स्त्रीच्या स्त्रीत्वावरच हे विश्व चाललंय, यावर माझा ठाम विश्वास आहे. माणसात देवत्व घडवण्याची कला, ती आंतरिक शक्ती फक्त स्त्रीमध्येच असते. त्यातूनच अनेक आयुष्य घडत असतात. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत, वैयक्तिक जीवनात असे अनेक प्रसंग घडलेत, ज्यात माझं स्त्रीत्व पणाला लागलं. मी स्त्री असल्यामुळेच त्या प्रसंगांना, घटनांना अतिशय संवेदनशीलतेने हाताळू शकले, असं मला वाटतं.
मी आयपीएस ऑफिसर असताना तर अशा अनेक घटना घडल्यात. तिहार तुरुंगामध्ये अनेक गंभीर गुन्ह्य़ांची सजा भोगणारे कैदी होते, त्यांच्याशी वागणं सोपं नव्हतंच. तिहार जेलच्या कैद्यांना विपश्यना, प्राणायाम, ध्यानधारणा, योग आचरणात आणण्याआधी ती परवानगी मिळावी म्हणून मी जंग जंग पछाडलं, कारण कैदी असले, त्यांच्या हातून गंभीर अपराध घडले असले, तरी त्यांना जगण्याची पुन्हा संधी मिळावी, त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून विपश्यना, योग, ध्यान वगैरेंचा पाठपुरावा मी केला. त्याचा खूप चांगला परिणामही अनुभवायला मिळाला.
अलीकडेच भ्रष्टाचाराच्या विरोधात दिल्लीत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. जमाव आवरणं अशक्य कोटीतलं होतं, पण जेव्हा जेव्हा मी जमावाला सामोरी गेले, लोकांनी आपला आवाज, आपली तीव्र प्रतिक्रिया, हिंसाचाराविरोधातील नारेबाजी सगळं काही आटोक्यात आणलं. आब-मर्यादा-सन्मान आणि तरीही तिचं स्वत:चं अस्तित्व म्हणजे स्त्री. तिचं स्त्रीत्व. माझ्या एक सशक्त शब्दावर हजारोंचा जमाव शांत होतो, नियंत्रणात येतो. ही शक्ती, हे योगदान मी स्त्री असल्याचं द्योतक आहे.
एक स्त्री म्हणून मी स्वत:ला अतिशय महत्त्वाची मानतेच, कारण मी समाजाचं अर्ध अंग आहे. मी स्वत:ला एक जबाबदार व्यक्ती मानते. ज्या समाजात मी राहते, त्या समाजाच्या काही जबाबदाऱ्या मी पार पाडते, कारण समाज बनतो तो स्त्रियांमुळेच. आपण सगळे म्हणत आलोय ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. तिचं हे अनंत काळाचं मातृत्व तिला अतिशय मायाळू, कनवाळू, संवेदनशील बनवतं. नित्यनियमाने मी ‘वाहे गुरू’चे आभार मानते, ज्याने मला स्त्रीच्या रूपात जन्म दिला. मी स्त्री म्हणून जन्माला आल्याचा मला खरच अभिमान आहे. याच स्त्रीत्वाचं आणखी एक रूप म्हणजे तिचं आई होणं. जेव्हा ती एका नव्या जिवाला जन्म देते, तेव्हा तेव्हा प्रत्येक महिलेचा पुनर्जन्म होतो, असं मी मानते. हे तिचं मातृत्व- स्त्रीत्वच आहे. त्याबरोबरच तिची ताकद वाढवतात ते तिचे कुटुंबीय, तिचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, शुभचिंतक. मलाही वेळोवेळी बळ दिलं ते माझ्या आई-वडिलांनी, माझ्या बहिणीने, सासरच्या माणसांनी.
देशाची पहिली महिला आयपीएस ऑफिसर असा लौकिक मला मिळाला, पण माझं करिअरचं क्षेत्रच पुरुषी असल्याने पुरुष सहकाऱ्यांशी माझी तुलना अपरिहार्य होती. तशी अनेकदा ती केली गेली, पण माझं व्यक्तिगत धोरण असं आहे की, तुलना, टीका-टिपणीसारख्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करायचं. टीकेचं मोहळ तर अनेकदा उठलं माझ्यावर, पण त्यावरही मी शक्यतो प्रतिसाद देणं टाळलंच, कारण तुलना झाली की त्यावर प्रतिक्रिया देणे म्हणजे पुन्हा वाद-प्रत्यवाद यांना उत्तेजन देणे असते. त्याला मी टाळत आले आहे. म्हणूनच आज जी मी आहे, जे माझं आहे ते पूर्णत: माझं आहे.
महिलांना आत्मनिर्भर, स्वावलंबी व्हायचं असेल, तर त्यांनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यातच सुज्ञपणा आहे, जे मी केलं. माझे करिअरचे असो वा वैयक्तिक आयुष्य असो, ते मी वेळोवेळी स्वत: घेतलेत. त्यामुळे माझ्यावर कुणाची सक्ती होऊ शकली नाही. आजची स्त्री अशीच आहे, स्वत:च्या मार्गाने जाणारी. म्हणूनच तिचं समाजातलं, कुटुंबातलं स्थान उंचावतंय.
साहजिकच जागतिक महिला दिनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिनाच्या निमित्ताने किमान महिलाविषयक प्रश्न, समस्या याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित होतं. ‘रोज मरे, त्याला कोण रडे..’ या म्हणीला अनुसरून विचार केल्यास महिलांचे प्रश्न प्रचंड आहेत. त्यांचा पाठपुरावा दैनंदिन होत नाही. किमान महिला दिनी तरी त्याची जाग येते. जग गंभीर होतं. महिलाओं को बहुत सारे अवसरों की आवश्यकता है, क्योंकि बरसों से उनके हाथों से अवसर छिन लिए गए है। महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे प्रश्न काही प्रमाणात धसास लागतील, लागतात. महिलांना सुयोग्य संधी मिळाल्यास त्या संधींचं त्या सोनं करतात, पण त्यातून एकूणच समाजाचं कल्याण होणारेय. फक्त सक्षम स्त्री हीच सक्षम समाजाची निर्मिती करते. म्हणूनच सक्षमीकरणाला भर देणं गरजेचं आहे. महिला म्हणजे अर्धा समाज.. अर्ध जग. अध्र्या जगाचं नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात अर्ध प्रतिनिधित्व मिळायलाच हवं. तिचे हक्क जेव्हा तिला मागून मिळत नाहीत, तेव्हा ते तिला लढून, आवाज बुलंद करून मागावे लागतात. त्यासाठीच केला जातोय महिला दिनाचा अट्टहास. त्यातून भलंच निष्पन्न होतंय. स्त्री आता विविध क्षेत्रांत यशस्वी होतेय.
स्त्रीला स्वत:च्या नजरेतून मात्र तिचं हे यश जाणवायला हवं, तिच्या यश-अपयशाला ती स्वत: जबाबदार हवी. यह तो आगाज है.. भोर हो चूकी है.. आनेवाले समय में उजाला बढता ही जाएगा।
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
भोर हो चूकी है…
आजची स्त्री आत्मनिर्भर आहे. स्वत:च्या मार्गाने जाणारी, स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी. म्हणूनच तिचं समाजातलं, कुटुंबातलं स्थान उंचावतंय. स्त्री-स्वातंत्र्याची पहाट केव्हाच झाली आहे.. भोर हो चूकी है.. आनेवाले समय में उजाला बढता ही जाएगा।..सांगताहेत, माजी आय.पी.एस अधिकारी किरण बेदी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-03-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of kiran bedi