एका अप्रसिद्ध शायरने म्हटले आहे,
ज़्ारासा हाथ क्या छुआ तो वो बुरा मान गये वो दिलको छूते रहे
और हमने उफ् तक नहीं किया
हा शायर भलेही अप्रसिद्ध असू दे (कारण तो मीच आहे) पण या शेरमधली भावना मात्र जगप्रसिद्ध आहे. ‘दिलको छूनेवाली’ ही भावना आजवर या मानवी विश्वामध्ये क्रांती करीत आलीय, क्रांती घडवत आलीय. याला प्रेम, प्यार, लव, इश्क, मुहब्बत वगरे वगरे नावांनी आपण ओळखत आहोत. मनाला कुठल्याही वयात भुरळ पाडणाऱ्या व आनंदमय हुरहूर लावणाऱ्या या भावनेमुळे ‘साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण’ होईपर्यंत होणाऱ्या वेदनेच्या जाणिवा त्या संबंधितालाच भोगाव्या लागत असतात. (तरीही उफ्तक न करणारा माझ्यासारखा विरळाच). परंतु याच आनंद-वेदनेवर होणाऱ्या भावनिक आंदोलनांवर जगप्रसिद्ध शेरोशायरी, पोएट्री, कविता, महाकाव्ये, कादंबऱ्या, नाटके जन्माला आली. अशा साहित्यकृती जन्माला घालणारी व ताजमहालासारखी स्मारके निर्माण करणारी ही ‘प्रेम’भावना विश्वव्यापी तर आहेच, पण ती सर्वव्यापीही आहे. कोणीही यातून सुटत नाही हे खरे.
‘इरॉस’विषयी, शृंगारिक प्रेमाविषयी बोलताना सॉक्रेटिसने ‘शृंगारिक प्रेम हा एक ईश्वरनिर्मित वेडेपणा आहे (लव इज गॉडगिफ्टेड मॅडनेस)’ असे सांगितले. प्लॅटोने ‘फ्रिडस’ या त्याच्या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये ‘प्रेमरोगा’च्या लक्षणांचे वर्णन करताना सांगितले आहे की, ‘या स्थितीत ती प्रेमरोगी व्यक्ती आनंद आणि वेदना एकाचवेळी जाणवत असल्याने गोंधळलेली असते. एक प्रकारच्या विचित्र अनुभवाशी ती असहायपणे झगडत असते. त्याची रात्रीची झोप उडते आणि दिवसाही बेचनी असते. परंतु आपले प्रेमपात्र (प्रियकर, प्रेयसी) दिसेल वा भेटेल या नुसत्या कल्पनेनेसुद्धा त्याला त्याची प्रेमऊर्जा चतन्य देत असते.’
अंग गरम होणे, हातापायांची थरथर, झोप न लागणे, भूक नष्ट होणे, अशक्तपणा जाणवणे, हृदयाची धडधड वाढणे अशी शारीरिक आजाराची लक्षणे जरी आढळत असली तरी प्रेमरोगावर वैद्यकीय क्षेत्रात फार कमी संदर्भ आहेत. मात्र प्रसिद्ध प्राचीन रोमन डॉक्टर गॅलेन याने त्याच्या ‘ऑन प्रोग्नॉसिस’ या ग्रंथात, तो ‘इस्ट्रसच्या बायको’च्या ‘निद्रानाश’ आजारावर उपचार करण्यासाठी गेला असताना तिच्या लक्षणांचे वर्णन करताना सांगितले आहे, ‘तिला तिच्या आजारासाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना ती व्यवस्थित उत्तरे देत नसल्याने मला आजाराचे निदान करण्यासाठी काहीच मदत होत नव्हती. पण जेव्हा चौथ्या दिवशी डान्सर प्लायडसचा उल्लेख केला गेला, तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, अंगलक्षणांमधे फरक पडला, नाडीचे ठोके खूपच अनियमित झाले. इतर कुठल्याही डान्सरच्या उल्लेखाने तसे होत नव्हते. माझ्या मते तिचे प्लायडसवर प्रेम जडले होते.’ पाश्चात्त्य इतिहासातील ‘प्रेमरोगा’चे झालेले हे पहिले वैद्यकीय निदान! गॅलेनने शरीरातील रासायनिक असंतुलनामुळे प्रेमरोग होत असतो, असे सांगितले. थोडक्यात ‘प्रेमरोग’ ही एक वैद्यकीय अवस्था आहे.
आणि जगभर सर्व मानवी संस्कृतींमध्ये हा रोग पूर्वापार आढळून आला आहे. किंबहुना मानवाच्या सर्वात प्राचीनतम आजारांपकी हा एक आजार आहे. म्हणूनच म्हटले आहे,
जिधर देखो उधर इश्क़के बीमार बठे हैं
हज़ारों मर चुके हैं संक़डो तयार बठे हैं
‘प्रेमरोगा’चा उगम हा कामभावनेतून होत असल्याने व उत्तेजित कामभावना ही कुणालाही वेड लावणारी असल्यानेच शृंगारिक प्रेम हा वेडेपणा ठरला आहे. आणि ती निसर्गनिर्मित असल्याने कोणीही यातून मुक्त होत नाही. आधुनिक वैद्यकीय संशोधकांच्या अभ्यासातून कामभावाचा उगम हा मेंदूतील प्रेरणा भागांशी, हायपोथॅलॅमस, लेफ्ट कॉडेट, राईट ग्लोबस पॅलीडस, राईट इन्शुला या भागांशी, निगडित आहे, तर प्रेमभावाची निर्मिती ही भावनेच्या ‘लिम्बिक’ मेंदूच्या भागांशी (व्हीटीए, कॉडेट, पुटामेन, लेफ्ट मिडल इन्शुला, अँटिरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स) संबंधित आहे.
एखाद्या व्यक्तीची ‘मोहिनी’ पडण्याची कारणे शोधणे पुरुषाच्या बाबतीत अवघड नसतात पण स्त्रीच्या बाबतीत मात्र अनाकलनीय असू शकतात. कारण दोघांच्या मेंदूक्रियेतच निसर्गाने याबद्दल वेगळेपणा आणलेला आहे. पुरुषाला स्त्रीचे रूप, शारीरिक ठेवण यामुळे प्रामुख्याने ओढ निर्माण होते, तर स्त्रीमध्ये पुरुषाच्या शारीरिक गुणांपेक्षा इतर गुणांची भुरळ पडत असते. पुरुषामध्ये असणाऱ्या पुरुषत्वाच्या ‘टेस्टोस्टेरॉन’ हॉर्मोन रसायनाचा प्रभाव तो वयात येताना मेंदूतील ‘मॅमिलरी बॉडी’ भागावर पडत असल्याने तर स्त्रीमध्ये तिचा स्त्रीत्वाचा ‘इस्ट्रोजेन’ हॉर्मोन भावुक करत असल्याने या गोष्टी घडत असतात.
स्त्रीची भावुकता तिला ‘इंटिमसी’ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल असे तिला जाणवते ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळय़ा कारणांनी वाटू शकते, ज्याचे कोणीही अनुमान करू शकत नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक स्त्रीमध्ये ही कारणे वेगवेगळी असल्याने ‘कुठली स्त्री कुठल्या पुरुषाच्या प्रेमात का आणि कशी पडेल’ हे ‘देवो न जानाति कुतो मनुष्य’. म्हणूनच प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व ‘मनोविश्लेषणाचा जनक’ (फादर ऑफ सायको-अॅनॅलिसिस) डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांनी प्रांजळपणे कबूल केले की ‘३० वर्षांच्या स्त्रीमनाच्या माझ्या अभ्यासानंतरही मला एका गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही की, स्त्रीला नेमके काय पाहिजे असते?’ मलाही माझ्या गेल्या ३२ वर्षांच्या व्यावसायिक (व त्याहीपेक्षा जास्त काळ वैयक्तिक) अनुभवातून फ्रॉईड यांच्या या वाक्याला अनुमोदन द्यावेसे वाटते. मला तर असेही वाटते की स्त्रीलासुद्धा स्वतला पुरुषाविषयी तिला भुरळ पाडणाऱ्या कारणांचा पत्ता असेलच असे नाही. तिचे मोहमयी विश्व पुरुषाच्या वेगवेगळय़ा ‘व्यक्तिमत्त्व’ कारणांवर आधारित असल्याने वेळोवेळी वेगवेगळय़ा कारणांनी वेगवेगळय़ा व्यक्तींविषयी तिला ओढ निर्माण होऊ शकते.
या कारणवैविध्यामुळे स्त्रीचे, तर शरीराकर्षणाच्या एकमेव प्रमुख कारणामुळे पुरुषाचे मन हे प्रेमाच्या मोहमयी दुनियेत ‘चंचल’ बनत असते. म्हणून म्हटले जाते की रिलेशनशिपमध्ये स्त्रीची अनेक स्वप्ने असतात, तर पुरुषाचे एकच. एकच स्वप्न असले तरी त्याला ‘प्रेम’ म्हणत त्याच्या ‘स्वप्नपूर्ती’च्या नादात पुरुष अनेकांच्या मागे भरकटत असतो (आणि स्वतची फरफट करून घेत असतो). ‘प्रत्येक पुरुषामध्ये एक विश्वामित्र लपलेला असतो आणि त्याला लुभावणारी मेनका तो शोधत असतो’ असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणून अशा ‘प्रेमळ’ पुरुषांचे, तरुणांचे प्रेम हे अजरामर, कधीही न मरणारे असते, परंतु ते ज्याच्यावर प्रेम करीत असतात त्या व्यक्ती मात्र बदलत राहातात हे खरे. पुरुषाचे प्रेम असे प्रासंगिक असल्याने त्याची प्रवृत्ती ही ‘मिळाली संधी की कर प्रेम’ अशी बनते. म्हणून अशांना ‘संधिसाधू’ म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
एखादी आवडती व्यक्ती पाहिली किंवा पाहिलेली व्यक्ती आवडली की, दृष्टिज्ञान मेंदूभागातून (व्हिज्युअल कॉर्टेक्स) मेंदूगर्भातील व्हीटीए भागाकडे संवेदना जातात. मग व्हीटीए भागात ‘फेनिलएथिलामाईन’ (पीईए) हे मेंदूपेशी उत्तेजक रसायन वाढते. मेंदूपेशींमधील संदेशवहन वेगाने वाढून मेंदूची उत्तेजकता वाढते. प्रेमरोगाची ही तर सुरुवात. पीईएमुळे डोपामिन हे आनंद-रसायन वाढत असते. त्याचा परिणाम हायपोथॅलॅमस, न्युक्लिअस अॅक्युम्बन्स या मेंदूतील आनंदकेंद्रांवर होतो. प्रेमाकर्षण निर्माण होते. न्युक्लिअस अॅक्युम्बन्समधे डोपामिनने निर्माण होणाऱ्या अण्डॉर्फिन रसायनांमुळे स्वर्गानंद वाढतो. तसेच पीईएमुळे नॉरएपिनेफ्रिन रसायनही मेंदूत वाढून अंगकाप, उत्तेजकता, निद्रानाश, भूक मंदावणे हे परिणाम दिसायला लागतात. झाला प्रेमरोग!
डोपामिनमुळे मानसिक संतुलनाचे सेरोटोनिन हे रसायन कमी होते, पण रोमान्सचा हॉर्मोन ऑक्सिटोसिन वाढतो. कमी झालेल्या सेरोटोनिनमुळे वैचारिक संतुलन ढळते व संबंधित व्यक्तीविषयी उन्मादक आकर्षण (ऑब्सेशन) वाढते. ऑक्सिटोसिन हा ममत्व, जिव्हाळा, बॉिण्डग वाढवणारा. जितके ऑक्सिटोसिन जास्त व सेरोटोसिन कमी तितके प्रेम व आकर्षण वाढते. हा ‘ऑब्सेशन’ व ‘मॅडनेस’चा परिणाम साधारणत काही महिने ते एक वर्षांपर्यंत टिकून राहू शकतो, असे विविध संशोधकांना आढळले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पीईए, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन यांसारख्या प्रेम-रसायनांच्या परिणामांना मेंदू सवय करून घेतो व त्याची उत्तेजकता कमी होत जाते. मात्र ऑक्सिटोसिन वाढवण्याच्या रोमँटिक कृतींमुळे नात्यातील जिव्हाळा त्यापुढेही टिकून राहू शकतो व ते प्रेमनाते मजबूत बनू शकते.
सेरोटोनिन हे वैचारिक स्थर्य देणारे, सारासारविचारशक्ती बळकट करणारे मेंदू-रसायन आहे. तेच कमी झाल्याने ‘प्रेमात पडलेल्या व्यक्ती’ची सारासारविचारशक्ती का नष्ट होते व ‘ऑब्सेशन’मुळे प्रेमपात्राच्या विचारांशिवाय दुसरे का काही सुचत नाही हे लक्षात येईल. वास्तवतेचे भान न राहिल्याने आपला प्रियकर (वा प्रेयसी) ही एक आदर्श व परिपूर्ण व्यक्ती असल्याचा साक्षात्कार त्याचमुळे क्षणोक्षणी होत असतो. म्हणूनच प्रेमाला ‘आंधळे’ म्हटले गेले आहे. याच ‘ऑब्सेशन’मुळे प्रिय व्यक्तीची प्रतीक्षा करणेसुद्धा कठीण जात असते. ‘काळवेळ’ याचे भान या ‘क्लाउडी’ मनामुळे जात असते आणि मग अशांना आतुरता वाढल्याने वाटत राहाते,
आप आते नहीं तो वक्त गुजरता क्यूँ नहीं
आप आते हो तो वो ठहरता क्यूँ नहीं
थोडक्यात प्लॅटो किंवा गॅलेनने सांगितलेली ‘प्रेमरोगा’ची सर्व लक्षणे या रासायनिक घडामोडींमुळेच दिसून येतात. जी औषधे सेरोटोनिन वाढवतात (अँटी डिप्रेशन, वीर्यपतन लांबवणारी इ.) यांचा गंभीर तोटा म्हणजे प्रेमात पडलेल्या व्यक्तीमधील प्रेमाकर्षणाची तीव्रता कमी होत जाते किंवा प्रेमात पडण्याचे चान्सेसही कमी होतात.
हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे की प्रेमभंग झाल्यास कमी सेरोटोनिन असल्याने व्यक्तीला ‘डिप्रेशन’ पटकन येत असते. परंतु प्रेमभंग झालेल्या व्यक्तीने एक बाब ध्यानात ठेवली पाहिजे की तिने तर तिच्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीला गमावले असते, पण जिने प्रेमभंग केला आहे त्या व्यक्तीने तर तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती गमावलेली असते. नुकसान कुणाचे?
सृजनासाठी विश्वामध्ये निसर्गाने जो ‘कामभाव’ निर्माण केला त्यातून प्राण्यांमध्ये भिन्निलगी आकर्षण तयार होत असते आणि मानवामध्ये त्यातूनच हा शृंगारिक ‘प्रेमभाव’ही जन्माला येतो. म्हणून कुठलेही विरुद्धिलगी शृंगारिक प्रेम हे निष्काम असूच शकत नाही. प्रेमाविषयी काहीही सांगणे आतापर्यंत कवी, लेखक, तत्त्वज्ञानी इत्यादींचे क्षेत्र मानले गेले होते. परंतु सध्याच्या वाढलेल्या कामसमस्या व प्रसार माध्यमातून कुमार-कुमारींना, युवक-युवतींना होणारी एकतर्फी प्रेमाची व लंगिकतेची अपरिपक्व जाण बघता याविषयी डॉक्टरांनी विशेषत लंगिक-समस्या तज्ज्ञांनी उद्बोधन करणे नितांत आवश्यक आहे.
(प्रेमाला उपमा नाही- भाग २ प्रसिद्धी २५ मे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा