नीरजा
जोतिबांची सावित्री जर तुमच्यासाठी आदर्श असती तर तुम्ही वटपौर्णिमेची तारीख लक्षात ठेवण्याऐवजी तीन जानेवारी ही तारीख लक्षात ठेवली असती, पण तुम्हाला सुशिक्षित होण्यापेक्षा पतिव्रता वगैरे होण्यात जास्त रस आहे याची मला कल्पना आहे. खरं तर सावित्रीसारखी अशी हजरजबाबी, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्री आपल्यालाही पत्नी म्हणून मिळावी म्हणून पुरुषांनीच व्रत करायला हवं होतं तेव्हापासून. पण आपल्या संस्कृतीत स्त्रियांचे आदर्श पुरुष सहसा घेत नाहीत. त्यामुळे त्या सावित्रीला पतिव्रता म्हणून लेबल चिटकवून टाकलं आणि तुम्हाला वडाभोवती फिरत ठेवलंय.. हा डाव तुम्हाला कळावा म्हणूनच जोतिबांच्या सावित्रीनं शाळा दाखवली आणि अक्षरांशी ओळख करून दिली तुमची. पण..
वेळ घालविण्यासाठी काही खास उपाय – वाचन व विचार न करता फक्त आणि फक्त घर सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी –
वेळ जात नाही काळजी करू नका. आमच्याकडे अगदी जालीम उपाय आहेत त्यासाठी –
सकाळचा केरवारा सावकाश करा. जमिनीवर सांडलेला कणन्कण आपल्या केरसुणीच्या कक्षेत येतो की नाही याचं निरीक्षण करा. लादी पुसताना घराचा प्रत्येक कोपरा ओला होतो आहे की नाही यावर लक्ष ठेवा. भांडी घासल्यावर त्यात आपलं प्रतिबिंब दिसेल एवढी लख्ख ठेवा. स्वत:चा चेहरा पाहायला वेळ मिळतोच असं नाही. कपडे धुताना कमरेचा जास्तीत जास्त व्यायाम होईल याची काळजी घ्या. बायका ऊठबस करत नाहीत विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधांमुळे असा अलीकडे संशय आहे लोकांना!
मग स्वयंपाकाला लागा. भाज्या निवडणं, कांदा कापणं, वाटण करणं यात जमेल तेवढा वेळ घालवा. नवऱ्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो, असं लग्नाच्या वयात आल्यापासून तुम्ही ऐकलेलं असेलच. तुमच्या चविष्ट स्वंयपाकामुळे नवरा खूश होऊन कदाचित संध्याकाळी कामावरून परतताना मोगऱ्याचा गजरा घऊन येईल. सत्तरीच्या दशकात अनेक कथा-कादंबऱ्यांतले आणि नाटक-सिनेमातले नायक असे गजरे वगैरे घेऊन यायचे. तुमचा नवरा गजरा नाही तर कधीकाळी पफ्र्युम तरी नक्की आणू शकतो. शेवटी आयमुष्यात कोणता ना कोणता सुगंध दरवळला म्हणजे झालं!
स्वयंपाक झाल्यावर सकाळी शाळेत सोडलेल्या मुलाला किंवा मुलांना शाळेतून आणायला जा. त्यांचे कपडे बदलून त्यांना खाऊपिऊ घाला. स्वत: जेवता जेवता त्यांना दिलेल्या गृहपाठावरून नजर फिरवा. समोर चालू असलेल्या टीव्हीवर लागलेल्या तुमच्या आवडत्या मालिकेतील नायिकेची साडी, दागिने निरखा, नव्या फॅशनची ओळख वाढवा. मुलांसाठी थोडा अभ्यास करा. मालिका पाहा. पुन्हा अभ्यास करा.
रात्रीच्या जेवणासाठी भाजी आणायला बाजारात जा. थोडं नीटनेटकं दिसा, जमलंच तर ओठाला लिपस्टिकही लावा. आणून ठेवलेला मेकअप बॉक्स लग्नकार्याशिवाय वापरला जात नाही. त्याची आणि स्वत:च्या सौंदर्याची एक्सपायरी डेट पाहा. ती संपण्याआधी स्वत:ला नटवा. बरं दिसलं तर स्वत:लाही छान वाटतं. प्रत्येक वेळी नवऱ्यासाठीच नटायचं असतं असं नाही. ऑफिसात काम करून दमून आलेल्या नवऱ्याला गरम गरम चहा द्या. चहाबरोबर काही तरी खायला करा. नाहीतर भुकेला नवरा नाराज होण्याची शक्यता असते. स्वत: केलेला चहा तुम्हीही प्यालच. तुम्ही घरी रिकाम्या आणि मोकळ्याच असता. त्यामुळे कायम ताज्यातवान्या. तरीही कधी कधी इतर कोणी बनवून दिलेला चहा तुम्हाला आवडतो हे या कानाचे त्या कानाला कळू देऊ नका. टीव्हीसमोर बसून जगाचे प्रश्न समजून घेत सरकारनं काय काय करायला हवं याचा विचार करणाऱ्या किंवा स्पोर्ट्स चॅनलवर एखादी आयपीएल किंवा वर्ल्ड कप पाहाणाऱ्या नवऱ्याला चुकूनही काय चाललंय म्हणून विचारू नका. तुम्हाला मूर्ख ठरविण्याची शेकडो कारणं त्याला माहीत आहेत.
साऱ्या घराला जेऊखाऊ घातल्यावर त्या घराला शांत झोप यावी याची काळजीही तुम्हालाच घ्यायची आहे हे विसरू नका. तुमच्या झोपेचा मात्र विचार करू नका. कारण तुम्हाला बिछान्यातही फ्रेश राहायचं असतं. कारण त्याची तशी इच्छा असते. आणि नवऱ्याच्या इच्छेचा मान राखणं हे प्रत्येक स्त्रीचं परम कर्तव्य असतं. आपल्या कर्तव्यात कधीही कमी पडू नका. दिवसभराचा हा कार्यक्रम सावकाशीनं करूनही तुमच्याकडे बराचसा वेळ शिल्लक राहू शकतो. आणि नसेल राहात तरी तो काढावा असं आम्हाला नाही तर साऱ्या जगाला नेहमीच वाटत असतं. कारण कोणत्याही आदर्श स्त्रीला रोजच्या कामाव्यतिरिक्त अनेक कामं करायची असतात. उदाहरणार्थ रोजची देवपूजा. साग्रसंगीत शक्य नसली तरी सकाळ-संध्याकाळ निरांजन लावायला लागतेच. त्याशिवाय कोणत्याही गीतकाराला, ‘लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी’ अशी कविता किंवा गाणं सुचणं शक्य नाही. लावलेला दिवा जमलं तर हिंदी फिल्म किंवा मालिका स्टाईलनं घरभर फिरवा आणि वातीचा प्रकाश आपल्या हातानं पसरवा. सकाळ-संध्याकाळ केलेला हा एक्सरसाइझ मन प्रसन्न वगैरे ठेवतो.
आता उरल्या महत्त्वाच्या गोष्टी. वर्षभराच्या सणासमारंभाचं, व्रतवैकल्यांचं नियोजन करा. नुकतीच वटपौर्णिमा झालेली आहे. नवऱ्याला टिकवण्याच्या, कुटुंबाला समृद्ध करण्याच्या, मुलांना मार्गी लावण्याच्या वगैरे जबाबदाऱ्या तुमच्यावरच आहेत. चांगला नवरा मिळावा म्हणून एवढी वर्ष तुम्ही हरतालिका केलेली आहेच. ज्याच्यामुळे तुम्ही या जगात सौभाग्यवान झाला आहात त्याला व्यवस्थित जगवण्यासाठी, वडाची फांदी घरी आणून किंवा थेट वडाजवळ जाऊन तुम्ही यमाच्या दारात गाऱ्हाणंही घातलं आहे. तरीही नवऱ्याची काळजी घेण्यासाठी आणखी काही व्रतं असतील तर तीही करा. कारण शेवटी तो आहे म्हणूनच तुम्ही आहात हे विसरू नका. खरं तर दर वर्षी वटपौर्णिमेला बायका एवढय़ा भक्तिभावानं वडाची पूजा करतात. वडाला धागे गुंडाळून त्यांच्या पुरुषांचं आयुष्य मागतात. म्हणजे या पुरुषांना अमरत्वाचा पट्टाच मिळायला हवा. पुरुषांचं जिवंत असणं किंवा अखंड सोबत असणं स्त्रियांच्या सौभाग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं हे तुम्हाला समजून घ्यायला हवं. नाहीतर तुमच्या पातिव्रत्याबद्दल संशय व्यक्त होऊ शकतो. आजच्या सावित्री त्या हजरजबाबी सावित्रीएवढय़ा हुशार नाहीत का, असे नानाविध प्रश्न आपले संस्कृतीरक्षक विचारू शकतात. मला वाटतं, यमाला कसं जिंकायचं याचे कोचिंग क्लासेस काढण्याची गरज आहे. ते काढले तर कदाचित पुरुषांचा मृत्यू होणारच नाही. आपल्या परंपरेप्रमाणे स्त्रियांच्या जिवंत राहण्याने किंवा न राहण्याने तसा काहीच फरक पडत नाही. आणि तसं पाहिलं तर त्यांच्यासाठी ना कोणी वडाला धागे बांधत ना हरतालिकेची पूजा करत ना त्यांच्या आरोग्यासाठी कोणी प्रार्थना करत. तरीही अनेक बायका कशा काय चिवटपणे जगतात नवरा मेल्यावरही, हा एक गहन प्रश्न आहे. तुमच्या मनात तो येतो का? येत असेल तरी त्याचा विचार करू नका. फक्त तुमच्या बांगडय़ा, कुंकू, मंगळसूत्र आणि मुख्य म्हणजे कर्त्यां किंवा नाकर्त्यां पुरुषामुळे तुम्हाला मिळालेलं सौभाग्य एवढी व्रतं करूनही तो यम नावाचा पुरुष कसं काय ओरबाडून घेतो याचा विचार करा बायांनो. तुम्ही काय सावित्रीपेक्षा कमी आहात का? मी जोतिबांच्या सावित्रीबद्दल नाही काही म्हणत. कारण जोतिबांच्या सावित्रीमुळे तुम्ही लिहायला, वाचायला, शिकला असलात तरी लिहिण्या-वाचण्याने काय होतं. ते आपलं सही करण्यापुरतं किंवा मुलांना शिकवण्यापुरतं ठीक असतं. म्हणजे आमचे कवी अशोक नायगावकर म्हणतात तसं, नवऱ्यानं जाळल्यावर निशाणी आंगठय़ाऐवजी सही करून लिहिता येतं ‘मी स्वखुशीनं जाळून घेतेय म्हणून.’
जोतिबांची सावित्री जर आदर्श असती तुमच्यासाठी तर तुम्ही वटपौर्णिमेची तारीख लक्षात ठेवण्याऐवजी तीन जानेवारी ही तारीख लक्षात ठेवली असती आणि आठवणीने तिचं स्मरण केलं असतं. पण तुम्हाला सुशिक्षित होण्यापेक्षा पतिव्रता वगैरे होण्यात जास्त रस आहे याची मला कल्पना आहे. नाहीतर तुम्ही सत्यवानाच्या सावित्रीचीही गोष्ट नीट समजून घेतली असतीच ना! त्या काळात या बुद्धिवान सावित्रीनं तिच्या पसंतीने नवरा निवडला होता. आपल्या जबाबदारीवर लग्न केलं होतं. प्रत्यक्ष यमाबरोबर गाठभेट नसणारच झाली तिची. पण स्वत:च्या कर्तृत्वावर नवऱ्याचा प्राण, त्याचं गेलेलं राज्य परत मिळवलं होतं. खरं तर सावित्रीसारखी अशी हजरजबाबी, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्री आपल्यालाही पत्नी म्हणून मिळावी म्हणून पुरुषांनीच व्रत करायला हवं होतं तेव्हापासून. पण आपल्या संस्कृतीत स्त्रियाचे आदर्श पुरुष सहसा घेत नाहीत. बाईनं पुरुषांना आदर्श मानायचं असतं. त्यामुळे त्या सावित्रीला पतिव्रता म्हणून लेबल चिटकवून टाकलं आणि तुम्हाला वडाभोवती फिरत ठेवलंय. हा डाव तुम्हाला कळावा म्हणूनच जोतिबांच्या सावित्रीनं शाळा दाखवली आणि अक्षरांशी ओळख करून दिली तुमची. पण शिक्षण म्हणजे चांगली नोकरी मिळवणं असा काहीसा समज झालाय सगळ्यांचा आणि तुम्ही घराचं मंदिर करणाऱ्या बायांनो, तुम्हाला वाटतं शिक्षण घेणं म्हणजे चांगला शिकलेला, पैशानं समृद्ध नवरा मिळवण्याचा आणि मुलांसाठी घरच्या घरी कोचिंग टीचर होण्याचा मार्ग आहे. ठीक आहे, तुम्ही नका करू विचार. मेंदूला झिणझिण्या येतील. सवय नाही ना विचार करायची. अजिबात करू नका. फक्त वेळ घालवण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करा. मिळालेला वेळ तुम्हाला हवा तसा सत्कारणी लावा.
आता चातुर्मासही सुरू होतोय. म्हणजे व्रतवैकल्यांची चंगळच आहे. तुमचा वेळ कसा सत्कारणी लागेल याची सोय आपल्या परंपरेनं खूप चांगल्या पद्धतीनं केली आहे. त्यामुळे परंपरेला नावं ठेवू नका. श्रावण सुरू होईल, सोमवार, शनिवारचे उपवास सुरू होतील. खमंग स्वयंपाक करा, पुऱ्यांचं पीठ मळा, अळूवडी, कोथिंबीरवडी वळा, तळा.
दळ दळ दळा
मळ मळ मळा
तळ तळ तळा
तळा आणि जळा, असं विंदा करंदीकरांनी म्हटलं आहेच.
मग पुढे आहेच मंगळागौर, गौरी-गणपती, पितृपक्ष, दसरा, दिवाळी, सडासारवण, फराळ, मार्गशीर्षांतले गुरुवार, संक्रांत, महाशिवरात्र, गुढीपाढवा, होळी, चैत्रगौर, अक्षय्यतृतीया, एकादशा, चतुर्थ्यां, आमावास्या, अधून मधून सिद्धिविनायक, महालक्ष्मी, साईबाबा हे आणि ते बापूबाबा, बैठका आणि काय काय. किती सोई केल्यात पाहा तुमच्यासाठी. बायकांचा वेळ जात नसेल तर त्यांनी काय काय करायला हवं याची उपाययोजना आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून करून ठेवली आहे. आणि एवढं करून ते थांबले नाहीत तर तुमच्या या कामाची शाबासकीही ते तुम्हाला अधून मधून देत असतात. म्हणजे तुमच्या मातृत्वाचं कौतुक असतं त्यांना. ‘निजल्या तान्ह्य़ावरी माऊली दृष्टी सारखी धरी’ असं जगाला सांगितलं जातं. सगळी गाणी सगळ्या कविता तुमच्यासाठीच, तुमच्यातल्या आईसाठीच. कायम आपलं घर सांभाळणाऱ्या आणि मुलांना वाढताना पाहणाऱ्या आणि जास्तीत जास्त सोसणाऱ्या बाईंचं कौतुक. तुम्ही हे सगळं कसं बरं जमवून आणता याचा अगदी ‘स्मायली’त असतो तसा अचंबाही करतात ते. एक लक्षात ठेवा अचंबा केला तरी दुस्वास नाही करणार ते तुमचा. कारण तुम्ही असं घरात राहून घरं सांभाळणं आवडतं त्यांना. त्यातून वेळ काढून स्वत:चा विकास केलात, म्हणजे नृत्य केलंत, गाणं शिकलात, कशिदा काढलात, विणकाम केलं, शिवणकाम केलंत तर भरून येतं त्यांना. फक्त विचार करायचा नाही फालतू जगण्याचा, स्वत:च्या अस्तित्वाचा वगैरे. स्वभान वगैरे तर अजिबात स्पर्शूही देऊ नका मनाला. ज्या जागी आहात तिथेच राहा. परंपरांच्या बेडय़ा पायात अडकवा. स्थानबद्ध व्हा. मी उपहासानं नाही बोलत हे. विंदाही नव्हते बोलले जेव्हा त्यांनी भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत लिहिलं होतं. पाहा किती सुंदर गीत तयार केलंय त्यांनी तुमच्यासाठी.
कर कर करा
मर मर मरा
धूव धूव धुवा
शीव शीव शिवा
चीर चीर चिरा
चिरा आणि झुरा
कर कर करा
मर मर मरा
कूढ कूढ कुढा
चीड चीड चिडा
झीज झीज झिजा
शिजवा आणि शिजा.
बायांनो वेळ घालवण्याचे हे उपाय आवडतीलच तुम्हाला याची खात्री आहे आमची. पण आवडले नाहीत तर स्वत:ला प्रश्न विचारा. आम्हालाही विचारा. उत्तरं शोधा. जमलंच तर बदलून टाका तुमच्या जगण्याची हार्डडिस्क, बाप्यांनी तयार केलेली तुमच्यासाठी!
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com