डॉ. शंतनू अभ्यंकर
‘२८ सप्टेंबर हा ‘जागतिक सुरक्षित गर्भपात दिवस’ म्हणून पाळला जातो. बाळात किरकोळ, उपचार करून बरा होण्याजोगा दोष दिसला, तरी गर्भपात करण्याचा आग्रह धरणारी जोडपी अलीकडे वारंवार भेटू लागली आहेत. ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’ हे गृहीत धरून, खास अपवाद म्हणून अपेक्षित असलेल्या गर्भपाताच्या अधिकाराचा वापर जोडप्यांनी अधिक सजगतेनं करायला हवाय..’’
त्या दिवशी दवाखान्यात एक सुस्वरूप जोडपं आलं. ‘या-बसा’ झालं आणि फाइल टेबलावर सरकवत, हलक्या आवाजात ‘ती’ म्हणाली, ‘‘आम्हाला हे मूल नकोय. गर्भपात करायचा आहे.’’ दोघंही दृष्ट लागण्यासारखे देखणे होते. अगदी ऐटबाज होते. कपडे आणि तिच्या गळय़ातल्या हिऱ्यांचं डेकोरेशन बघता, गडगंजही असावेत.
‘‘का? का नकोय?’’
‘‘ते लंगडं होणार आहे! त्याचे पाय वेडेवाकडे आहेत, फेंगडे आहेत. दोष आहे पायात. असलं वेडंविद्रं मूल आम्हाला नकोय.’’ फाइल आणखी पुढे ढकलत ती म्हणाली.
बापरे! एकाच वाक्यात त्यांनी त्या बाळाला लंगडं, फेंगडं, वेडं आणि विद्रं ठरवलं होतं. सहसा असं कुणी आपल्याच बाळाबद्दल बोलत नाही. मला काय बोलावं सुचेना. आवाजात ‘अर्जन्सी’ आणि हालचालींत अधिरता, असे ते दोघे. मी फाइलमधील रिपोर्ट पाहू लागलो. त्या बाळाचं एक पाऊल किंचित दुमडलेलं होतं. आतल्या बाजूला वळलं होतं.
‘‘गर्भपात करायचाच आहे का? पण हा दोष तसा विशेष नाहीये.’’ मी म्हणालो.
हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..
‘‘पण जो आहे तो दोषच आहे ना?’’ त्यांच्यातला ‘तो’ ठामपणे, खर्जातल्या दमदार आवाजात म्हणाला.
‘‘आता तर पाचवा चालू आहे. आता गर्भपात त्रासदायक ठरू शकतो.’’ त्यांना जाणीव असावी म्हणून मी सांगू लागलो.
‘‘पण आधी कळलं तर आधी येणार ना? हा दोष तर पाचव्यातच कळतो.’’ मला निरुत्तर करत, पुन्हा ‘तो’.
‘‘पण तुमची पहिलीच खेप आहे, गर्भपाताचा त्रास आणि दोष तसा सहज बरा होण्यासारखा आहे.’’
‘‘आम्ही गूगल करून आलोय डॉक्टर. आधी प्लास्टर, मग ऑपरेशन, मग पुन्हा खास बूट, असा सगळा प्रकार आहे. नकोच ते.’’ आता तीही तितक्याच ठामपणे सांगू लागली.
‘‘अहो, पण हे सगळं केल्यावर अगदी नॉर्मल होणार आहे बाळ. काही त्रास होता याचा मागमूसही राहणार नाही.’’
सोनोग्राफीची त्रिमिती चित्रंही त्यांच्याकडे होती. त्यात ते इवलं पाऊल, त्याचा अनैसर्गिक बाक अगदी स्पष्ट दिसत होता. बाळाचा पाय वाकडा पडणार हे कुणीही सांगावं!
चित्र दाखवत मी म्हणालो, ‘‘हेच तर मी म्हणतो आहे. उपचारच नाही घेतले, तर हा दोष म्हणायचा. पण नीट उपचार तर तुम्ही घेणारच, मग एवढी काळजी कशाला?’’
दोघंही त्या चित्रांकडे हतबुद्धसे बघत होते. ज्या आधुनिक तंत्रज्ञानानं निदान शक्य केलं होतं, त्यानंच निर्माण केलेली ही प्रतिमा मात्र त्या बाळाच्या मुळावर उठली होती. त्या होणाऱ्या आई-बाबाला घाबरवून टाकत होती. कीव आणि कारुण्याची हलकी छटा माझ्या चर्येवर उतरली असावी.
‘‘कित्ती काळजी घेतली आम्ही.’’
ती अगदी तळमळून सांगू लागली, ‘‘सहा महिने शरीरशुद्धीसाठी जात होते मी. शिवाय स्प्राऊटस्, फॉलीक अॅसिड, प्री-कन्सेप्शन योगासनं, चहा-कॉफी बंद आणि त्यातून हे असं! डॉक्टर, आमचं मूल आम्हाला शोभेल असं नको का? हे असं अपंग मूल नकोय आम्हाला. आम्हाला ‘परफेक्ट’ मूल हवंय!’’
‘‘अहो, पण इथे कोण परफेक्ट आहे? तुम्ही आहात का?’’ मी जरा चढय़ा सुरात विचारलं. ‘‘मी आहे का? आता काही टेस्ट केल्या, तर कोणते आजार होऊन गेले, कोणते होऊ शकतात अशी कुंडली मांडता येईल सगळय़ांचीच!’’
हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’
‘‘डॉक्टर, काय सांगू तुम्हाला.. हे असं कळल्यापासून आसपास सारखी अधू माणसंच दिसतात. तीन-चार पायऱ्यांकडेही डोंगराकडे पहावं तसं पाहणारी, गर्दीत मागे मागे पडणारी.. परवा एअरपोर्टवर व्हीलचेअरवरून टॉयलेटच्या दाराशी हताशपणे झटापट करणारी एक मुलगी दिसली. म्हणजे, आधीही ही माणसं होतीच की, पण त्यांच्या अडचणी मला जाणवल्या नव्हत्या. नुसतं म्हणायला ‘दिव्यांग’ हो, पण तशा सोईसुविधा कुठे आहेत? तुमच्या दवाखान्यातही पायऱ्या चढूनच यावं लागतं.’’ तिनं आवंढा गिळला.
‘‘समजा, हा गर्भ पाडला, मग पुढच्यावेळी सगळं सुरळीत होईल याची खात्री आहे का? पुढच्यावेळी आणखी काहीही असू शकतं. क्वचित काही यापेक्षा गंभीरही!’’ आता मात्र ते विचारात पडले.
पुढे बराच वेळ मी त्या दोघांना समजावत होतो. किरकोळ, दुरुस्त होण्याजोग्या व्यंगासाठी टोकाचं पाऊल कशाला? अर्थात, त्यांचीही काही बाजू होती. आणखीही व्यंगं असली तर? शाळेतली चिडवाचिडवी, हिणवणं,
आई-बापालाच बोल लावणारे लोक, साध्या टॉयलेटसारख्या सुविधांचा अभाव, पुढे लग्न, पुढच्या पिढीत हे उतरलं तर? अशा चिंता होत्या. निदान या बाळापुरत्या तरी त्या लागू नाहीत अशी मी खात्री दिली. अशा बाळांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची आणि अशाच अन्य रुग्ण-कुटुंबीयांची गाठ घालून देईन असं आश्वस्त केलं. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असंही बजावलं. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही सांगितलं. अखेर सध्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या बोलीवर ते बाहेर पडले.
हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!
हे प्रकार आता वाढत चालले आहेत, हा अनुभव आहे. सोनोग्राफीमुळे अनेक व्यंगं मूल पोटात असतानाच समजतात. त्यातली काही दुखणी सरळ सरळ जीवघेणी असतात. मुलाचं डोकंच तयार झालेलं नाही.. कवटी, छाती किंवा पोट उघडं असून सारे अवयव बाहेर डोकावत आहेत, वगैरे. इथे गर्भपातच हिताचा. निर्णय सोपा. यातले काही जीवघेणे आजार मुळी उशिराच लक्षात येतात. उशिराही गर्भपाताचा हक्क मिळावा म्हणून बराच झगडा द्यावा लागला. अखेर तो हक्क मिळाला आहे.
दोन टोकाच्या प्रकरणांमध्ये परिस्थिती बरी असते. रुग्णाला गर्भपाताला प्रवृत्त किंवा परावृत्त करणं एवढंच काम असतं. पण काही मधलेअधलेही आजार असतात. उदा- कमरेचा मणका उघडा असणं. यात शस्त्रक्रिया करून मूल नीट चालू शकेल का, हा तर प्रश्न असतोच, पण शी-शूवर नियंत्रण, मेंदूची नीट वाढ, असेही अनेक प्रश्न असतात. सोनोग्राफीनंही ते अनुत्तरित राहातात. काही आजारांत मुलाची काळजी हे पूर्णवेळचे काम ठरू शकतं. सतत सेवेकरी लागू शकतात. कोणाच्या तरी- म्हणजे बहुधा आईच्याच, करिअरला ब्रेक लागू शकतो. कधी अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात. त्या कमी अधिक यशस्वी ठरू शकतात. काही उपचार त्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर असतील तर असून नसल्यासारखेच. या साऱ्याचा मानसिक आणि आर्थिक ताण काहींना झेपतो, काहींना नाही. म्हणूनच ज्या त्या जोडप्यानं घेतलेला निर्णय ज्या त्या वेळी बरोबरच असतो. त्यांनी त्याचं वैषम्य किंवा गंड बाळगू नये.
मात्र कित्येकदा अत्यंत छोटंसंच काही व्यंग असतं. छोटय़ाशा उपचारांनी, शस्त्रक्रियेनं किंवा कालांतरानं भरून येणारं असतं आणि ‘गर्भपात करून द्या’ अशी मागणी येते. ‘परफेक्शन’चं खूळ कोणतीही तडजोड स्वीकारायला तयार नसतं. ज्यांना परवडतं, ते तर निव्वळ ‘पायाला सहा बोटं आहेत’ म्हणूनही गर्भपात करा म्हणतात! मग शब्दांत पकडण्याचा खेळ सुरू होतो- प्रश्न येतो, ‘‘एक दोष दिसतोय,
हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!
याचा अर्थ न दिसणारे अन्यही असू शकतात, हो ना?’’
‘‘असू शकतात.’’ डॉक्टर.
‘‘मग नको हे मूल.’’
पण एकही दोष न दिसताही कित्येक दोष असू शकतातच की! जगी व्याधी नाही असा कोण आहे? असे फुसक्या कारणानं केलेले गर्भपात म्हणजे कायद्याचा गैरवापर आहे. ‘देवानं दिलेलं लेकरू’ समजून जसं असेल तसं निमूट स्वीकारणारे बरे म्हणायचे! अपंगत्वाबद्दल समाजानं अधिक सहनशील आणि स्वागतशील असायला हवं. गर्भपात हे एक जीव संपवणंच आहे. समाज आणि कायदा मात्र त्या दृष्टीनं याकडे बघत नाहीत. डॉक्टर, रुग्ण, समाज सगळय़ांचीच मानसिकता लोकसंख्या स्फोटाच्या भयछायेत घडलेली आहे. तेव्हा लोकांची संख्या कमी करणारा प्रत्येक उपाय, म्हणून गर्भपातही, आपण ‘वंद्य’ मानला आहे. खास अपवाद म्हणून वापर अपेक्षित असताना तो ‘आम’ झाला आहे. चार चॉकलेटं मटकवावीत इतक्या सहजतेनं बायका गर्भपाताच्या गोळय़ा मटकावत असतात, असंही दिसतं.
ओठ फाटलेला असणं, हृदयाला अत्यंत छोटं छिद्र असणं, नाळेत दोनच्या ऐवजी एकच रक्तवाहिनी असणं, बाळ घडण्यातल्या अशा अनेक त्रुटी सोनोग्राफीत दिसतात. त्या दिसतात म्हटल्यावर नोंदल्या जातात. नोंदल्याच आहेत म्हटल्यावर रुग्णाला सांगितल्या जातात आणि मग ‘आताच्या आता गर्भपात करा’पासून ‘तुम्ही सांगताय ना डॉक्टर, मग ठीक होईन सगळं,’ पर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात.
हेही वाचा >>> पाहायलाच हवेत : शिक्षणातून नवा दृष्टिकोन!
सोनोग्राफीत न ओळखता येणाऱ्या व्याधी, जन्मल्यानंतरच कळणाऱ्या गोष्टी, याबद्दल या ‘परफेक्शनिस्टां’चं काय म्हणणं असतं? नजीकच्या भविष्यात बाळाला अमुक वयात तमुक आजार होईल, ते पाच किंवा पंचवीस वर्षच जगेल, असंही वैद्यकीय ज्योतिष पुढच्या काळात शक्य आहे. मग अशा बाळांना जन्म द्यायचा की नाही?
अर्थात हे भविष्यात! इतका पुढचा विचार कुणी करत नाही. होणाऱ्या आईबापाला तात्काळ येणाऱ्या अडचणींच्या पायऱ्या दिसत असतात आणि वर्तमानात, माझ्याही दवाखान्याला, चारच का असेनात, पायऱ्या आहेतच की!
shantanusabhyankar@gmail.com