– डॉ. भूषण शुक्ल

लेखक पुण्यातील बालमानसोपचारतज्ज्ञ असून गेली २३ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. लहान मुलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध व्हावा, यासाठी ते २००० पासून ‘नो-गो-टेल’ ही कार्यशाळा घेतात. ‘सत्यमेव जयते’ या प्रसिद्ध कार्यक्रमात तिचा समावेश झाला असून सरकारी व सामाजिक संस्थांनी या कार्यशाळेचा अवलंब प्रशिक्षणासाठी केला आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, महापालिका, कौटुंबिक न्यायालय आणि पोलीस अशा विविध घटकांना त्यांनी या विषयाबाबत मार्गदर्शन केले आहे. ‘बेसिक्स ऑफ सेक्स, जेंडर अँड सेक्शुआलिटी’ या पुस्तकाचे सहलेखन त्यांनी केले आहे.

vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

आज पूर्णपणे वेगळ्या वातावरणात, परिस्थितीत जन्माला येऊन वेगळं व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन पिढ्या एकाच घरात वावरत आहेत. जणू दोन ध्रुवांवरच्या दोन पिढ्या! मधली पिढी आणि कनिष्ठ पिढीतल्या नात्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेत ‘सांदीत सापडलेल्या’ या दोन पिढ्यांमधला संघर्ष कमी व्हावा यासाठी जाणिवा समृद्ध करणारं हे सदर दर पंधरवड्यानं.

हेही वाचा – सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

लक्षावधी वर्षांपूर्वी, आफ्रिकेच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये म्हणे आधुनिक माणूस जन्मला. कोणत्या एका माकडानं दोन पायांवर चालायला सुरुवात केली आणि हातांचा उपयोग विविध प्रकारे केला! त्याच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी झाडावर बसून, ‘‘काय हे नवीन फॅड? असं कोणी चालतं का? नसती मरायची लक्षणं ही! शिवाय कंबर मोडेल ते वेगळंच!’’ असं म्हटलं असेल का?

हा नुसता कल्पनाविलास असला, तरी दोन पिढ्यांमध्ये फरक असणं हा मनुष्यजातीचा स्थायिभाव आहे, असं आपण म्हणू शकतो. अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला, तर ‘भावार्थदीपिका’ सांगून समाधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज, वडिलांच्या जहागिरीवर समाधान न मानता स्वराज्याचा झेंडा फडकवणारे आणि साम्राज्याची पायाभरणी करणारे शिवाजी महाराज, अलीकडच्या काळात- वयाच्या विशीत शाळा, कॉलेज आणि वर्तमानपत्र सुरू करणारे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. हे सगळे महापुरुष तरुण वयातच काही तरी कमालीचं वेगळं करून गेले. आपल्या आईवडिलांप्रमाणे आयुष्य जगणं सहज शक्य असताना, ज्ञान, स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णय याचा ध्यास धरून, प्रचंड मोठा धोका पत्करून या मंडळींनी क्रांती घडवली. पण आता आपण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यांमुळे वातावरणच वेगानं बदलतं आहे. डोळ्यांदेखत घडणारा बदल आणि स्वत:मध्ये सतत बदल घडवून आणण्याची गरज, हा एकविसाव्या शतकाचा मंत्र आहे. डोळ्यादेखत साम्राज्यं उभी राहात आहेत आणि कोसळत आहेत. हे सगळं कमालीचं नवीन, वेगवान आणि चक्रावून टाकणारं आहे. अनिश्चितता हीच आता कायमची स्थिती असणार बहुतेक, असं सगळे जण मानून चालत आहेत. अशा या जागतिकीकरण झालेल्या, वेगवान समाजात आपलं काय होणार, याची काळजी तर प्रौढांना आहेच, पण आपल्या पोराबाळांचं काय होणार? हा एक जास्त काळजीचा विचार त्यांची झोप उडवतो आहे.

अशा परिस्थितीत धोका आणि संधी हातात हात घालून चालताहेत. त्यामुळे भीती आणि महत्त्वाकांक्षासुद्धा एकाच मनात शेजारी शेजारी आहेत. अशा विचित्र परिस्थितीत दोन पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला नाही तरच नवल! आयुष्य कसं जगावं? सर्वात जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? कसं वागावं? काय घ्यावं आणि काय सोडावं? कोणाशी नाती जमवावीत आणि कोणती नाती सोडून द्यावीत? या प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर दोन पिढ्यांचे कमालीचे मतभेद दिसताहेत.

‘‘आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय, आमचं ऐका..’’ असं थोरले म्हणताहेत. आणि ‘‘..‘ते’ जग संपलं. तुम्हाला आमच्या, आताच्या जगातलं फारसं कळत नाही. आमच्या मार्गातून बाजूला व्हा!’’ असा धाकट्या मंडळींचा नारा आहे. हा संघर्ष इतका सरळ नाही. पुढच्या पिढीचं शिक्षण जास्त वेळखाऊ झालं आहे. स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभं राहण्याचं वय वाढत चाललं आहे. शारीरिक वाढ लवकर होते आणि आर्थिक वाढ उशिरा, अशी विचित्र परिस्थिती धाकट्या पिढीला अनुभवावी लागते आहे. आपल्याला वेगळं आयुष्य हवंय, वेगळं जगायचं आहे, चाकोरीतून मोकळं व्हायचं आहे, हा ध्यास आहे. पण त्यांच्या पालकांच्या, मधल्या पिढीच्या हातात सर्व आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पालक म्हणून त्यांच्याशी भावबंध आहेत, ते तोडणं शक्य नाही.. मग या सर्व स्वप्नांचं काय करायचं? असं कसं जगायचं?.. हे प्रश्न मुलांसमोर उभे आहेत.

तर मधल्या पिढीला वेगळ्या काळज्या आहेत. आपलं काय होईल? नोकरीतला पैसा पुरेल का? मुलं तर देशी-परदेशी उडून जातील, मग आपल्याजवळ कोण? आपण इतकी वर्ष थोरल्या पिढीची पानं उचलली. आता आपली वेळ आली, तर पुढची पिढी काढता पाय घेते आहे, निघून जाते आहे! हा काय अन्याय?..

कॉलेजची एक पदवी घ्यायची आणि नोकरीच्या मागे लागायचं. लग्न, मुलं, स्वत:चं घर, या तीन गोष्टी झाल्या की आयुष्यात करण्यासारखं सगळं करून झालं, असं अगदी आताआतापर्यंत लोकांना वाटत होतं. आता डिग्री तर सोडा, विशेष कौशल्य दाखवल्याशिवाय नोकरी मिळत नाही आणि टिकत तर नाहीच असं दिसतंय. लग्नाचं प्रमाण कमी होत आहे आणि वय बरंच वाढेपर्यंत अनेक तरुण-तरुणी लग्नाचा विचारसुद्धा नको म्हणताहेत. ‘आमचं काम, आमचे मित्र आणि जमतील तशी काही नाती,’ असा विचार मूळ धरतोय.

८-१० वर्षांचं मूल आणि त्यांचे ३० हून अधिक वयाचे आई-वडील इतक्या वेगळ्या जगात मोठे झाले आहेत, की ते एकत्र राहताहेत आणि एकमेकांना कुटुंब समजताहेत हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! मुलाचं बोट धरून त्यांना चालायला शिकवणाऱ्या आजी-आजोबांना, आई-बाबांना आता त्यांची लहान मुलंच नवीन तंत्रज्ञान असलेल्या वस्तू आणि सुविधा कशा वापरायच्या हे शिकवताहेत.

हेही वाचा – निद्रानाशाच्या विळख्यात..

मनानं दोन ध्रुवांवर राहणाऱ्या, पण शरीरानं एका घरात असणाऱ्या आणि भावबंधांनी एकमेकांशी गच्च बांधलेल्या दोन पिढ्यांचा हा धांडोळा आहे. धाकटी पिढी अजून शाळा-कॉलेजात आहे. मधली पिढी पालक आहे, घर चालवते आहे आणि जबाबदारी घेते आहे. पूर्णपणे वेगळ्या जगांमध्ये जन्माला येऊन वेगळ्या प्रकारे व्यक्तिमत्त्व घडलेल्या या दोन पिढ्या एका जगात, एका घरात आहेत. त्यांचे घडण-अनुभव काय आहेत? त्यांना जग कसं दिसतं? ते विचार कसे करतात? त्यांच्यात साम्य काय आणि वेगळेपण काय? हा बदल मूलभूत आहे की फक्त वरचं वेष्टन आहे?

हे सदर म्हणजे सांदीत सापडलेल्यांचा ताळेबंद आहे. विविध मुद्द्यांवर त्यांचं निरीक्षण करून, त्यांच्याशी चर्चा करून या दोन्ही बाजू मांडण्याचा हा प्रयत्न. कोण बरोबर आणि कोण चूक हे शोधण्याचा नाही.. उपदेशसुद्धा नाही. फक्त जाणीव वाढवण्याचा आणि जग दुसऱ्या ध्रुवावरून कसं दिसतं, ते सामावून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे. बघू या आपल्याला काय काय दिसतं ते..

chaturang@expressindia.com