– ॲड निशा शिवपूरकर

‘‘परिस्थितीविषयीचे अज्ञान हा भयाचा पाया असतो, त्यामुळे उघड्या डोळ्यांनी, विचारांनी जगणे गरजेचे असते. समोरची माणसे केवळ माणसे असतात. ती विशिष्ट जाती व धर्माची आहेत म्हणून वेगळी आहेत, असा विचार माझ्या आईवडिलांनी कधीही केला नाही. आम्हा मुलांवरही याच विचारांचा सहज संस्कार झाला. माणसाला माणूस म्हणून ओळखणे ही निर्भयतेची पहिली अट असल्याने समाजकार्य करताना, वकिली करताना सगळ्या लोकांमध्ये सहज, निर्भयपणे वावरता आले. ‘भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य,’ असे गांधीजी म्हणत तेच आयुष्यभर जपले गेले.’’

लहान मूल कशालाच घाबरत नाही. अंधारात सहज जातं. फरशीवरील मुंगी, किडा हातात पकडतं. भय त्याला माहीत नसतं. घरातली त्याची माणसंच त्याला अंधारात बागूलबुआ, भूत आहे, किडा, मुंगी चावेल. तुला बाऊ होईल सांगतात. ‘इकडे जाऊ नको’, ‘हे करू नकोस, ते करू नकोस’ असे सांगत त्याच्या मनात भय पेरतात. भीती दाखवणाऱ्या व्यक्तीची देहबोली भय निर्माण करते. आगीच्या जवळ जाणं, उंचावरून पडणं यात धोका आहेच. पण या धोक्याची जाणीव मुलांपर्यंत पोहोचवण्याची भाषा मुलांना भीतीची ओळख करून देते. संशय, अविश्वास, आत्मविश्वासाचा अभाव, अशा अनेक भावनांचे मिश्रण भीतीच्या कल्पनेमध्ये असते. परिस्थिती- विषयीचे अज्ञान हा भयाचा पाया आहे. कौटुंबिक परिस्थिती, आजूबाजूचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण भयाची भावना वाढवत नेते किंवा कमी करते. समाजात भय निर्माण करणाऱ्यांविरुद्ध शासनाने दंडशक्ती वापरायला हवी. भय निर्माण करणाऱ्यांना सत्तेचे समर्थन मिळते तेव्हा समाज अधिक भयभीत होतो.

हेही वाचा – जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

कोणालाही न घाबरणारी, निर्भय व्यक्ती अशी माझी समाजात ओळख आहे. १९८२ ची घटना आहे. मुंबईतील ‘समता युवा संघटने’च्या बैठकीत अकोले तालुक्यातील समशेरपूरला संघटनेचे युवा शिबीर घ्यायचं ठरलं. शिबिरात बाबा आढावांना निमंत्रित करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या काळी फोन संपर्क सहज नव्हता. मुंबईहून रात्री बसने निघाले. पहाटे ४ वाजता पुण्यात पोहोचले. बसस्टँडवर चहा घेतला. बाबा नानापेठेत राहात होते. नानापेठेचा रस्ता विचारला. चालत चालत पोहोचले. दिवस थंडीचे होते. नानापेठ म्हणजे हमालांचं थांबण्याचं ठिकाण. शेकोटीभोवती ४-५ हमाल बसले होते. त्यांना बाबांचं घर कुठे आहे? विचारलं. इतक्या पहाटे बाबांना त्रास द्यावासा वाटला नाही. शेकोटीजवळ त्यांच्याशी तासभर गप्पा मारत बसले. सहानंतर बाबांच्या घराजवळच्या पायरीवर जाऊन बसले. दूधवाला आला. त्याने बेल वाजवली. बाबा बाहेर आले. मला पायरीवर पाहून चकित झाले. घरात घेतलं. कधी, कशी आलीस? चौकशी केली. वृत्तांत ऐकून म्हणाले, ‘‘भलतीच साहसी पोरगी आहेस.’’

मुंबईला कधीही गेले की, महमद खडसांकडे मुक्काम असे. एकदा अशीच कुठून तरी मुंबईला पोहोचले. रेल्वे ट्रेनने सायन स्थानकापर्यंत आले. तिथून रिक्षा करून महमदभाईंच्या चुनाभट्टीतील घरी पोहचले. दारावरची बेल वाजवली. महमद भाईंनी दार उघडले. मला पाहून म्हणाले, ‘‘रात्रीचा दीड वाजलाय. कुठून आलीस अशी अवेळी एकटी? मान्य, तुझ्या अंगावर दागिने नाहीत, पण तरुण आहेस. मुंबईत पुन्हा असं साहस करू नकोस.’’ १९८५-८६ मध्ये नगरपालिकेतील सत्तेच्या ध्रुवीकरणासाठी संगमनेर शहरात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुस्लीम तरुणांना एकटे गाठून हल्ला करण्याच्या चार-पाच घटना घडल्या. यात हिंदुत्ववादी संघटनेचा पुढाकार होता. मुस्लीम समाजातील संपर्कामुळे या मारहाणीच्या तक्रारी ‘समता आंदोलना’कडे आल्या. आम्ही त्यांना पोलीस ठाण्यात फिर्यादी नोंदवायला सांगितले. ‘समता आंदोलना’ने नेहरू चौकात शांततेसाठी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना मी न्यायालयात आरोपींचे जामीन देणारे प्रतिष्ठित गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी केली. या प्रतिष्ठितांमध्ये हिंदुत्वादी संघटनांचे प्रमुख आणि शहरातील उद्योजक होते. हा घाव वर्मी बसला. मी शहरात सगळीकडे पायी फिरायचे. तीन वेळा मला रस्त्यात चार-सहा तरुणांच्या गटाने अडवले. तुम्ही हिंदूविरोधी व मुस्लिम धार्जिण्या आहात असे म्हणत धमकीची भाषा सुरू केली. त्यांना मी दंगलविरोधी व शहरातील शांतताधार्जिणी आहे, असं सांगितलं. काही हितचितकांनी मी शहरात एकटीनं फिरू नये असा सल्ला दिला. मी तो अर्थात मानला नाही.
एके दिवशी संध्याकाळच्या वेळी मी घरी एकटी असताना एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आला. मी बाहेरच्या गच्चीत कपडे वाळत घालत होते. त्यांनी धमकावण्याच्या सुरातच मला, ‘आमच्या मागे लागलात तर महागात पडेल,’ असं ऐकवलं. साडीचा पिळा झटकत मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि माझं काम सुरूच ठेवलं. आणि विचारलं, ‘‘चहा पिणार का?’’ तो गडबडूनच गेला. काही न बोलता निघून गेला. आमचे मित्र व कार्यकर्ते इस्माईल ऊर्फ शेखर पटेल यांना कळल्यानंतर ते त्याच्या दुकानात गेले. ‘‘निशाताईंना काही झाले तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.’’ अशी त्याला जरब बसवून आले.

औरंगाबाद माझे माहेर. आई, वडील होते तेव्हा घरी जायची ओढ लागलेली असायची. सामाजिक काम, वकिली पेशातून जमेल तसा वेळ काढून औरंगाबाद गाठायची. एकदा धुळ्याला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर बस स्टँडवर आले तर समोर औरंगाबादची बस दिसली. आई-बाबांना भेटावंसं वाटलं. औरंगाबादला पोहोचले तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. बस स्टँडवरचा रिक्षावाला जास्त पैसे मागू लागला. माहेरची वाट चार-पाच कि.मी. होती. निवांत पायी चालत घरी पोहोचले. वहिनीने दार उघडलं. आई जागी झाली. अचानक लेकीला पाहून खूश झाली. स्टँडपासून चालत आल्याचं कळाल्यावर म्हणाली, ‘‘बेटा तू कोणाला भीत नाहीस. मात्र या वेळी रस्त्यावर कुत्रे फार असतात. त्यांनी त्रास नाही ना दिला?’’ ‘‘नाही गं अगदी आरामात आले,’’ असं म्हणत तिच्याबरोबर चहा घेतला.

