नैतिक (कायदेशीर) आणि अनैतिक अशा दोन्ही पद्धतीने पुरुषी भूमिका आत्मसात करत आहेत!’ फ्रेडाला भविष्य दिसलं होतं की काय, असं आताच्या परिस्थितीवरून वाटतं. पण हेच भविष्य याच गतीनं न वाढण्यासाठी काय करता येईल, त्यावर विचार करूया असं वाटतं. स्त्री शक्तीचं प्रबोधन, जागरण हे सत्य, शिव आणि सुंदरासाठी असावं. हिंसा-क्रौर्य आणि संहारासाठी नको! आणि त्यासाठी सदिश प्रयत्नांची योजना करता येणं ही काळाची गरज आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा