अलीकडेच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिनाची दशकपूर्ती आणि येत्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने जागतिक पातळीवर भारताचे नेतृत्व करणाऱ्या आणि विज्ञानातील विविध करिअर संधींचा मागोवा घेणाऱ्या तीन तरुण महिला संशोधकांविषयी…

प्रे माचा महिना म्हणून ओळख असणारा फेब्रुवारी महिना आणखी एका कारणाने स्मरणीय आहे. या महिन्यात असणारी विज्ञान दिवसांची आणि पर्यायाने कार्यक्रमांची रेलचेल… संयुक्त राष्ट्र महासभेने २०१५ पासून ११ फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यंदाचं वर्ष दशकपूर्तीचं… या जोडीनेच नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याच्या आणि नोबेल पारितोषिकाच्या स्मरणार्थ १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून घोषित केला. विज्ञानाच्या दृष्टीने हा सुवर्णयोगाचा महिना… ‘ STEM मधील (Science, technology, engineering, mathematics) विविध करिअर संधी उलगडणं आणि त्यामधील स्त्रियांचा सहभाग अधोरेखित करणं’ ही आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवसाची या वर्षीची संकल्पना. तर ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील भारतीय तरुणांचं नेतृत्व’ ही या वर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना. या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने जागतिक पातळीवर भारताचं नेतृत्व करणाऱ्या आणि विज्ञानातील विविध करिअर संधींचा मागोवा घेणाऱ्या काही तरुण स्त्रियांचा मागोवा घेणं गरजेचं ठरतं.

मणिपूरमधील तुमुयोन खुलेन या लहानशा गावात जन्माला आलेली एस. बी. ट्विएला. पुढे विज्ञानातील तिच्या वावराचं श्रेय ती तेथील समृद्ध नागा संस्कृती आणि निरभ्र आकाश या दोहोंना देते. निसर्गाची ही देणगी विज्ञानातील तिची आवड वृद्धिंगत होण्यासाठी कारणीभूत ठरली. स्वच्छ मोकळ्या आकाशामुळे अवकाशाची ओढ लागलीच, पण सोबतच नागा संस्कृतीतील विविध परंपरा, शेती या साऱ्यामुळे त्या शहरापासून दूर समृद्ध नैसर्गिक वातावरणात वाढत असताना; निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा, घटकांचा एकमेकांशी असणारा सहज संबंध तिला अनुभवता आला. तिच्यासाठी विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यास न राहता, विश्वाविषयी, निसर्गाविषयी असणारं तिचं प्रेम आणि कुतूहल वृद्धिंगत करणारा, अनुभवातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीचा एक मार्ग झाला. तिच्या लहानपणीच एकदा मोठं वादळ आलं आणि डोळ्यांसमोर शेतीसाठी घेतलेली मेहनत काही क्षणांत उद्ध्वस्त होताना तिने पाहिली. त्या अनुभवाचा परिणाम म्हणूनच आज पर्यावरणासंदर्भातील विविध समस्यांवर काम करत असताना ती कायम वास्तविक आणि कृतिशील उपाय शोधण्यावर भर देते. हे सारं स्वत: अनुभवलं असल्यामुळे तिचं संशोधन हे केवळ एक नेमून दिलेलं काम न राहता तिच्यासाठी ती एक वैयक्तिक जबाबदारी ठरते. सध्या ती आयआयटी दिल्ली येथे समाजातील आणि विविध स्थानिक समुदायांकडे असणारे पारंपरिक ज्ञान आणि क्लायमेट अॅक्शनसाठीचे (हवामान बदल आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्न) आधुनिक उपाय यांच्या समन्वयाचं महत्त्व अधोरेखित करणारं संशोधन करत आहे. तिच्या आजवरच्या अनुभवाविषयी बोलताना ती एक गोष्ट पुन:पुन्हा अधोरेखित करते- ‘‘विज्ञानाची जशी आणि जितकी आपल्याला गरज आहे. अगदी तशीच विज्ञानालाही वेगवेगळे चेहरे, वेगळे आवाज, विविध अनुभव आणि विविधांगी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. विज्ञानाला तुमची, आपली साऱ्यांचीच आवश्यकता आहे.’’ एका लहानशा गावातून सुरू झालेला तिचा हा प्रवास संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये भारताचं नेतृत्व करण्यापर्यंत येऊन पोहोचला. ती २०२४ च्या ‘संयुक्त राष्ट्र विज्ञान परिषदे’च्या व्यवस्थापन समितीचा भाग होती. संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयामध्ये आपलं संशोधन या क्षेत्रातील जगभरातील दिग्गजांसमोर मांडण्याची आणि त्यांच्याकडून कौतुक करून घेण्याची संधी तिला मिळाली. या अनुभवामुळे तिला आपण योग्य मार्गावर आहोत याची पुन्हा एकदा नव्याने खात्री झाली.