हेही वाचा – माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’

माझ्या या निर्भयतेचे नेमके गमक काय? सार्वजनिक जीवनात जनतेच्या निर्भयतेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्तीचे या प्रवासात व्यक्ती, स्त्री म्हणून असलेलं भय कसं गळून पडलं? याचा मी विचार करते तेव्हा तो प्रवास माझ्या आईपासून सुरू होऊन महात्मा गांधीजींपर्यंत पोहोचतो. आईला आम्ही तीन मुली आणि एक मुलगा. आई कलावती शिवूरकर शिक्षिका आणि शेतकरी होती. त्या काळी शेतीच्या पाण्यासाठी विहिरीवर इंजिन वापरत. या इंजिनची दुरुस्ती हे नेहमीचेच काम असायचे. शेतातील मदतनीस इंजिन फिटरकडे आणून पोहोचवायचे. त्यानंतर आम्हा मुलांची ड्युटी सुरू व्हायची. फिटरच्या गॅरेजमध्ये बसून ते काम करावं लागायचं. भीती, घाबरणं हे शब्द आईच्या शब्दकोशातच नव्हते. आपल्या वाढत्या वयातील मुलींना ती गॅरेजमध्ये बिनधास्त पाठवायची. नाही म्हणायची आमची प्राज्ञा नव्हती. आम्ही मुले थोडेफार घाबरायचो ते फक्त आईलाच. गॅरेजमध्ये कंटाळा यायचा. त्यावर तिचं म्हणणं असे की, पुस्तक वाचत बस नाहीतर अभ्यास कर. कधी कधी रात्रीचे नऊ वाजत. फिटर चाचा चविष्ट चहा देत. गॅरेजमध्ये सात-आठ माणसं वावरत असत. कितीही बोअर झाले तरी भीती मात्र कधीच वाटली नाही. तर अशी आई असलेल्या मुलीला आपण मुलगी आहोत म्हणून घाबरून, दबून राहावं असं वाटण्याचं काही कारणच नव्हतं. समोरची माणसं केवळ माणसं असतात. ती विशिष्ट जाती व धर्माची आहेत म्हणून वेगळी आहेत, असा विचार आई-वडिलांनी कधीही केला नाही. आम्हा मुलांवरही याच विचारांचा सहज संस्कार झाला. माणसाला माणूस म्हणून ओळखणं ही निर्भयतेची पहिली अट आहे.

स्वातंत्र्यसैनिक असलेले संघर्षशील वडील न बोलता, सांगता आम्हा मुलांना निर्भयतेचा संस्कार देत होते. घरातला गांधीजींचा उभा फोटो आणि साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहियांची पुस्तकं उघड्या डोळ्यांनी आणि मेंदूला कोणतीही झापड न लावता जग पाहायला शिकवत होती. ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेत गांधीजींनी त्यांच्या मनात असलेल्या भीतीविषयी प्रांजळपणे लिहिलं आहे. चोर, भूत, अंधार, साप यांच्या भीतीने पछाडलेला तरुण मोहनदास दक्षिण आफ्रिकेतील जुलमी सत्तेच्या विरोधात लढायचे ठरवतो. त्याचा घाबरटपणा नाहीसा होत जातो. त्याचे संघर्षशील निर्भय नेत्यामध्ये रूपांतर होते. गांधीजींचा हा प्रवास मुळातूनच वाचायला हवा. ‘भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य,’ असं गांधीजी म्हणत. गांधीजींनी ब्रिटिशांच्या वसाहतवादी साम्राज्याविषयीचे भारतीय जनतेच्या मनात असलेले भय घालवले. सशस्त्र ताकद असलेल्या ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गाने लढताना नि:शस्त्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या मनातील अनेक प्रकारचे भय नष्ट झाले. देश स्वतंत्र झाला.

जनतेने कोणतेही भय मनात न बाळगता निर्भीडपणे जगावे असा प्रयत्न मीही सार्वजनिक जीवनात सतत केला. या प्रवासात माझाही भयमुक्तीचा प्रवास झाला. निर्भय असणं हे माझ्यासाठी व्यवस्थेने कळत-नकळत दिलेले ‘संरक्षक कवच’- प्रिव्हिलेज आहे. मध्यमवर्गीय, विचारी कुटुंबातील जन्म, चळवळीतील कार्यकर्ते, मित्र-मैत्रिणी यांनी निर्भयतेची साखळी माझ्याभोवती निर्माण केलेली आहे. देशातील फार मोठ्या समाजाच्या वाट्याला असे विशेष संरक्षक कवच आलेले नाही.

मी मणिपूरची रहिवासी नाही, बिल्कीस बानो नाही, हाथरसच्या दलित कुटुंबातील वा काश्मीरमधील कथुआची असिफा नाही. व्यवस्थेने या सगळ्यांच्या वाट्याला दिलेली वेदना माझ्या वाट्य़ाला आलेली नाही. तरीही ती माझ्यापर्यंत पोहोचते. देशातील प्रत्येक माणसाचा निर्भयपणे जगण्यावर अधिकार आहे. तो व्यक्तीचा नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकार आहे. संकुचित राष्ट्रवादाच्या आजच्या काळात प्रत्येक माणसाला निर्भयपणे जगता येईल अशी परिस्थिती नाही. बहुतांश जनता आणि प्रस्थापित सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या सगळ्यांभोवती भीतीचे सावट उभं केलेलं आहे.

‘भयशून्य चित्त जेथे, उन्नत तेथे माथा’ या कविवर्य रविंद्रनाथ टागोरांच्या कवितेतील मार्गाने निघालेल्या माझ्याही मनाच्या आतल्या कप्प्यात एक भय दाटून येते. धर्म, जात, बहुसंख्याक-वादाच्या नावाने निर्माण केलेल्या आक्रमक राष्ट्रवादाच्या भयाने रात्रीची झोप उडते. अंधारात उघड्या डोळ्याने देशाच्या भविष्याचा विचार सुरू होतो. अशा वेळी एन.आर.सी.(नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप) विरोधात २०२० मध्ये स्त्रियांनी केलेले शाहीन बाग आंदोलन आणि २०२२-२३ मधील किसान आंदोलन आठवतं. आंदोलनात मीही सहभागी होते. माणसाला वाटणारं श्वापदाचं, अपघाताचं भय असू दे असले तर. मात्र आपलं सामाजिक, राजकीय जीवन निर्भय असलं पाहिजे, असं सांगत मनाला शांत करते. भय इथले संपवण्याची माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र होते. तेव्हा मला शायर राहत इंदोरी यांच्या

जो आज साहिब ये मसलत, कल नही होंगे।
किरायादार है जाती मकान थोडी है,
सभी का खून शामील यहा के मिट्टी मे
किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है।

या शेरची आठवण येते. निर्भयपणे आपली भूमिका बजावणारा ‘स्वतंत्र मीडिया’ सोबत असतो. देशातील बदललेला माहोल भविष्याची चिंता कमी करतो. महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, एस.एम. जोशी यांच्यासारखे अनेक नेते दंगलग्रस्त भागात, गर्दीमध्ये सहज जात. निर्मळ चारित्र्य, सद्सद्विवेक आणि समस्त मानवजातीविषयी असलेल्या त्यांच्या कळवळ्यातून त्यांना हे सामर्थ्य मिळाले होते. करुणेचा हा प्रवाह वाहता ठेवण्यातूनच निर्भयतेचा प्रवास करता येतो. विषमता, अन्याय, हिंसा भयाची निर्मिती करतात. निर्भय असण्यासाठी समतामूल्यावर विश्वास हवा.
स्त्री-पुरुष नात्यामध्ये स्वामित्वाच्या भावनेबरोबरच भयही असतं. गांधीवादी विचारवंत दादा धर्माधिकारींनी वाघ आणि शेळीच्या साहचर्याचे उदाहरण दिले आहे. शेळीला वाघ खाऊन टाकण्याची भीती आहे. हे नातं बरोबरीचं कसं होणार? स्त्री-पुरुष सहजीवनाचा पाया मैत्री हवा, हा विचार दादांनी सांगितला. पुरुषांच्या सहवासात स्त्रियांना भीती वाटता कामा नये ही पुरुषांची जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष नात्यातील मैत्रीचा विचार ही गांधीजींनी आपल्याला दिलेली देणगी आहे, असे दादा धर्माधिकारींनी म्हटलं आहे. सगळ्याच नात्यांमध्ये मैत्रभाव हवा. असा मैत्रभाव समाजातील भय कमी करेल, असा विश्वास आहे.

advnishashiurkar@gmail.com