संपदा सोवनी
यशस्वी होण्याचे मापदंड प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यातला सार्वत्रिकरीत्या मान्य होणारा मापदंड म्हणजे सामाजिक स्तरावर मिळालेलं सर्वोच्च पद किंवा सर्वोच्च पुरस्कार! स्त्री-कर्तृत्वाच्या बाबतीतसुद्धा हेच सांगता येईल. प्रामाणिकपणे काम करून मेहनतीनं एकेक पायरी चढत जाणाऱ्या स्त्रीपासून मानाचा पुरस्कार पटकावणारी किंवा एखाद्या देशाच्या सर्वोच्चपदी नियुक्ती झालेली स्त्री, इतका हा परीघ विस्तारलेला आहे. कुणाचं यश कमी, कुणाचं जास्त, हा मुद्दाच नसून स्त्रीनं केलेली वाटचाल हा यांच्यातला समान दुवा म्हणता येईल. या दुव्याला धरून वर्षभरातल्या लक्षवेधी स्त्रियांचा हा परिचय..
प्रत्येक वर्ष संपतं, तसं या वर्षांत काय मिळवलं, काय गमावलं, याचा हिशोब मांडायला सुरुवात होते. फक्त वैयक्तिक पातळीवरच नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये समाज म्हणून, देश म्हणून आणि जग म्हणूनही हाती काय आलं, याचे पडताळे करण्याची हीच ती वेळ. स्त्रीविश्व हे या पडताळय़ाच्या नेहमीच अग्रस्थानी राहिलेलं आहे. अजूनही, व्यक्तिगत स्वरूपातही कित्येक स्त्रियांना केवळ यशाचाच नाही, तर साध्या, आनंददायी जीवनाचाही मार्ग चालायला खूप कष्ट घ्यावे लागतात.
स्त्री असल्यामुळे अनेक गोष्टी मुळापासूनच नाकारल्या जाण्याचा अनुभव अनेक जणींना येत असतो. इतका, की हा अन्याय आहे हेही लक्षात येऊ नये! पण त्याच वेळी, त्याच समाजात खूपशा सकारात्मक गोष्टीसुद्धा घडत असतात. आपल्याला जे मिळालं, जितकं मिळालं, त्यात संघर्ष करत, मेहनत करत अनेक जणी स्वप्नं पाहात असतात. ती पूर्ण करण्यासाठी अडथळय़ांच्या शर्यतीतून का होईना, पण वाटचाल करत असतात. काही जणी शिखरं पादाक्रांत करत असतात. इतर प्रवासिनींना आपल्या वाटचालीतून हुरूप आणि उमेद देत असतात. त्यांचं यश कोणत्याही पातळीवरचं असो, संघर्षांची तीव्रता भलेही कमी-जास्त असो, ‘ती करू शकली, मीही करू शकेन..’ ही भावना पुढच्या ‘ती’ला ताजंतवानं करते. तिचा आत्मविश्वास कोणत्याही कारणानं डगमगत असेल, तर तिला बळ देते. ‘पडलीस तरी हरू नकोस, परत ऊठ, चालायला सुरुवात तर कर.. एक क्षण असा येईलच की तू वेग पकडशील!’ हे शब्द जगरहाटीच्या पार्श्वभूमीवर कुणी तरी सतत मूकपणे आळवत असतं. अशा बातम्या वाचून-ऐकून संघर्षकर्तीच्या कानी तो स्वर पडू लागतो. म्हणूनच सामान्यत: माहीत असल्या, तरी जगभरातल्या काही घटनांची वर्ष सरताना पुन्हा उजळणी करणं महत्त्वाचं!
विश्वातल्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक म्हणजे नोबेल पुरस्कार. विविध क्षेत्रांमधल्या अतुलनीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांच्या घोषणेकडे आणि त्यात स्त्रिया किती आहेत, याकडे जगभराचं लक्ष लागलेलं असतं. या वर्षी, वर्ष संपता संपता या पुरस्कारांच्या यादीतलं एक नाव विशेष कौतुकाचं ठरलं- कॅरोलिन बेटरेझी. रसायनशास्त्राच्या क्षेत्रात केलेल्या अतुल्य कामगिरीसाठी यंदा कॅरोलिन यांना मोर्टेन मेल्डाल आणि के. बॅरी शार्पलेस यांच्यासह विभागून नोबेल पारितोषिक मिळालं. ‘क्लिक केमिस्ट्री’ आणि ‘बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री’ या संकल्पनांचा विकास केल्याबद्दल या तिघांना नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं. ‘आम्ही रसायनशास्त्रातली मंडळी स्वप्नाळू असतो! नवीन रेणूंच्या कल्पना मांडून त्यांना आम्ही सत्य स्वरूप देतो..’ अशा शब्दांत आपलं काम मांडणाऱ्या बेटरेझी संशोधनात काम करणाऱ्या अनेकींसाठी प्रेरणादायी ठरल्या. विज्ञानाकडे असलेला मुली आणि स्त्रियांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत ‘नोबेल’सारख्या मोठय़ा पारितोषिकास पात्र ठरणारं एका स्त्रीचं नवीन काम समोर येतं, तेव्हा त्या क्षेत्राला अधिक झळाळी प्राप्त होऊन त्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते.
सामाजिक वर्तुळात देशातल्या आणि जगभरातल्या राजकारणाकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असतं. राजकारणात स्त्रियांच्या असलेल्या (किंवा अभावानंच असलेल्या) प्रतिनिधित्वाबद्दलही सतत बोललं जातं. या वर्षी भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. सामाजिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही पातळय़ांवर सातत्यानं वंचित राहणाऱ्या आदिवासी समाजातली एक स्त्री याच वर्षी देशाच्या सर्वोच्चपदी- अर्थात राष्ट्रपतीपदी विराजमान झाली- द्रौपदी मुर्मू. मुर्मू या केवळ देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती नाहीत, तर प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्याच महिला राष्ट्रपतीही ठरल्या. नगरसेविका ते राष्ट्रपती असा प्रवास असलेल्या मुर्मू यांची जुलैमध्ये निवड झाल्यानंतर या निवडीचं प्रचंड कौतुक झालं. त्यांनी लहानपणापासून धरलेली शिक्षणाची आस आणि आयुष्यात विविध टप्पे पूर्ण करताना केलेला संघर्ष सर्वाकडून वाखाणला गेला.
जागतिक राजकारणाच्या स्तरावर दोन स्त्रियांनी आपलं लक्ष वेधून घेतलं. त्यातल्या एक- सप्टेंबरमध्ये इटलीला मिळालेल्या पहिल्या स्त्री पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि दुसऱ्या म्हणजे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वीडनच्या हवामान खात्याच्या मंत्री (क्लायमेट मिनिस्टर) झालेल्या रोमिना पोरमोख्तारी. जॉर्जिया मेलोनी यांचं नाव दोन कारणांनी चर्चेत आलं होतं. आणखी एका देशाच्या अत्युच्च पदावर स्त्रीची स्थापना झाली याचा आनंद व्यक्त होत होता आणि त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धानंतर अतिउजव्या विचारसरणीचं सरकार इटलीत स्थापन झालं या मुद्दय़ावरून होणारी चर्चा अधिक होती. त्यांच्या येण्यानं स्थानिक स्त्रियांना काय फायदा होईल, अशी शंकाही घेतली जात होती. रोमिना पोरमोख्तारी या स्वीडनमधल्या वयानं सर्वात लहान असलेल्या केंद्रीय मंत्री आहेत; पण त्यांच्या निवडीनंतर व्यक्त होणाऱ्या आनंदाबरोबरही स्वीडनच्या पर्यावरण धोरणाबद्दल होणाऱ्या टीकाटिप्पणीचे बोल होतेच. मात्र या दोन्ही प्रकरणांतला राष्ट्रीय धोरणाचा मुद्दा काही काळ बाजूला जरी ठेवला, तर स्त्रियांनी या उच्च पदांपर्यंत मारलेली मजल हीदेखील दुर्लक्ष करण्याजोगी बाब नाही.
याच्याच थोडं पुढे जात अमेरिकेतल्या मेरिलँड राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अरुणा मिलर यांचंही नाव आवर्जून घ्यावं लागेल. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस काम करत आहेतच. आता मेरिलँड राज्याच्या महत्त्वाच्या पदावर ५८ वर्षांच्या मिलर यांची निवड झाल्यामुळे मूळच्या भारतीय वंशाच्या व्यक्तीनं आणि तेही स्त्रीनं अमेरिकेत मिळवलेलं यश पुन्हा अधोरेखित झालं. अमेरिकेतल्या राज्यांमध्ये गव्हर्नरनंतर दुसरं सर्वोच्च पद लेफ्टनंट गव्हर्नरचं असतं. गव्हर्नरच्या अनुपस्थितीत लेफ्टनंट गव्हर्नर त्यांची भूमिका बजावतात.
सामाजिक स्तरावर व्यावसायिक क्षेत्रात उच्च पदांवर पोहोचणाऱ्या स्त्रियासुद्धा अनेकींसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असतात. हे क्षेत्र अगदी सामान्यांतल्या सामान्य स्त्रीच्याही मनाला स्पर्श करून जातं. कारण नोकरी-व्यवसायात मार्गक्रमण करताना जेव्हा जेव्हा मानसिक उभारीची गरज भासते, तेव्हा माणूस अशा व्यक्तींच्या जागी स्वत:ची कल्पना करून पाहतो. ‘ती करू शकली..’ हा मुद्दा इथे सर्वाधिक लागू पडतो आणि तोच पाठबळ देण्याचं काम करतो.
या वर्षी असं चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअॅप’ची मालकी असणाऱ्या ‘मेटा’च्या ‘इंडिया हेड’ म्हणून नियुक्ती झालेल्या संध्या देवनाथन. येणाऱ्या नवीन वर्षांपासून संध्या देवनाथन ही जबाबदारी निभावणार आहेत. भारतातले मोठे ब्रॅण्ड्स, निर्माते, जाहिरातदार आणि भागीदारांशी धोरणात्मक संबंध दृढ करणं आणि भारतातल्या ‘मेटा’च्या महसुलात वाढ करणं या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. याची एक महत्त्वाची बाजू म्हणजे कंपनीच्या कठीण काळात भारतातल्या व्यवसायाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ते या क्षेत्रातलं एक आव्हानात्मक काम ठरेल.
मनोरंजन क्षेत्रात इंग्लिश चित्रपटांचं विश्व नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. त्यातही ‘अकॅडमी अॅवॉर्डस’चे (ऑस्कर) वेध तमाम चित्रपटप्रेमींना लागलेले असतात. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या ऑस्कर सोहळय़ानंतर अरिआना डी-बोस ही अभिनेत्री चर्चेत होती. ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटातल्या ‘अनिता’ या व्यक्तिरेखेसाठी अरिआनाला या वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. तिचं कौतुक झालं, कारण ती हा पुरस्कार मिळवणारी पहिली कृष्णवर्णीय-लॅटिन (अॅफ्रो-लॅटिना) आणि ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाचा भाग असलेली अभिनेत्री आहे. ‘‘स्वत:ची ओळख काय आहे, याबद्दल ज्यांना कुणाला प्रश्न भेडसावत असतील, त्या सर्वाना मी खात्रीनं सांगते, की आपल्यासाठीही इथे एक स्थान आहे!’’ हे तिचे शब्द अनेक जणींना अतिशय स्फूर्तिदायक वाटून गेले. अर्थातच तिच्याबरोबर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारी जेसिका चॅस्टेन हीसुद्धा चर्चेत आली.
‘द आईज ऑफ टॅमी फे’ या चित्रपटात जेसिकानं टॅमी फे-मेसनर या धर्मोपदेशक स्त्रीची भूमिका साकारली होती. या दोघींची नावं घेतल्यानंतर यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या जेन कॅम्पियनचं नाव घ्यावंच लागेल. यंदा ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळवलेल्या जेन हिचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार पटकावणारी ती तिसरीच दिग्दर्शिका आहे. यापूर्वी कॅथरीन बिगेलो हिला २०१० मध्ये आणि क्लोई झाओ हिला २०२१ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात जगातली अनेक सत्तांतरं आणि स्थित्यंतरं यांच्या साक्षीदार झालेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचं निधन (सप्टेंबर २०२२) हीदेखील या वर्षांतली मोठी घटना. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. २० ‘ऑिलपिक’च्या साक्षीदार आणि १५ ब्रिटिश पंतप्रधान, १४ अमेरिकी अध्यक्ष पाहिलेली व्यक्ती असा त्यांचा उल्लेख होत असतो. राणी एलिझाबेथ यांनी आपल्या ९६ वर्षांच्या आयुष्यात सत्तरहून अधिक वर्ष ब्रिटन, काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटिश वसाहतींचं राष्ट्रप्रमुखपद सांभाळलं. वैयक्तिक आयुष्यात आलेले संघर्षांचे प्रसंग, दु:खद घटना यांचं प्रदर्शन जनतेसमोर न मांडता शांतपणे, स्थितप्रज्ञतेनं आणि संवेदनशीलतेनं आपली जबाबदारी निभावणारी राणी असा त्यांचा गौरव आणि त्यांच्या निधनाचा शोकही या घटनेनंतर सार्वत्रिकरीत्या व्यक्त झाला.
सप्टेंबरमध्येच माहसा अमिनी या तरुणीचा इराणमधल्या नैतिकता रक्षक पोलिसांकडून झालेल्या चौकशीदरम्यानचा मृत्यू आणि त्यानंतर केवळ तिथेच नाही, तर जगात ठिकठिकाणी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात सुरू झालेल्या आंदोलनाची पडलेली ठिणगी, यांचंही हेच वर्ष. समाजमाध्यमांमुळे या आंदोलनाला आणखी वाचा मिळाली आणि स्त्रियांना अत्यंत गरजेचे असे कोणते हक्क वाटतात, या मुद्दय़ावर जगभरातल्या स्त्रिया हक्कानं मतं मांडू लागल्या. स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पनेची आपली अशी मांडणी करायला सरसावू लागल्या. याशिवाय सर्वानाच धक्कादायक घटना म्हणजे तालिबानचा अफगाणिस्तानमधल्या मुलींना विद्यापीठाच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय. जगभरातून याविरोधात सूर उमटले असल्यानं याविषयी काही सकारात्मक लवकर ऐकायला मिळो, हेच या वर्षांला निरोप देताना वाटतं.
जीवनाच्या विविध आयामांमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी कायमच पूर्ण क्षमतेनं रिंगणात उतरणाऱ्या स्त्रिया बातम्यांच्या मथळय़ांमध्ये आपलं स्थान हक्कानं स्थापित करतच होत्या. सांस्कृतिक क्षेत्रापासून क्रीडाप्रकारांपर्यंत आणि साहित्यापासून व्यवसाय क्षेत्रापर्यंत कोणतंही क्षेत्र कधीच स्त्रियांसाठी अपवाद नव्हतं. संख्या कमी असली म्हणून काय झालं, असा सवाल करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये स्त्रिया पाय रोवून उभ्या राहातच होत्या आणि आपल्या उदाहरणानं इतर जणींसाठी वाट निर्माण करून देत होत्या.
यातल्या लोकप्रिय क्षेत्रांमध्ये क्रिकेट हे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. यंदाच्या वर्षी भारताच्या स्त्री क्रिकेटपटूंनी मैदानावर दाखवलेल्या लक्षवेधी कामगिरीचा उल्लेख करायलाच हवा. भारतीय संघाची विक्रमी गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर, ‘स्त्रियांचं क्रिकेट आणि पुरुषांचं क्रिकेट अशी तुलना केलेली मला आवडत नाही. या दोन्ही वेगळय़ा गोष्टी आहेत,’ अशी भूमिका मांडणारी धावपटू स्मृती मानधना या क्रिकेटप्रेमींच्या कौतुकास पात्र ठरल्या. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, गोलंदाज दीप्ती शर्मा यासुद्धा या वर्षी आपल्या खेळामुळे चर्चेत राहिल्या होत्या.
नुकतीच ‘नेट’कऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली आणखी एक स्त्री म्हणजे सरगम कौशल. सरगम हिनं तब्बल २१ वर्षांनी भारताला ‘मिसेस वल्र्ड’ हा मुकुट जिंकून दिला. यापूर्वी आदिती गोवित्रीकर २००१ मध्ये मिसेस वल्र्ड ठरली होती. लग्नानंतर स्त्रीचा फॅशन, सौंदर्य, फिटनेस या गोष्टींची संबंध संपतो, या समजाला छेद देणारी ही आगळीवेगळी स्पर्धा लक्ष वेधून घेणारी ठरते.
ही सगळी केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. विषय आणि क्षेत्रं जशी खूप आहेत, तशीच त्यात घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची संख्याही निश्चितपणे अधिक आहे आणि ती वाढतेही आहे. स्त्री शिक्षित झाल्यावर सामाजिक स्तरावर अनेक बदल व्हायला सुरुवात झाली आणि ‘केवळ स्त्रियांसाठीच’ किंवा ‘केवळ पुरुषांसाठीच’ अशी लेबलं असलेले अनेक जुने संकेत हळूहळू मोडीत निघू लागले. आता स्त्री केवळ शिक्षित होण्याच्या आणखी बरीच पावलं पुढे आली आहे. ‘पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून’ वगैरे गुळगुळीत संबोधनं मागे टाकत कर्तृत्वाच्या बाबतीत एका िलगनिरपेक्ष प्रतलावर सगळय़ांनी यावं आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवावं, असा ठाम आग्रह आता अनेक स्त्रिया धरू लागल्या आहेत. त्याच वेळी आपल्या स्त्रीत्वाचा सार्थ अभिमानही स्त्रीला आहे. एखादी स्त्री कोणत्याही क्षेत्रात उच्चपदी पोहोचते, तेव्हा तिच्याकडे पाहणाऱ्या हजारो, लाखो स्त्रियांना कार्यप्रवण व्हायची प्रेरणा मिळत असते. वर्ष संपताना आपापल्या कार्यात गतिशील व्हायचा हुरूप घेण्यासाठी तरी या यशस्वी स्त्रियांची उदाहरणं आपल्याला निश्चितपणे प्रेरणादायी ठरतील!
चतुरंग
कलावंतांचे आनंद पर्यटन नामवंतांचा प्रवासातल्या आठवणींचा कोलाज.
सई परांजपे रामदास भटकळ
अरुण खोपकर भारत सासणे
अतुल पेठे अनंत सामंत
रामदास फुटाणे संजय मोने
सचिन कुंडलकर आशुतोष जावडेकर प्रियदर्शनी कर्वे आणि इतर मान्यवर.
पाहायलाच हवेत स्त्रीकेंद्री चित्रपटांचा आस्वाद
चित्रा पालेकर अमृता सुभाष
सोनाली कुलकर्णी मीना कर्णिक
दीपा देशमुख आणि इतर मान्यवर.
सूर संवाद
शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांचा ‘सांगीतिक प्रवास’
ग्रासरूट फेमिनिझम
तळागावांतल्या मानल्या गेलेल्या शहरी, ग्रामीण स्त्रीनेतृत्वाचे बदलते आयाम.
सायक्रोस्कोप
आव्हानं झेलणारी तरुणाई -डॉ.अंजली जोशी
देहभान
लैंगिकतेचे समज-गैरसमज – निरंजन मेढेकर.
‘शोध आठवणीतल्या चवींचा!’
विस्मृतीत गेलेल्या पदार्थाच्या शोधाचा प्रवास शिल्पा परांडेकर. याशिवाय वाचकांसाठी खास सदरे,
‘.. आणि मी शिकलो’ आणि ‘मला घडवणारे शिक्षक’.
वाचनीय, चिंतनीय आणि आनंददायी
wsampada.sovani@esxpressindia.com