वय वर्षे ९७ (जन्म १६ नोव्हेंबर १९१७) आणि डोक्यापासून पायांपर्यंत एकही सुरकुती नाही. लखलखता गोरा रंग, प्रसन्न हास्य आणि चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारं बुद्धिमत्तेचं तेज. हा चमत्कार पाहायचा असेल तर तुम्हाला पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर जायला हवं. केवळ रंगरूपानेच नव्हे, तर कर्तृत्वाच्या अनेक अंगांनी स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचं नाव डॉ. लीला बाळकृष्ण गोखले. स्त्री शिक्षणासाठी समाजात अनुकूलता नसताना एम.डी.पर्यंतचं उच्चशिक्षण, दीर्घकालीन यशस्वी वैद्यकीय कारकीर्द, रशियन भाषेवर प्रभुत्व, पंचांग वाचण्यापासून छोटय़ा मोठय़ा उपकरणांच्या दुरुस्त्यांपर्यंत अनेक गोष्टीत प्रावीण्य, वयाची ऐंशी पार झाल्यावरही साहित्यप्राज्ञ आणि ८२ व्या वर्षी शोधनिबंधाचं लिखाण.. या त्यांच्यातल्या काही मोजक्या गोष्टी.
लीलाताईंना मिळालेलं आणखी एक वरदान म्हणजे त्यांची फोटोमेमरी. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून वाचलेलं, बघितलेलं ते अलीकडे ऐकलेलं सगळंच्या सगळं त्यांना आठवतं. शुक्रवार पेठेतील भाऊमहाराज बोळातील रानडय़ांचा वाडा हे त्यांचं माहेर. (आज तिथे मोठ्ठं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालंय). त्यांचे वडील गोविंद विष्णू रानडे हे सुप्रसिद्ध स्थापत्यकार होते. वीज, टेलिफोन, मोटार अशा अनेक गोष्टी पुण्यात रानडय़ांकडे प्रथम आल्या. घरात शंभरच्या वर माणसं, त्यांचं करायला १२ ते १५ गडी. जेवण झाल्याची वर्दी द्यायला घंटा वाजायची. रानडय़ांच्या या वाडय़ाची तपशीलवार रचना, तिथे साजरे होणारे सणवार, चालीरीती, बायकांचे दागिने, उन्हाळी सुट्टीतील वाळवणं इत्यादींच्या संदर्भात लीलाताईनी ‘माझी गोष्ट’ नावाच्या आत्मकथनपर पुस्तकात केलेलं वर्णन वाचताना हरखून जायला होतं.
लीलाताईंच्या आयुष्याला दिशा देणारी घटना त्या चौथीत असताना घडली. फळीवर डबा ठेवताना त्यांच्या स्वयंपाकीणबाईचा तोल गेला आणि चुलीवरील उकळत्या दुधाचं भांडं त्यांच्यावर उपडं झालं. त्याचं शरीर भाजलं. त्यांच्या जिवाची तगमग कशानेही थांबेना. शेवटी डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर त्या शांत झाल्या. या प्रसंगाचा छोटय़ा लीलाच्या मनावर खोल परिणाम झाला. डॉक्टर दुखणं थांबवू शकतात तर मग आपण डॉक्टरच व्हायचे, हा निर्णय त्या क्षणी घेतला गेला.
तेव्हा म्हणजे ७५ वर्षांपूर्वी पुण्याला मेडिकल कॉलेज नव्हतं, त्यामुळे इंटरनंतर मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. या ठिकाणी नव्याने प्रवेश घेतलेल्या एकूण १२० मुलांत मुलींची संख्या फक्त १५. त्यातील १२ राखीव कोटय़ातून आलेल्या. खुल्या वर्गातील मुलींसाठी केवळ ३ जागा. त्यामध्ये कुशाग्र बुद्धीच्या लीलाताईंचा समावेश सहज झाला. स्वतंत्र बाण्याच्या या मुलीने आयुष्यात नेहमी स्वत:ला हवं तेच केलं. शाळकरी वयात पाळीच्या दिवसात बाजूला बसण्याचं बंधन झुगारून रानडय़ांच्या घरात नवं पर्व सुरू करण्यापासून कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये एकटय़ाने जाऊन-खाऊन-पिऊन वेटरला ऐटीत टीप देण्यापर्यंत तिने अनेक पायंडे पाडले. त्यानंतर तर या रानडे कुलोत्पन्न कन्येने इराण्याच्या हॉटेलात बसून अनेकदा ऑम्लेट व चिकन बिर्याणीदेखील हादडलीय. १३ मे १९४१ हा लीलाताईंच्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लावण्याचा दिवस. त्यानंतर जे.जे. ला सर्जन एस.आर. जोगळेकरांच्या हाताखाली काम (हाऊसमनशिप) करायला मिळालेले ६ महिने हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ. खरं तर यावेळी त्यांना मिळणारा पगार होता ६५ रुपये (महागाई भत्त्यासह). साप्ताहिक सुट्टी नाही. त्या ६ महिन्यात ६ रात्रीसुद्धा त्या स्वस्थ झोपल्या नसतील. परंतु इथे मिळालेली अनुभवाची शिदोरी त्यांना जन्मभर पुरली.
त्या काळातही लीलाताई कोणत्याच गोष्टीत सहकारी मुलांच्या मागे नव्हत्या. वर्गातील मुलं जेव्हा कंपनी म्हणून सिगरेट ओढण्याचा आग्रह करत तेव्हा कुणाकडून कसलंही फेवर न घेणाऱ्या लीलाताईंनी अॅपरनच्या खिशात ‘कॅव्हेडर्स नेव्हिकट मॅग्नम’ या ब्रॅन्डचं पाकीट ठेवायला सुरुवात केली. कोणी सिगारेट ऑफर करू लागल्यावर त्यांचं उत्तर असे.. ‘आय हॅव माय ओन ब्रॅन्ड.’ ठसठशीत कुंकू, केसांचा अंबाडा, नऊवारी साडीचा घट्ट कासोटा, त्यावर अॅपरन आणि तोंडात सिगारेट. १९४४ सालातील त्यांचं ते रूप कल्पनेत साकारतानादेखील अशक्य वाटतं. मात्र जे.जे. सुटलं तशी सिगरेटही सुटली. सर्वच बाबतीत पुढे असणाऱ्या लीलाताईंनी एम.डी. (गायनॅक) परीक्षेतही बाजी मारली. पहिल्या प्रयत्नात हे शिखर सर करू इच्छिणाऱ्या ११ जणांत त्या एकटय़ा यशस्वी झाल्या आणि दादरला रानडय़ांच्या प्लॅटबाहेरील रस्त्यावर पाटी लागली. डॉ. लीला गो. रानडे एम.डी. (बॉम्बे).
लीलाताईंचा विवाह हीदेखील एक चाकोरीबाहेरची कहाणी. बाळकृष्ण ऊर्फ बंडू गोखले यांच्याशी त्यांची ओळख झाली तेव्हा ते पूर्ण वेळ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांचं लग्न घटस्फोटाच्या वाटेवर होते. दरम्यान या दोघांचं जमलं आणि थोडय़ाच दिवसात कम्युनिस्टांची जी धरपकड झाली त्यात बंडू गोखले पकडले गेले. प्रकृतीच्या कारणास्तव एक महिना त्यांना पॅरोलवर सोडलं असताना दोघांनी रजिस्टर लग्न केलं. लग्नानंतर गोखले २ वर्षे तुरुंगातच होते. पुढे सुटका झाल्यावर त्यांनी ‘नॅशनल इन्फर्मेशन सव्र्हिस’ नावाची संस्था सुरू केली.
हॉस्पिटल कसं असावं या संदर्भात लीलाताईंच्या मनात पक्का आराखडा होता. जेव्हा १९५३ मध्ये पुण्यात त्यांचं स्वत:चं हॉस्पिटल निघालं तेव्हा त्या आराखडय़ातील सर्व नियम त्यांनी कृतीत उतरवले. उदा. बाई बाळंत झाली की १ किलो लोणी आटवून ते कढवून ती तुपाची बरणी लीलाताई त्या बाळंतिणीच्याच स्वाधीन करत. तिचं जेवणंही डॉक्टरीणबाईच्या घरूनच जाई. उशांचे अभ्रे व पांघरूण एक दिवसाआड तर पलंगपोस रोज बदलले जात. हॉस्पिटलमध्ये घालायचे कपडे रोजच्या रोज इस्त्री केलेले हवे, रोज खोली साबणाच्या पाण्याने व ब्रशने धुतली पाहिजे, रुग्ण घरी गेल्यावर त्याची गादी गच्चीत उन्हात टाकली पाहिजे, अशी काटेकोर दक्षता घेतल्याने त्याचं हॉस्पिटल थोडय़ाच काळात नावारूपाला आलं.
वैद्यकीय विश्वातील आपल्या समृद्ध स्मृती-खजिन्यामधले अनेक किस्से त्यांनी बोलता बोलता सांगितले. काही खळखळून हसवणारे, तर काही हृदयद्रावक, काही अचंबित करणारे तर काही अंतर्मुख व्हायला लावणारे. ते जिवंत अनुभव ऐकताना कवी यशवंत यांच्या ‘प्रभो, मज अन्य नको वरदान’ या कवितेची आठवण येत राहिली.
पुण्यात आल्यावर लीलाताईंनी ज्या ज्या ठिकाणी ऑनररी सेवा दिली त्या संस्थांची यादी ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालय, सुतिका सेवा मंदिर, माता बाल आरोग्य समिती, खेड केंद्र, कुटुंबनियोजन केंद्र, पुणे महानगरपालिकेची वाकडेवाडी व हडपसर हॉस्पिटल आणि ओंकारवाडा दवाखाना, पुना विमेन्स कॉन्सिलचे आरोग्य केंद्र, स्टुडंट्स हेल्थ सव्र्हिस स्कीम, पुणे विद्यापीठ.. अशी लांबलचक आहे.
१९८६ मध्ये वयाच्या ७०व्या वर्षी हॉस्पिटल बंद केल्यावर लीलाताई संशोधनाकडे वळल्या. बालकांमधील विकृती ही निव्वळ गरोदर स्त्रीला हार्मोन्स देण्यामुळे निर्माण होत नाही हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. १९९१च्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात एक गायनॉकॉलॉजिकल परिषद भरली होती. त्यात लीलाताइर्ंनी ‘पाळीच्या वेळची पोटदुखी’ यावर एक निबंध वाचला. या दुखण्यावर त्या जे औषध देत होत्या ते जगात कुणीच देत नव्हतं, असं आढळलं. डॉ. लीला गोखले यांच्या या संशोधनाला एका अफाट जिद्दीची कहाणी असं म्हणता येईल.
या संशोधनाविषयी थोडक्यात सांगायचं तर- निबंधासाठी त्यांना प्रथम स्वत:च्या ३० वर्षांच्या वैद्यकीय सेवेत, अशा प्रकारचा इलाज केलेल्या मुलींचे कागदपत्र शोधून काढले. त्या २०८ केसेस निघाल्या. या दुखण्यावर त्या बी १ जीवनसत्त्वाच्या गोळय़ा देत. ८७ टक्के मुली या औषधाने बऱ्या झाल्या होत्या. स्वत:चे निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी नंतर ब्रिटिश लायब्ररी व वैद्यकीय महाविद्यालयाचं ग्रंथालय पालथं घातलं. पण या उपचाराचा कुठेही ओझरता उल्लेखही नव्हता. त्यानंतर लीलाताईंनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेतील ४४ मुलींवर व त्यानंतर पुण्याच्या वेगवेगळय़ा शाळांमधील ७५० मुलींवर त्यांचे गट पाडून बी १ जीवनसत्त्वाचा उपचार केला. अवघे पाऊणशे वयमान असताना, जवळजवळ वर्षभर चाललेल्या या प्रयोगासाठी खर्चही त्यांनीच केला. सरतेशेवटी पुन्हा ८७ टक्के व्याधीमुक्त ८ टक्के तक्रार कमी व ५ टक्के बदल नाही असाच निकाल आला.
डॉ. लीला गोखले म्हणतात, ‘या उपचाराचं वैशिष्टय़ं असं की या औषधाला डॉक्टरांची चिठ्ठी लागत नाही. आपलं शरीर ते जरुरीपुरतंच घेऊन जास्तीचं बाहेर टाकलं यामुळे त्याची मात्रा कमी जास्त होऊ शकत नाही. साहजिकच याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि मुलींची या त्रासातून सुटका होऊ शकते.’ तमाम स्त्री जातीने आयुष्यभर कृतज्ञ राहावं असं हे संशोधन. त्यासाठी तरी डॉ. लीला गोखले यांचा उचित सन्मान व्हायला हवा.
वार्धक्य सुसह्य़ कसे होईल याबद्दलचे त्यांचे विवेचन प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वाचावे असे आहे. त्यांच्या या निबंधातील अनेक मुद्दय़ांपैकी, मलमूत्रोत्सर्जकावर नियंत्रण मिळवण्यासाठी आचरणात आणायलाच हवा असा व्यायाम म्हणजे गुदद्वाराच्या मूत्रद्वाराच्या व पटलाच्या स्नायूंचं आकुंचन. हा साधा, सोपा व्यायाम कुठेही, कधीही आणि कितीही वेळ करता येतो. अशी कल्पना करायची की आपल्याला उत्सर्जनाला जायलाच हवं आहे पण सोईस्कर जागा नाही. अशा वेळी जसं स्नायूंचं आकुंचन केलं जातं तसं नेहमी करायचं. लीलाताई म्हणतात, तक्रार सुरू झाल्यावर जरी हा व्यायाम चालू केला तरी फायदा होतो. उतारवयात हाडं ठिसूळ होऊन पटकन मोडतात यावर त्यांचा प्रेमाचा सल्ला म्हणजे पन्नाशीनंतर डी-३ हे जीवनसत्त्व व कॅल्शियम आणि सत्तरीनंतर इतर सर्व जीवनसत्त्वांबरोबर रोज च्यवनप्राश अवश्य सेवन करावा. लीलाताईंचा गेल्या कित्येक वर्षांचा नाश्ता म्हणजे १ कप दूध अधिक २ चमचे च्यवनप्राश, तोही घरी केलेला.
वयाची पन्नाशी उलटल्यावर त्यांनी रशियन भाषा शिकायला सुरुवात केली. हायर डिप्लोमा घेतला. एम.ए.चाही अभ्यास केला, पण इतर व्यवधानांमुळे डिग्री तेवढी राहिली. प्राज्ञ (मराठी) परीक्षेसाठी वृत्तपत्रात जाहिरात आली. त्यात दोनच अटी होत्या- एक दहावी पास व दुसरी वय १८ पेक्षा अधिक. लीलाताईंचं वय त्यावेळी बरोबर उलटं होतं ८१. वर्गातील बाकी मुलं त्यांच्या नातवंडांच्या वयाची. तरीही त्या अगदी मजेत कार चालवत क्लासला जात आणि तिथून परस्पर पत्ते खेळायला. कार चालवणं हा त्यांचा आवडता छंद. ९२व्या वर्षांर्पयन्त त्या ड्रायव्हिंग करत होत्या.
मेडिकलला असताना त्यांनी भरतकामाच्या वर्गाला नाव घातलं. का? तर हवी तिथे सुई काढायची सवय व्हावी म्हणून. नंतर या कलेचा त्यांना एवढा नाद लागला की त्यांनी फ्रॉक, ब्लाऊज एवढंच नव्हे तर डझनावारी शाली व पलंगपोसदेखील भरले. पुढे तर अफगाणी लोक ज्याने ब्लँकेट्स विणतात तसा हूक घरी बनवून अक्षरश: पोत्यानी उबदार पांघरून विणली. त्यांच्या मुली आईच्या सुगरणाविषयी जे दाखले देतात, ते ऐकताना तर वाटतं या डॉक्टर झाल्या नसत्या तर नक्कीच एखाद्या पंचतारांकित हॉटेलात प्रमुख शेफ म्हणून वावरत असत्या. लीलाताईचं पाठांतर अफाट आहे. बोलताना एखाद्या काव्याचा चरण किंवा ठेवणीतला संस्कृत श्लोक त्या सहज उद्धृत करतात. आज तुम्ही लीलाताईना भेटायला त्यांच्या घरी गेलात तर त्या स्वस्थ बसलेल्या दिसणार नाहीत. सकाळी लवकर गेलात तर त्या वर्तमानपत्र वाचताना दिसतील किंवा कोडं सोडवण्यात मग्न दिसतील. आल्या गेल्याशी गप्पा मारताना एकीकडे विणकाम सुरू असेल. झालंच तर मुलींशी किंवा स्वयंपाकिणीशी आमचा बेत ठरवत असतील व त्यानुसार आपल्या अत्यंत सुवाच्य अक्षरात कामाच्या याद्या करत असतील.
उत्कटतेने जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याची उजवण होते म्हणतात. संपूर्ण पूजा करूनच उजवण होते. आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा याच सुखोत्सुक अवस्थेत पिंजऱ्याचे दार उघडावे ही त्यांची इच्छा. पण त्या आधी आप्तेष्ट, हितचिंतक व अनेक चाहत्यांशी असलेला त्यांचा शंभरी गाठण्याचा किमान ३ वर्षांचा बॉन्ड पूर्ण व्हायला हवा ना!
लीला गोखले यांचा संपर्क –
anupamaoak@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा