पॉलिसी घेताना, कोणकोणते शुल्क आकारले जाईल याची नीट चौकशी करा. अनेकदा त्यातून मिळणारे फायदेच अधोरेखित केले जातात. मात्र, या पॉलिसीतून काय फायदा आहे, इतर पॉलिसींच्या तुलनेत तो किती आहे हे आधी समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किती व्याजाने परतावा मिळणार यावर लक्ष द्या.
कुटुंबातील सदस्य असोत किंवा कामाच्या ठिकाणचे सहकारी, मित्रमैत्रिणी वा नातेवाईक या सगळ्यांशी स्त्रियांचे जिव्हाळ्याचे नाते आपोआप तयार होत जाते. वर्षभरापूर्वी या सदराच्या माध्यमातून आणखी एक नवा बंध महिलांच्या आयुष्यात जोडला जावा, यासाठीचा प्रवास सुरू झाला..एक नवा बंध, नव्या दृष्टिकोनाच्या दिशेने. महिलांनी सगळी अनास्था सोडून तेवढंच जिव्हाळ्याचं, घट्ट असं नाते अर्थकारणाशी जोडून घ्यावं, यासाठी.
शेवटच्या या लेखात आपण विम्याशी संबंधित काही क्लिष्ट संकल्पनांचं स्पष्टीकरण पाहूया.
विमा हा तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेशी निगडित असतो. मात्र, जेव्हा तुम्ही स्वत:साठी एखादी पॉलिसी घेण्याचा विचार करता त्या वेळी बाजारात असणाऱ्या अनेक विमा पॉलिसींच्या पर्यायांमुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि त्या पॉलिसीची नेमकी उपयुक्तता न कळल्यामुळे अनेकदा तर आपण आपल्या गरजांपेक्षा निराळीच पॉलिसी गळ्यात बांधून घेतलेली असते.
सामान्य विमा पॉलिसी-
निव्वळ विम्याचे संरक्षण या स्वरूपातील या पॉलिसी, दुर्दैवी मृत्यू, अपघात किंवा अपंगत्व यांसारख्या आपत्कालीन घटनांच्या पश्चात त्या कुटुंबाला आर्थिक फायदे मिळवून देतात. विम्याचे संरक्षण काही ठरावीक काळासाठी, म्हणजे तुम्ही अमुक वर्षांचे होईपर्यंत अशा प्रकारात मिळते. उदा- पॉलिसीमध्ये ६० वर्षांपर्यंतचे विमा संरक्षण दिलेले असेल तर साठी उलटल्यावर पॉलिसीचे संरक्षण संपते. मात्र काही पॉलिसी ऑफर्स वयाची अट न ठेवता आयुष्यभराचे संरक्षण देतात.
या पॉलिसींचे वैशिष्टय़ म्हणजे या पॉलिसी तुलनेने कमी किमतीत उपलब्ध असतात. जसे की २५ वर्षांसाठीच्या कालावधीसाठी फक्त २५ लाख रुपये. उदा- ३५ वर्षीय सुहासला विम्याचा प्रीमियम म्हणून वर्षांकाठी ५००० रुपये इतकी माफक रक्कम द्यावी लागते.
पॉलिसीवर संरक्षण दिलेली रक्कम वार्षिक उत्पन्नाच्या सहापट असावी, असा एक सर्वसाधारण नियम आहे.
युलिप-
ही शेअर मार्केटशी जोडलेली पॉलिसी असून यातील पैसा हा भांडवली बाजार व कर्जरोखे यात गुंतवला जातो. साधारणपणे, विमा पॉलिसी म्हणजे सुरक्षित व निश्चित परतावा, हे समीकरण असतं. मात्र या पॉलिसीचा परतावा फंडांच्या भांडवली बाजारातील कामगिरीवर अवलंबून असतो. म्हणूनच तिला युनिट लिंक्ड इन्शुन्सर पॉलिसी(युलिप)असे म्हणतात. हे गुंतवणुकीचे माध्यम म्हणायला हरकत नाही. मात्र, जोखीम घेऊ शकणारे व नियमितपणे प्रीमियम भरू शकणाऱ्यांनी युलिपचा पोर्टफोलिओत समावेश करण्यास हरकत नाही. मात्र ही गुंतवणूक करताना कमीत कमी १०-२० वर्षांचा कालावधी विचारात घेतला पाहिजे. सामान्य पॉलिसीच्या तुलनेत युलिपमध्ये जादा प्रीमियम भरूनही कमी संरक्षण मिळते.
रायडर-
रायडर म्हणजे तुमच्या विमा पॉलिसीवर मिळणारा जादाचा फायदा. जणू पिझ्झाच्या घरपोच डिलिव्हरीसोबत हॉटेलवाल्याने कमी किमतीत गार्लिक ब्रेडही द्यावा! रायडर तुम्हाला विमा पॉलिसीसह सोयीचे व अतिरिक्त विमा संरक्षण देतात. त्यासाठी पॉलिसीच्या प्रीमियमव्यतिरिक्त काही अधिक रक्कम मोजावी लागते.
रायडरवर मिळणाऱ्या सुविधेसारखी स्वतंत्र पॉलिसी घेतल्यास निश्चितच त्याचा प्रीमियम रायडरच्या प्रीमियमपेक्षा अधिक असतो.
गंभीर आजारपणासाठीचे संरक्षण, अपघात तसेच अपंगत्व आल्यास संबंधित रायडर, प्रीमियममध्ये सूट देणारे रायडर अशा काही प्रकारचे रायडर उपलब्ध आहेत.
पॉलिसी लॅप्स-विम्याच्या प्रीमियमच्या बाबतीत तुम्ही अनेकदा ‘लॅप्स’ हा शब्द ऐकला असेल. जर तुमचा प्रीमियमचा हप्ता (ठरावीक कालावधीत)भरायचा राहिला तर पॉलिसी लॅप्स होते, अर्थात रद्द होते. माझी बहीण निशा हिने, नव्या नोकरीसाठी पुण्याला बस्तान हलवले. त्यामुळे मुंबई-पुणे अशा फेऱ्या मारण्यात व नव्या जागेशी जुळवून घेण्यात महिना सहज गेला. त्या गडबडीतच तिचा पॉलिसीचा प्रीमियम भरायचा राहिला. तिच्या पॉलिसीतील कागदपत्रांमध्ये असा स्पष्ट उल्लेख होता- पॉलिसीचे हप्ते लॅप्स झाल्यास पॉलिसीचे फायदेही संपुष्टात येणारच!
आता तिच्याकडे काय पर्याय आहेत?
प्रीमियमचा हप्ता चुकल्यास विमा कंपन्या काही वाढीव दिवसांचा ग्रेस कालावधी देतात. अशा सुविधेमुळे निशा प्रीमियम भरण्याच्या तारखेपासून ३०-४५ दिवसांच्या आत तो हप्ता भरून पॉलिसी सुरू ठेवू शकते.
दुसरे म्हणजे, आर्थिक अडचणीमुळे तुमची पॉलिसी लॅप्स झाली असेल तर तुम्ही पॉलिसी रीन्यूही करू शकता. मात्र पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी, प्रीमियमची जेवढी रक्कम चुकली त्या रकमेसह अतिरिक्त रक्कम शुल्क स्वरूपात आकारली जाते.
जर पॉलिसी पुन्हा सुरू करण्याचा कालावधी बराच मोठा असेल तर विमा कंपन्या हेल्थ चेकअप करण्यासही सुचवू शकतात. म्हणूनच सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे विमा कंपन्यांचा हप्ता न चुकवणे! वाहनाच्या विम्याबाबत तर पॉलिसी लॅप्स झाल्यास गंभीर परिणाम संभवतात. कायदेशीरही व वैयक्तिक नुकसानही.
गेली ६ वर्षे निशाने न चुकता प्रीमियम भरला आहे, म्हणूनच तिला या गुंतवणुकीवर आजच्या मूल्याप्रमाणे परतावा मिळाला पाहिजे. या प्रकारच्या ‘पेड अप’ पॉलिसीमधून मिळणारा परतावा हा गेली सहा वर्षे तिने जे सुरुवातीचे प्रीमियम भरले त्याच्या एकूण मूल्याइतका हवा. म्हणूनच प्रो-राटा तत्त्वाप्रमाणे तिला परतावा मिळाला पाहिजे. समजा, निशाने २० वर्षांसाठी असणारी पॉलिसी १० वर्षे प्रीमियम भरून रद्द केली तर तिला प्रस्तावित संरक्षणाच्या निम्म्या रकमेता हिस्सा मिळेल.
पॉलिसी खंडित करणे (Surrender of policy) –
जर तुम्ही विमा पॉलिसी सुरू ठेवायची नसेल तर कमीत कमी पाच वर्षे प्रीमियम भरून तुम्ही ती बंद करू शकता. मात्र, पॉलिसीतून पाच वर्षांच्या कालावधीपूर्वी बाहेर पडल्यास पॉलिसी मध्येच बंद केल्याचा दंड भरावा लागतोच, शिवाय कोणतेही फायदे मिळत नाहीत. लक्षात ठेवा विमा पॉलिसी ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे. म्हणूनच आपल्या पॉलिसीचे स्वरूप, छुपे दर, प्रीमियमची कटिबद्धता आणि या सगळ्याचे तुमच्या आर्थिक स्थैर्यावर होणारे परिणाम हे सर्व पॉलिसी घेण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासले पाहिजेत.
पॉलिसीची फी व शुल्क –
मृत्यू शुल्क- सोप्या भाषेत, मृत्यू शुल्क म्हणजे व्यक्तीच्या आरोग्याच्या व दीर्घायुष्याच्या निकषांवर त्या व्यक्तीची श्रेणीवार विभागणी केली जाते. व त्यानुसार हे शुल्क ठरवले जाते. उदा. २५ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसाठी ५० वय वर्षे असणाऱ्या व्यक्तीपेक्षा निश्चितच प्रीमियम कमी असेल. याचप्रमाणे, भूकंपप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीसाठी प्रीमियमची रक्कम इतर भागात राहणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असणार.
प्रीमियम निर्धारित करण्याचे शुल्क-
हे शुल्क प्रीमियमच्या रकमेतून वजा केलेले असते. जितकी ही रक्कम अधिक तेवढी तुमची गुंतवणुकीची रक्कम कमी. समजा, तुमच्या विमा योजनेमध्ये ३५ टक्के ही ‘प्रीमियम अलोकेशन चार्ज म्हणून आकारण्यात आला असेल तर तुम्ही भरलेल्या दहा हजार रुपयांपैकी फक्त साडेसहा हजार रुपयांची प्रत्यक्षात गुंतवणूक होणार होती. कारण उर्वरित रक्कम शुल्क म्हणून घेतली गेली. साधारणपणे, पहिली ५ वर्षे हे शुल्क अधिक असते. त्यानंतर ते कमी कमी होत जाते. म्हणूनच, कमी कालावधीच्या पॉलिसी जास्तीचा परतावा देण्याऐवजी नुकसानीच्याच ठरतात.
पॉलिसीचे व्यवस्थापन शुल्क-
नावात स्पष्ट होते त्याप्रमाणे हे शुल्क पॉलिसीचे व्यवस्थापन करण्यासाठी आकारले जाते. पॉलिसी सुरू असेपर्यंत हे शुल्क आकारले जाते. शिवाय इतर फी ही वार्षिक तत्त्वावर घेतली जाते. मात्र पॉलिसी व्यवस्थापन शुल्क दर महिन्याला घेतले जाते. जरी याची रक्कम कमी वाटत असली तरी अनेकदा आकारली जात असल्याने परताव्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. समजा, दर महिन्याला १०० रु. आकारले जात असतील तर १५ वर्षांच्या पॉलिसीसाठी तब्बल १८ हजार रुपये खर्ची पडतात हे विसरू नका.
फंड व्यवस्थापन शुल्क-
बाजाराशी निगडित पॉलिसींवरती फंड व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. योजनेतील तरतुदींनुसार गुंतवणुकीचा निधी कोणत्या प्रकारात किती गुंतवला, यावर हे शुल्क अवलंबून असते. म्हणजे समभागांमध्ये, निश्चित उत्पन्नामध्ये इत्यादी प्रकारात होते. कंपन्यांच्या समभागांमध्ये अधिक गुंतवणूक म्हणजे अधिक फी. याशिवाय संबंधित फंडाची यापूर्वीची कामगिरीही तपासून पाहणे चांगले. बहुतांशी पॉलिसींमध्ये गुंतवणुकीचे पर्याय निवडल्यानंतर त्यात बदल करण्याचाही मार्ग असतो. समजा, एखाद्याला शेअर्समधील गुंतवणूक कमी वा अधिक करायची असेल तर तो तसे करू शकतो.
पॉलिसी घेताना, कोणकोणते शुल्क आकारले जाईल याची नीट चौकशी करा. ग्राहकांना पॉलिसी देताना अनेकदा त्यातून मिळणारे फायदे अधोरेखित केले जातात. मात्र, या पॉलिसीतून काय फायदा आहे, इतर पॉलिसींच्या तुलनेत तो किती आहे याची आधी चौकशी करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किती व्याजाने परतावा मिळणार यावर लक्ष द्या. बँका किंवा एफडी यांच्या व्याजदरापेक्षा साधारण २-३ टक्के अधिक व्याज पॉलिसींमधून मिळते. त्यामुळे कुणी २०-२५ टक्के व्याजाने परतावा मिळेल, अशी हमी दिल्यास सावधतेने आधी विचारणा करा. पॉलिसींमधील शुल्क व परतावा यांची तुलना करूनच पॉलिसीची निवड करा.
एक लक्षात घ्या मेैत्रिणींनो, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशाची कालांतराने जी वृद्धी होते, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळते. मात्र काही घोटाळे व जोखीम यांच्यामुळे गुंतवणुकीकडे काहीशा संशयाने बघितले जाते. क्लिष्ट माहिती व घाईघाईचे काही निर्णय यांमुळे अनेकदा पैसे बुडतात. म्हणूनच गुंतवणुकीपूर्वी योजनेशी निगडित सर्व माहितीची चौकशी करणे, नेमके उत्पादन काय आहे, त्याची कार्यपद्धती समजून घ्या. यानंतर एकदा का तुम्ही गुंतवणुकीच्या निर्णयाप्रत आलात की नियमितपणे गुंतवणूक करा व ३-५ वर्षांनंतर त्याचा आढावा घेत रहा.
पुढील गुंतवणुकीसाठी खूप शुभेच्छा…
(लेखिका वित्त नियोजिका असून लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)
(समाप्त)
विमा पॉलिसी घेताय ?
पॉलिसी घेताना, कोणकोणते शुल्क आकारले जाईल याची नीट चौकशी करा. अनेकदा त्यातून मिळणारे फायदेच अधोरेखित केले जातात. मात्र, या पॉलिसीतून काय फायदा आहे, इतर पॉलिसींच्या तुलनेत तो किती आहे हे आधी समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किती व्याजाने परतावा मिळणार यावर लक्ष द्या.
आणखी वाचा
First published on: 29-12-2012 at 06:47 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance policy buying