पतीच्या उत्पन्नातील किमान २० टक्के वाटा गृहिणींना देण्यात यावा, हा विषय मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्रालयाने सप्टेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध केलं होतं यावर त्या वेळी थोडा गहजब झाला होता. अनेक गृहिणींनी तो वाटा घरकामाचा ‘पगार’ समजून हा गृहिणीपदाचा अपमान आहे, असा सूर लावला. पण त्याचबरोबर ‘पगार नको, सन्मान हवाय’, या मथळ्याखाली अनेक प्रतिनिधी गृहिणींनी आपले मनोगतही व्यक्त केले.
 पसे कमावण्याची संधी गमावणाऱ्या, पूर्णवेळ कुटुंब पालनपोषण करणाऱ्या गृहिणींसाठीचा खरं तर हा आíथक स्वातंत्र्याचा एक मार्ग होऊ शकेल, असे प्रथमदर्शनी वाटले म्हणून नाशिक शहरातील गृहिणींशी संवाद साधला असता, गृहिणी अंतर्मुख झाल्या. ‘संस्कृती की हक्क’ हे ठरविताना गोंधळल्या. कोरी पाटी म्हणून संस्कृतीस प्राधान्य वा शिक्षित आहे म्हणून स्वजाणिवेतून हक्क म्हणून प्रतिसाद याचा कुठेही ताळमेळ बसत नाही.
स्त्रिया कुटुंबासाठी करीत असलेले हे अदृश्य श्रम अधोरेखित व्हायला हवेत हा मुद्दा तसा जुनाच आहे. त्यावर अनेक मतप्रवाह अनेक उपाय सुचवितात. घरकामाची विभागणी समान असावी, कुटुंबातील दोघांनाही कमावता यावे, यासाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे असावी आदी गोष्टी सुचवण्यात आल्या, परंतु आजपर्यंत ना हे घडले ना कुटुंब सांभाळण्यासाठी होत असलेल्या स्त्रियांच्या श्रमास प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यामुळेच किमान       २० टक्के वाटा तरी पत्नीला सन्मानपूर्वक देऊन याची सुरुवात होईल असे वाटते. पण मुळात घरकामाचे आíथक मोल करण्यामागे कोणते विचारप्रवाह आहेत, हे अद्याप स्त्रियांना माहिती नाही, किंवा त्यावर विचार केला गेलेला नाही हे या गृहिणींशी झालेल्या संवादातून प्रकर्षांने जाणवले. आजची पूर्णवेळ गृहिणी कुटुंबाचे पालनपोषण जाणीवपूर्वक, नेटकेपणाने करत असते. पण तिच्या या कामाचे, कुटुंबासाठीच नव्हे तर, समाजासाठी, देशासाठी देत असलेल्या योगदानाचे (उत्पादक श्रमाचे) मूल्य काय? तिच्या मर्यादित आíथक स्वातंत्र्याचे काय? तिच्या भविष्यकाळाची तरतूद अनेकदा केली नसणे हे तिच्यासाठीच दु:खदायक ठरू शकते. पण त्याच्याही आधी गृहिणी घरातून फक्त मानसन्मान मिळावा याची अपेक्षा करते. संस्कृती जोपासायची की आर्थिक हक्क मागायचा? या द्विधेत नाशिकच्या पूर्णवेळ गृहिणी आहेत.
 स्त्रिया फक्त कुटुंबाचेच पालनपोषण करीत नसून त्या देशाच्या भांडवलात भर टाकतात. एखादी स्त्री कुटुंबाचे जे पालनपोषण करते, ते तिच्या कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही. ती देशाच्या भांडवलामध्ये योगदान देत असते. मुलांना जन्म देणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यांच्यावर संस्कार करणे, व उद्यासाठी उत्पादक श्रम तयार करणे. म्हणजेच एका अर्थाने उद्यासाठी मनुष्यबळाची भांडवली गुंतवणूक करण्याचे काम अविरत करीत आहे, हा व्यापक विचार गृहिणींपर्यंत पोहोचलेला नाही, असे जाणवते.
अर्थात अर्थार्जन करून स्त्रियांच्या जोडीने पुरुषही कुटुंबाचे पालनपोषण करीत असतात, मात्र त्यांचे आíथक, सामाजिक कोणत्या ना कोणत्या पद्धतीने   मोल केले जाते. परंतु स्त्रियांनी कुटुंबासाठी केलेले श्रम हे कुठेही मोजले जात नाही. म्हणूनच पूर्णवेळ गृहिणींच्या आíथक स्वातंत्र्याचा विचार केला गेला तर ते चुकीचे ठरावे का? या गृहिणींच्या वैयक्तिक आयुष्यातील, आíथक गोष्टींशी ताडून पाहिल्यास त्यांचे मर्यादित आíथक स्वातंत्र्य हेसुद्धा कुटुंब पालनपोषणाच्या मोबदल्याची गरज अधोरेखित करते. म्हणूनच त्याचा विचार होणं गरजेचं असावे, असे वाटते.
कुटुंबात मिळणारा मान
व्यवस्थापन शाखेतील कोणत्याही पदवीशिवाय स्त्री कुटुंब व्यवस्थापन करते. मात्र आपल्या  कुटुंबव्यवस्थेच्या संस्कृतीत (जी चांगली नाही, असे अजिबात म्हणणे नाही) या गोष्टींना आíथक मूल्य नाही, फक्त मान आहे, आणि गृहिणीही अर्थात प्रथम या मानाचीच अपेक्षा करतात. ‘‘मान आहे, पण तो सोयीनुसार असतो. एखाद्या विशिष्ट टप्प्यावर वाहवा होते, पण एखादे काम झाले नाही तर त्याचा अनेकदा जाबही द्यावा लागतो. कुटुंबातून आम्हाला मान, मानसिक आधार मिळावा, केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, घर सांभाळणे ही स्त्रियांचीच जबाबदारी आहे, असे गृहीत धरू नये, असे विचार या गृहिणींशी संवाद साधताना ऐकायला मिळाले.  
गृहिणींचे आर्थिक स्वातंत्र्य  
या पूर्णवेळ गृहिणी महिन्याकाठी स्वत:साठी, कुणाचीही परवानगी न घेता किती पसे खर्च करू शकतात? याची सुरुवात अगदी शून्यापासून होते. स्वत:साठी एक रुपयाही नवऱ्याला विचारल्याशिवाय खर्च करू शकत नाही इथपासून कमाल मर्यादा ५०० रुपयापर्यंत खर्च करतात. जरी हे खर्च केले तरी ते घरखर्चाच्या वाचवलेल्या पशातून करावे लागते, याबाबत पतीला सांगताना मोकळेपणा नसतो. दडपण असते. घर दोघांचे आहे, पसेही दोघांचे आहेत, मग असे का? प्रत्येक वेळी काही पाहिजे असेल तर ‘ह्य़ांना’ विचारायचे, किंवा ‘ह्य़ांच्याकडून’ पसे मागायचे. कुणाला मदत करावीशी वाटली तरी ती स्वखुशीने करता येत नाही. वैयक्तिक गरजांसाठी सर्वाधिक पशांची गरज भासते. मग त्यात सॅनिटरी नॅपकीन, डोकेदुखीची गोळी, टिकल्या, बांगडय़ा, नातेवाईकांकडे जाणे, जाताना एखादा खाऊ घेऊन जाणे, शाळकरी मुलाचा चॉकलेट गोळ्या, पेन पेन्सिलचा हट्ट भागवता येत नसला की  गृहिणींना परावलंबाची भावना जाणवते. तर त्याउलट याची जाणीवच नाही अशाही काहीजणी आहेतच. पती सगळं काही आणून देतो, टिकल्या, बांगडय़ा, साडय़ा, औषधं मग पसे हवेत कशाला? असा त्यांचा प्रश्न होता. त्या निवडीचे, स्वत खरेदीचे स्वातंत्र्य नाही, क्रयशक्तीचा वापर नाही, आत्मविश्वास नाही, हे आपल्यासाठी असू शकतं यापासून अनभिज्ञ असल्याचे जाणवले. रोज स्वंयपाक करणे, कुटुंबाची काळजी घेणे, व उरलेल्या वेळात भिशी ग्रुप, महिला मंडळात सामील होणे, व्हॉट्सअपवर असणे, सणवार, उत्सव साजरे करणे, यातच आयुष्य सरते आहे. बाहेरच्या जगापासून, त्यातल्या घडामोडींपासून आपण वंचित आहोत, याचे अनेकींना भानही नाही.
पण त्याहीपलीकडे ‘‘लग्न झाल्यापासून सगळं तेच आणतात, मी काही आणीत नाही, आणि आता तर मला जमत नाही, सवयही उरली नाही व तेही मला म्हणतात तुला काही जमत नाही.’’ ही काहींची वाक्ये धोकादायक वाटतात, स्त्रियांची फसवणूक होण्यास कारणीभूत ठरतात. आíथक मोबदल्याच्या निमित्ताने स्त्रियांना स्वतची क्षमता वापरायचा अवकाश मिळेल, असे वाटते.कुटुंबाची मानसिकता
झोपेचे ८ तास सोडल्यास गृहिणी पूर्णवेळ कुटुंबाच्या पालनपोषणात व्यग्र असतात. सरासरी १२ ते १६ तास प्रत्यक्ष काम करीत असतात. (नवरा ८ तास काम करतो, ९ व्या तासाला ओव्हर टाइम मागतो.) पूर्णवेळ गृहिणी कुटुंबासाठी करीत असलेले काम तेवढीच शैक्षणिक पात्रता असणाऱ्या बाहेरील व्यक्तीकडून पसे देऊन करावयाचे झाल्यास किती पगार द्यावा लागेल? कल्पना म्हणूनही स्त्रियांना हे ठरवता येत नाही. यावर हे काम अमूल्य आहे, कुणी करूच शकणार नाही, अशी उत्तरे मिळाली. (अगदी आजारी असतानाही ‘संध्याकाळी, नुसती खिचडी तरी टाकण्याची’ कुटुंबीयांची अपेक्षा गृहिणी पूर्ण करते.)
स्त्रियांना असे वाटते की आपण कुटुंबात राहतो, आपल्याला हवं ते मिळतं, मग विनामोबदला कसं म्हणता येईल. परंतु अर्थार्जनाची क्षमता असतानाही, अनेक जणींना कुटुंब पालनपोषणासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे त्यांना आíथक स्वातंत्र्य नाही. किंवा पूर्णत: त्यांचा अधिकार असेल इतकी रक्कम त्यांना मिळत नाही. अनेक पूर्णवेळ गृहिणी या आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित आहे, पण यातला विरोधाभास हा की हे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर अवलबूंन नाही, हे त्या कुटुंबाच्या, समाजाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
घरकामाचे मूल्य ही कुटुंबागणिक ठरवायची गोष्ट नक्कीच नसून किमान सामाजिक- वैचारिक पातळीवर प्रथम हे स्वीकारले गेले पाहिजे की घरकामाचे आíथक मोल व्हावयास हवे, ते कोणी द्यावे कसे द्यावे मग ते घेतले तर काय होईल, नोकर-मालक संबंध निर्माण होतील का? आदी नंतरचे मुद्दे. घरकामाचा मोबदला या संकल्पनेस जो नकारात्मक प्रतिसाद येतो, तो आपल्याकडील कुटुंबव्यवस्था, संस्कृती या विचारांच्या बठकीतून येतो असे वाटते. घरकामाचे आíथक मोल होण्यापाठीमागे स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य आहे, याचे चिंतन, ही विचारांची बठक समाजात नाही. कदाचित म्हणूनच गृहिणी स्वत घरकामाचा मोबदला नाकारतात, व ठामपणे हेही सांगतात, की घरकामाचा मोबदला असावा असे आमच्या जोडीदारासही कधी वाटणार नाही. अíथक मोबदला असण्याबाबत कुटुंबाकडे प्रस्ताव मांडल्यास काय प्रतिक्रिया येतील, तर..असा प्रस्ताव कुटुंबीयाकडे मांडण्याची हिंमत करावी लागेल, असेही स्त्रियांनी नोंदवले.
गृहिणीची शैक्षणिक पात्रता, कुटुंबातून मिळणारी आíथक सुरक्षितता, कुटुंबाची प्राप्ती व खर्चावर असणारे गृहिणीचे नियंत्रण, स्त्रियांचे समाजातील स्थान, या भूमिकाकडे पाहण्याचा गृहिणीचा दृष्टिकोन किंवा याबाबत तिच्या जडणघडणीत तिच्यावर झालेले संस्कार, या सर्वाचा एकत्रित व स्वतंत्र परिणाम आíथक स्वातंत्र्यास, घरकामाचा मोबदला हा पर्याय असावा की नसावा हे ठरण्यास कारणीभूत ठरतो, असे दिसते. सरसकट सर्वच स्त्रिया होही म्हणत नाही व नाहीही म्हणत नाहीत. या ना त्या प्रकारे गृहिणींचे हे म्हणणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला असता, प्रत्येक वेळी हो किंवा नाही ठामपणे म्हणणाऱ्या प्रत्येकी दोनच गृहिणी आढळल्या, बाकी प्रत्येक वेळी गोंधळात पडल्या, त्यांना स्वत:ला याबाबत ठरवता आले नाही.     
या अभ्यासासाठी Caroline O. N. Moser, Washington DC यांचा अभ्यास आराखडा आधारभूत मानला आहे. त्यानुसार प्रत्येक स्त्री व पुरुष समाजात तीन प्रकारच्या भूमिका पार पाडत असतात. प्रॉडक्टिव्ह रोल, रिप्रॉडक्टिव्ह रोल, आणि कम्युनिटी मॅनेजिंग अॅण्ड कम्युनिटी पॉलिटिक्स. या त्यांच्या तीन भूमिकेचे त्यांना त्या त्या प्रमाणात फायदे मिळतात. मात्र या तिन्ही भूमिकांत पुरुषाला वैयक्तिक उत्कर्षांची  संधी मिळते. कुटुंबाचा आर्थिक पालन-पोषणकर्ता म्हणून सर्व अधिकार त्याच्याकडे एकवटलेले असतात, निर्णयस्वातंत्र्य, आíथकस्वातंत्र्य त्याला असते. समूह-नेतृत्वाच्या संधी व पत त्याला प्राप्त होते. परंतु स्त्रीच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. अर्थार्जनाची भूमिका स्त्रीने बरोबरीने निभावूनही, ती पुरुषाची साहाय्यक, दुय्यम ठरते. स्त्रिया कुटुंब पालनपोषणाची ८० टक्के भूमिका निभावतात, पण या बदल्यात कोणत्याही प्रकारचे पशातील मोल अथवा वैयक्तिक उत्कर्षांच्या, सन्मानपूर्वक पत वाढण्याच्या संधी तिला खुलेआम मिळत नाहीत. त्यामुळे तिच्या योगदानाचे मोल काय? हे अधोरेखित होण्याची गरज आहे.
  समजा, एका सामान्य कुटुंबात नवरा-बायको-मुले, सासू-सासरे आहेत. नवरा पसे कमावून आणतो व बायको त्या पशाचा योग्य तो विनियोग करते. अर्थात नवऱ्याला विचारून. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती मल्टिटास्किंगची भूमिका पार पाडते. घरातील वृद्धांची देखभाल, सेवाशुश्रूषा, प्रौढांची, मुलांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, घरातील सर्व व्यवस्थापन, समाजातील नीतिनियम, व्रतवैकल्यं ही तिचीच जबाबदारी ठरली जाते, या पूर्णवेळ गृहिणीच्या आयुष्यात डोकावले की हे सर्वसाधारण चित्र दिसते. कुटुंबाचे पालनपोषण ही ती जाणीवपूर्वक, नेटकेपणाने करत असते. पण तिच्या या कामाचे, कुटुंबासाठीच नव्हे तर, समाजासाठी, देशासाठी देत असलेल्या योगदानाचे (उत्पादक श्रमाचे) मूल्य काय? अगदी उघडपणे मांडले तर कमावता नवरा तिला दोन्ही वेळचे जेवण व वरखर्चाला जे काही पसे देईल ते आणि मिळणारा सन्मान, कुटुंब घडवल्याचं समाधान, मुलांची काळजी घेण्याचा आनंद तिला मिळेलही त्याच्याही पुढे जाऊन थेट बोलायचं तर नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाची (असेल तर) पेन्शनही तिची असेल पण तरी त्यावर वृद्धापकाळ जाणार नाही. पशाने भागणाऱ्या गरजा या पशानेच भागवता येतात,’ असेही कल गृहिणी नोंदवतात. स्त्रिया पार पाडीत असलेल्या भूमिकेचे आर्थिक मोल होणे जोपर्यंत समाजाकडून स्वीकारले जाणार नाही, जोपर्यंत त्याची जाणीव होणार नाही, तोपर्यंत स्त्रियांना हवा असलेला मानही कदाचित मिळणार नाही. घरकाम हे उत्पादक काम आहे – हे मान्य होण्याची ही वेळ आली आहे, असे वाटते.
 घरकामाचे मूल्य हा विचार अनेक गृहिणींना रुचत नाही, ज्यांना रुचतो त्यांची त्यामागची भावना केवळ आíथक घुसमट टाळली जाईल इथपर्यंतच मर्यादित आहे.
जनगणनेमध्ये गृहिणींची गणना ही ‘नॉन वर्कर्स’ अशी केली जाते. या गटात विकलांग, सज्ञान पण शाळेत न जाणारी मुले, भिकारी, कैदी, यांचा समावेश होतो.
 पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांचा एकत्रित डाटा कुठेही उपलब्ध नाही.
घरगुती कामे करणाऱ्या स्त्रिया ज्या धुणीभांडी, स्वयंपाकाची, मुले सांभाळण्याची कामे करतात. (पैसे कमावूनही त्यांची तशीच नोंद आहे.) यातच या पदवीधर, उच्च पदवीधर गृहिणींची गणना होते, कारण त्या घरकाम करतात, नवऱ्यांवर अवलंबून आहे, ज्याला आíथक मोल (?) आहे असे कुठल्याही प्रकारचे काम त्या करीत नाही.
आपल्याकडील गोंडस कुटुंबव्यवस्था व घरकामाचा मोबदला या दोन्ही परस्पर विरोधी संकल्पना आपल्याला वाटतात. साहजिक आहे, परंतु घरकाम हे उत्पादक श्रम मानण्यापाठीमागे असाही विचार आहे की, श्रम विकून श्रमशक्ती संपलेल्या, दमून-भागून घरी येणाऱ्या पुरुषाची सेवा त्याची पत्नी करते, खाऊ-पिऊ घालते, लैंगिक गरजा भागवते, मुलांची काळजी घेते व भविष्यात उत्पादनासाठी तयार करते, (म्हणजे भविष्यातील उत्पादनाचे काम करते.) पण हीच वस्तुस्थिती अशी व्यक्त होते, ‘घर आमच्या दोघांचं आहे, तो बाहेर कमावतो व मी घर सांभाळते.’ त्यामुळे  आपल्याच लोकांसाठी केलेल्या कामाचे पसे घेणे पटत नाही. भांडवलशाहीत विनामोबदल्याचे काम हे उत्पादक काम नाही आणि म्हणून आíथक मोबदला नाही. परिणामी गृहिणीचे श्रम अधोरेखित होत नाही.
स्त्री, पूर्ण वेळ गृहिणी असो वा नोकरदार महिला असो तिला तिच्या कुटुंबात मान हवाय. प्रत्येक कुटुंबात स्त्रीला कसा मान दिला जातो, हे कुटुंबागणिक भिन्न ठरते. नोकरदार स्त्रियांच्या हाती किमान आíथक स्वातंत्र्य आहे, (असे समजू या), गृहिणींच्या तुलनेत किमान त्यांना कुटुंबात मान मिळू लागला असावा. या धर्तीवर गृहिणींना सन्मानपूर्वक असा आर्थिक मोबदला मिळाल्यास त्यांचा सन्मान होईल, घरकामाच्या श्रमास सन्मान प्राप्त होऊन स्त्रीच्या आíथक स्वातंत्र्य, स्वावलंबनाची सुरुवात होईल, असे वाटते, पण आपल्या तमाम हाऊस इंजिनीअर्सने ते नाकारले, नुसतेच नाकारले नाही तर पुन्हा त्याची वाच्यता नाही. असो.
 एक मात्र निश्चित की घरकामास आर्थिक मोबदला असो वा नसो गृहिणी कुटुंबासाठी देत असलेले योगदान कुटुंबीयांनी किमान मान देऊन तरी अधोरेखित करावे हे आवर्जून व्यक्त करतात, मात्र हीच जर वस्तुस्थिती सगळीकडे असेल तर घरकामाच्या श्रमाला व पर्यायाने गृहिणीला मान मिळण्यासाठीच्या संघर्षांचा श्रीगणेशा प्रथम करावा लागेल, व नंतर आर्थिक मूल्याचा!    
नाशिक – सुलभा शेरताटे -sulabha21@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषांक असल्याने चतुंरग’मधील नियमित सदरे अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत.

आजचा आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषांक असल्याने चतुंरग’मधील नियमित सदरे अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत.