सुटसुटीत, हलके, मोकळे कपडे वापरायला मिळणे स्त्रीच्या परिधान आणि निवडस्वातंत्र्याचा एक भाग होता. परंतु त्यासाठी तिला चळवळ करावी लागली. पँटसदृश ब्लूमर घालणाऱ्या स्त्रियांना शिव्या, कुत्सित बोल, दगड-अंडय़ाचा वर्षांव झेलावा लागला. हे सारं घडलं अमेरिकेत. नंतर ही चळवळ ‘ब्लूमरिझम’ म्हणून जगभरात झिरपली. स्त्रीला परिधानस्वातंत्र्य मिळाले आणि ती ‘मोकळी’ झाली.. उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या चळवळींचा आढावा..
जगाचा इतिहास पाहिला, तर असे दिसते की, स्त्रियांना बहुतेक कुठलाही अधिकार जन्मजन्य अथवा सहजपणे मिळालेला नाही. मतदानाचा हक्क, संमती विवाह, ऐच्छिक संतती, अर्थार्जन इथपासून परिधानाचे म्हणजे ऐच्छिक पोशाख घालण्याचे स्वातंत्र्यही झगडून आणि समाजाविरुद्ध बंड करूनच मिळवावे लागले आहे. अमेरिकेसारख्या देशातील स्त्रीसुद्धा अपवाद नाही.
आज पाश्चात्त्य देशातील स्त्रिया पँट टॉप, शॉर्ट्स टॉप, स्कर्ट ब्लाउज असे सुटसुटीत पोशाख घालतात. उर्वरित जगानेसुद्धा अलीकडच्या दोन दशकांत हे पाश्चात्त्य व सुटसुटीत कपडे वापरायला सुरुवात केली आहे. या वापराने, स्त्रियांचा सर्वत्र वावर हा सोपा आणि सोयीचा झाला आहे. हा झाला व्यवहार्य भाग, पण त्यात एक आत्मसन्मान अनस्यूत आहे. कारण हे परिधानस्वातंत्र्य झगडून मिळालेले आहे. स्त्रीमुक्ती संघटनांना त्यासाठी अविरत संघर्ष करावा लागला आहे. १८५०च्या आसपासचा काळ.. त्या जुन्या काळातील अमेरिकी, युरोपिय स्त्रियांना संपूर्ण अंग झाकणारा पायघोळ झगा वापरावा लागे. अतिशय जाड आणि जड कापड. त्याचा पावलांवर पडणारा चुणीदार घेर. त्या झग्याच्या आतूनही कडक, घेरदार असा बक्रम (पेटिकोट) घालायचा. हे कपडय़ांचे ओझे कित्येक पौंडाचे होते. (आपल्या नऊवार लुगडी-चोळ्यांहून कित्येकपट जड) दिवसरात्र हा जड आणि मानेपासून पावलांपर्यंत असणारा ड्रेस घालायचा. घरकाम, मुले सांभाळणे, जिन्याची चढउतार, तीही रात्री हातात मेणबत्ती घेऊन, कारण ‘वीज’ अद्याप आली नव्हती. त्यामुळे नव्हते पंखे, नव्हते ए.सी. त्या झग्यात वावरताना घामाच्या धारा लागायच्या, मात्र कोणालाही हा अवजड पोशाख, सोपा करता येऊ शकतो ही कल्पना सुचली नाही. ‘गॅरिस स्मिथ’ या समाजसुधारकाच्या मनात ही कल्पना प्रथम आली आणि तिचा पाठपुरावा केला, त्याच्या सुधारक कन्येने एलिझाबेथ स्मिथ मिलर हिने. एलिझाबेथ काही कामासाठी स्वित्झर्लँडला गेली होती. तिथल्या एका सॅनिटोरियममध्ये तिने काही स्त्रिया सुटसुटीत कपडे घालून वावरताना पाहिल्या. सैलसर सुती पायजमा आणि गुडघ्यापर्यंत लांब, सैलदार कुर्ता (टॉप) घालून चपळाईने त्या स्त्रिया इकडेतिकडे वावरत होत्या,(त्या काहीतरी विरोधी गोष्ट करताहेत हे कुणाच्या लक्षात आले नाही बहुतेक) त्या ताणविरहित दिसत होत्या आणि ‘विझ’ने अमेरिकेला परतल्यानंतर स्वत:च कापड विकत आणून, तसाच म्हणजे स्वित्झर्लँडला पाहिलेला पोशाख शिवला. अंगात घातला आणि ती हरखूनच गेली. येस्स! शी वॉज अ ट्रेंड सेटर.
विझ तिचा नवा ड्रेस घालून तिच्या आत्याकडे ‘सॅनेका फॉल्स’ला गेली. ही आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्ती एलिझाबेथ कॅडीस्टॅन. तिनेसुद्धा हा ड्रेस शिवला आणि उभयता सॅनेको फॉल्सच्या बाजारात मजेत फिरू लागल्या. बास्केट सांभाळताना तारांबळ होत नव्हती की रस्ता ओलांडताना, अशा या दोघीजणी पोस्ट ऑफिसमध्ये हा नवा (तेव्हाचा चमत्कारिक) ड्रेस घालून आल्या. तेव्हा त्यांची भेट झाली, अमेलिया ब्लूमरशी. अमेलिया ब्लूमर या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या माननीय कार्यकर्तीशी. त्या दोघींच्या सोयीस्कर पोशाखाने प्रभावित झाल्या. आणि एका चळवळीचा जन्म झाला.. ब्लूमरिझम! अमेलिया ब्लूमरच्या नावाने प्रसिद्ध झालेली ही चळवळ! (आजही ही ‘ब्लूमर’ पँट मिळते. ब्लूमर म्हणजे फुगेरी शॉर्ट्स) अमेलिया अनेक आघाडय़ांवर स्त्रियांसाठी काम करीत होती आणि त्यात डेक्स्टर ब्लूमर या सुधारणावादी, पुरोगामी पतीची साथ होती. १८४८ साली महिला हक्क परिषदेचे व्यासपीठ तिने गाजवले होते आणि दारूबंदीची मागणी केली होती. त्यासाठी स्त्रियांची संघटना उभी केली होती. आणि ‘आपला आवाज’ जगात पोहोचावा, म्हणून ‘द लिली’ नावाचे मासिक सुरू करून, त्याचे संपादन ती करीत होती. विविध स्त्रीप्रश्न ‘द लिली’ हाताळत होतेच, त्यात पोशाखस्वातंत्र्याच्या उद्गारांची भर पडली. तिने या नव्या पोशाखाची (पुढे ‘ब्यूमल ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या) सचित्र माहिती दिली. त्याची उपयुक्तता सांगितली. आणि सुधारणावादी महिलांच्या पत्रांनी ‘द लिली’चा पोस्टबॉक्स भरून गेला. पुढचे ‘लिली’ अंक पोशाख कसा शिवावा? कपडा, कुठून घ्यावा? तो कसा ठेवावा अशा विषयांनी भरून गेले. लिलीचा खप ५०० वरून ४००० प्रती इतका वाढला. ब्लूमरला आणि पोशाख प्रवर्तक दोघी, विझ व तिची आत्या एलिझाबेथ कॅडीस्टॅन यांनाही व्याख्यानांची गावोगावची आमंत्रणे येऊ लागली. या वक्त्या ‘तो ड्रेस’ घालूनच माइकसमोर उभ्या राहत. एक प्रकारचे प्रात्यक्षिकच म्हणूयात.. पण अधिकाधिक पाश्चात्त्य महिला या ड्रेसने सुखावल्या. हळूहळू का होईना, तो जड-अवजड-अंगभर वागवला जाणारा ड्रेस, वगळून पायजमा
आणि वरती तोकडा म्हणजे गुडघ्यापर्यंतच सुती झगा वापरू लागल्या.
इथे या संदर्भातली एक हकिगत आठवली. स्त्री नियतकालिकांचा अभ्यास करताना ‘स्त्री’ मासिकाने, म्हणजे जुन्या किलरेस्करवाडीहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्त्री’ मासिकाने, सकच्छ की विकच्छ म्हणजे नऊवारी लुगडे की पाचवारी (गोलसाडी)?’ या विषयावर चर्चा घडवून आणली होती. सकच्छ म्हणजे कासोटय़ाची लुगडी ही परंपरा निदर्शक, शालीन, कुलीन पोशाख आणि विकच्छ म्हणजे बिनकासोटय़ाची साडी, ही परंपरेला छेद देणारी अशी चर्चा रंगली आणि काळाच्या सुधारक रेटय़ात ‘गोलसाडी’ टिकली आणि ‘नऊवारी साडी’ही ट्रॅडिशनल ड्रेस’मध्ये गणली जात, ‘प्रसंगापुरती’ उरली. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने दोन दशकांपूर्वी तुम्हाला कोणता पोशाख सुटसुटीत वाटतो?’ या आवाहनाला पाश्चात्त्य देशातील पोशाखाला ‘देसी पर्याय’ म्हणून सुटसुटीत सलवार कमीज म्हणजे, पंजाबी ड्रेसची शिफारस बहुमुखाने केली आणि वर्तमान स्त्रियांनी हा ‘राष्ट्रीय पोशाख’ अंगी रुळवला. लेगीग्ज आणि टॉप्सनी आणि पँट टॉप्सनी तरुण पिढीची ओढण्या-पदरातून मुक्तता केली आणि स्त्रीचा वावर अधिक सोपा करून टाकला. परंपरागत भारतीय आणि मराठी समाजाने स्त्रियांच्या पोशाखातले हे आधुनिक बदल, त्या मानाने, म्हणजे १८५० ते १९०० कालखंडातल्या पाश्चात्त्य अमेरिकन समाजाच्या तुलनेत, बऱ्याच समंजसपणे स्वीकारले.
याचे कारण, त्या स्वीकाराची एक पायवाट आधीच तयार झाली होती. एक पाश्र्वभूमी तयार झाली होती. ही पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या दोघी ‘विझ’ (आत्या-भाची) आणि ब्लूमर यांनी प्रचंड उपहास सहन केला होता. हा पोशाख आरामदायी होता. दोन्ही पाय स्वतंत्र ठेवणारे कपडे वापराला सोपे होते. घरकाम, प्रवास, मुलांचे संगोपन करणे यासाठी सोपे पडत होते. तरीही ‘समाजविघातक’ म्हणून त्यावर शिक्का बसला होता. समाज काय म्हणेल या भयाने, पारंपरिक महिला तोच अवजड पोशाख (अनेक जुन्या इंग्रजी पुस्तकांच्या कव्हर्सवरती असे फोटो आहेत.) घालीत राहिल्या.
अमेलिया ब्लूमर आणि चळवळीतल्या स्त्रिया असे नवे पोशाख घालत, म्हणून त्यांच्यावर नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी बहिष्कार टाकला. ब्लूमर घालणाऱ्या स्त्रियांच्या अंगावर पाणी उडवणे, अंडी फोडणे असे कुप्रकार केले. (सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शाळेत जाताना शेण टाकले जाई.. त्यातलेच प्रकार..) ब्लूमर घालणाऱ्या स्त्रियांवर शिवराळ कविता म्हटल्या जाऊ लागल्या. ‘ब्लूमरवाली मॅडम’ सिगरेट ओढते आहे आणि नवरा स्वयंपाक करतो आहे’ ‘ब्लूमरवाली मॉम’ रस्तोरस्ती भटकते आहे आणि ‘डॅड! मुलांना जेवण वाढतो आहे’ अशी व्यंगचित्रे चितारली गेली.
थोडक्यात, ब्लूमर घालणारी स्त्री, ही ‘वाया गेलेली’ आणि ‘अंगभर गाऊन वागवणारी घरंदाज ही कल्पना अमेरिकेत इतकी रुजली होती, की पहिला नवा पोशाख शिवलेल्या विझच्या मुलांनी, आईला ब्लूमर घालून परेंट्स-टीचर्स मीटिंगला येऊ नको, अशी ताकीद दिली. निवडणुकांमध्येही राजकीय भांडवल म्हणून ब्लूमरचा ‘गैरवापर’ केला गेला. एलिझाबेथ कॅडीस्टॅनचा नवरा हॅन्री याला, त्याचा पत्नी ब्लूमर वापरते म्हणून मत देऊ नये, असा प्रचार केला गेला. सुटसुटीत पोशाख घालण्याइतका हा लढा स्त्रियांसाठी सोपा नव्हता. कित्येक ब्लूमर घालणाऱ्या महिलांना सासर-माहेरचेच नव्हे तर मुलांच्या घरांचे दरवाजे कायमचे बंद झाले होते. लुसी स्टोन आणि सुसन अॅन्थनी या महिला कार्यकर्त्यांना तर आपल्याकडे होळीतल्यासारखी बोंब मारणाऱ्या टोळक्यांचा पाठलागाचा सामना करावा लागला.
या पोशाखाला अगदी धर्मगुरूंचासुद्धा कडक विरोध होता. इंग्लंडच्या ‘पंच’ मासिकाने हा विरोध कायम धगधगत ठेवला. ‘हा पोशाख म्हणजे परमेश्वराची अवज्ञा’ धर्मगुरू प्रवचनांतून हाच मुद्दा अधोरेखित करीत. हा सर्व विरोध का? तर, हा पोशाख घालणे म्हणजे पुरुषांची बरोबरी करणे. हा पोशाख करणाऱ्या महिला बायकांची कामे टाळतील आणि पुरुषी कार्यक्षेत्रात पाऊल रोवतील. पुरुषांचे खास व्यवसाय हिसकावतील. पुरुषांचे वर्चस्व संपवतील. हे भविष्यकालीन ‘भय’ या पोशाखांच्या विरोधात होते. प्रगतिशील अशा पाश्चात्त्य देशात ही स्थिती! पोशाख हे एक निमित्त होते, पण स्त्रीला बरोबरीत वागवायचे नाही. हाच मूळ गाभा.
मात्र ब्लूमरसह, तिच्या चळवळीतल्या सहकारी महिला या विरोधाला पुरून उरल्या. भाषणे, सभा, वृत्तपत्रीय लेखन आणि प्रत्यक्ष भेटीसाठी सातत्याने करीत राहिल्या, हळूहळू अनेक स्त्रिया या मांदियाळीत सामील झाल्या. ब्लूमर हे स्त्री चळवळीचे प्रतीक बनले. ‘ब्लूमर’ हे निमित्त होते. प्रश्न होता निवडस्वातंत्र्याचा, पुढे युरोप अमेरिकेत स्त्रिया सायकली चालवू लगल्या आणि या पोशाखाचा सर्रास वापर सुरू झाला. स्त्रियांची एका जोखडातून मुक्ती झाली आणि ब्लूमर्सच्या रूपाने, निवडस्वातंत्र्याच्या उद्गारांचा जागर झाला. ही चळवळ ‘ब्लूमरिझम’ म्हणून जगभरात झिरपली, आणि किमोनीज, लुगडी, व्हेल, घागरे अशा परंपरांतून स्त्रीचा सुटसुटीत आणि स्वतंत्र प्रवास सुरू झाला. त्यासाठी एलिझाबेथ कॅडीस्टॅन, सुझान अॅन्थनी आणि अमेलिया ब्लूमर या आद्य प्रेरणांचे, कृतज्ञ स्मरण करायला हवे. त्याच बरोबर ‘सुटसुटीत पोशाख’ आणि ‘आवाहनात्मक उघडा पोशाख’ यातले अंतर ओळखून स्त्रियांनी आपली वाट प्रतिष्ठेने चालावी. हेही तितकेच खरे! उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा विचार नक्कीच झिरपायला हवा.
ब्लूमरिझम! चळवळ परिधानस्वातंत्र्याची!
सुटसुटीत, हलके, मोकळे कपडे वापरायला मिळणे स्त्रीच्या परिधान आणि निवडस्वातंत्र्याचा एक भाग होता.

First published on: 07-03-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International womens day