नवी दिल्लीत जन्मलेली आणि पुढे किशोर वयापासून पीएच.डी.पर्यंत कोलकाता येथे शिक्षण घेतलेली डॉ. मुक्ता बासू… इतिहासातील तारखा लक्षात ठेवणं तिला त्रासदायक वाटायचं, पण त्याव्यतिरिक्त बालपणी विज्ञान, साहित्य आणि क्रीडा अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये तिला कमालीचा रस. पण गंमत म्हणजे, इतिहासातील तारखा वगैरे लक्षात राहत नसल्या तरी विज्ञानातील क्लिष्ट नामकरणं, वर्गवारी तिला छान मुखोद्गत व्हायच्या. वेगळे प्रयत्न करून ते लक्षात ठेवावं लागायचं नाही. आणि यामुळेच शरीरविज्ञान शास्त्रातील तिची रुची वाढू लागली. कर्करोग या विषयावर आपण काम करायचं नाही, कारण त्या विषयामध्ये अनेक लोक काम करतात असं तिनं सुरुवातीलाच ठरवलं होतं. पदवीचं शिक्षण घेत असतानाच ‘पेशीय विज्ञाना’तील तिची आवड वाढत गेली. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान ती अधोरेखित झाली. पीएच.डी.साठी कोलकाता येथील ‘चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थे’मध्ये पेशी विज्ञानातील संशोधनासाठी (Research in cellular biology) तिला प्रवेश मिळाला आणि ती कर्करोगावर संशोधन करू लागली. तिथं काम करत असताना तिला या क्षेत्रातील पेशीविज्ञानातील क्लिष्ट जगाची ओळख आणि संशोधनाच्या गरजेचं महत्त्व लक्षात आलं. सध्या ती अमेरिकेतील लॉसएंजलिस येथील सेडार्स-सिनाई मेडिकल सेंटर ( Cedars- Sinai Medical Center) येथे पोस्ट डॉक्टरेटअंतर्गत मूत्राशयाच्या कर्करोगावर ‘इम्युनोथेरपी’च्या माध्यमातून उपचार करण्यासाठी संशोधन करत आहे. ‘इम्युनोथेरपी’ या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला कर्करोगाशी लढण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. ही उपचारपद्धती कर्करोगाच्या जोडीने ऑटोइम्यून रोगांसाठीसुद्धा उपयोगी असल्यामुळे हे संशोधन येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं संशोधन ठरेल. विज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी ज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला कायम अद्यायावत (अपडेट) असण्याची आवश्यकता असते. संशोधन करत असताना आपल्या क्षेत्रातील घडामोडींवर, नवीन संशोधनावर लक्ष ठेवण्यासोबतच या विषयात रस असणाऱ्या, काम करणाऱ्या इतर लोकांसोबत चर्चा करणं, तसंच स्पर्धेपेक्षा एकत्र येऊन काम करण्यावर भर देणं ही काळाची गरज असल्याचं ती आवर्जून सांगते. आपल्या कामावर श्रद्धा आणि संयम ही या क्षेत्रांत यशस्वी होण्याची किल्ली आहे असं तिला वाटतं.

भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील बरेली या शहरात प्रियांका दासगुप्ताचे पालक कोलकात्यातील सरसूनातून स्थलांतरित झाले तेच बरेलीमध्ये शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने. शिक्षण हे केवळ गुणपत्रिकेवरील गुणांपुरतं मर्यादित नसून, जगणं समृद्ध करणाऱ्या, आपल्या जगापेक्षा वेगळ्या जगाला समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी असतं. तसंच या जगाला कवेत घेत, आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत, आपला रस्ता धुंडाळण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे याची जाणीव तिला याच लहानशा शहरात झाली. पुढे दिल्लीमधून विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ती वेगळे मार्ग शोधत राहिली. आणि याच प्रवासात तिला ‘विज्ञान संवाद’ या क्षेत्राची ओळख झाली. ‘फेम लॅब इंडिया’ आणि ‘युरेक्सेस इंडिया सायन्स स्लॅम’ या वैज्ञानिकांसाठी आयोजित विज्ञान संवाद या विषयावरील दोन्ही स्पर्धांमध्ये तिने केवळ सहभाग नोंदवला नाही तर या क्षेत्राविषयी फारशी माहिती नसतानाही केवळ विज्ञानावरील प्रेम आणि वादविवाद स्पर्धा तसंच नाटकांमधील अनुभव या पुंजीवर ती जिंकलीसुद्धा! युरेक्सेस स्पर्धेची विजेती म्हणून तिला ‘युरोपियन रिसर्च कौन्सिल’च्या बेल्जियम येथील मुख्यालयाला भेट व या क्षेत्रात काम करणाऱ्या युरोपातील वैज्ञानिकांची भेट घेण्याची संधी मिळाली. ही युरोपवारी प्रियांकासाठी निर्णयात्मक ठरली. तिला तिच्या करिअरची वाट सापडली. भारतामध्ये मुख्य प्रवाहात फारसं चर्चेत नसणारं- विज्ञान संवादाचं क्षेत्र. त्यानंतर प्रियांकाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर तसेच संस्थांमध्ये काम केलं. तिने लंडनच्या विद्यापीठातून ‘विज्ञान संवाद आणि पॉलिसी’ या विषयात पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतलं. इथंच विज्ञान संवादाच्या जोडीने ‘पॉलिसी’ या विषयातील तिचं कुतूहल आणि आवड वाढली. ‘विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर’, ‘म्यूझियम ऑफ लंडन’, ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चं रसायनशास्त्रासाठीचं प्रदर्शन, ‘युरोपियन अणू संशोधन संस्था (CERN)’ या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये इंटर्नशिप तसंच पूर्णवेळ कामाचा दीर्घ अनुभव घेतला. सध्या ती इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (IEC) या संस्थेमध्ये असोसिएट प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून कर्यरत आहे. एक वैज्ञानिक ते विज्ञान संवादक आणि पॉलिसीसाठी धोरणात्मक व्यवस्थापन अशा विविध माध्यमांतून ती विज्ञान क्षेत्रात करिअर करते आहे. या तीनही क्षेत्रांचा तिनं छान समन्वय साधला असला तरी ही तीनही क्षेत्रं स्वतंत्रपणेसुद्धा करिअरसाठी उत्तम परिपूर्ण संधी आहेत हेही यानिमित्ताने इथं अधोरेखित करायला हवं.

एस. बी. ट्विएला, डॉ. मुक्ता बासू आणि प्रियांका दासगुप्ता या तिघींच्या प्रवासाच्या आणि क्षेत्रांच्या गोष्टी एकमेकांपासून भिन्न असल्या तरी या तीनही गोष्टींना जोडणारा विज्ञानाचा एक सामायिक धागा आहे. विज्ञानावरील त्यांचं निस्सीम प्रेम, कुतूहल शमवण्याची वृत्ती, प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती, विज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून नवे मार्ग धुंडाळण्याची मनोवृत्ती, अज्ञाताला सामोरं जाण्यासाठीचं धाडस, स्वत:वर असणारा विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण जे काम करत आहोत त्यासाठीचं योग्य क्रिस्टल क्लिअर उद्दिष्ट्य. विज्ञानातील वेगवेगळ्या करिअर संधींचा शोध घेत असताना जागतिक पातळीवर भारताचं नेतृत्व त्या तिघीही करताहेत.

यानिमित्ताने मला अधोरेखित करावीशी वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, या तिघींसहित अनेकींचा विज्ञानव्रतींचा त्यांच्या आयुष्यातील, क्षेत्रामधील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्या म्हणतात, ‘‘आव्हानं तर साऱ्याच क्षेत्रात असतात. ती केवळ कुणा एका क्षेत्राशीच बांधील नाहीतच मुळी. आम्हाला फक्त एक स्त्री म्हणून आव्हानांना सामोरं जाण्याऐवजी एक वैज्ञानिक म्हणून आव्हानांना सामोरं जायचं आहे.’’ यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणारा आणि समानता हे मूल्य रुजवणारा विज्ञाननिष्ठ समाज घडवण्याची प्रतिज्ञा घेऊ या. ‘मला वैज्ञानिक व्हायचं आहे’ असं ठरवणाऱ्या अगदी खेड्यातीलही एका लहानगीला स्वप्नं पाहण्यासाठी विश्वास आणि आदर्श मिळेल यासाठी प्रयत्न करू या.

postcardsfromruchira@gmail.com

Story img Loader