कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि कर्तेपण आपसूक पुरुषाकडे आलं. पिढ्यान्पिढ्या हे पद सांभाळताना त्याची किती दमछाक झाली असेल याचा विचार केला जातोच असं नाही. कालौघात पुरुष म्हणून त्याचं असं एक व्यक्तित्व तयार झालं. हा पुरुष घराबाहेरचाही असतो आणि घरातलाही असतो. कसा आहे आजचा पुरुष? त्याच्याकडून असलेली अपेक्षा आणि त्याला इतरांकडून असलेली अपेक्षा यातून हा पुरुष स्वत:ला वेगळं काढू शकतोय का? कुटुंबातली कोणती भूमिका त्याला आवडतेय? की सगळ्याचंच त्याला ओझं होऊ लागलंय? की सगळ्यांसाठी करायचं तर आहे पण… अशा गोंधळलेल्या अवस्थेत तो आहे? १९ नोव्हेंबरच्या ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’निमित्ताने याविषयी…
‘मॅडम सेक्रेटरी’ ही दूरचित्रवाणीवरील मला आवडणारी मालिका पुन्हा एकदा बघत होतो. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील ‘पॉलिसी अॅडव्हायजर’ असलेला जे व्हिटमन अखंड कामात बुडालेला आहे. जगात या ना त्या उलाढाली होत असताना त्याने सतत ‘इमर्जन्सी’मध्ये अडकावं हेही स्वाभाविक. पण आता त्याची बायको या सगळ्याला कंटाळली आहे आणि तिच्या मुलीला घेऊन वेगळी राहायला गेली आहे. परराष्ट्र खात्याच्या सातव्या मजल्यावर लिफ्टपाशी ती हातात कायदेशीर कागदपत्रे घेऊन येते आणि जे ला सांगते, ‘‘जे, आपल्या मुलीची कस्टडी तू माझ्याकडे दे. ती या सगळ्यात गोंधळते आहे.’’ आधीच्या सगळ्या चर्चांमध्ये स्वत:ला सांभाळून असलेला तो ‘पुरुष’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र बेभान होतो. त्याची तीन वर्षांची मुलगी हा त्याचा प्राण आहे. तो लेकीला सोडणार नाही हे तो त्रिवार घोषित करतो. पण काम, व्यवसाय आणि कुटुंब यामध्ये आपण सुसंवाद साधू शकणार नाही याची त्याला कल्पना असते. काही दिवसांनंतर तो हृदयावर दगड ठेवून त्याच्या पत्नीला मुलीचा हक्क देतो. तीदेखील त्याला म्हणते, ‘‘आपल्या मुलीला तिचा बाप उत्तम आहे हेच कायम मनात राहावं असा माझा प्रयत्न असेल.’’ आता ती निघून गेली आहे. समजुतीचा अपार थकवा त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे. असं वाटतं की, त्याने आता त्वेषाने शेजारच्या भिंतीवर एक ठोसा मारला तर बरं होईल! पण तसं होत नाही, होणार नसतं…
माझ्या नेहमीच्या चालण्याच्या वाटेवर मी कॉफी प्यायला नेहमीच्या ठिकाणी थांबलो आहे. दिवाळीचा काळ असल्यामुळे गर्दी अगदी कमी आहे. इथले वेटर मला आणि मी त्यांना नावानिशी ओळखतो. मी समोर आलेल्या उमेशची चौकशी करत विचारतो, ‘‘भाई उमेश, घर नहीं गए? दिवाली जो हैं!’’ तो हसून त्याची कथा सांगतो. तो उत्तर प्रदेशचा, पण गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातच आहे. नुकतंच लग्न झालेलं असलं तरी इथल्या शहरी आर्थिक गणितांमुळे आणि त्याच्या पालकांकडे बघण्यासाठीदेखील त्याची पत्नी तिथंच गावाकडे राहणार आहे. इथं तो त्याच्या मित्रांबरोबर पुण्यात राहताना भटकंती करेल, मजाही करेल; पण आता माझ्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर आपल्या घराला फार फार ‘मिस’ करणारा त्याच्यातला मुलगा, पती मला स्वच्छ दिसतो आहे…
आणखी वाचा-इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
मला एकदम पॅरिसच्या मेट्रोत माझ्याशेजारी बसलेला अल्जेरियाचा तो पुरुष आठवतो. आपल्या ‘लोकल’सारखी तिथल्या ‘मेट्रो’मध्ये अखंड बडबड नाही, पण ‘स्विस ट्रेन’मध्ये असते तशी स्मशानशांतताही नाही. त्याचा व्हिडीओ कॉल सुरू आहे. मी सहज स्क्रीनवर बघतो तर समोर वृद्ध माणूस आहे. त्याच्याशी तो हळू आवाजात फ्रेंचमध्ये काही तरी बोलतो. तो बोलताना Pè re असं फ्रेंचमध्ये बोलल्याने मला ते त्याचे वडील असावेत हे कळतं. काही तरी वाद बहुदा सुरू आहे किंवा विसंवाद तरी. तो फोन बंद करतो. ‘मेट्रो’ जोरात धावत असते. डोळे बंद करून तो आता बसला आहे आणि त्याच्या डोळ्यातून नकळत बाहेर पडलेले अश्रू मला नुसते दिसत नाहीत, जाणवत आहेत. आफ्रिकेमधील त्याचा देश सोडून पॅरिसमध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करणारा तो पुरुष आणि त्याचं ओरान किंवा अल्गेरियातील खेड्यातलं कुटुंब मी मनोमन कल्पित राहतो.
संपादकांनी मला जेव्हा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’च्या निमित्ताने ‘पुरुष आणि कुटुंब’ या विषयावर लिहायला सांगितलं तेव्हा हे सगळं आठवत गेलं. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ असतो तसा मुळात ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ असावा की नसावा? यावर टीकाकार समाजमाध्यमांमध्ये उच्चरवात भाष्य करीत असतात. रॅडिकल फेमिनिस्ट मंडळी अजूनही तोंडलीची भाजी किंवा पुरणपोळी पुरुषाला करता येते का? यावर पुरुषाला पास किंवा नापास करणार असतात. दारू पिऊन बायकोला मारणारा पुरुष हे वास्तव अधोरेखित करताना नवऱ्याच्या पैशांवर स्वत: काहीही काम न करता मस्ती आणि माज करणाऱ्या बायकाही असतात हे वास्तव अनेकदा सोयीस्कर विसरलं जातं. आणि पुरुषाचे व्यावसायिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असू शकतात याकडेही काही वेळा दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणून या सगळ्या पैलूंकडे लक्ष वेधून घेणारा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ मला महत्त्वाचा वाटतो. हा पुरुष घराबाहेरचा असतो आणि एक घरातलाही असतो.
कुटुंबामधील पुरुष तरी कुठे एकसंध असतो? अनेक भूमिका तो निभावतो तिथं. म्हणजे ‘उडदामाजी काळे गोरे’ हे आपण गृहीत धरूनदेखील सहसा मुलांचा बाप असलेला पुरुष हा त्यांच्या रक्षणासाठी सिंह बनतो. तो सारखा पोरांकडे लक्ष देईल असेही नाही. पण जिथं आपल्या लेकाचं भावनिक अस्तित्व पणाला लागणार असेल तिथं तो समोरच्यावर तुटून पडेल हे नक्की. आणि लेकीचा बाप असेल तर विचारूच नका! मग तर तो अनेकदा सदोदित हातात तलवार घेऊनच असेल. जेव्हा पुरुष नवरा होतो तेव्हा मात्र तो आपल्या स्त्रीकडे वेगळ्या अर्थी बघतो. आपल्या वाढत्या मुलीविषयी वाटणारी अनुकंपा त्याला आपल्या नांदत्या, जुन्या झालेल्या बायकोविषयी सहसा वाटत नाहीच!
आणखी वाचा-बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
तो स्वयंपाकघरात मदत करतो का? हा प्रश्न खूपदा विचारला जातो. पूर्वीच्या काळापेक्षा नक्कीच आपल्याला चित्र पालटलेलं दिसेल. पण स्वयंपाकघरात काम करणं हीच पुरुषाची इतिकर्तव्यता आहे का? असंही मला कधी कधी वाटतं. एकदा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी खरेदीपासून फोडणी टाकण्यापर्यंत अनंत कामे असतात. आमची एक मैत्रीण म्हणते तसं, नवरेमंडळींनी स्वयंपाक केला नाही तरी चालेल, पण त्यांनी त्याच्या आधी सतत भाज्या, डाळी आणि कडधान्यांचा स्टॉक बघत राहून खरेदी करणं आणि स्वयंपाक केल्यानंतर ओटा स्वच्छ पुसून ठेवणं एवढं केलं तरी तिला पुरेसं आहे. (मला व्यक्तिश: वाटतं की स्वयंपाक ही गोष्ट शाळेमध्येच मुलग्यांना आणि मुलींना शिकवली गेली पाहिजे.) पण पुरुष हा पती म्हणून काही फक्त एवढाच कुटुंबात मदतनीस म्हणून नसतो.
शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर आपल्या पत्नीसोबत आनंदाची देवघेव करताना किती पुरुष आपल्याला दिसतात? अनेकदा ती देवघेव एकतर्फी असते की काय? असंही मला आसपास बघताना वाटतं. सगळ्या कौटुंबिक भूमिकांमध्ये पुरुषाला सगळ्यात जास्त शिकण्याची संधी कुठे असेल तर ती पती या भूमिकेमध्ये! पतीला पत्नीमध्ये आपली मैत्रीण हवी असते, पण त्याला ती अनेकदा सापडत नाही. पण तो मैत्रिणीशी वागतो तसा पत्नीशी वागतो का हे त्यानेही स्वत:ला विचारण्याची गरज आहे!
पुरुष जसा पती असतो, पिता असतो तसा पुत्रही असतो. आजकाल ही त्याची भूमिका आयुष्यभर संपत नाही. कारण वाढलेली आयुर्मर्यादा! माझे एक साठीतले ज्येष्ठ स्नेही आहेत. त्यांचे वडील आता नव्वदीत आहेत आणि अजून धडधाकट आहेत. आपला मुलगा साठीत आहे हे विसरून ते त्याला अद्याप कुणाही समोर, काहीही बोलत असतात. या गृहस्थाचा तिशीतला मुलगा तर तरुण पिढीच्या ब्रीदाला स्मरून वडिलांचं काहीच ऐकत नाही! ते मला एकदा सांगत होते की, दोन्ही बाजूंनी त्यांची फार कुचंबणा होते. बाकी, आपल्या भारतात तर पुरुष हा कोणाचा भाऊ असतो, काका असतो, मामा असतो, पुतण्या-भाचा असतो आणि या सगळ्या भूमिकांमध्ये त्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडाव्या लागत असतात. हे सगळे आयाम सांभाळताना पुरुष अनेकदा थकतो हे कधी कधी कोणाच्याच लक्षात येतच नाही.
आणखी वाचा-… मोहे शाम रंग दई दे
‘कुटुंबातील पुरुष’ या विषयाकडे बघताना आपण त्याचे व्यावसायिक आयुष्य नजरेआड करू शकत नाही. २०१९ मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के भारतीय वडिलांना त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणं महत्त्वाचं वाटतं, अत्यावश्यक वाटतं. पण त्यामधील केवळ ४० टक्के पुरुष हे प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देऊ शकतात. आकडे खोटे बोलत नाहीत. पुरुषाची होणारी मानसिक कुतरओढ यामध्ये दिसते. पैसे मिळवणं ही पुरुषाची प्राथमिक जबाबदारी मानली गेलेली असल्याने तो बाहेरच्या जगात अधिक गुंतून राहतो- म्हणजे वेळ आणि मन या दोन्ही अर्थाने. ‘युनिसेफ’चा २०१७ मधील जो अहवाल आहे त्यानुसार भारतामधील केवळ २८ टक्के पुरुष हे खऱ्या अर्थाने मुलांचं संगोपन करत असतात. हे प्रमाण इतर अनेक देशांपेक्षा पुष्कळ कमी आहे. तसंही पुरुषांकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कुठलंही ‘इन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ वा नियमावली नसते. जे तो आसपासच्या समाजात बघतो त्याचाच नकळत कित्ता गिरवत असतो. हा परीघ ओलांडून स्वत:चा विचार करणारी माणसं तशी ही समाजात कमीच असतात. आणि समाजदेखील पुरुषांकडून मुळात आधी त्याने संसारासाठी भरपूर पैसे आणावेत हेच आजही अपेक्षितो! कुठल्याही विवाह संस्थेत नोंदणी केलेल्या लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणाला याबाबत विचारा! तो कुटुंबप्रमुख स्वेच्छेने होतो की समाज त्याला तसं घडवतो हाही मोलाचा प्रश्न आहे.
खरं तर हा सगळाच एका मोठ्या पुस्तकाचा हा विषय आहे. पण जाता जाता अजून काही माझी निरीक्षणे सांगतो. पुरुषाला कुटुंब कितीही आवडत असलं तरी हजारो, लाखो वर्षांपासून शिकारीला गुहेबाहेर जाणारा आणि दिवसभर भटकणारा पुरुष अद्याप त्याच्या आत आहे. रात्री जेवण झाल्यावर पटकन पानवाल्याच्या इथं मित्रांसोबत जेव्हा पुरुष जातो किंवा रविवारी मुद्दाम सकाळी उठून तो ट्रेकिंगला किंवा सायकल चालवायला जातो तेव्हा तो त्याची ही ‘स्पेस’ मिळवत असतो. म्हणजे स्त्रियांना ‘स्पेस’ भरपूर मिळते असं मी म्हणत नाही. पण त्या त्यांच्या अदम्य उत्साहाने तो वेळ भरून काढतात आणि वर आनंदी राहतात. आत्ताही मी हॉटेलमध्ये बसून लॅपटॉपवर हा लेख लिहीत असताना समोर एक स्त्रियांचा मोठा भिशीचा ग्रुप आला आहे. त्या धमाल करीत आहेत. मजेत सांगायचं तर, त्या सगळ्या बायकांचे हसण्याचे किलकिलाटी आवाज ऐकताना हॉटेलमधील पुरुष काहीसे गांगरूनच गेले आहेत! आणि मला मार्गारिट अॅटवुड या समर्थ लेखिकेचं विधान आठवत आहे : Men are afraid that women will laugh at them. Women are afraid that men will kill them! अनेक कादंबऱ्यांमधून भविष्यातील दु:स्वप्ने दाखवणारी ही समर्थ लेखिका आणि हे तिचं दुर्दैवाने आजही लागू होणारे विधान!
ते विधान आहे तोवर स्त्री आणि पुरुष दोघांनाही बदलण्याची गरज आहे. आणि ती गरज अधोरेखित करणारे दोन्ही आंतरराष्ट्रीय महिला आणि पुरुष दिवस म्हणूनच फार फार अगत्याचे आहेत.
ashudentist@gmail.com
व्यक्त व्हा…
कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि कर्तेपण आपसूक पुरुषाकडे आलं. पणआजचा पुरुष कसा आहे? ते कर्तेपण त्याला हवंय की समाज त्याला त्यासाठी भाग पाडतो आहे? पर्याय मिळाला तर पुरुष ते पद सोडू शकतो का? वाचकहो, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कळवा फक्त २०० शब्दांमध्ये. भूमिका मांडणाऱ्या निवडक प्रतिक्रियांना ‘चतुरंग’मधून प्रसिद्धी दिली जाईल. आमचा ईमेल पत्ता chaturang.loksatta@gmail.com आपल्या प्रतिक्रिया फक्त मराठीमध्येच असाव्यात. शब्दमर्यादा पाळली जावी आणि सब्जेक्टमध्ये ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’निमित्ताने असा स्पष्ट उल्लेख करावा.