एका पुरुषांची तुलना दुसऱ्या पुरुषाशी, तर एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीशी होते; पण अमुक स्त्रीची तुलना तमुक पुरुषाशी होते, असं कमी पाहण्यात आलंय. उलट तसं व्हावं असं मी म्हणेन. त्यामुळे नेमकेपणाने त्यांचं कर्तृत्व समोर येईल, कारण आजच्या स्त्रिया कुठेही कमी नाहीत. कांकणभर श्रेष्ठच आहेत. महिलांचं भविष्य उज्ज्वलच आहे. त्यांच्या यशाचा अश्वमेध रोखणं आता कुणालाही शक्य नाही. सो.. से.. जय.. हो..सांगताहेत, उद्योजिका डॉ. स्वाती पिरामल
स्त्री म्हणजेच तिचं स्त्रीत्व. तेच तिचं सामथ्र्य, कारण निर्मिती ही फक्त स्त्रीकडेच आहे, तिच्या उदरात आहे. स्त्री म्हणून मला कधी वेगळी वागणूक दिलेली मला आठवत नाही. अगदी लहानपणीही नाही. उलट मी अभ्यासात, खेळात किती निपुण आहे, तिच्याकडून शिका काही तरी असंच सांगण्यात येई. मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. त्यासाठी कसून अभ्यास केला. मेरिटमध्येही आले. माझ्या कुटुंबातून माझ्या या निर्णयाचं, अभ्यासू वृत्तीचं स्वागतच झालं. कोडकौतुकाचा वर्षांव हा त्यातला घरगुती भाग सोडला, तर मी स्त्री असल्याने अभ्यासू, चिकित्सक, गंभीर, मेहनती वृत्तीची कास सोडली नाही. स्वत:ला नशीबवान समजत आलेय मी आणि माझी मुलगी नंदिनीदेखील खूप भाग्यशाली समजते स्वत:ला. मी डॉक्टर झाले त्यातही मी योगदान मानते माझ्या जन्मजात स्त्रीत्वाचं, ज्याने माझ्यात अनेक गुण बहाल केलेत.
माझा विवाह उद्योगपती अजय पिरामल यांच्याशी झाला आणि दोन मुलांच्या मातृत्वानंतरच माझ्या करिअरने वेग घेतला. अजय यांनी त्यांच्या फार्मासिटिकल कंपन्यांची खूपशी जबाबदारी माझ्यावर विश्वासाने सोपवली. आम्ही दोघांनी मिल उद्योग बाजूला सारून फार्मा कंपनीत नव्याने, अगदी शून्यातून आरंभ केला. आता तर लेक नंदिनीदेखील याच उद्योगात आलीये. स्त्री आहे म्हणून मी कशात मागे पडतेय असं कधी झालं नाही. मातृत्वही तेवढय़ाच समर्थपणे सांभाळलं आणि कंपनीही सांभाळते आहे.
जे आज कित्येक स्त्रिया करीत आहेत त्यांच्याचसाठी जागतिक महिला दिन केवळ एक दिन साजरा न होता तो दररोज व्हावा. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार, त्यांचे स्वातंत्र्य त्यांना विनासायास मिळायला हवे. ज्या सामान्य हक्कापासून, विशेषत: सुरक्षेचा, महिला वंचित राहतात, ते त्यांना मिळायलाच हवेत. कित्येक भारतीय घरांमध्ये महिलांची विविध कारणांमुळे घुसमट होते, त्यांना सन्मानाने वागवलं जात नाही, त्यांच्यासाठी महिला दिन साजरा व्हावा. नोकरदार महिलांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांची रोजची धावपळ, लोकल गाडय़ांचे प्रश्न, या सगळ्या गदारोळात अनारोग्य. त्यांचे हे दैनंदिन प्रश्न कमी व्हावेत, सोपे व्हावेत यासाठीदेखील महिला दिन साजरा व्हावा. मी डॉक्टर असल्याने महिलांच्या आरोग्यविषयक अडचणी, त्यांचे प्रश्न याबद्दल मी खूप संवेदनशील आहे. महिला दिन साजरा करण्याचं प्रस्थ योग्य कारणांसाठी असावं, इतकंच.
मला नेहमी असं वाटतं. पुरुषांची तुलना दुसऱ्या पुरुषाशी, तर एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीशी होते; पण अमुक स्त्रीची तुलना तमुक पुरुषाशी होते, असं कमी पाहण्यात आलंय. उलट तसं व्हावं असं मी म्हणेन. त्यामुळे नेमकेपणाने त्यांचं कर्तृत्व समोर येईल. माझ्या कंपनीत अनेक स्त्रिया मोठय़ा पदावर आहेत. अतिशय मेहनती, प्रामाणिक, बुद्धिमान आणि कामात वाघ आहेत. सो, आय एम व्हेरी प्राउड ऑफ माय वुमन स्टाफ अँड देअर क्वालिटीज. पुरुष अप्रामाणिक असतात किंवा त्यांचा बुद्धय़ांक कमी असतो, असं म्हणत नाही मी; पण महिला कुठेही कमी नाहीत. कांकणभर श्रेष्ठच आहेत. महिलांचं भविष्य उज्ज्वलच आहे. त्यांच्या यशाचा अश्वमेध रोखणं आता कुणालाही शक्य नाही. सो.. से.. जय.. हो..
Say.. जय.. हो!
एका पुरुषांची तुलना दुसऱ्या पुरुषाशी, तर एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीशी होते; पण अमुक स्त्रीची तुलना तमुक पुरुषाशी होते, असं कमी पाहण्यात आलंय. उलट तसं व्हावं असं मी म्हणेन. त्यामुळे नेमकेपणाने त्यांचं कर्तृत्व समोर येईल, कारण आजच्या स्त्रिया कुठेही कमी नाहीत. कांकणभर श्रेष्ठच आहेत.
आणखी वाचा
First published on: 09-03-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of dr swati piramal