लहानपणापासूनच आपणही कारखाना काढायचा हे स्वप्न पाहिलेल्या आणि मोठेपणी ते प्रत्यक्षात आणणाऱ्या, इतरही स्त्रियांना उद्योजिकतेची स्वप्ने दाखवून त्यांना मूर्त रूप देण्यासाठी झटणाऱ्या नाशिकच्या रंजना देशपांडे. महाराष्ट्रातील पहिली ‘महिला सहकारी औद्योगिक वसाहत’ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रंजना यांची ही उद्योगभरारी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणी सर्वानाच अंतराळवीर, वैमानिक आदी बनण्याची स्वप्ने पडत असतात. पुढे सगळ्यांचीच स्वप्ने पूर्ण होतात, असे नाही. कधी स्वप्ने मागे पडतात, तर कधी मेहनत कमी पडते. मात्र काही जण जिद्दीने स्वप्ने पूर्ण करतात. त्याहून एक पाऊल पुढे जाऊन दुसऱ्यांना स्वप्ने दाखविण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्दसुद्धा निर्माण करतात. अगदी अशीच कहाणी आहे महाराष्ट्रातील पहिल्या ‘महिला सहकारी औद्योगिक वसाहत’ निर्माण करणाऱ्या रंजना देशपांडे यांची. फक्त ‘माझा उद्योग’ ही सीमारेषा मोडून एक महिला उद्योजिका बनून राहण्यापेक्षा इतर अनेक जणांना त्यांनी रोजगार उभा करून दिला आहे. उद्योजिका होण्यास मदत केली आहे, त्यामुळेच त्या खऱ्या अर्थाने ‘एक उद्योगस्वामिनी’ आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
रंजनाताई मूळच्या साताराच्या. त्यांचं सगळं शिक्षणही तिथेच झालं. घरात वडील पोस्टमास्तर असल्याने आर्थिक परिस्थिती साधारण होती. घराजवळ असलेल्या ओगलेवाडीत कारखाने होते. त्यामुळे कारखाने पाहतच त्या लहानाच्या मोठय़ा झाल्या. या कारखान्यामुळेच छोटय़ा रंजनाने मोठे झाल्यावर आपणही असेच कारखाने उभे करायचे, असं ठरवून टाकलं. मग आयुष्याची वाटचाल त्याच दिशेने सुरू केली. बी.कॉम.ची पदवी घेतली. त्यानंतर वाई कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. लग्न करतानासुद्धा उद्योजक नवराच हवा, अशीच अट घातली. त्यानुसार सुनील देशपांडे यांच्याशी लग्न झाले. त्या वेळी सुनील देशपांडे यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र तो भागीदारी स्वरूपाचा होता. त्यामुळे रंजनाताई यांच्या उद्यमशीलतेला काहीच वाव मिळाला नव्हता. पुढे त्यांनी कुटुंबासह नाशिकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
नाशिकला आल्यानंतर मात्र रंजनाताईंची स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रत्यक्ष वाटचाल सुरू झाली. फाइल बनविण्याच्या व्यवसायापासून त्यांनी उद्योजिकतेला सुरुवात केली. त्या वेळी त्यांचे पती स्टेशनरी बनवून विकण्याचा व्यवसाय करीत होते. रंजनाताईंनी त्यांच्याकडून फाइल बनविण्याचे तंत्र, फाइल बनविताना पुठ्ठय़ाच्या घडय़ा घालणे, पंचिंग करून घेणे अशा बारीकसारीक गोष्टी शिकून घेतल्या. दुपारच्या वेळी जेव्हा आजूबाजूच्या स्त्रिया गप्पा मारीत बसत त्या वेळी रंजनाताई फाइल बनविण्यामध्ये व्यस्त असत. शेजारी नवीन राहायला आलेली एक स्त्री दुपारी काम करून पैसे कमविते, संसाराला मदत करते हे पाहून त्या इतर स्त्रियांनाही काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आपणसुद्धा काम करायला हवं, असं त्यांनाही वाटू लागलं. त्या आपणहून रंजनाताईंकडे आल्या. वाढत्या कामांमुळे रंजनाताईंनासुद्धा मदतीची गरज होती. त्यामुळे सुमारे दहा-बारा जणींना एकत्र घेऊन रंजनाताईंनी आपला पहिला उद्योग सुरू केला. दरम्यान, १९८६-८७ मध्ये एका दैनिकात ‘मिटकॉन’च्या ‘उद्योजकता प्रशिक्षण वर्गा’ची जाहिरात आली. रंजनाताईंनी तो अभ्यासक्रम केला. तो केल्यानंतर त्यांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या पैशातून त्यांनी नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एस.आर. एन्टरप्रायजेस या नावाने प्रिन्टिंग आणि फाइल्सचा उद्योग सुरू केला. या उद्योगातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कामाचे नियोजन, मनुष्यबळाचा वापर, मार्केटिंग आदींचे प्राथमिक धडे त्यांनी इथेच गिरविले. खासगी आणि सहकारी अशा दोन्ही क्षेत्रांतली कामे रंजनाताई करायच्या. एकदा एमएसईबीची निविदा त्यांनी भरली होती. रंजनाताईंची सहकार सोसायटी नसल्याचे सांगून ती निविदा नागपूरच्या एका सहकारी सोसायटीला मिळाली. हा सगळा प्रकार पाहून आपणही महिलांची सहकारी संस्था स्थापन करायचीच, असं रंजनाताईंनी ठरविलं. आतापर्यंत महिलांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा अनुभव गाठीशी होताच. कायद्याच्या बाबी बघितल्या तर त्या वेळी अशा प्रकारच्या कुठल्याच महिला सहकारी संस्थेसाठी कुठल्याच तरतुदी नव्हत्या. महिला एकत्र येऊन सहकार तत्त्वावर औद्योगिक वसाहत निर्माण करणे या संकल्पनेचा विचार झालाच नव्हता. त्यानंतर मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा, बैठका आदी करून त्यांनी संकल्पना सविस्तरपणे मांडली. यासाठी असंख्य वेळेला मंत्रालयात जावे लागे. मग त्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसचा पाससुद्धा काढला. घरी मुलीची दहावीची परीक्षा होती त्यातूनही रंजनाताईंनी पाठपुरावा सुरूच ठेवला. शेवटी अथक मेहनतीनंतर १२ ऑगस्ट १९९१ ला ‘उद्योगस्वामिनी हितवर्धिनी महिला सहकारी संस्था’ सहकार खात्याकडे नोंदणीकृत झाली.
या रजिस्ट्रेशनच्या आठवणी रंजनाताई अभिमानाने सांगतात. एक ‘स्पेशल केस’ म्हणून या संस्थेकडे पाहिलं गेलं. सुरुवातीला २५ महिलांना एकत्र घेऊन या संस्थेंतर्गत ‘उद्योगस्वामिनी व्यवसाय संकुल’ या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. यासाठी महिलांना एकत्र आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दररोज त्यांना भेटून उद्योगातून होणारे फायदे सांगितले. उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदतसुद्धा मिळणार असल्याचे पटवून सांगितले. तेव्हा शेवटी महिला तयार झाल्या.
ही सगळी मेहनत इथेच थांबली नाही तर पुढे या पंचवीस जणींचे कर्जासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, मंजुरीसाठी लागणारी इतर कागदपत्रे गोळा करणे, दहा लाखा रुपयांचे कर्ज मंजूर करून घेणे दुसरीकडे प्रकल्पाचे बांधकाम, वीज, पाणीची तरतूद, स्टॅप टय़ुटीत माफी मिळविणे ही सर्व केली. व्यवसाय संकुलासाठी मिळालेली जागेत मोठय़ा प्रमाणात भराव टाकून एकसारखी जागा करून घ्यावी लागली. भूखंडावर गाळ्यांच्या उभारणीसाठी योग्य नियोजन केले. अशा रीतीने अडथळ्यांची शर्यत जिंकून महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत उभी राहिली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘उद्योगस्वामिनी व्यवसाय संकुलाचे’ २६ ऑगस्ट १९९९६ ला उद्घाटन केले. पुढे शरद पवार यांनी सहकार परिषदमध्ये अशाच स्वरूपाच्या महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठीचा संपूर्ण मसुदा तयार केला. मात्र या कामाची सुरुवात खूप आधी रंजनाताईंनी केली होती.
पहिल्या प्रकल्पाला मिळालेल्या या यशानंतर त्यांनी दुसऱ्या ‘उद्योगस्वामिनी प्रेरणा संकुला’चे काम हाती घेतले. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साठ गाळ्यांचे संकुल उभारले. या साठ गाळ्यांसाठी सुमारे साडेतीनशे अर्ज आले. यातून वेगवेगळ्या चाळण्या लावून निवड करण्यात आली. रूपी बँकेकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. मात्र १९९८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीने रंजनाताईंची खरी परीक्षा बघितली. अनेक लोकांनी साथ सोडली. काहीजणांनी पैशाची सोय होत नाही, भांडवल नाही, मंदी आहे, अशी कारणे सांगून काढता पाय घेतला. रंजनाताईंनी जिद्द काही सोडली नाही. प्रसंगी स्वत:ची पदरमोड करून, तोटा सहन करून त्यांनी मार्ग काढला. बँकेचे कर्ज फेडले आणि आज प्रेरणा संकुल प्रकल्प उभा आहे. या प्रकल्पात त्यांनी महिलांबरोबरच पुरुष उद्योजकानांसुद्धा सहभागी करून घेतले आहे.
दोन संकुलांच्या प्रकल्पानंतर आता रंजनाताईंना महिला उद्योजक आणि त्यांच्या बाळांसाठी ‘उद्योगस्वामिनी सुविधा संकुला’ अर्थात पाळणाघर यासाठी काम सुरू केले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड घेतला असून, बांधकाम पैशांअभावी थांबले आहे. मात्र रंजनाताईंची धडपड सुरू आहे. रंजनाताईंनी स्थापन केलेल्या उद्योगस्वामिनीचा संकुलनांमधून शेकडोजणांना रोजगार आणि रोजगाराची साधने मिळाली आहेत. दरवर्षी ३ ते ५ कोटींची उलाढाल होत आहेत. प्लास्टिक मोल्डिंग, स्टेशनरी, प्रिंटिंग प्रेस, फॅब्रिकेशन, इंजिनीअरिंग, मोटार वाईंडिंग, रबर उद्योग, मशिनरी, रेडिमेड गारमेंटस् आदींचा उद्योग व्यवसाय सुरू आहे.
इतरांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करताना आणि संस्थेची जबाबदारी सांभाळून रंजनाताईंनी स्वत:चे ‘चमचम फूड्स’ हे उपाहारगृह सुरू केले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची खवय्येगिरी इथे सांभाळली जाते. विशेष करून मराठी खाद्यपदार्थ यात, थालीपीठ, पुराणपोळी आदी पदार्थाची मेजवानी मिळते.
आतापर्यंत केलेल्या वाटचालीत सरकारी कामकाजाविषयी आवर्जून बोलताना रंजनाताई सांगतात, चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आले. एकदा रंजनाताई कर्जासाठी एमएसएफसी (MSFC) त गेल्या होत्या. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्यांनी दाखल केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. शेवटी रंजनाताईंची स्वाक्षरीदेखील झाली आणि तो अधिकारी म्हणाला, आता तुमच्या नवऱ्याचीसुद्धा लागेल. आम्ही फक्त तुमच्या सहीवर कर्ज देणार नाही. तेव्हा रंजनाताई म्हणाल्या, नवरा कर्ज घेतो तेव्हा बायकोची सही लागत नाही. मग बायको कर्ज घेते तर नवऱ्याची का सही हवी? यावर अधिकाऱ्याने सांगितले, ‘असले तर्क लावू नका. सही आणा.’ त्या अधिकाऱ्याची ही वागणूक पाहून रंजनाताईंनी आजपर्यंत त्या कंपनीतून कर्ज घेतलेच नाही. महिलांना आजही अस्तित्वासाठी भांडावं लागतं, लढावं लागतं हीच सद्य:परिस्थिती असल्याचं त्या सांगतात. तर कधी कधी लोक स्वत: भेटून ताई, तुम्ही मोठं काम केलं. आम्हाला पण फायदा झाला, अशी प्रामाणिक कबुलीसुद्धा देतात असं त्या आनंदाने सांगतात.
उद्योजकतेचे एवढे मोठे साम्राज्य उभारणे कसे शक्य झाले, असा प्रश्न सगळा कामाचा व्याप पाहून विचारला की, रंजनाताई अगदी सहज सांगतात,‘‘ यात काय मोठं झालं? एकदा जबाबदारी घेतली की, ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करायचा. मध्ये घाबरून पाठ फिरवायची नाही. काम हातातून सोडायचं नाही की मग सगळं सोपं होतं.’’ यशामागचं गुपीत त्या असं सोप्या शब्दांत सांगतात.
उघडय़ा डोळ्यांनी बघितलेली स्वप्ने नेहमी प्रत्यक्षात येतातच, याची प्रचिती रंजनाताईंची कहाणी वाचून येते.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist women ranjana despande