भारतात साधारण ८८ लाख माणसे डिमेन्शियाने बाधित आहेत. साठीच्या आतील लोकांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे. त्यातही स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. व्यक्तिकेंद्री होत असलेला समाज लक्षात घेता सर्वांनी तरुण वयातच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डिमेन्शियासाठी कारणीभूत जोखीम घटक कोणते हे लक्षात घेतले तर आपण त्यापासून दूर राहून आपल्या मृत्यूपर्यंत सजग आयुष्य जगू शकतो.
रॉबर्टने अॅमस्टरडॅम येथून विस्प या गावाला जाणारी ट्रेन पकडली. आपल्या ७० वर्षीय बायकोला भेटायला रॉबर्ट निघाला होता. खरे तर ना ती त्याला पाहून ‘स्वीटहार्ट’ म्हणत गळामिठी मारणार होती, ना मुलाबाळांची चौकशी करणार होती, ना घराच्या अंगणातील ट्युलिप या वर्षी फुलले का विचारणार होती, ना तिने पूर्वी हौसेने लावलेल्या चेरीच्या झाडाला फळे धरली का याची तिला उत्सुकता होती. हे सर्व खरे तर तिचे जिवलग जग, पण आता या साऱ्याच्या पल्याड गेली होती ती! रॉबर्टने तिला दोन वर्षांपूर्वी विस्पला आणून ठेवले होते. जगातल्या पहिल्या ‘डिमेन्शिया व्हिलेज’मध्ये. २००९ मध्ये ते वसवले गेले आणि आता बहुतांशी प्रगत देशांत डिमेन्शिया झालेल्या रुग्णांसाठी विशेष कम्युनिटी विकसित करण्यात येत आहेत.
‘‘अरे, कधी आलास तू?’’ नानांनी हा प्रश्न त्यांना भेटायला गेल्यानंतरच्या अर्ध्या तासात पाच वेळा विचारला होता आणि प्रत्येक वेळी पुतण्याने अगदी शांतपणे तेच ते उत्तर न कंटाळता दिले होते. काकाने आपल्याला ओळखले नाही याची त्याला कल्पना होती आणि ते क्वचित सुसंगत, पण इतर काही तरी सर्वसामान्य गप्पा मारणार, त्यात कोणतेही कौटुंबिक संदर्भ, प्रेमळ चौकश्या, काळजीचे प्रश्न येणार नाहीत हेही त्याला माहीत होते. कारण गेल्या सहा वर्षांपासून काकांच्या स्मृती हळूहळू धूसर होत गेल्या आणि एकंदर डिमेन्शिया वाढत होता हे सर्व कुटुंबीयांच्या अंगवळणी पडले होते.
आपल्याही नात्यात, आसपास अशी ‘हरवलेली’ माणसे आपण बघतो. स्मृती, स्थळ, काळ, वेळ, समज, समाज, उमज, नाती-गोती याचे भान सरलेली, गोंधळलेली, निर्णयक्षमता, कार्यक्षमता गमावलेली, बावरलेली किंवा कधी एकदम रागीट होणारी, आपल्यात असूनही नसल्यासारखी, ‘अनरिचेबल’ माणसे. त्यांचे आयुष्य त्यांच्या सुखदु:खापलीकडे, पण कुटुंबीयांना मात्र फार आव्हानात्मक. हे सर्व बघून आपल्यापैकी अनेकांच्या मनात विचार चमकून जातो, आपलेही असेच होईल की काय भविष्यात? कमी-जास्त फरकाने?
डिमेन्शिया अर्थात बुद्धिभ्रंश-स्मृतिभ्रंश हा मुख्यत: वयस्क लोकांना होणारा एक गुंतागुंतीचा आजार. ‘अल्झायमर’ हा एक माहीत असलेला प्रकार. भारतात साधारण ८८ लाख लोक या आजाराने बाधित आहेत. २०१० मध्ये ३७ लाख रुग्ण होते आणि २०३० पर्यंत ८८ लाख होतील, असा अंदाज ‘अल्झायमर अँड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी’ने वर्तवला होता. पण २०२०पर्यंतच रुग्णांची संख्या ८८ लाख झाली. रुग्णांची संख्या अशा वेगाने वाढत आहे आणि त्यातही स्त्रियांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे खरे तर या आजाराकडे एक स्त्री आरोग्याचा प्रश्न म्हणूनही बघायला हवे. जसे जसे माणसाचे आयुष्यमान वाढते आहे तसे तसे डिमेन्शिया असलेल्यांची संख्या वाढणार हे स्पष्ट आहे. पण साठीच्या आतील लोकांमध्येही डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे, हे धोकादायक आहे. पूर्वी एक लाखांमध्ये ५९ व्यक्ती डिमेन्शियाने पीडित असत, आता हे प्रमाण ६५ रुग्णांवर गेले आहे. अजून तरी या आजाराला पूर्ण बरे करणारे औषध नाही. थोडेफार यश देणारी औषधे आहेत, त्यावर जगभरात संशोधन चालू आहे.
डिमेन्शियासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? त्यासाठी कोणते जोखीम घटक वा रिस्क फॅक्टर आहेत याचा विचार सर्वांत महत्त्वाचा आहे कारण अशी स्थिती येणार नाही यासाठी आधीपासूनच उपाययोजना करता येऊशकेल. आपली जनुके किंवा आनुवंशिकता हे अगदी थोड्या प्रमाणात डिमेन्शिया होण्यासाठी कारणीभूत आहेत असे दिसतेय. मात्र वाढते वय, हवा, प्रदूषण असे काही धोकादायक घटक आहेत की जे आपण बदलू शकत नाही, पण इतर अनेक बाबींमध्ये काय करावे आणि काय करू नये हे बऱ्यापैकी समजून येत आहे.
आदिमानवाचा मेंदू खूप छोटा होता. आजच्या उत्क्रांत मानवाच्या मेंदूचे वजन शरीराच्या साधारण दोन टक्के असते आणि मेंदूला एकूण ऊर्जेपैकी तब्बल २० टक्के ऊर्जा लागते. मेंदूपेशी (मज्जातंतू) आणि दुसऱ्या ‘ग्लीअल’ नावाच्या पेशींनी मेंदू बनतो. एक मज्जातंतू शरीरातील इतर अनेक मज्जातंतूंशी जोडला जातो आणि मज्जातंतूंची अनेक जाळ्या (नेटवर्क्स) तयार होतात. त्यांच्यात रासायनिक दळणवळण आणि संदेशवहन चालू असते, त्यामुळे मेंदूचे काम सुरळीत चालते. मज्जातंतूंच्या कार्यासाठी आवश्यक अशी ‘बीटा अमिलॉइड’ आणि ‘टाऊ’ ही प्रथिने मेंदूत असतात. काही कारणाने या प्रथिनांची विकृत रूपे तयार होतात आणि अतिरिक्त प्रमाणात मेंदूत जागोजागी जमा होतात. स्मृतिकेंद्रे, विचारकेंद्रे यावर त्याची पुटे जमतात. पेशींच्या आतही गुंता निर्माण करतात. यामुळे मेंदूपेशींतील दळणवळण, पेशीपेशींतील जोडणीच्या जागा नाहीशा होऊ लागतात. मेंदूचे काम विस्कळीत होते. गोंधळ उडतो. विस्मरण होते, दोन गोष्टींतली विसंगती समजत नाही आणि रुग्णाला डिमेन्शिया झाल्याचे निदान होते.
या आजारामध्ये ‘मायक्रोग्लिया’ या पेशी शरीरात फार जास्त प्रमाणात तयार होतात, दाह निर्माण करून मेंदूला इजा करतात. अनेक पेशी मृत होतात. वयोमानानुसार काही पेशी मृत होणे अपेक्षित असले तरी अशा रुग्णांमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसते, मेंदू आक्रसतो. मेंदूचा आलेख, ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी), पेट-स्कॅन, एफएमआरआयमध्ये (Functional Magnetic Resonance Imaging) मेंदूचे विस्कटलेले अंतरंग स्पष्ट दिसतात. अनेक आजारांचे मूळ शरीरातील दाह (इन्फ्लमेशन) आणि ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ यात असते. ऑक्सिजनचे अस्थिर अतिक्रियाशील रूप, रेणू (फ्री रॅडिकल्स)अति प्रमाणात बनतात. मोकाटपणे शरीरभर विहरत निरोगी पेशींना इजा करतात आणि हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूजन्य आजाराची सुरुवात होते. अशा मुक्त रॅडिकल्स आणि शरीरात अनेक कारणांनी निर्माण झालेला दाह (एकमेकांना पूरक असे हे दोन्ही आपले शत्रू) मेंदूला इजा करतात, विकृत प्रथिने तयार होतात.
मधुमेह किंवा उच्च रक्तदाब जर नियंत्रणात नसेल, तर त्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, मेंदूपेशींना प्राणवायू मिळत नाही, ४० ते ६० वर्षे वयापर्यंत जर रक्तदाबाकडे दुर्लक्ष झाले, तर अशा व्यक्तींमध्ये पुढील काळात डिमेन्शियाची शक्यता वाढते. आज आपल्याकडे साधारण २० ते २५ टक्के लोकांना माहीतच नसते की त्यांना या व्याधी आहेत, कारण कधी तपासण्या केलेल्या नसतात. यासाठी डोळे तपासणे, कानाची क्षमता तपासणे या चाचण्यासुद्धा वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे तसेच आवश्यकतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र वापरले नाही तर तेसुद्धा डिमेन्शिया होण्यास कारणीभूत ठरू शकते. हिरड्या, दात, एकंदरच मौखिक आरोग्य नीट राखले नाही तर शरीरात दाह निर्माण होऊन डिमेन्शिया आणि इतर व्याधींची शक्यता वाढते. धूम्रपान, मद्यापान किंवा तत्सम व्यसनांमुळेही डिमेन्शिया होण्याचा धोका संभवतो.
मेंदूला २० टक्के ऊर्जा लागते या दृष्टीने आणि बाकी जीवनशैलीने होणारे आजार होऊ नयेत (जे पुढे डिमेन्शिया होण्यास कारणीभूत ठरतात) यासाठीही शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सातत्याने केला तर मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होऊन निश्चित फायदेशीर ठरते.
झोप हा एक जोखीम घटक म्हणून अद्याप प्रस्थापित झाला नसला, तरी ब्रिटनमध्ये झालेले संशोधन झोप आणि डिमेन्शियाचा जवळचा संबंध असल्याचे सूचित करते. दररोज जर सहा तासांहून कमी तास झोपत असाल, विशेषत: ५० ते ६० या वयात, तर डिमेन्शियाचा धोका वाढतो. झोपेत ‘स्लीप एपनिया’(झोपेत श्वसनास अडथळे येणे) असेल तरीही डिमेन्शिया होऊ शकतो आणि जर वेळीच उपाय केले, तर कमीही होऊ शकतो. संशोधन हे नक्कीच सांगते की, झोप आणि बुद्धी यांचा परस्परांशी संबंध आहे. त्यामुळे दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे असते.
‘डिजिटल डिमेन्शिया’ हा अजूनही प्रस्थापित जोखीम घटक नाही, पण अति स्क्रीनटाइममुळे मेंदूतील ग्रे आणि व्हाइट मॅटर यामध्ये बदल घडून येतात. मेंदू विकसित होण्याच्या वयात गॅजेट्सच्या वापरामुळे मेंदूला सतत मिळणाऱ्या उत्तेजनेमुळे तरुण वयातच मानसिक आजार, डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते.
शरीरातील हानीकारक फ्री रॅडिकल्सना नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहारात अँटिऑक्सिडंट्स हवेत. त्यासाठी ओमेगा ३ स्निग्धाम्ले असलेले अन्नघटक रोजच्या रोज जाणीवपूर्वक आहारात हवेत. सर्व रंगांच्या भाज्या आणि फळे, वेगवेगळ्या तेलबिया, कडधान्ये, शेंगभाज्या, सुका मेवा हे सगळे लाभदायक अन्नघटक आलेच. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले, तेच मेंदूलाही योग्य हे समीकरण लक्षात ठेवायचे. अति साखरयुक्त, अति प्रक्रियायुक्त, पॅकेज्ड फूड, जंक फूड हे शरीरात दाह वाढवतात. आहारात योग्य प्रमाणात चोथा नसला, तर आतड्यातील मित्रजंतूंची उपासमार होते, ते हळूहळू लोप पावतात. शत्रुजंतूचे राज्य तयार होते, मेंदू आणि आतडी यांचे घनिष्ट नाते. त्यामुळे आतड्यांचा ‘फ्लोरा’ शत्रुजंतूंनी व्यापला की मेंदूवर विपरीत परिणाम होतो. मेंदूला जास्त वापरले नाही, म्हणजे बुद्धिमांद्या जीवनशैली ठेवली तर साहजिक मेंदूतील मज्जातंतूंची जाळी कमी होऊ लागतात. यामुळे डिमेन्शिया आजाराची सुरुवात होऊ शकते. आपण अनेक कृती फार यंत्रवत करतो. फक्त साधारण पाच टक्केच मेंदू वापरतो. रोजच्या ठरलेल्या कामातील पद्धतीत बदल (उदा. शक्य तिथे उजव्याऐवजी डावा हात वापरायचा) केला तरी मेंदू जागरूक राहतो. तसेच जे करतो त्यात त्या क्षणी पूर्ण लक्ष देणे, म्हणजे ‘माइंडफूल’ राहणे याला साऱ्या जगात खूपच महत्त्व आले आहे. आपल्याला पूर्वी गाणी, संगीतकार पाठ असायचे, पण आता विसरले तरी चालते. कारण इंटरनेट आहेच. आठवणीने अमुक आणायलाच हवे अशी आपली पूर्वीची मेंदूला लावलेली सवयही, विशेषत: शहरात राहणाऱ्यांमध्ये नाहीशी होतेय. कारण आता खूप अॅप्स दहाव्या मिनिटाला वस्तू घरी आणून देतात. त्यामुळे मेंदू सैलावतो, त्यात त्याचा काय दोष? दूरध्वनी क्रमांक पाठ करणे, साधे हिशोब, शब्दकोडी, प्रवास, नवीन छंद, नवीन भाषा असे काही केले की मेंदूला आव्हाने मिळतात. असे मेंदूचे व्यायाम (नुरोबिक्स) उपकारक आहेत.
एक खूप महत्त्वाची बाब संशोधनाने दिसून आली की, ज्या व्यक्ती मेंदूची क्षमता जास्तीत जास्त वापरतात त्यांच्या मेंदूत वयस्क झाल्यावर जरी विकृत प्रथिने साठली तरी त्यांना डिमेन्शिया होत नाही, याचे कारण त्यांनी केलेला ‘बौद्धिक साठा’ ( cognitive reserve) ही नक्कीच आशादायक बाब आहे. एकलकोंडा स्वभाव, फारसे मित्रमैत्रिणी नसणे हेसुद्धा डिमेन्शियासाठी अगदी वाईट. त्यामुळे समृद्ध सामाजिक आयुष्य खूप आवश्यक आहे. सातत्याने करायला हव्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण डिमेन्शिया रोखण्याचा प्रयत्न करू शकतो.
‘जागतिक अल्झायमर अहवाल २०२३’चे उमेद वाढणारे समर्पक शीर्षक होते. ‘नेव्हर टू लेट, नेव्हर टू अर्ली’ तर मग, चला आठवणीसाठी, आठवणीने काही बदल घडवू या…
Manjeerig@gmail.com