‘‘नकळत सारे घडले’मधला बटुमामा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं एक वेगळंच रसायन आहे. घरात बायका जी कामं करत असतात ती तो अगदी सहज सफाईदार, स्त्रीसुलभ पद्धतीने पार पाडत असतो. हे जे ‘बटुमामा’ला जमलं ते ‘मला’ कसं जमलं? घरातल्या कामांची सवय मला नव्हती, पण नट म्हणून मी निरीक्षणातून या लकबी, हालचाली लक्षात ठेवल्या असाव्यात, शिवाय स्त्रियाच नव्हे, भोवतालची विविध वृत्ती, प्रवृत्तींची माणसे यांचं निरीक्षण करणं हा नटासाठी अभ्यासच असतो. अशा निरीक्षणातून नट घडतो. माझी ही भूमिका अशी ‘नकळत’ सारे घडले नाही तर ‘निरीक्षणा’तून सारे घडले या मुशीतून घडली. ’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या सदरातल्या या शेवटच्या लेखात.
माझं मराठी रंगभूमीशी अभिनेता म्हणून गेली ६३ वर्षांचं नातं आहे. मात्र हा २४ फुटांचा रंगमंच एवढाच त्याचा आवाका आणि त्याची पोकळी आहे, असं मी मानत नाही. तर असीम आकाशाएवढा त्याचा अवकाशपट असतो. अभिनेता अनेक भाषा, भूमिका आणि रूप रंगातल्या भूमिका त्यावर सजीव करतो. गायकाचं सुरेल स्वरांशी जे नातं असतं तशी माझी एकतानता रंगमंचावर नाटकातल्या माझ्या त्या त्या भूमिकेशी जुळून येते. तरी व्यक्तिश: स्वत:ला न विसरता सावधपणे मी फक्त भूमिकेची अभिव्यक्ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, माझ्या मते हा या कलेशी प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे प्रेक्षक त्या वेळी त्या ‘व्यक्ती’ला विसरून नाटकातल्या त्याच्या सुष्ट-दुष्ट भूमिकेशी समरस होतात आणि आनंद घेतात.
या अर्थाने, नाटक म्हणजे प्रेक्षकांना वास्तव अनुभव वाटेल असा आभास निर्माण करण्याची कला आहे. म्हटलेलंच आहे ना,The art of acting lies in the creation of illusion. . मात्र वास्तव आणि आभासाचं योग्य प्रमाण आणि समतोल साधण्याचा सुजाण शहाणपणा नटानं त्या वेळी सावधपणे बाळगायला हवा. माझ्या सावधपणाची ही परीक्षा ‘स्वामी’ या रणजित देसाई लिखित नाटकात रंगमंचावर प्रवेश चालू असतानाच मला द्यावी लागली. प्रसंग असा होता, माधवराव पेशवे (मी) काकांवर म्हणजे राघोबादादांवर अत्यंत चिडलेले आहेत. रागाच्या भरात ते म्हणतात, ‘‘तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर त्याला आम्ही हत्तीच्या पायी दिले असते!’’ त्या वेळी आनंदीबाई येऊन हात जोडून माधवाची विनवणी करत म्हणतात, ‘‘नको रे माधवा. मी भीक मागते रे, पदर पसरते. माझ्या कुंकवाला धक्का लावू नकोस रे, माधवा’’ आणि मी माघार घेतो. पण या दिवशी हे वाक्य बोलणाऱ्या ‘आनंदीबाईं’नी रंगमंचावर प्रवेशच केला नाही. राघोबा तर गप्प राहिले. कारण इथे त्यांना वाक्य नव्हते. मग माझ्यातल्याच सावध अभिनेत्याने काकांना (हजर) जबाब दिला. ‘पण काकाऽऽ, आम्ही काकूंच्या कुंकवाला धक्का लावणार नाही. तेवढे बळ आमच्यात नाही!’’
आनंदीबाईंच्या भूमिकेतील आशालताबाईंची वेळेवर एंट्री न झाल्याने प्रसंगावधान राखून त्यांच्या तोंडचे वाक्य मी बोललो. (खरंतर नटाने पदरची वाक्ये नाटकात घुसवून संवाद बोलणे गैर आहे. अकारण किंवा प्रेक्षकांना खूश करण्यासाठी कुणी ऐनवेळी काही बोलले तर मंचावरील इतर पत्रांचाही गोंधळ उडतो.) आणि या (पेच) पेशवे प्रसंगात ते वाक्य घेण्यानेच आमच्या नाटकाची गाडी पुढे सुरळीत चालू झाली. नाहीतर पेशवाईवर बाका प्रसंग ओढवला असता.
 ‘संकेत मीलनाचा’ या सुरेश खरे लिखित नाटकात मला वेगळीच भूमिका वठवायची होती. या नाटकातला नायक- मी सबंध नाटकभर आपल्या पत्नीशी सतत फोनवरच बोलत असतो. ती पत्नी व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष स्टेजवर कधीच येत नाही. ही माझी व्यक्तिरेखाही त्यामुळे वेगळी आणि आव्हानात्मक ठरते. असा हा अभिनयही अवघडच म्हणायचा. परंतु लेखकानेही त्या परोक्ष संवादामध्ये एकसुरीपणा किंवा कंटाळा येऊ नये म्हणून नाती आणि भावना गुंफल्या आहेत. त्यातून वेगवेगळे ‘संकेत’ मिळतात. उदा. कधी तो पत्नीशी त्या दोघांच्या मुलीबद्दल लाड, कौतुक करण्याच्या भाषेत, स्वरात बोलतो. तर कधी पत्नीशी समजावणीच्या, संयमाच्या सुरात बोलतो. या ‘दूरवाणी’तून संवाद करण्याचे कारण काय, तर हा पत्नीशी संवाद चालू असताना त्याची प्रेयसी त्याच्या समोर बसलेली प्रेक्षकांना दिसत असते. तेव्हाच दुसरीकडे तो तिच्याशी नेत्रसंवाद, चेहऱ्यावरील हावभाव, हाताबोटांचा उपयोग करून ‘बोलत’ असतो. एकाच भूमिकेत, एके जागी बसून फोनबोली आणि मूकाभिनयातून संवादाच्या शैली आणि शक्तीने या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर होतो, त्याला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळते. एकटय़ा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे ५३ प्रयोग हाउसफुल झाले. ‘यासाठी नुसते पाठांतर नाही तर एकाग्रता, बेअरिंग सहजता अशा अभिनयक्षमतेची गरज असते,’ असे या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक सुरेश खरे अजूनही सांगतात.
नटाने स्वत:ला काही विशिष्ट विषयांवरील नाटकं आणि आपल्याला सोप्या, सोयीस्कर वाटणाऱ्या साचेबंद भूमिकेत अडकवून घेऊ नये. एका चाकोरीतल्या या आभिनयामुळे तुमची हमखास लोकप्रिय कलावंताची एक प्रतिमा तयार होते. भरपूर प्रसिद्धी, कौतुक आणि पैसा ही तुमच्या पदरात पडतो. पण नट म्हणून आपला कस, आपली ‘यत्ता’ वाढवायची असेल तर अगदी वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागतं. कारण नट म्हणजे काही कळसूत्री बाहुली नसतो. तो नेमकं काय करतो? नाटककाराने लिहिलेले शब्द आणि दिग्दर्शकाने नेमून दिलेल्या जागांवर उभे राहणे, उठणे, बसणे एवढंच करतो का? नटाने त्या नाटकाचा भूमिकेचा बर्हिरग आणि अंतरंगातून विचार, अभ्यास, निरीक्षणातून शोध घ्यायला हवा तेव्हाच त्याची ती भूमिका आतून खरीखुरी वठते.
अशा प्रकारे दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या नाटकांतून मी अंतर्बाह्य़ वेगवेगळ्या माणसांच्या भूमिका आत्मसात केल्या त्यासाठी वेगवेगळ्या मुशीतून स्वत:ला घडवलं. आवश्यक ते नाटय़तंत्र अमलात आणलं. एक भूमिका होती. शेखर ढवळीकर लिखित नाटक ‘नकळत सारे घडले’मधली ‘बटुमामा’ची. दुसरं नाटक ‘राहू केतू’ ऊर्फ ‘छुपे रुस्तम’ या नाटकात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका. ‘नकळत सारे घडले’मधला बटुमामा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं एक वेगळंच रसायन आहे. तो स्वत: अविवाहित आहे. त्यांच्याकडे त्यांचा एक किशोरवयातला भाचा राहायला येतो, त्याच्यासाठी एक समुपदेशक तिथे येऊ लागते. तिच्या शिकवण्या, सांगण्यातून मामाला भाच्याची वागणूक, त्याची संवेदना हळूहळू उशिरा जाणवते. हे सर्व या भूमिकेत अभिप्रेत आहे. मामाचं आणखी एक रूप म्हणजे या घरात बायका जी कामं करत असतात ती तो अगदी सहज सफाईदार, स्त्रीसुलभ पद्धतीने पार पाडत असतो. हे जे ‘बटुमामा’ला जमलं ते ‘मला’ कसं जमलं? हा प्रश्न कुणालाही पडेल. घरातल्या वस्तू हाताळणं, धुणं, पुसणं, धुणी वाळत घालणं या कामाची सवय मला नव्हती, पण नट म्हणून मी निरीक्षणातून या लकबी, हालचाली लक्षात ठेवल्या असाव्यात, शिवाय स्त्रियाच नव्हे, भोवतालची विविध वृत्ती, प्रवृत्तींची माणसे, त्यांच्या लकबी, सवयी, दिनक्रम, देहबोली यांचं निरीक्षण करणं हा नटासाठी अभ्यासच असतो. अशा निरीक्षणातून नट घडतो. माझी ही भूमिका अशी ‘नकळत’ सारे घडले नाही तर ‘निरीक्षणा’तून सारे घडले या मुशीतून घडली. शांता गोखले यांनी इंग्लिश परीक्षणात या स्त्रीसुलभ लकबीचा उल्लेख केला आहे.
‘राहू केतू’ या नाटकातल्या पोलीस इन्स्पेक्टरने मात्र मला नाटय़कौशल्य, तंत्र, प्रेक्षकांचे नाटकातल्या सुष्टदुष्ट भूमिकेशी समरस होऊन जाणे, स्वत: ‘स्विच ऑन स्विच ऑफ’ हे नटांच्या ओळखीचे तंत्र वापरून नाटकात प्रत्यक्ष भूमिकेतून आत-बाहेर जाणे असे अनुभव  दिले. ‘राहू केतू’ हे नाटक ‘चोर पोलिसा’चं. चोर होता रमेश भाटकर. मी त्याला कुत्र्यासारखा साखळदंडाने बांधून ठेवला होता. आणि माझ्या हातात दारूची बाटली आणि ग्लास! त्याला खिजवत त्याच्याशी संवाद, अर्थात त्याच्यापासून अंतर राखून! पण जिभेवर दारूचा अंमल हळूहळू चढलेला, बोलताना विषेशत: जोडाक्षरी शब्द, बरळल्याप्रमाणे गळपटून चुकतमाकत तोंडातून निघत होते. प्रेक्षक माझ्या या अभिनयाशी समरस झाले होते. पण नंतर त्यांची माझ्याकडे बघत आपापसात काहीबाही कुजबुज सुरू झाली. बहुधा मी खरंच नशेच्या आहारी गेलो आहे. असा त्यांचा समज  होऊ लागल्याची लक्षणं मला दिसू लागली. आणि मी ‘स्विच ऑफ’ करून भूमिकेतून बाहेर पडलो. एक मिनीट रमेशला थांबवून नेहमीच्या नॉर्मल आवाजात प्रेक्षकांशी बोललो. प्रेक्षकांना उद्देशून हातातला ग्लास उंचावून म्हटले, ‘दारू नाही. हा कोक आहे. कोक..! प्रेक्षकांत शांतता पसरली. आणि क्षणभरात पुन्हा नशेबाज इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आवाजात मी रमेशबरोबर संवाद सुरू केला. प्रेक्षक आमचं नाटक आमच्या भूमिकेशी इतके समरस होत असतील तर तो ‘ड्रामा’ मेलोड्रामा’ न होऊ देता आभासाच्या पातळीवर नट आणि प्रेक्षकांना आणून ठेवण्यासाठी हे ‘स्विच ऑन-स्विच ऑफ’चे तंत्र वापरून नाटक पुन्हा रुळावर आणून ठेवले. तरीही एका वृत्तपत्राने कौतुकाने ‘विक्रम गोखले यांचे रंगमंचावर दारू पिऊन थैमान’ असा लेख त्या वेळी लिहिला होता. त्याच नाटकात एकदा वारंवार माझी मिशी गळून पडू लागली. तेव्हा ती उतरवून खिशात घालण्याचा वास्तववादी निर्णय मी स्टेजवर धीटपणे घातला. तसाच याच नाटकाच्या एका प्रयोगात सुरुवातीलाच माझ्या पँटची चेन उघडी राहिल्याचे पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाने सूचित केल्यावर न गोंधळता ‘सॉरी’ म्हणून मी उठून उभा राहिलो- वळलो, चेन ओढली, पुन्हा प्रेक्षकसन्मुख झालो. थँक्यू म्हणालो आणि नाटय़प्रयोग पुढे सुरू केला. प्रसंगावधान, आत्मविश्वास, प्रेक्षकांचा अभिनेत्याच्या कलेवर असलेला विश्वास यातून नटाला हे व्यक्तिमत्त्व मिळतं.
परंतु तरी ही एका नाटकात या दारूच्या प्रसंगातच एकदा माझे वाक्य बोलण्याचे वजन चुकले. त्यातून प्रेक्षकांना चुकीचा संदेश गेला आणि त्यामुळे वाक्याला नको ती प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून आली.. अनपेक्षितपणे त्यांच्याकडून टाळ्या आल्या. हे का घडलं? कसं घडलं? आपलं काय चुकलं? यावर मी खूप विचार केला. त्या एकाच प्रयोगानंतर पुन्हा आपल्याकडून अशी चूक होणार नाही याची सावधगिरी मी बाळगीत आलो. नाटक होते अरविंद औंधे लिखित ‘आणि मकरंद राज्याध्यक्ष’ तुफान दारू प्यायलेल्या नाटकाच्या नायकाच्या तोंडी हे वाक्य होतं, ‘‘अरे जा जा मला काढून टाकताहेत. नाटकातून मला काढून टाकलंत तरी लक्षात ठेवा, दारू पिऊन काम करत असलेल्या आणि कोसळणाऱ्या मकरंद राजाध्यक्षाला पाहण्यासाठीही प्रेक्षक येतात. लोक तिकिटे काढून आजसुद्धा नाटकाला गर्दीच करतात बरं का.’’ या नाटकातल्या वाक्यावरून प्रेक्षकात चुकचुक, हळहळ, दया, करुणेचा हुंकार येईल. या व्यक्तिरेखेबद्दल कीव, घृणा, तिरस्कार प्रेक्षकातून व्यक्त होईल अशी माझी अपेक्षा होती. पण टाळ्यांचा कडकडाट? हे नाटक लिहीत असताना मी नाटककाराला जवळपास सहा र्वष वेगवेगळ्या पद्धतीने ते पुन:पुन्हा लिहावं असा तगादा लावून त्याचा प्रयोग लांबवला होता. यातून कुणा व्यक्तिविशेष कुणाच्या प्रतिमेचा संदेश जाऊ नये अशी सावधगिरी राखायला हवी होती. एका प्रयोगात अनवधानाने माझी वाक्याची फेक चुकली हे खरं.
हिंदीत गायकाच्या बाबतीत, त्याचा गाता गळा त्याच्या ‘दिल और दिमाग के बीच में होता है’ असं म्हटलं जातं. तसा समतोल मी माझ्या नाटकातल्या भूमिका वठवताना सांभाळतो. झोकून देणे आणि हातचे राखून ठेवणे या दोन्हीच्या मध्यावर मी अभिनयाचा तराजू ठेवतो, कुणालाच झुकतं माप देत नाही. त्या समतोलासाठी मी एक पंचाक्षरी सूत्र वापरून स्वत:ला कारण आणि प्रश्न विचारतो ‘का? काय? कुठे? कसे? केव्हा?’ या प्रश्नांच्या प्रामाणिक उत्तरातून मी तारतम्यानं भूमिकेतल्या अभिनयाचं प्रमाण ठरवतो. या अभिनयशैलीतून मी विविध नाटककारांच्या नाटकांमधून भूमिका वठवल्या. त्यापैकी महत्त्वाचं एक म्हणजे तेंडुलकरांचं ‘कमला’. या नाटकात विवाहित पत्नी सरिता आणि विकत घेतलेली कमला या दोन्ही स्त्रियांच्या सारख्याच महत्त्वाच्या भूमिका आहेत. मग पत्रकार जयसिंग जाधव म्हणजे मी दोन स्त्रियांच्या कात्रीत सापडलो आहे का? तर नाही. तसं असतं तर मग ते तेंडुलकरांचं नाटक कसं? त्याचं नाटक भावुकतेत अडकत नाही, ते व्यक्तीपेक्षा त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीवर भाष्य करणारे, प्रसंगी त्यावर घाव घालणारे आहे. नाटककार यात माझी पत्रकाराची भूमिका घडवतात. जयसिंग हा पुरुषप्रधान समाजरचनेचा पुरुषी अहंकारी वृत्तीचा प्रतिनिधी आहे. तो परपीडन विकृतीचा शिकार (सेडिस्ट) आहे. तर मॅसोचिझम वृत्तीने कमला स्त्रियांच्यातल्या दास्य, गुलामगिरीच्या प्रभावाची बळी आहे. पातिव्रत्याच्या पारंपरिक कल्पनांचं विडंबन इथे केलं गेलं आहे. ‘कमला’चे प्रयोग करताना मला प्रयोगशीलतेचं एक वेगळं समाधान मिळत होतं. या भूमिकेसाठी मला त्या वर्षीचा नाटय़दर्पणचा सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. आम्ही ‘कमला’चे अंदाजे एकशे तीस प्रयोग केले आणि महाराष्ट्र ढवळून निघाला. ‘ते आणि आम्ही’ या पुस्तकात मी यावर लेख लिहिलेला आहे. काही चांगल्या नाटकांत भूमिका करताना पुन्हा पुन्हा अंतर्मुख होऊन माझ्यातल्या कलाकाराचा शोध नाटकांनी मला घ्यायला लावला. त्यापैकी एक ‘बॅरिस्टर’ आणि दुसरे खरे लिखित नाटक ‘सरगम’.
‘बॅरिस्टर’ हा माझ्या नाटय़प्रवासातला ‘मैलाचाच’ नव्हे तर ‘मोलाचा’ दगड ठरला. ही भूमिका जयवंत दळवींनी अनेक पैलू पाडून घडवलेली आहे. मनस्वी, हळवा पण मनाने अस्थिर अशी व्यक्तिरेखा मला जिवंत करायची होती. ते घर रूढी परंपरात रुजलेलं. त्यात रुतलेली मावशी आणि राधा. या वातावरणात फुलणारा आणि कोमेजणारा हा जीव. आता ती पात्रं ‘कालबाह्य़’ वाटत असली तरी आजही मी त्या भूमिकेत गेलो तर ती कालबाह्य़ वाटत नाही. आजही त्यातली चिरवेदना माझ्या अलिप्त राहून अभिनय करण्याच्या शैलीमध्ये कशी झिरपते कुणास ठाऊक. ग्लोरिया वेडी झाल्याच्या कल्पनेशी माझं मन काही तन्मय होईना. त्या वेळी मीच विचार करून एक काल्पनिक प्रसंग मनावर कोरला, की माझी बायको अशी झाली असती तर? तो आघात माझ्या आत्म्याशी संवाद करून गेला आणि माझ्या हळव्या जाणिवा जाग्या झाल्या.
‘सरगम’ या नाटकातील भूमिकेने एक वेगळा अभ्यास आणि आभास निर्माण करण्याची कला माझ्यात जागवली. ती म्हणजे प्लेबॅकची. प्लेबॅक देणे आणि घेणे ही एक जिवंत कला आहे, ‘सरगम’ हे रिअ‍ॅलिटी शोमध्ये गाणाऱ्या बालकलाकारांचे नाटक आहे. त्यात माझी भूमिका बुजुर्ग, खानदानी, घरंदाज गायकाची होती. शास्त्रीय गाण्याची बैठक मला सजवायची होती. माझ्यासारख्या न गाणाऱ्या उस्तादाने मग काय करावं? गात नसलो तरी लहापणापासून अगदी उत्तमोत्तम गायकांचं गाणं मन लावून आणि मनापासून ऐकत आलेलो आहे. ते गायक गायिका, ते चेहरे. त्याचे हावभाव, ओठांची हालचाल, गळ्याच्या ताणलेल्या शिरा हे सर्व आठवून गाण्याच्या मैफलीत मी मांडी ठोकली. प्लेबॅक देणारे गायक कलाकार होते संजीव चिमलगी! गायकाचा तो अभास व्यक्त करण्यात मी यशस्वी झालो असं म्हणता येईल. कारण प्रत्यक्ष गानसरस्वती किशोरीताई आमोणकर माझ्या गाण्याचा हा अभिनय खराखुरा समजल्या. त्यांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या अलिप्त अभिनयाची मी ही मोठीच पावती समजतो. कारण रंगभूमीवर प्लेबॅकचा हा पहिलाच आणि एकमेव प्रयोग आहे असं ही खात्रीनं सांगतो.
खूप भूमिका करून झाल्यात. अजूनही करतोच आहे. मात्र अभिनयाचा हा वसा असाच पुढे जायला हवा. आतापर्यंतच्या अनुभवातून नव्या पिढीला सर्वागीण स्वरूपाचे नाटय़ प्रशिक्षण देण्याचे स्कूल मी सध्या चालवतो आहे.
शब्दांकन: डॉ. चारुशीला ओक (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा