१९२१ साली एलसीपीएसमध्ये (भारतातील त्या वेळची डॉक्टरी परीक्षा) सर्वप्रथम येणारी इंदुमती ही पहिली मराठी कन्या. त्याशिवाय मेडिसीन व सर्जरी या दोन्ही विषयांत ती सर्वप्रथम आली. पुढे महाराष्ट्रात सत्याग्रह करणारी व इतर स्त्रियांना त्यासाठी तयार करणारीही ती पहिलीच मराठी स्त्री. उच्च शिक्षण घेऊनही स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणाऱ्या डॉ. इंदुमतीबाईंनी आपल्या घरात स्वदेशी बांगडय़ांचे दुकान सुरू केले. प्रत्येक बाईपर्यंत पोहोचण्याचा तो एक यशस्वी मार्ग होता. त्या वेळी त्यांच्यावर ‘डॉक्टरीण कासारीण झाली’ अशी टीकाही झाली. पण त्याला न जुमानता, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांपुढे न झुकता त्यांनी स्वातंत्र्य लढा चालू ठेवला. त्या विसाव्या शतकातील आद्य मराठी स्वातंत्र्यसैनिक डॉ. इंदुमती नाईक यांचा हा रोमहर्षक लढा.
इतिहास वाचत असताना डॉ. इंदुमती नाईक या एका मराठी कन्येच्या कर्तृत्वाने लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्रात सत्याग्रह करणारी व इतर स्त्रियांना त्यासाठी तयार करणारी ही पहिलीच मराठी स्त्री असल्याचं कळलं आणि कळलं ते मरेपर्यंतचं त्याचं संघर्षमय जीवन. डॉ. इंदुमती नाईक यांनी १९२१ मध्ये मुळशी धरणाविरुद्ध झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला. या सत्याग्रहापासून त्या राजकारणाकडे पूर्णपणे वळल्या. डॉक्टर झालेल्या या तरुणीने आपला व्यवसाय बाजूला ठेवून देशकार्याला वाहून घेतलं त्याची ही कथा!
डॉ. इंदुमती यांचे वडील नारायणराव वीरकर. वीरकर पुण्याच्या कोर्टात वकिली करत होते. विचाराने ते नवमतवादी असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत करायचीच नाहीत, असा निश्चय केला होता. मुली हुजूरपागेत शिकत होत्या. मोठी सुमती १५ वर्षांची झाली तेव्हा इंग्रजी सहावीत होती. हुशार असल्यामुळे तिला वर्षांला २५ रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असे. अशातच डॉ. रामचंद्र नाईक या विधुराचे स्थळ सांगून आले. एक अट होती डॉक्टरांची. मुलीने पुढे शिकलेच पाहिजे. वीरकर मंडळींना व स्वत: सुमतीलाही ही गोष्ट फारच समाधान देऊन गेली. सुमती वीरकर लग्नानंतर इंदुमती नाईक झाली. डॉ. रामचंद्र हे धारवाडचे. त्यांचे चुलतबंधू काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांचा भरभराटीचा धंदा काँग्रेसच्या कामात झोकून दिल्यामुळे पार बुडाला व नाईक कुटुंब भुकेकंगाल झाले. अशा परिस्थितीत डॉ. नाईक यांनी काबाडकष्ट करून व शिष्यवृत्ती मिळवून डॉक्टर ही पदवी मिळवली होती. त्या कुटुंबात ते एकटेच कर्ते व मिळवते पुरुष होते. तरीही त्यांनी इंदुमतीचे शिक्षण चालू ठेवले. डॉ. नाईक टिळकभक्त होते. त्यांचा शिष्य म्हणून त्यांना राजकारणातच जायचे होते. आपल्या स्वत:च्या व्यवसायात इंदुमतीने डॉक्टर होऊन मदत करावी असे त्यांना वाटले. या शिक्षणाकरिता इंदुमतीला पुण्यात राहावे लागणार होते. तेव्हा डॉक्टरांनी धारवाडचा व्यवसाय बंद करून पुण्यात व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यामुळे इंदुमतीचे शिक्षण व स्वत: टिळकांच्या मार्गाने जाण्याचे स्वप्न साकार होणार होते.
१९२१ साली इंदुमती एलसीपीएस  (Licentiate of the college of physicians and surgeons)  ही त्या वेळची भारतातली डॉक्टरी परीक्षा पास झाली. भारतात राहून या परीक्षेत सर्वप्रथम येणारी ही पहिलीच मराठी कन्या. त्याशिवाय मेडिसीन व सर्जरी या दोन्ही विषयांत ती सर्वप्रथम आली. आपल्या पत्नीने वैद्यकीय व्यवसाय जरुरीपुरताच करावा व स्वातंत्र्यलढय़ाच्या कामाला अग्रक्रम द्यावा, असा डॉ. रामचंद्र यांचा आग्रह होता. इंदुमतीने तो मानला. आणि न. चिं. केळकर यांच्याबरोबर त्या काँग्रेसच्या कामात सहभागी झाल्या. १९२१ रोजी सुरू झालेल्या मुळशी सत्याग्रहात सहभागी झाल्या. गांधीयुगाच्या सुरुवातीस महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या विचारांचे गट होते. त्यांनी मुळशी सत्याग्रहास नेतृत्व दिले होते. १९२०मधील काँग्रेसनंतर असहकार आंदोलनाच्या महात्मा गांधी पुरस्कृत कार्यक्रमात फेरफार करावे, अशी मांडणी करणाऱ्यांना ‘फेरवादी’ म्हणत. महाराष्ट्र काँग्रेसअंतर्गत गांधींच्या असहकाराच्या कार्यक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी करा, असे म्हणणाऱ्यांना ‘नाफेरवादी’ म्हणत. १९२२ च्या अकोला येथे भरलेल्या म. प्रां. काँग्रेसच्या अधिवेशनातून व अहमदाबादच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात    डॉ. इंदुमती नाफेर गटातून बाहेर पडल्या.
मुळशी धरणाच्या सत्याग्रहात स्त्रियांनाही सामील करून घेतल्याशिवाय तो सत्याग्रह खऱ्या अर्थाने सत्याग्रह होणार नाही, असे सेनापती बापट यांचे म्हणणे होते. मुळशी गावातील बायकांचा तो स्वत:चाच प्रश्न असल्यामुळे शेतक ऱ्यांच्या बायकांमधून हळूहळू सत्याग्रहासाठी स्त्रिया नावे देऊ लागल्या. या सत्याग्रहात त्यांच्याबरोबर इतरही स्त्रिया सहभागी झाल्या पाहिजेत, असे इंदुमतीबाईंना वाटून त्यांनी ४ ऑक्टोबर १९२१ रोजी पुण्यात स्त्रियांची सभा बोलावली. आश्चर्य म्हणजे त्या सभेला १००० वर स्त्रिया जमल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात इंदुमतींनी सत्याग्रह म्हणजे काय व त्याची जरुरी काय, हे अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन एकीने आपल्या हातातील चार सोन्याच्या बांगडय़ा काढून सत्याग्रहासाठी देणगी दिली. २३ ऑक्टोबरला सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठा सत्याग्रह झाला. त्यात इंदुमतीबाईंनीही एका तुकडीचे नेतृत्व केले. याच सत्याग्रहापासून त्या राजकारणाकडे पूर्णपणे वळल्या. याच सत्याग्रहामुळे गांधीप्रणीत चळवळ पुण्यापर्यंत पोहोचली. डॉ. नाईक व भुस्कुटे अशी दोन्ही दाम्पत्ये व १०२ मावळे व इतर काही सत्याग्रही यात होते. यात प्रमुख १२ स्त्रिया होत्या. डॉ. इंदुमती यांचे अमोघ वक्तृत्व, रोजच्या व्यवहारातील व पुराणातील उदाहरणे यामुळे स्त्रिया त्यांच्या सभेला गर्दी करीत. या सत्याग्रहात मुळशीची जाईबाई भोई ही पहिली महिला सत्याग्रही. उपलब्ध माहितीनुसार ही सत्याग्रहात भाग घेऊन तीन महिन्यांचा कारावास भोगणारी पहिली स्त्री. इंदुमती या सत्याग्रहात शेतकरी व मध्यमवर्गीय शहरी स्त्रियांमधील प्रमुख दुवा होता.
मुळशी सत्याग्रहानंतर डॉ. इंदुमतींनी असहकाराच्या संकल्पनेवर जोर देऊन काम केले. स्वदेशीचा प्रचार, सूतकताई वर्ग, राष्ट्रीय शिक्षण या कामात त्या पतीबरोबर डॉक्टर होण्यापूर्वीच होत्या. स्त्रियांमध्ये वैचारिक परिवर्तन होण्यासाठी कोणत्याही सभेत बोलण्याची त्या संधी सोडत नसत. गीतेचा व इतर आध्यात्मिक विषयांचा विद्यार्थिदशेपासूनच त्यांचा अभ्यास होता. भाषणे करताना त्या त्यातील उदाहरणांचा अचूक उपयोग करीत. डॉक्टरीचा निकाल लागण्यापूर्वी त्यांना पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नोकरी आली. इंदुमतीबाईंच्या वडिलांनी त्यांना ती नोकरी घेण्याचा सल्ला दिला. पण ससूनची नोकरी ही सरकारी नोकरी असल्यामुळे इंदुमतीबाईंनी ती नोकरी नाकारली. आणि पतीबरोबर स्वत:ला स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून दिले.
डॉ. इंदुमतीबाईंनी पुण्यातील आपल्या घरात स्वदेशी बांगडय़ांचे दुकान सुरू केले. प्रत्येक बाईपर्यंत पोहोचण्याचा तो एक यशस्वी मार्ग होता. या दुकानाची जाहिरात त्या वेळच्या ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रात दिली होती. ‘डॉक्टरीण कासारीण झाली’ अशी टीकाही त्याबद्दल झाली. त्याचबरोबर स्वदेशी, असहकार, हरताळ याचे तात्त्विक अधिष्ठान समजावून देण्यासाठी त्यांनी इंग्लिश व मराठीतून विपुल लेखन केले. ज्ञानप्रकाशात जाहिरात देऊन आपल्या राहत्या घरात सूतकताईचा वर्ग सुरू केला. तो अपेक्षेपेक्षाही मोठा झाला. त्यातूनच ‘सूत कमिटीची स्थापना झाली. त्यात आनंदीबाई जोगळेकर, सत्यभामा कुवळेकर आदी स्त्रिया प्रमुख होत्या. या कमिटीतर्फे विकले जाणारे सूत अत्यंत तलम होते. त्यांनी विणलेली साडी बालगंधर्वानी विकत घेतली होती. डॉ. इंदुमती यांनी राजकीय कामासाठी टिळक स्मारक फंड व स्वराज्य फंड जमविण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे गावोगावी स्त्रियांनी काँग्रेसचे सभासदत्व घेतले. एकटय़ा बारामती गावात त्यांच्या भाषणानंतर ४० स्त्रिया काँग्रेसच्या सदस्य झाल्या व त्याच स्त्रियांनी आपली सूत कमिटी स्थापन केल्याचा उल्लेख इंदुमतीबाईंच्या चरित्रात सापडतो. डॉ. इंदुमतीबाई हिंदू-मुस्लीम एकता व राष्ट्रीय कार्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने वीरमाता अम्मी (अलीबंधूंची आई) यांचे व त्यांची सून (महंमद अलीची पत्नी) यांची उदाहरणे देत. महंमद अलींची अम्मी मुंबईच्या एका जाहीर सभेत म्हणाल्या होत्या, ‘‘माझे दोन पुत्र देशकार्यासाठी देता आले त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणखीही असले तरी तेही दिले असते.’’ महंमद अलींच्या पत्नीही त्यांचे काम करण्यास पुढे आल्या. ही त्या देत असलेली उदाहरणे स्त्रियांसाठी फारच प्रेरक ठरली. डॉ. इंदुमतीबाईंची या त्यांच्या कार्यामुळे अ. भा. काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झाली. सरोजनी नायडू, कस्तुरबा, विजयालक्ष्मी नेहरू (पुढे पंडित) स्वरूपा राणी व डॉ. इंदुमती नाईक अशा फक्त पाच जणी सभेच्या कार्यकारिणीवर होत्या. त्यांना ‘पंचकन्या कमिटी’ म्हणत.
आठवा एडवर्ड (युवराज इंग्लंड) च्या भारत-भेटीवर लोकांनी बहिष्कार घालावा म्हणून डॉ. इंदुमतींनी महाराष्ट्रभर दौरा करून भाषणे केली. जानेवारी १९२२ मध्ये दारू दुकानावरील निदर्शनाकरिता आपल्या घरी स्त्रियांची सभा घेऊन गुत्त्यावर कोणी जावे, कोणी काय बोलावे ते सर्व लिहून संबंधित स्त्रियांकडे दिले. वृत्तपत्रांनी इंदूताईंचे व त्यांच्या टीमचे ‘पुण्यातील बहादूर स्त्रिया’ असे वर्णन केले. डॉ. इंदुमतींचे असहकार आंदोलनातील हे काम सर्वत्र पोहोचले. १९२१ ते १९२३ पर्यंत त्यांना खूपच दगदग झाली व त्या सपाटून आजारी पडल्या. कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते गंगाधरराव गाडगीळ यांनी त्यांना हवा व विश्रांतीसाठी बेळगावला बोलावले. कर्नाटकातील जनतेने त्यांना महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकामध्ये महिला संघटन करण्याची विनंती केली. जरा बरे वाटते न वाटते तोच त्या परत कामाला लागल्या. स्त्रियांमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यासाठी बेळगावमध्ये राष्ट्रीय कन्या शाळेची स्थापना केली. बेळगावमध्ये डिसेंबर १९२३ ला काँग्रेसचे मुखपत्र म्हणून साप्ताहिक ‘लोकपक्ष’ सुरू केले. काँग्रेसचा कार्यक्रम, सरकारच्या दोषी कार्यक्रमावर टीका, स्त्रियांचे प्रश्न, हिंदू-मुस्लीम प्रश्न इत्यादी विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या साप्ताहिकाचा होता. पंडित नेहरूंनी याबद्दल डॉ. नाईक पती-पत्नीचे अभिनंदन केले होते. त्याची कर्नाटकात राहून पक्षबांधणी करावी, असे काँग्रेसचे मत होते. पण ते घडणे नव्हते. याच सुमारास डॉ. इंदुमतींना कन्या झाली. एकाच ठिकाणी राहून व्यवसाय व काँग्रेसचे काम करण्याऐवजी देशभरात फिरून राजकीय व आध्यात्मिक प्रवचने, व्याख्याने व संघटना बांधणे हेच काम त्यांनी करायचे ठरविले. विंचवांच्या पाठीवर त्यांचे बिऱ्हाड झाले. इ. स. १९२६ ते १९४४ पर्यंत अशी भ्रमंती चालूच होती. १९२८ मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले. त्याच वेळी डॉ. रामचंद्रांची पुण्यातली एक सभा उधळली गेली. त्यांच्या पायावर लाठय़ा बसल्यामुळे त्यांना कायमचे पंगुत्व आले. सतत फिरतीमुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ  झाली. खाण्यापिण्याचेही हाल झाले. दोघांपैकी एकाने जरी व्यवसाय केला असता तरी हजारो रुपये मिळविता आले असते. हे सर्व दिसत असूनही त्यांनी नाही आपली तत्त्वनिष्ठा सोडली, नाही आपले ध्येय! अशाही परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रातील संस्थानांत प्रजा परिषदांची स्थापना केली. अशा राज्यांतून कीर्तने, प्रवचने यातून स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्त्रियांचा राष्ट्रकार्यात भाग असे विषय त्या मांडीत. १९४० नंतर सातारा जिल्ह्य़ातच ‘कराड’ गावी नाईक कुटुंब विसावले.
दोन्ही पायांनी अपंग पती व दोन मुलांचे शिक्षण व संगोपन करण्यासाठी त्यांनी डॉक्टर देशपांडे यांच्याकडे डॉक्टर म्हणून नोकरी केली. सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत काम करून त्या अपंग पती व मुलांचे शिक्षण यासाठी श्रम करीत होत्या. याच सुमारास ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले. असहकाराच्या चळवळीच्या वेळी आपले जीवनच देशाला अर्पण करणाऱ्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील या अग्रणी महिलेला स्वस्थ बसणे किती यातनामय झाले असेल ते देवच जाणे! १९२४ साली गांधीजींना अ‍ॅपेंडिक्सचा अ‍ॅटॅक आला. त्या वेळी त्यांना जेलमधून ससूनमध्ये आणले होते. डॉ. मोडक यांनी गांधीजींवर शस्त्रक्रिया करताना सर्जरीमध्ये प्रावीण्य असलेल्या डॉ. इंदुमतींना आपल्या मदतीला बोलावले होते. अशा धन्वंतरी डॉक्टरने आपल्या करिअरवर देशासाठी पाणी सोडले. मुलांच्या भविष्याचाही विचार केला नाही आणि त्याची कुठे नोंदही नाही.
१९६० मध्ये यशवंतराव कराड या त्यांच्या मतदारसंघात मतदार क्षेत्रात फिरत असता, त्यांची डॉ. इंदुमतींशी भेट झाल्यावर त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘आम्ही दोघांनी आमच्या घरसंसारासाठी होळी करून या स्वातंत्र्यसंग्रामात होरपळून घेतले. आमच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले. तुम्ही सत्ता चाखता. आमच्यासारखे उच्चशिक्षित स्वातंत्र्यसैनिकही आज उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांचे सर्वच आयुष्य खर्ची पडले आहे.’’ पुढे वसंतराव नाईक १९६६ साली मुख्यमंत्री झाले व त्यांनी डॉ. इंदुमतींना मानपत्र दिले. डॉ. इंदुमतींच्या मुलाने आपल्या ७० वर्षीय आईला निवृत्तिवेतन द्यावे, असा इंदुमतींच्या विरोधात जाऊन अर्ज केला. तोपर्यंत चव्हाण केंद्र सरकारात गेले. माधव नाईक यांना पत्राचे उत्तर आले – महाराष्ट्र शासन चौकशी करीत आहे. ते साल होते १९७१. त्यानंतर १९७४ च्या ४ जानेवारीला महाराष्ट्र शासनाकडून ५० रुपये पेन्शन मंजूर झाल्याचे पत्र आले. आणि एप्रिल १९७४ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी विसाव्या शतकातील या आद्य मराठी स्वातंत्र्यसैनिक डॉ. इंदुमती नाईक यांनी जगाचा निरोप घेतला.    
chaturang@expressindia.com

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस