प्रतिभा वाघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या कलेची साक्ष देणारी कातळचित्रे, जुन्या चर्च व इमारतींमधील डोळय़ांना मोहवणाऱ्या स्टेन्ड ग्लास खिडक्यांचे पुनरुज्जीवन, चित्र, शिल्प व एकूणच कलेचे आधुनिक पद्धती वापरून केलेले जतन आणि काटेकोरपणे ठेवलेली नोंद.. कलेच्या क्षेत्रात अत्यंत आशादायक चित्र दाखवणाऱ्या वारसा जपण्याच्या कामात किती तरी स्त्रिया उत्तम कामगिरी बजावत आहेत. १८ एप्रिलच्या ‘जागतिक वारसा दिना’च्या निमित्ताने त्यांची ही ओळख..

आपण वारसास्थळे (हेरिटेज साइटस्) पाहायला जातो, त्या वेळी येणारा नेहमीचा अनुभव मला २०१३ मध्ये जहाँगीर आर्ट गॅलरीच्या टेरेस आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन पाहताना आला. वर्षां कारळे यांच्या ‘प्लेजर अँड पेन’ (आनंद आणि वेदना) या मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेल्या या प्रदर्शनात वारसास्थळांचे सुंदर फोटो होते. पण प्रत्येक वास्तूच्या सौंदर्याला बाधा आणणारे गालबोट लागले होते, ते म्हणजे त्यावर लोकांनी खडूने, कोळशाने लिहिलेला मजकूर आणि भिंती खरवडून लिहिलेली नावे. हे सारे पाहून मन विषण्ण झाले. २०२२ च्या मार्चमध्ये मात्र मी त्याहून वेगळे दृश्य पाहिले, ते रत्नागिरीच्या एका गावात, कातळचित्र पाहताना. उक्षी गावात एका कातळचित्राच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी उभारलेले कुंपण. ते पाहून काळ पुढे जातोय तशी लोकांची मानसिकता बदलते आहे, या वारसास्थळांचे महत्त्व त्यांना समजू लागले आहे, या सकारात्मक विचाराने मनाला उभारी आली. 

 उपलब्ध माहितीनुसार जगामध्ये एकूण ११५४ वारसास्थळे आहेत. त्यांपैकी ९८७ सांस्कृतिक, २१८ नैसर्गिक आणि ३९ मिश्र वारसास्थळे आहेत. यात भारतात एकूण ४० वारसास्थळे आहेत. त्यांपैकी ३२ सांस्कृतिक,

 ७ नैसर्गिक आणि १ मिश्र स्वरूपाचे आहे. जगात वारसास्थळांच्या संख्येनुसार भारताचा सहावा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात अजिंठा, घारापुरी गुंफा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक, व्हिक्टोरियन गॉथिक इमारतींचा समूह अर्थात राजाबाई टॉवर, इरॉस चित्रपटगृह, चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाची इमारत ही काही वारसास्थळे आहेत. कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वारसास्थळ म्हणून ‘युनेस्को’कडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे.    

कोकणातील कातळचित्रांना खोदचित्र, कातळशिल्प असेही म्हणतात. कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या कलाप्रकाराकडे पाहिले जाते. कोकणात जांभा खडकांनी युक्त (Lateritic plateau) कमी उंचीची पठारे, ज्यांना ग्रामीण भाषेत ‘सडा’ असे म्हणतात, ती आहेत. प्रागैतिहासिक कालखंडाच्या संदर्भाने पाहिल्यास ही कातळचित्रे कोकणाचा भूशास्त्रीय वारसा (Geoheritage) आहेत असेच म्हणावे लागेल.  कातळचित्रे कोरून, खोदून किंवा खरडून निर्माण केलेली, कमी उठावाची, जवळजवळ द्विमित वाटावी अशी आहेत. या चित्रांचे विषय विविध प्रकारचे जंगली प्राणी, नीलगाय, गवा, रेडा, माकड, ससा, डुक्कर, एकिशगी गेंडा, हत्ती, पाणघोडा, वाघ, कोल्हा, मगर, घोरपड, तसेच शार्क, कासव, वाघळी, देवमासा, असे जलचर आहेत. गरुड, ससाणा, बगळा, मोर इत्यादी पक्षी यांचेही चित्रण आढळते. स्त्री आणि पुरुषाच्या आकृतीत फारसा फरक आढळत नाही. काही आकृतींचे मातृदेवतेच्या आकृतीशी साम्य दिसते. याशिवाय विविध भौमितिक आकार, नागमोडी रेषा, चौकोन, त्रिकोण आणि काही अगम्य आकारही आढळतात. दोन ते चार चित्रांपासून १२० चित्रांचा समूह आढळतो. कातळचित्र हा आदिमानवाचा आविष्कार मोठय़ा प्रमाणात शोधून जगासमोर आणण्याचे मोठे काम २०१२ पासून रत्नागिरीचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई स्वखर्चाने करत आहेत. ७२ गावसडय़ांवर १२७ ठिकाणी, १६०० पेक्षा अधिक कातळचित्रे त्यांनी शोधून काढली आहेत. यापूर्वीही ८ ते १० ठिकाणी संशोधनाचे काम झाले आहे. प्र. के. घाणेकर, दाऊद दळवी, श्रीकांत प्रधान, सुबोध शिरवळकर, रवींद्र लाड,अनिता राणे यांनी संशोधन केले.

लेखाच्या प्रारंभी उल्लेख केलेल्या उक्षी गावातील कातळचित्रांना सुरक्षिततेचे कुंपण घालण्याचे काम २०१७ मध्ये झाले. जमीनमालक, ग्रामपंचायत, गावकरी यांच्या सहकार्याने हे काम झाले. या कामानंतर तिथे पोहोचण्यासाठी लागणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करून घेण्यात आला. या ठिकाणचे हत्तीचे चित्र पाहिल्यावर या कातळचित्राच्या सौंदर्यमूल्याची कल्पना येते. हत्तीचे चित्रण १८ फूट लांबीचे असून रुंदी (उंची) १४ फूट आहे. रेषा अत्यंत ओघवती असून चित्रकलेच्या दृष्टीने रेखांकनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ‘महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागा’चे संचालक तेजस गर्गे, इतर ज्ञानशाखेतील तज्ज्ञ आणि वर उल्लेखलेल्या व्यक्ती या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नाने संशोधनात्मक काम सुरू आहे. नुकतेच ‘युनेस्को’कडून कातळचित्रांना प्राथमिक यादीत स्थान मिळाले आहे. मानवी इतिहासातील हा एक खूप मोठा ठेवा आहे. रत्नागिरीमधील ‘निसर्गयात्री’ ही संस्था या संदर्भात महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. नुकताच या संस्थेच्या वतीने रत्नागिरीत कातळ महोत्सव साजरा करण्यात आला.

   कठीण दगडावरील कातळचित्रांप्रमाणे चर्चच्या खिडक्यांवरील नाजूक काचेवरील रंगीत चित्रांना वारसास्थळाचा मान मिळाला आहे. ही चित्रे ‘स्टेन्ड ग्लास विन्डो’ या नावाने ओळखली जातात. या नाजूक काचेवरील चित्रे रंगवणारे नाजूक हात आहेत स्वाती चंदगडकर आणि सुमन वाढये यांचे. ‘स्टेन्ड ग्लास’- अर्थात रंगीत काचचित्रे- जी विशेषत: जुन्या इमारती, चर्च, यांच्या खिडक्यांवर दिसतात. आपला वारसा म्हणून त्याकडे पाहिले जाते. या खिडक्यांचे संवर्धन करण्याचे काम आत्मीयतेने करणाऱ्या स्वाती चंदगडकर यांनी इंग्रजी साहित्यात ‘एम.ए.’-‘एम.फिल’ केले असून त्या रुईया कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी दोन वर्षांचा स्टेन्ड ग्लासचा अभ्यासक्रम केला आणि या क्षेत्रात उच्च स्थान मिळवले. ‘कॉन्झर्वेशन टेक्निकल हँडबुक’ या पुस्तकाच्या त्या लेखिका असून ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’ने त्यांचे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. देशा-परदेशातील विद्यापीठांत, वस्तुसंग्रहालयांत ‘स्टेन्ड ग्लास’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. सिंगापूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी त्यांच्या कचेऱ्या आहेत.

   १९९७ मध्ये ‘द ग्लास हाऊस’ स्टुडिओची निर्मिती करणाऱ्या स्वाती चंदगडकर यांनी मुंबईतील अनेक इमारतींच्या स्टेन्ड ग्लास विन्डोंचे पुनरुज्जीवन केले असून त्यांना ‘एशिया पॅसिफिक हेरिटेज अ‍ॅवॉर्ड’ पाच वेळा मिळाला आहे. सिंगापूरमधील ‘कॅथ्रेडल ऑफ द गुड शेफर्ड’ या त्यांनी सुशोभीकरण केलेल्या एकाच चर्चला २०१७ मध्ये दोन पुरस्कार मिळाले आहेत. एकटय़ा मुंबईत त्यांचे ३० पेक्षा अधिक प्रकल्प आहेत. गोव्यातील चर्चच्या खिडक्यांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे. भुलेश्वर मंदिर, विरारचे जीवदानी मंदिर यातही त्यांचे काम पाहायला मिळते. ‘रॉयल बॉम्बे याच (Yacht) क्लब’, पेटिट लायब्ररी, राजाबाई टॉवर, ग्लोरिया चर्च, अफगाण चर्च आणि अनेक इमारतींमध्ये वारसास्थळे जपण्यासाठी स्टेन्ड विन्डोचे काम त्यांनी केले आहे.

सुमन वाढये गेली १३ वर्षे स्वातीताईंच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांच्याबरोबर काम करतात. सुमन यांनी मुंबईमधून ‘फाईन आर्ट्स’चे शिक्षण पूर्ण केले असून स्टेन्ड ग्लासचे संपूर्ण धडे त्यांना स्वातीताईंकडून मिळाले. सिंगापूरमधील दोन चर्चेसच्या प्रकल्पांत त्यांनी चित्रकार म्हणून काम पाहिले. स्टेन्ड ग्लासची पहिली पायरी म्हणजे आवश्यकतेनुसार डिझाईन करणे. त्यानंतर चित्रकार पूर्ण प्रमाणात (Fullscale) रेखाटन करतात. त्यानंतर कारागीर चित्राला आवश्यक असलेल्या रंगीत काचा कापतात. या काचा हिरवा, निळा, पिवळा अशा रंगांच्या असतात. कापून झालेल्या काचांवर चित्रकार निवड झालेले चित्र रंगवतो आणि या चित्रित काचा भट्टीमध्ये योग्य तापमानात भाजल्या जातात. कारागीर या तयार झालेल्या चित्राच्या काचा टेबलवर मांडून लेड- म्हणजे शिशाच्या साहाय्याने जोडतात आणि पॅनल तयार होते.

सुमनताई सांगतात, की सातव्या शतकापासून अस्तित्वात असलेली कला जतन करण्यासाठी संवर्धन (Conservation) आणि जीर्णोद्धार (Restoration) या दोन्हीची गरज असते. हे करताना कलाकृतीचा अस्सलपणा (Authenticity) जपणे आवश्यक असते. हे शास्त्र म्हणजेच संवर्धनशास्त्र. कलाकृतीचा तुटलेल्या अवस्थेतील भाग पुन्हा दुरुस्त करणे किंवा तिला मूळ रूपात आणणे म्हणजे जीर्णोद्धार. थोडक्यात, ही कलात्मकतेने केलेली दुरुस्ती असते.

मुंबईतील कालाघोडा परिसरात ‘द केनसेथ इलियाहू सिनेगॉग’ या यहुदी लोकांच्या प्रार्थनागृहाचे काम ‘द ग्लास स्टुडिओ’ने २०१८-१९ या कालावधीत केले. भारतातल्या सर्वात प्राचीन यहुदी प्रार्थनास्थळांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे प्रार्थनास्थळ आणि स्टेन्ड ग्लास विन्डो असलेले हे एकमेव सिनेगॉग आहे. यातील स्टेन्ड ग्लासची निर्मिती इंग्लंडमध्ये झाली आणि १८८४ मध्ये ती भारतात आणली गेली. या स्टेन्ड ग्लास विन्डोंमध्ये मुकुटाकृती रचना असलेली तीन उंच, समांतर पॅनल्स आहेत. या मुकुट रचनेला ट्रेसरी (Tracery) म्हणतात. आकाराने ही विन्डो १४ फूट उंच आणि १२ फूट रुंद असून यहुदी प्रतीके आणि प्रतिमांनी सजलेली आहे. ट्रेसरीमधील १२ नक्षीदार वर्तुळांची रचना इस्रायलच्या १२ जमातींचे प्रतिनिधित्व करतात. यहुदी संस्कृतीत विशेष महत्त्वाच्या वनस्पती, फळे म्हणजे पेर, डाळिंब, सोनेरी सफरचंद, गुलाब, लिली, लॉरेलची पाने, ही लाल, हिरव्या, कोबाल्ट ब्ल्यू रंगांच्या काचांवर चित्रित आहेत.

नाजूक काचेवरील चित्रांप्रमाणे कागदावरील जुनी चित्रे- चारकोल (कोळशाच्या कांडय़ा) पेन्सिल, खडूच्या कांडय़ा अर्थात पेस्टल, जलरंग यांपैकी विविध माध्यमांमध्ये असणाऱ्या जुन्या चित्रांचे आयुष्य वाढवण्याचे काम अनेक जण करतात. त्यांपैकीच एक चित्रकर्ती आणि संवर्धक म्हणजे राधिका कदम. मूळच्या अमरावतीच्या राधिका यांनी २००६ मध्ये ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून ‘बी.एफ.ए.’ पूर्ण केले. २००८ मध्ये ‘एम.एफ.ए.’ पिंट्र मेकिंगमधून केले. त्यांना तरुण चित्रकारांसाठी सांस्कृतिक मंत्रालयाची भारत सरकारतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली. अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या राधिका व्यावसायिक चित्रकार म्हणून प्रसिद्ध तर आहेतच, पण २०१३ मध्ये ‘काँझव्‍‌र्हेशन ऑफ ऑब्जेक्ट’ हा ‘नॅशनल रीसर्च लॅबोरेटरी फॉर काँझव्‍‌र्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी’ (एनआरएलसी) यांचा अभ्यासक्रम लखनऊ येथे विशेष प्रावीण्य शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी पूर्ण केला. ‘एनआरएलसी’ यांच्या अंतर्गत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’, ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ यांच्या कलासंग्रहाचे जतन आणि संवर्धन उपक्रम पूर्ण केले. मुंबईतील अनेक नामवंत कलासंग्रहालये, कलावंत आणि खासगी कलासंग्राहकांच्या संग्रहातील एम. एफ. हुसेन, एस.एच.रझा, वासुदेव गायतोंडे अशा अनेक विशेष नावाजलेल्या चित्रकारांच्या, शिल्पकारांच्या कलाकृतींचे स्वत:च्या ‘आर्टकन्झर्व’ या स्टुडिओच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरूपात त्यांनी यशस्वीपणे संवर्धन केले आहे.

‘रीस्टोरेशन’च्या विविध पद्धती आहेत. कलावस्तूच्या छायाचित्रणाद्वारे आणि लिखित सद्यपरिस्थिती काय आहे त्याची नोंद केली जाते. बुरशी आणि इतर सूक्ष्म कीटक यांनी त्यावर केलेली घाण-विष्ठा मुळापासून काढावी लागते. इतकेच नाही तर पुन्हा ते या पृष्ठभागावर येऊ नये यासाठी रासायनिक औषधांचे लेपन करतात. वायू उत्सर्जित करून धुरीप्रक्रियेचा प्रयत्न करतात. हे कलाकृतीवरील डाग, धूळ, तेलकटपणा कोरडय़ा रीतीने किंवा ओल्या द्रावणाने स्वच्छ करतात. जुन्या कागदाचा पिवळटपणा काढण्यासाठी निराम्लीकरण नावाच्या पद्धतीत सामान्यत: जुन्या पिवळट कागदामध्ये तयार झालेले आम्ल काढून टाकले जाते. त्यामुळे कागदाचा पिवळेपणा निघून जातो. तो शुभ्र होतो आणि टिकाऊपणा वाढतो. फुटलेल्या, चिरा गेलेल्या, कपटा उडालेल्या वस्तू अचूकतेने जोडल्या जातात. त्याला ‘मेंडिंग’ (Mending) अशी इंग्रजी संज्ञा आहे. नाजूक जीर्ण कॅनव्हासवर किंवा कागद, वस्त्र यांना मागील बाजूने अस्तर लावून बळकट केले जाते. त्याला संवर्धनाच्या परिभाषेत ‘लायनिंग’ असे म्हणतात. काही वेळा कॅनव्हासवरील चित्राच्या रंगांना भेगा जातात, खपल्या पडतात. अशा वेळी त्या विलग होऊ नयेत म्हणून दृढीकरण प्रक्रिया केली जाते. कलावस्तूचे मूळ स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी पुन:एकीकरण प्रक्रिया केली जाते. या वेळी पुन्हा नव्या रंगांनी रंगवले जाते. जुन्या चित्रांना नवे रूप, जीवन देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या नोंदी ठेवणेही गरजेचे आहे. संग्रहण (Archive) हे इतिहास आणि संशोधनासाठी उपयोगी आहे. बारा वर्षांपूर्वी स्वाती गोसावी सावंत यांनी सुप्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांच्या पुस्तकाकरिता काम केले होते. अकबर पदमसी यांच्या ‘ग्रीक लॅन्डस्केप’ या पेन्टिंगची किंमत ९ सप्टेंबर २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या लिलावामध्ये १९.१९ कोटी रुपये झाली होती. पदमसींच्या आतापर्यंतच्या चित्रविक्रीत या रकमेची उच्चतम नोंद झाली आहे. स्वातीताई गेली दीड वर्ष अकबर पदमसी यांचे संग्रहण सांभाळत आहेत. संग्रहणाच्या कामात अनेक प्रकारचे दस्तऐवज, लेख, पत्र, फोटो, चित्रे यांचा समावेश होतो. महत्त्वाच्या व्यक्ती, घटना यांच्या नोंदी ठेवल्या जातात. यामुळे इतिहासलेखन आणि संशोधन यांस मदत होते.

स्वातीताईंनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून ‘बी.एफ.ए.’ पदवी (फाईन आर्टस्) घेतली आहे. तसेच टिळक महाविद्यालयातून भारतीय विद्या या विषयात ‘एम.ए.’ केले आहे. भारतीय सौंदर्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारतीय नौदल, मराठा नौदल या विषयांशी संबंधित संशोधनपत्रिकेचे वाचन त्यांनी सेमिनारमध्ये केले असून ‘मॅरिटाइम हिस्ट्री सोसायटी’चा लोगोही तयार केला आहे. स्वातीताई म्हणतात, ‘‘भारतीय कला आणि संस्कृती हा एक प्रवाह आहे. आपला वारसा जतन करण्यात मला जो छोटा वाटा उचलण्याचा आनंद मिळतो, तो शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.’’

१५ हजार वर्षांपूर्वीची कातळचित्रे शोधण्याचा, जपण्याचा प्रयत्न, प्राचीन स्टेन्ड ग्लास खिडक्यांचा जीर्णोद्धार करण्याचे काम, कागद-कॅनव्हासवरील जुन्या चित्रांचे आयुष्य वाढवण्याचे काम आणि नव्या नोंदी ठेवताना इतर समकालीन चित्रकारांच्या अभ्यास नोंदी तपासणे, हे सारे काम निष्ठेने, तळमळीने करणारी ही मंडळी पाहिली की जतन केलेल्या वस्तू-वास्तूंमधून चित्र, शिल्प, नैसर्गिक वारसे, यामुळे आपल्या संस्कृतीची इतिहास ओळख पुढील पिढीला निश्चित होत राहील याची खात्री पटते.

plwagh@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inherited hands human art evidence art modern methods ysh
Show comments