कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या आजघडीच्या गंभीर समस्येला, गढुळलेले कौटुंबिक, सामाजिक स्तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. ‘इंटरनेट व्यसनाधीनता’ हे यातील एक महत्त्वाचं कारण! या दुखऱ्या संगतीविषयी, तिच्या दुष्परिणामांविषयी आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयी सांगताहेत.. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये.
विकास १९ वर्षांचा मुलगा, इंजिनीअरिंग करणारा, सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय घरातला मुलगा, घरात सर्व प्रकारच्या सुखसोयी, सर्व प्रकारचे गॅझेट्स उपलब्ध; परंतु गेली २ वष्रे इंजिनीअरिंगचं पहिलं वर्षच संपत नव्हतं, कारण विकास एक तर परीक्षाच देत नव्हता किंवा दिली तरी पास होत नव्हता. यावरून घरात त्याच्यात व त्याच्या आईवडिलांमध्ये सतत वाद, चिडचिड. या सर्व गोष्टींचं प्रमाण वाढत गेलं आणि पर्यवसान त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात झालं. आईवडील दोघेही कामावर गेले की, विकासला संध्याकाळपर्यंत रान मोकळं. मग कॉलेज बुडवून स्वारी गेम्स, सोशल नेटवर्किंग, चॅटिंग यातच मग्न होऊ लागली. एक दिवस अचानक लवकर घरी परतलेल्या आईला हे सगळं बघायला मिळालं. तशी कुणकुण लागली होतीच, पण प्रत्यक्ष ‘आँखो देखा हाल’ दिसल्यावर मग आई चिंताक्रांत होऊन तिच्या आक्रस्ताळ्या पद्धतीने सर्व हाताळू लागली, वडील नेहमीप्रमाणे तटस्थ! पर्यवसान काय झालं ते समोर आहेच.
१५ वर्षांचा रौनक, घरी आईवडील व तो एकुलता एक. अभ्यासात फार हुशार नव्हता, पण व्यवस्थित असायचा. हळूहळू शाळेतून सतत मारामारीच्या तक्रारी येऊ लागल्या. इतके की, एक दिवस रौनकने त्याच्या एका वर्गमित्राचा गळा दाबायचा प्रयत्न केला. इतका तो हिंसक झाला होता, कारण फक्त एकच होते त्याची ‘नेट’वरून झालेली गर्लफ्रेंड या मुलाबरोबर मैत्रीने वागत होती.
२१ वर्षांची वृषालीसुद्धा सुशिक्षित, मध्यमवर्गीय घरातली, फेसबुकची प्रचंड चाहती. गेल्या चार वर्षांपासून तिचं फेसबुक अकाऊंट आहे. सतत ‘या पुस्तकात’ गढलेली. घरात असताना पीसीवरून, बाहेर असताना मोबाइल, टॅब्लेटवरून ती नेहमी फेसबुकशी जोडलेली असायची. त्याच सोशल नेटवìकगच्या माध्यमातून ती एका मुलाच्या संपर्कात आली होती. नेहमी चॅटिंग, एसएमएस. हळूहळू या गप्पांचं, मत्रीचं रूपांतर ‘प्रेमात’- ‘इंटरनेट प्रेम’ यात झालं आणि एक दिवस वृषाली गायब झाली. तिचा मोबाइल संपर्क कक्षेच्या बाहेर. काही कळेना. पोलिसात तक्रार केली गेली. दोन-तीन दिवसांनी मुलगी विस्कटलेल्या अवस्थेत घरी परतली. सामूहिक बलात्काराची ती बळी ठरली होती! परत आल्यावर तिने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याच सोशल नेटवर्किंग साइट्सच्या प्रभावामुळे तरुणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं आपण सगळ्यांनीच वाचली किंवा पाहिली असतील. एकूण टीनएज किंवा कुमारवयात आत्महत्या, हिंसा या गोष्टींचे प्रमाण वाढत चालल्याचे आपण अनुभवतो आहोत. आत्महत्या हासुद्धा हिंसेचाच एक भाग म्हणता येऊ शकेल. या उदाहरणांमधून कुमारवयीन मुलांमध्ये होणाऱ्या आत्महत्या आणि त्यांच्यावरील इंटरनेटचा प्रभाव याचा अन्योन्यसंबंध किती दृढ आहेत ते दाखवतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. जगात एकूण होणाऱ्या आत्महत्यांच्या १० टक्के आत्महत्या या एकटय़ा भारतात होतात. त्यातील जवळजवळ ४० टक्के आत्महत्या या तिशीच्या आतील तरुणांनी केलेल्या असतात. त्यातही तरुणांपेक्षा तरुणींमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं प्रमाण जास्त आहे; परंतु यशस्वी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांचं/युवकांचं प्रमाण जास्त आहे.
२००० साली १-२ टक्केच हिंसेच्या घटनांमध्ये कुमारवयीन मुलांचा सहभाग असायचा. आता हेच प्रमाण वाढत जाऊन ५-६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही टक्केवारी मोठय़ा हिंसेची आहे, परंतु हिंसात्मक वर्तनही वाढत चालले आहे. ६वी ते १०वीपैकी १५-२० टक्के मुलांमध्ये टारगटपणा, दबावगिरी करणे, मारामारी करणे या प्रकारचे हिंसात्मक वर्तन दिसून येते. थोडक्यात, हे फक्त हिमनगाचं टोक आहे हे निश्चित!
आत्महत्या हा शेवटी एक दुष्परिणाम आहे. म्हणजेच विमनस्क, वैफल्यग्रस्त मनोवृत्ती वाढत गेल्याने झालेलं ते पर्यवसान आहे. एक प्रकारे मदतीसाठी केलेली ती एक शेवटची आर्त याचना असते. (Cry for Help) हिंसात्मक वर्तन किंवा असामाजिक वर्तन, लैंगिक दुर्वर्तन हीसुद्धा बिघडलेल्या मानसिक स्थितीची द्योतकेच आहेत. एकटेपणा, कुटुंबातील विसंवाद यातून वैफल्यग्रस्त झालेली मुलेच या वयात अशा असामाजिक वर्तनाकडे वळतात. इंटरनेटचा प्रभावही आज मुलांना ‘एकटे’ करतो, कुटुंबात असून एकलकोंडे बनवतो, ज्यातून हिंसेचा प्रभाव वाढू शकतो.
कुमार वय किंवा कोवळं तरुण वय हे बालपणातून पूर्ण तरुणाईकडे होणाऱ्या स्थित्यंतराचं वय असतं. अनेक शारीरिक, भावनिक बदल या वयात होत असतात. एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने या वयाचं वर्णन ‘Identity versus Identity Confusion’ म्हणजे स्वप्रतिमा निर्माण करण्याचं किंवा त्याविषयी गोंधळ होण्याचं वय असतं, असं केलं आहे. त्यामुळे ज्यांच्या बाबतीत हा गोंधळ होतो ते वैफल्यग्रस्त होण्याची शक्यता वाढते.
म्हणजेच ज्यांना कुटुंबाचा, मित्रमंडळी, नातलग यांचा योग्य पाठिंबा आहे. अभ्यासाशिवाय छंदांची आवड आहे. सामाजिक, धार्मिक सहभागाची आवड आहे, त्यांना मनातील भावनांचं प्रकटीकरण योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने करण्याची सवय असते. ज्यांच्या बाबतीत वरीलप्रमाणे आधार देणाऱ्या गोष्टी नसतात, ते मग वैफल्य /नराश्य म्हणजेच थोडक्यात पर्यायाने आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ शकतात.
आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रमुख कारणांमध्ये पालकांचा घटस्फोट, सावत्रभाव, घर बदलून वेगळ्याच ठिकाणी जाणे, शारीरिक/लैंगिकछळ, भावनिक दुर्लक्ष, घरगुती/कौटुंबिक हिंसाचार, कुटुंबातील व्यसनाधीनता, स्वत:ची व्यसनाधीनता, नराश्याचा आजार, स्किझोफ्रेनियासारखा गंभीर मानसिक आजार, अशी कारणं आहेत. या व्यसनाधीनतेमध्ये दारू, ड्रग्स यांसारख्या गोष्टींबरोबरच तरुणाईचा विचार केला तर ‘इंटरनेट व्यसन’ हादेखील महत्त्वपूर्ण घटक म्हणून पुढे येत आहे. नराश्यासाठी इंटरनेट व्यसनदेखील प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.
लहान मुलं इंटरनेट वापरायला सुरुवात करतात ते मनोरंजनासाठी व वेळ घालवण्यासाठी! कंटाळा घालवणं, गेम्स खेळणं, थोडी फार सोशल इंटर अॅक्शन हे लहान वयातील इंटरनेट वापरण्याचे मुख्य हेतू असतात, तर कुमार वयात सामाजिक संपर्क (Social Interaction) हाच मुख्य हेतू असतो. स्वत:ची ‘व्हच्र्युअल’ सामाजिक प्रतिमा निर्माण करणं, स्वत:च्या वयोगटातील मुलांशी संपर्क, संबंध वाढवणं, त्यातून काही नाती निर्माण करणं हा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ई-मेल, चॅट, फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट वगरेसारखी सोशल नेटवìकग साइट्स/माध्यमं लोकप्रिय ठरत आहेत. त्यातही मुलांमध्ये व मुलींमध्ये थोडा फरक आढळतो. मुलं जास्त करून मनोरंजन, ऑनलाइन गेम्स खेळणं यासाठी वापरतात, तर मुली माहिती मिळवणं व सामाजिक संपर्क वाढविण्यासाठी जास्त वापरतात.
ऑनलाइन गेम्समध्ये हिंसेचा खूपच वापर असतो. सतत हिंसक तत्त्वांचा मारा झाल्याने ‘तेच’ योग्य किंवा त्याविषयीच्या भावना बोथट, तटस्थ होऊन जातात. एक प्रकारचा कोडगेपणा येतो. स्क्रीनवर दिसणारी प्रत्येक गोष्ट ‘खरी’च मानली जाते व सत्य आणि काल्पनिकता यातील फरक करण्याची क्षमता नष्ट होते. एक प्रकारे हिंसेचं प्रशिक्षणच मिळतं. आपल्या समस्या सोडवण्याचा तोच एक मार्ग आहे असं ती शिकतात. त्या हिंसक गोष्टीतून आसुरी आनंद मिळतो ज्या त्यांना महत्त्वाचा व योग्य वाटत राहतो. कुठचाही मिळणारा क्षणिक आनंद हेच व्यसन लागण्याचं मुख्य कारण असतं. त्यामुळे त्यासाठी झोप कमी घेणं वा अवेळी झोपणं, आपलं काम/अभ्यास, शाळा, कॉलेज बुडवणं, मित्र, नातलगांकडे दुर्लक्ष करणं, असं वर्तन दिसणं म्हणजेच इंटरनेटचं व्यसन लागणं होय.
नुकताच चीनमध्ये या अशा व्यसनाधीन मुलांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला, ज्यात असं आढळून आलं आहे की, प्रीफ्रॉटल कॉर्टेक्स, लिम्बिक कॉर्टेक्स येथील ग्रे-मॅटरचा भाग, तर कॉडेट न्यूक्लिअस, इंटरनल कॅप्सूल, थॅलॅमस इत्यादी व्हाइट मॅटरचा भाग कमी होतो/ अशक्त होतो. म्हणजे आपली सुविचार करण्याची क्षमता कमी होते, भावनांवरचं नियंत्रण कमी होतं, ही नक्कीच गंभीरपणे विचार करण्याची बाब आहे हे निश्चित.
हेच सर्व इंटरनेटविषयक सातत्यपूर्ण दुर्वर्तन ‘इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर’ किंवा इंटरनेट व्यसन समस्या या नावाने ओळखलं जाऊ लागलं आहे. अजून मानसिक आजारांच्या यादीत अधिकृत समावेश झाला नसला तरी भविष्यात होऊ शकतो हे निश्चित!
म्हणूनच इंटरनेट व्यसनात गुरफटलेली ही मुले खऱ्या सामाजिक संबंधांपासून, खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहातात. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी/सत्याशी नातं तुटल्याने वा कमी झाल्याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात. लंगिक दुर्वर्तनाचे प्रशिक्षण संबंधित इंटरनेट साइट्स प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देतात, ज्यातून आवेगावर नियंत्रण नसणं, विभिन्न लिंगी व्यक्तींविषयी हवंसं वाटणं वगरे समस्या उद्भवतात.
अशी मानसिकदृष्टय़ा ‘अशक्त’ मुले मग आत्महत्येस प्रवृत्त नाही झाली तरच नवल! थोडक्यात इतर अनेक कारणांबरोबरच इंटरनेट व्यसन हे कुमारवयीन मुलांच्या आत्महत्येसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मग या समस्येवर उपाय करताना सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, इंटरनेट हे सध्याचं वास्तव आहे. त्याचे फायदेही अनेक आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून मुलांवर पालकांचं विवेकी नियंत्रण असणं आवश्यक आहे. पहिलीपासूनच कॉम्प्युटर शिकत असलेली, किंबहुना त्याहीपुढे जाऊन वयाच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासूनच आईवडिलांचा मोबाइल हाताळण्याची मुलांना सवय लागते. त्यातूनच बटणं दाबताना त्यावरील इंटरनेटच्या मायाजालात ते ओढले जाऊ शकतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच पीसी वा मोबाइल गेम्स, इंटरनेट वगरे आपल्या उपस्थितीत व ठरावीक वेळच वापरण्याची युक्तीने सवय लावणं जमल्यास वय वाढल्यावरही आईवडिलांचे ऐकण्याची सवय लागते.
वय वाढल्यावर थोडा वेळ स्वतंत्रपणे, पण आपण घरात असताना वा शेजारी बसून एकत्रपणे इंटरनेट एन्जॉय करणं सुरू केल्यास मत्रीच्या नात्यातून नकळत नियंत्रण ठेवता येतं. नियंत्रण ठेवताना त्यांना या इंटरनेटच्या कोलितपणाची म्हणजेच दुष्परिणामांची माहिती करून देणं, तसंच त्या गेम्सच्या विषयीइतर सोशल साइट्सविषयी चर्चा करणं, त्यातील व्हच्र्युअल संबंध यातील फरक समजावणं ही कामं कौशल्याने पालकांनी करणं जरुरीचं आहे. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवताना वरील गोष्टी कल्पकतेने, कौशल्याने केल्यास फरक पडू शकतो. थोडं वय मोठं झाल्यावर शाळेत समुपदेशकांनी व घरात पालकांनी योग्य लंगिक शिक्षण दिल्यास पोर्नोग्राफीचे दुष्परिणाम टाळता/कमी करता येतील.
थोडक्यात, कुमारवयीन मुलांच्या आत्महत्या या गंभीर समस्या आहेच. त्यावर उपाय करताना त्यामागील हे इंटरनेट व्यसन या महत्त्वपूर्ण कारणावरही लक्ष केंद्रित करणं तितकंच गरजेचं झालंय. एकूणच या कुमारवयीन पिढीला तणाव नियोजन, व्यसनाधीनता (ज्यात इंटरनेट व्यसनाचाही अंतर्भाव आहे.), लंगिक शिक्षण, करिअर मार्गदर्शन आदी सर्वच बाबतीत शालेय, सामाजिक, वैयक्तिक स्तरांवर जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळाल्यास समस्या निवळायला मदत होईल हे नक्की!