‘‘आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात आपणच लिहिलेली भूमिका आपण करावी अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्यातून एक वेगळी खूप आव्हानात्मक भूमिका सापडली, ‘तन्वीर पुरस्कार’. त्यासाठी उभारलेलं प्रतिष्ठान. याला सतत आर्थिक बळ लागतं. त्यासाठी मी व्यावसायिक झाले आहे. या खटाटोपात पुन्हा एकदा नवीन काही शिकते-शिकवते आहे..जगण्यात आनंद आणि समाधानही मिळवणं त्यामुळे सहजसाध्य होईल, असं स्वप्न बाळगते आहे..’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू.
आई-वडिलांना परफॉर्मिग आर्टस्ची आवड असल्यामुळे आमच्या घरात नाटकाचं वातावरण होतं. लहानपणी कुठेही छोटय़ा-मोठय़ा भूमिका करण्यासाठी त्यांचं खूप प्रोत्साहन असायचं. १२ वर्षांची असताना ‘यक्षगान’ मध्ये मी कृष्णाच्या नातवाची भूमिका सगळ्या पोशाखासह केली होती, तो एक लक्षात राहण्यासारखा प्रसंग! पण मला नृत्याची आवड अधिक. मुंबईत राघवन नायर मास्तरांकडे मी भरतनाटय़म् शिकत असे. ते दोन तास कसे सरत ते अगदी कळायचं नाही..
वाणी स्वच्छ होती, अंगी धीटपणा होता. शाळा मुलींची. त्यामुळे शाळेत वाटय़ाला बहुधा मुलांच्याच भूमिका येत असत. वक्तृत्वातही सहभाग असायचा. साहजिकच शाळेत १० वी नंतर नृत्याचा क्लास बंद झाला, तेव्हा कॉलेजमध्ये त्या वेळाची जागा नाटकानं भरून काढली. मित्रमंडळींमुळे मी नाटकाकडे ओढली गेले.
अशोक कुलकर्णीमुळे सत्यजीत दुबे यांच्या नाटकाशी आणि मग दुबेंशी माझी ओळख झाली. अशोकसोबत त्यांची नाटकं बघायला मी जात असे. पहिलंच होतं, ‘बंद दरवाजे.’ त्याच सुमारास  ‘पति गेले गं काठेवाडी’ हे नाटक बघितलं. या उच्च दर्जाच्या नाटकामुळे प्रायोगिक आणि व्यावसायिक समृद्ध मराठी रंगभूमीचा मला परिचय झाला. तोवर असे दोन वेगवेगळे प्रवाह आहेत हेही मला ठाऊक नव्हतं.
दरम्यान, माझ्या बहिणीचे सासरे मुरलीधर हट्टंगडी यांनी कोकणीमध्ये अनुवाद केलेल्या ‘तुझे आहे तुजपाशी’ यातली उषा मी साकारली होती.
इकडे दुबेंची नाटकं बघत असताना तिथलं वातावरण, तिथे येणाऱ्या बुद्धिमान माणसांच्या चर्चा.. हे सगळं मला आवडतंय, This is what I belong, असं मला जाणवू लागलं, दुबेला तसा निरोपही पाठवला आणि मला नाटक मिळालं, ‘आधे-अधुरे’. गंमत म्हणजे त्यासाठी माझी कुठलीच ऑडिशन घेतली गेली नाही, याचं मला आश्चर्य वाटलं. पण दुबेचं म्हणणं असं, ‘फक्त कमिटमेंट असायला हवी, मग काम चांगलं होईल.’
नाटक सुरू झालं. माझं हिंदी चांगलं होतं, अभिनय जमतो आहे, असंही वाटू लागलं होतं. ‘आधे अधुरे’ नंतर मराठीतही आलं. अमरिश पुरी, भक्ती बर्वे, अमोल पालेकर, ज्योत्स्ना कार्येकर ही मंडळी त्यामुळे संपर्कात आली. ज्ञानेश्वर नाडकर्णी या ज्येष्ठ  समीक्षकांची दाद मिळाली. तिथेच श्रीराम (लागू)ची भेट झाली. मग एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या आणि मी नाटकात रमत गेले. ‘आता हेच आपलं कार्यक्षेत्र,’ असा हळूहळू निश्चयच होत गेला.. माझ्या वयाच्या अभिनेत्री त्या वेळी फारशा नव्हत्या. त्यामुळे वेगवेगळ्या  प्रायोगिक संस्थांमधून मला कामं करायला मिळाली. त्यामुळेच उदंड अनुभव गाठीशी लागला.
या सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे यांच्या लिखाणाला अमोल पालेकर यांनी नाटकाचा आकार दिला. इम्प्रोव्हायझेशन. काहीसं मुक्त छंदातील हे नाटक म्हणजे अगदी वेगळा प्रयोग होता. ‘गोची’ या नावाने हे नव्या पठडीतलं नाटक तशाच निराळ्या सुधारित संगीतासह साकार झाले. छोटय़ा-छोटय़ा गटांमध्ये लहानशा जागेत आम्ही त्याचे प्रयोग करीत असू. अमोल पालेकर, चित्रा पालेकर, जयराम हर्डीकर, दिलीप कुळकर्णी यांच्यासोबत हे नाटक करायची आणि काही शिकायची संधी मिळाली. जुईली देऊसकर यांच्या जागी मी काम करत असे. एक चकित करणारा अनुभव या नाटकाने मला दिला.
‘गिधाडे’ मधली ‘माणकू’ ची भूमिका तशी बिनधास्तच! ती कशी उभी करायची, या विचारात असतानाच ‘what ever happened to baby Jane’ हा बेटी डेव्हिसचा सिनेमा माझ्या पाहण्यात आला आणि तिथेच मला माझी भूमिका सापडली. ढगळसर झगा, पायापेक्षा मोठय़ा स्लीपर्स, लालभडक ओठातून विशिष्ट कोनात लोंबकळणारी सिगरेट.. अगदी योग्यवेळी बेटी डेव्हिस सामोरी आली आणि भूमिका सापडल्याचा मला आनंद झाला. तर ‘एक होती राणी’ या नाटकाने माझ्या अभिनयाच्या कक्षा रुंदावल्या. याची गोष्ट अशी, एका देशाच्या राणीच्या हातून काही प्रमाद घडला आणि तिच्या वाटय़ाला देहान्त प्रायश्चित्त आलं. तिथून तिनं पळून जायचा प्रयत्न केला आणि वेशीपर्यंत जाणाऱ्या एका बसमध्ये बसली. पाठोपाठ तिच्यामागे तिला शोधायला आलेली माणसं.. आणि पकडल्या गेलेल्यांमध्ये एक ही वेश्या! या वेश्येची भूमिका मी करणार होते. नाटकात, आपणच राणी आहोत अशी खोटी कबुली देण्यास तिला एका दिवसाची मुदत मिळते, या काळात खरी राणी तिला गळ घालते, ‘माझ्या छोटय़ा मुलाला वाचवायला हवं, माझ्याऐवजी राणी म्हणून तू फाशी जाशील?’ इतकी घाबरट, भित्री बाई राणी कशी, असा प्रश्न तेव्हा त्या वेश्येला पडला. रात्रभरात ती विचार करती होती. मी आता राणी म्हणून कसं वागायचं?
या भूमिकेचा मी विचार करू लागले. माझी आवाजाची पट्टी कशी असेल, या दोघींच्या वागण्या-बोलण्यात-राहणीमानात नेमका काय आणि कसा फरक असेल? हा मला नाटकातला आणि माझ्या विचारांमधलाही टर्निग पॉइंट वाटला. दिग्दर्शक होते विनय आपटे. आजवर मी करत असलेलं नाटक तांत्रिकदृष्टय़ा योग्य असायचं. पण या नाटकानं मी तंत्राच्या पलीकडे गेले, अभिनयाची एक पायरी चढून गेले, असे मला वाटलं. भूमिकांचं कौतुक होत गेलं. ओळखी वाढू लागल्या..
त्यानंतर मिळाला ‘प्रतिमा’ हा सुलभा देशपांडेनी ‘आविष्कार’च्या उद्घाटनासाठी बसवलेला प्रयोग.. एक शिल्पकार आदिवासी बेटावर एका राज्यकन्येला बघतो. ती इतकी मनात ठसते की तो तिची प्रतिमा तयार करतो. आश्रमातून बाहेर पडताना तो तिच्यात जीव घालून बाहेर पडायचा. नेमका अशाच वेळी एक राजपुत्र बेटावर येतो आणि त्या राजकन्येच्या प्रेमात पडतो अशी ती गोष्ट. नाटकात जी मुलगी हे काम करणार होती, तिचं लग्न ठरलं आणि ही आदिवासी राजकन्येची भूमिका अचानक माझ्याकडे आली. त्यात तिला एक-दोन गाणीही होती..  मी आणि गाणं म्हणजे..!!  सुलभांनी मग त्यात नृत्यही समाविष्ट केलं. एक गाणं आपल्या बहिणीकडून गाऊन घेतलं. मी थोडं वजन कमी केलं..आणि ती भूमिका निभावली. नाहीतर ‘मी राजकन्या कशी?’ असा गंड माझ्या मनात होता. पण वेश्येची राणी होण्यापेक्षा हे खूप सोपं होतं. खानोलकरांचे हे नाटक मुक्तछंदामध्ये लिहिलेलं. त्यात तो पुतळा जिवंत होतो अशी कल्पना. सुलभा देशपांडे यांनी हे नाटक फार समर्थपणे दिग्दर्शित केले आणि माझ्याकडून हे सर्व करून घेतलं. मला खूप प्रोत्साहन दिलं.
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ मधलं राजकारण मला समजलं नाही. हे नाटक आम्ही आमची प्रायोगिक नाटय़ संस्था ‘रूपवेध’तर्फे केलं होतं. श्रीरामनेच हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्यांना या नाटकातील राजकारण परिचित होतं. मला मात्र ती भूमिका समजणं आणि गो. पु. देशपांडे यांची भाषा बरीच कठीण गेली. पण भूमिका करताना मात्र नाटकाच्या उभारणीसंबंधी नवा अनुभव आला. या नाटकाचे खूप प्रयोग झाले. महाराष्ट्रात आणि बाहेरही ते खूप लोकप्रिय झाले. याचवेळी ‘रूपवेध’ ची मी सेक्रेटरी झाले.
हा सगळा ७० ते ७५पर्यंतचा काळ.. तेव्हाच आणीबाणीच्या सुमाराला आमचं ‘अँटिगनी’ हे नाटक आलं. ते जाँ अनुईंच्या नाटकाचं रूपांतर आहे. फ्रान्सवर हिटलरचा कब्जा असतानाचा तो काळ.. परंतु नाटक असं होतं की ते क्रिऑनचं वाटेल,अँटिगनीचंही वाटू शकेल. त्यामुळे त्यावर बंदी आली नाही. स्वातंत्र्यासाठीचा मोठा संघर्ष त्यात होता. ते स्वातंत्र्य हवं असणं, त्याची आस मला त्या वेळी तितकीशी समजली नव्हती. मात्र श्रीराम आणि मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं, त्या वेळी मला घरून फारसा पाठिंबा नव्हता. नुसतं नाटकांवर कसं भागणार ही त्या मागची काळजी. या सगळ्याचा विचार केला तेव्हा अँटिगनीची भूमिका खरी सापडली..
‘गाबरे’देखील मला अजिबात समजली नव्हती. ते तर अपयशच होतं. पण त्यातून माणूस शिकत जातो. यातून मला एक नवाच दृष्टिकोन लाभला आणि त्याचे श्रेय दिग्दर्शक श्रीरामला जाते. त्यांनी जे सांगितलं ते असं की, या नाटकातल्या त्या चार भूमिका या चार व्यक्ती नसून या माणसाच्या चार वृत्ती आहेत. बुद्धिवाद, खेळकरपणा, हव्यास आणि सर्जनशीलता.. त्या सतत एकमेकांवर कुरघोडी करत एकमेकांशी भांडत असतात. यातील कोण सर्जनशीलतेच्या अधिक जवळचं आहे.. असं ते भांडण असतं आणि या प्रतिभेला मात्र त्यातील कुणाचीच गरज नसते..
नाटकाकडे कसं बघायचं हे अशा पद्धतीनं कळत-उलगडत गेलं. सुरुवात ‘गिधाडे’ पासूनचीच. तोपर्यंत माझी भूमिका आणि नाटकाची गोष्ट इतकाच विचार माझ्या मनात असायचा, पण त्या वेळीही श्रीरामने त्याचं म्हणणं बोलून दाखवलं, ते विचार करायला लावणारं होतं. समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती असतात, तशीच हिंसा असते. त्याला एक दिशा द्यावी लागते. योग्य दिशा मिळाली नाही तर त्यानेच माणसाची गिधाडं व्हायला वेळ लागत नाही. लचके तोडणारी गिधाडं..अशा स्पष्टीकरणांमधून वेगळा विचार करता येऊ लागला. तेव्हाच शब्दांपलीकडचं काही नाटकासंदर्भात जाणवू लागलं. नाटकासाठी, नटासाठीजसं वाचन महत्त्वाचं, तसंच अनुभवांना सामोरं जाणं, कुठल्याही नटाने आजूबाजूला काय घडतंय याचा सजगपणे अनुभव घ्यायला हवा, सामोरं जायला हवं. निरीक्षण खूप महत्त्वाचं. केव्हा कुठे काय उपयोगाला येईल हे कधीच सांगता येत नाही. ते आपोआप घडतं. आपलं आपल्यालाच चकित करून जातं. संहितेचं वाचन ज्या वेळी होतं, तेव्हा त्या भूमिकेची रूपरेषा तेवढी समोर येते. त्या वेळी कॅरॅक्टर फार जुजबी स्वरूपात असतं. तालमींमध्ये ते आकार घेत जातं, विकसित होत जातं. मग त्यात आपल्या निरीक्षणांची, अनुभवांची जोड मिळते.
‘वाडा चिरेबंदी’ मध्ये सुलभा नसली, तर त्या ८० वर्षांच्या म्हातारीची भूमिका मी करायची. त्या वेळी मी घेतलेली ती विशिष्ट बैठक, मान तिरकी करून मागं पाहणं, हाताची थरथर, बोट वाकडे करणं हे मी थेट आमच्या मोठय़ा आईचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं उचललं होतं. भूमिका साकारताना त्यांची आठवण झाली आणि हे घडत गेलं. श्रीरामलाही ती बैठक पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं.
दुबेच्या ‘लेखकांसाठी’च्या शिबिरात मला औरंगाबादहून आलेला प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी वगैरे मंडळींचा मोठा ग्रुप भेटला. त्यांच्याबरोबर ‘दगड का माती’ हे नाटक केलं आणि त्यातूनच पुढे ‘चारचौघी’साठी विचारलं गेलं.
‘चारचौघी’मधली आईची भूमिका आणि मी यामध्ये एक फारच पुसट रेषा होती. त्यातलं एक वाक्य मात्र मला फार त्रास देत असे. ती जावयाशी ज्या आवाजात बोलते आणि ‘शटअप’ म्हणते, त्या बाबतीत मी चंदूला (चंद्रकांत कुलकर्णी) म्हणत असे. ‘मी ज्या आवाजात बोलते तेही मला पटत नाही. हे असं ‘शट अप’ म्हणणं – जावयाला तेही इथे दाखवलेल्या वातावरणाच्या घरात घडण्याजोगी गोष्ट नाही.’ पण तो म्हणायचा. ‘मी सांगतो म्हणून तुम्ही तसंच चालू ठेवा.’ हळूहळू चंद्रकांत काय सांगू पाहात होता ते विचार करताना माझ्याच लक्षात येत गेलं. लेखक प्रशांत दळवी यांनी इथे माझ्यासाठी लिहिलेली वाक्ये ही फक्त माझ्या जावयाला उद्देशून नाहीत तर समस्त पुरुषवर्गाला, समाजाला तो काही सांगू पाहात आहे. मग त्यातली बरीचशी वाक्ये मी प्रेक्षकांकडे पाहून बोलत असे आणि एका ठरावीक वाक्याला जावयाकडे कटाक्ष टाकी. हे ठीक झालं आणि नाटककार आपल्या पात्रांच्या माध्यमातून आपले म्हणणे व्यक्त करीत असतो, हा शोध लागल्यानं मला स्वत:लाच मोठं समाधान मिळालं. या नाटकाच्या प्रयोगानंतर एकदा एका माणसाचा मला फोन आला होता. ‘माझ्या बायकोवर मी किती अन्याय करतोय हे आता माझ्या लक्षात येतंय.’ नाटक अशा पद्धतीने पोहोचतं, तेव्हा मिळणारं समाधान काही वेगळंच असतं. ‘चारचौघी’मधले कलाकार बदलत गेले. मी आणि वंदना गुप्तेनी नाटक बंद करण्याची विनंती केली. कारण त्यातली सगळी मजाच गेली. याच सुमाराला आम्ही पुण्यात राहायला आलो.
पुण्यात नाटकाचे ग्रुपही फारसे ओळखीचे नव्हते. इथे मला विद्या बाळ भेटल्या. त्यांच्या काही उपक्रमांमधून स्वत: व्यक्त होत असताना मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. आशा साठेबरोबर मी ‘स्वयम्’ हे नाटक आमच्या  ‘रूपवेध’ संस्थेतर्फे केलं. ते नाटक मला खूपच आवडलं. सीमॉन दी बॉव्हाची ती मूळ गोष्ट मी वाचली होती. मुख्य म्हणजे ते काळाशी सुसंगत होते. त्यामुळे हे नाटक करायला प्रेरित झाले. आपल्या नवऱ्याने घराबाहेर एखादं अफेअर केलं म्हणून आपण कोसळून जाण्यात मुळीच अर्थ नाही असा त्याचा विषय. बऱ्याच स्त्रियांनी नाटकानंतर सांगितलं, की यामुळे आमचा दृष्टिकोन बदलला. हे नक्कीच समाधान देणारं होतं. या नाटकामुळे आशा साठेसारखी एक प्रगल्भ विचारांची मैत्रीण मिळाली होती.
‘कहाणी साऱ्या जणीची’ हे मिळून साऱ्याजणी या पुण्यातून निघणाऱ्या मासिकाच्या १० वर्षांच्या प्रवासावर आधारित पुष्पा भावे यांनी लिहिलेलं नाटक. २७ जणींना घेऊन मला हे करायचं होतं. ते कसं पार पडेल याविषयी मनात थोडी शंका होती. नाटकातला प्रत्येक प्रवेश, त्याची सुरुवात-शेवट याचा विचार करताना मेधा पाटकरच्या भागाशी मी अडले होते. घरात ओटय़ापाशी काही काम करताना पाण्यातून एखादी कमळाची कळी वर उमलावी तसं अचानक माझ्या डोळ्यासमोर सगळं उलगडत गेलं. मग ते कामही छान पार पडलं.
माझ्या या अभिनयाच्या कारकिर्दीत मी २ वेळा ३-४ वर्षांची गॅप घेतली. त्यात वेगळं काही करून बघितलं. १९८०च्या सुमारास तन्वीर अगदी लहान असताना आम्ही जागा बदलली. त्याला रुळायला वेळ देणं आवश्यक होतं आणि श्रीरामची नाटकं, शूटिंग त्या वेळी जोरात चालू होतं. परंतु फार काळ घरी बसणंही शक्य नव्हतं. शिकवायला मला खूप आवडतं. ते जमतंही. स्पेशल बीएडचं माझ्यासाठी वेगळंच दालन उघडलं. बांद्रा येथील एसएनडीटी तसं जवळच होतं. सेरा पारेख आणि यशू बेन या उत्तम शिक्षिका तिथे भेटल्या. विशेषत: धारावीमधील पालकांना मूकबधिरांची सांकेतिक भाषा त्या शिकवत असत. त्यांनी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्ससुद्धा आयोजित केली होती. त्यामुळे अपंगांसाठी शिक्षण देण्याचा जागतिक स्तरावरचा भाषेपलीकडचा अनुभव मला मिळाला.
नंतर ‘प्रतिभा विकसन’ या संदर्भातलं ट्रेनिंग मी गणपती दाते आणि आयएसआयएसडी या संस्थेकडून घेतलं. इथे माझं अभिनयाचं कौशल्यही माझ्या कामी येईल हे माझ्या लक्षात आलं. पुढे तेंडुलकरांनी Ford foundation च्या प्रकल्पावर theatre adviser म्हणून घेतलं. तो प्रकल्प होता use of dramatics in education.
पुण्यात आल्यानंतर पुन्हा थिएटरच्या कामात थोडी गॅप पडली. आयुष्यातल्या एका मोठय़ा उलथापालथीनंतर एक आघात पचवून काहीसं शांत आयुष्य जगण्याच्या दृष्टीनं आम्ही इथे आलो..आणि चाणक्य मंडळाच्या कामाकडे मी ओढली गेले. माझं शिकवण्याचं तंत्र, माझे अभिनयातले प्रयोग आणि आजवरच्या प्रवासातून माझ्या अंगी आलेली प्रगल्भता या सगळ्याचा उपयोग मला या कामात आला. त्यामुळेच तनमनाने गुंतून जगण्याला उभारी आली. या तरुण मुलांना, शिक्षकांना अशा वेगळ्या गटांना व्यक्तिमत्त्व विकसनासाठी मदत करीत असताना आपल्याला स्वत:ला खूप काही शिकत असल्याचा आनंद यातून मिळतो. तसेच मुलांचा दृष्टिकोन थोडाफार बदलून त्यांच्या आयुष्यात उभारी मिळते, तसे त्यांचे फोनही येतात. शिक्षकाला सतत सतर्क, प्रयोगशील आणि नव्या नव्या युक्ती वापरून आपलं म्हणणं समोरच्या वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या, गुणवत्तेच्या लोकांपर्यंत पोचवायचं असतं. त्यासाठीही नेहमी ताजंतवानं राहणं आवश्यक ठरतं, हे सातत्याने जाणवतं. ही शिबिरं वर्षांतून एकदाच असतात. शिवाय आता शूटिंगसाठी, नाटकासाठी दीर्घकाळ घराबाहेर राहणं शक्य होत नाही. पुण्यात आल्यावर ‘अवंतिका’ ही मोठी मालिका झाली.
नाटकाच्या सुरुवातीला मनात एक एक्साईटमेंट असते, उत्सुकता असते.. आजचा प्रयोग कसा होईल.. ते काम करण्यासाठी स्फूर्ती देणारं असतं. तसं सिनेमाच्या बाबतीत नसतं. तो पूर्ण झाला म्हणजेच बघण्याची उत्सुकता असते. मागे मी ‘बिनधास्त’, ‘भेट’ असे काही चित्रपट केले. ‘नितळ’ चा विषय, त्याची हाताळणी, कमीत कमी शब्दात व्यक्त होणारी, त्यातली दृष्टिदोष असणारी गोड आजी मला फार आवडली. माझ्या अभिनयाला सर्वसामान्यांची दाद मिळाली, तेव्हाचा आनंद आणि अनुभूती फार वेगळी वाटली मला! या निमित्ताने सुमित्रा भावे, सुनील सुखथनकर यांच्या दिग्दर्शनाचा आनंद लुटता आला. योग्य वेळी योग्य जागी योग्य ती माणसं मला भेटली, त्यामुळेच माझं हे आयुष्य मला मिळालं.
एकूण ३०-३२ नाटकं झाली माझी. नाटकांनी मला खूप शिकवलं. माझ्या भूमिकांनी मला माणूस म्हणून समृद्ध केलं आणि ती समृद्धी पुन्हा भूमिकांना उपयोगी पडत गेली. अशी एक सुंदर देवघेव होती ती!
आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात आपणच लिहिलेली भूमिका आपण करावी अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्यातून एक वेगळी खूप आव्हानात्मक भूमिका सापडली. ‘तन्वीर पुरस्कार’, त्यासाठी उभारलेलं प्रतिष्ठान. याला सतत आर्थिक बळ लागतं. काही काळ काम केल्यानंतर मग आपोआप ‘passive income’ ची काही भर त्या फंडात पडत राहावी ही त्या मागची भूमिका. त्यासाठी मी व्यावसायिक झाले आहे. या खटाटोपात पुन्हा एकदा नवीन काही शिकते-शिकवते आहे.. जगण्यात आनंद आणि समाधानही मिळवणं त्यामुळे सहजसाध्य होईल असं स्वप्न बाळगते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा