स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे सामथ्र्य- बळ. स्त्रीत्व म्हणजे मातृत्वाचा साक्षात्कार. मी स्त्री असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. महिलांकडे निसर्गत:च स्त्री-सुलभ वृत्ती असल्याने त्या कोमल, दयाळू, वात्सल्यपूर्ण, तरीही खंबीर असतात.
शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य त्यांच्याकडे उपजतच असल्याने पुरुषांपेक्षा स्त्री आपल्या मुलांचं पालनपोषण अधिकाराने आणि म्हणूनच अधिक जबाबदारीने करू शकते. माझ्या दोन्ही मुलींच्या जन्माने मला सार्थकता लाभली. ईशा आणि आहनाचं संगोपन मी स्वत:च केलंय. त्या काळात मातृत्वाचा आनंद भरभरून घेण्यासाठी मी माझी चित्रपट कारकीर्द बाजूला ठेवली होती. ईशाला फुटबॉलची आवड होती, तिने फुटबॉल टीमसाठी शाळेचं नेतृत्वही केलं होतं. फुटबॉलच्या मॅचेस दरम्यानच्या काळात तिने मला म्हटलं, अम्मा जर मी मुलगा असते तर तू मला खेळाडू म्हणून संपूर्ण जगभर कुठेही पाठवलं असतंस ना? छे.. मी उगाचच मुलगी झाले..
मी तेव्हा तिला समजावून सांगितलं, ‘‘ खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठीच नव्हे तर अन्य कुठल्याही कलेसाठी तुला जी मेहनत घ्यायचीये, त्यासाठी किंवा तो खेळ शिकण्यासाठी जगात कुठेही जायचं असेल तर मी मुलगी आहे, मी स्त्री आहे, मी एकटी कशी जाऊ हा विचार मनाला शिवू देऊ नकोस. तुझ्यात हा आत्मविश्वास निर्माण कर. तू लहान आहेस, तोपर्यंत तुझी सोबत मी करेन. मात्र जेव्हा स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल तुझ्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल तेव्हाच मी समजेन तुझ्या पंखांत बळ निर्माण झालं. तू स्त्री आहेस याचा आनंद मान. स्त्री आहेस म्हणून परावलंबित्व पत्करावं लागतंय, असा विचार चुकूनही करू नकोस. डिपेन्डन्स अॅण्ड फीअर इज जस्ट सेट्स ऑफ अवर माइंड, बेटा.’’ त्याच क्षणी तिने मला अम्मा म्हणत मिठी मारली. ईशाला ही जाणीव त्या प्रसंगामुळे झाली ते बरं झालं. ती मुलगी आहे, स्त्री आहे म्हणून बाहेर जाण्याची-फिरण्याची बंदी केली नव्हती मी. ती वयाने लहान असल्याने तिच्या सुरक्षिततेची काळजी मी आई असल्याने वाटत होती, हे तिला त्या वेळी नीट समजले.
समाजात आज या समजून सांगण्याची, समजून घेण्याची गरज आहे. त्याचसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व जागतिकदृष्टय़ा खूपच आहे, पण त्याचा उपयोग जेव्हा महिलांच्या विशेषत: तळागाळातल्या महिलांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी होईल तोच खरा महिला दिन. मध्यमवर्गीय महिला, तळागाळातल्या महिला यांच्यासाठी महिला दिनाचं कोणतं औचित्य आहे? जगभरात महिला दिन थाटामाटात, दिमाखात बऱ्याचदा पंचतारांकित हॉटेलातही साजरा होतो. पण, त्याविषयी सामान्य महिला अनभिज्ञ असतात हेच मला जाणवू लागलंय. तरीही, महिला दिनामुळे एकूणच जाकरूकता वाढलीये हे खरं. या दिनानिमित्ताने स्त्रियांना त्यांच्यासाठी असलेल्या अधिकार, कायद्यांविषयी सविस्तर माहितीदेखील मिळायला हवी, त्या त्यांच्या हक्काविषयी जागृत होतील असंही मला वाटतं.
मैं जब अपने भारतीय समाज में अधिक तर महिलाओं को जब देखती हूँ, मला जाणवतं की आपल्या वेद-पुराणांमध्ये आणि उपनिषदांमधल्या स्त्रिया जास्त परिपूर्ण, स्वयंपूर्ण होत्या.. त्यांना आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार होता. ब्रह्मा-विष्णू-महेश यांसारखे देवदेखील आपापल्या अर्धागिनींच्या सहमतीखेरीज कृती करीत नसत, त्या काळात प्रत्येक पावलापावलावर घरातील पुरुषांना विचारून त्यांची मर्जी राखत जिणं नव्हतं, त्या स्त्रियांचं. तो काळ स्त्री-पुरुष समानतेचा होता. याउलट आजची नारी आपल्या पायांवर उभी आहे, पण तरीही आज सधन-सुसंस्कृत घरातदेखील, घरातल्या स्त्रियांना कसलीही स्वायत्तता नसते. आजही कित्येक घरातलं पान प्रमुख पुरुषांच्या मर्जीशिवाय हलत नाही. अर्थात, घर-घर की कहानी वेगळी असते, असू शकते. पण, महिलांचा कोंडमारा होतोय एवढं नक्की, आजच्या महिला दिनी स्त्री-पुरुष समानता कागदावर नकोय. ती प्रत्यक्षात हवीये. महिलांना भयविरहित जगायचं. त्यासाठी सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था काटेकोर करणं अत्यावश्यक आहे.
तरीही आजच्या स्त्रियांच्या बाबतीत मी आशावादी आहे. आज अनेक जणी प्रचंड प्रतिभासंपन्न, धडपडय़ा, मेहनती आणि तितक्याच कर्तबगार आहेत. अनेक जणी विवाहित असूनही त्यांनी स्वत:चं वैयक्तिक अस्तित्व जपलेलं आहेच. धरमजींशी माझं लग्न हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. कायम राहिला. ते स्वत: प्रसिद्ध अभिनेते आहेत, पण त्यांच्या वलयाचा, नावाचा, कर्तृत्वाचा कधीही फायदा मी करून घेतला नाही. फार भावुक न होता प्रॅक्टिकल राहिले. आनंदात जगले. अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा विवाहदेखील नवाब पतौडी यांच्याशी झाला, पण स्वत:च्या अभिनयाच्या आड त्यांनी कधी संसारदेखील येऊ दिला नाही. तरीही त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी होतं. तर याच्याउलट अभिनेत्री आशा पारेख अविवाहित राहूनही आनंदात आहेत. मुद्दा असा की आजच्याच काय पण, गेल्या दशकातल्या महिलादेखील अतिशय स्वयंपूर्ण होत्या. त्यांचा मार्ग, त्यांचा निर्णय योग्यच होता. हे कसब आहे, शिवधनुष्य आहे, कारण या सगळ्या माझ्यासह उल्लेखलेल्या स्त्रियांनी आपल्या जीवनात करिअर, विवाह, संसार साऱ्यांचा योग्य ताळमेळ घातला. स्वत:चं अस्तित्व – आब राखून जीवनात रंग भरला. जीवनाचे सूर बेसूर न करताही मीही छान जगले. मुलींनाही जगायला शिकवलं. कारण ह्य़ातच अलौकिक आनंद आहे. तेच जीवनगाणं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा