शिल्पा परांडेकर
‘खाद्यसंस्कृती म्हणजे काही नुसत्या पदार्थाच्या कृती नव्हेत! आजूबाजूचं वातावरण, त्या वातावरणाचं म्हणून तयार झालेलं व्यक्तिमत्त्व, परंपरेनं चालत आलेलं आणि मातीच्या कणाकणात सामावलेलं साहित्य-कला आणि मुख्य म्हणजे पदार्थ बनवणारे हात, या सगळय़ा गोष्टींचा संगम होऊन खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रत्यय घेताना मला कांदा-लसणाचं तिखट, डांगर, उडदाचं घुटं, म्हाद्या, असे चविष्ट पदार्थ नव्यानं भेटले..’
‘जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला।
जयानें सदा वास नामांत केला।।
जयाच्या मुखीं सर्वदा नामकीर्ति।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति।।’
असा नित्यपाठ म्हणत रोज पहाटे आजूबाजूच्या गावातल्या स्त्रिया एकत्र येऊन भाजी निवडण्याचं आणि चिरण्याचं काम करतात. हे असं ठिकाण आहे, जिथे दररोज हजारो लोक अनेक वर्षांपासून प्रसाद घेण्यासाठी येतात; तरीदेखील एकदाही अन्नाची नासाडी होत नाही. आणि याचं सर्व नियोजन एक ऐंशी वर्षांचे आजोबा करायचे, तेही संगणकाच्या मदतीशिवाय! हे पावन ठिकाण म्हणजे ‘श्री क्षेत्र गोंदवले’.
मी गोंदवल्यात दोन दिवस थांबले होते. महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्री अन्नछत्रांच्या माध्यमातून भक्तांना, गरजूंना अन्नदान करण्याची परंपरा जुनी आहे. अन्नछत्र आणि त्यांची खाद्यपरंपरा, व्यवस्थापन हेदेखील आपल्या खाद्यसंस्कृतीतलं एक महत्त्वाचं अंग आहे, असं मला वाटतं. त्यामुळे याचा अभ्यास नाही केला, तर खाद्यसंस्कृतीचा अभ्यास अपूर्णच राहील.
गोंदवल्यातली लहानपणीची एक पुसटशी आठवण मनात होती. तिथला परिसरही पुसटसा आठवत होता. आम्ही लहानपणी कोणत्या तरी सहलीतून इथे आलो होतो. स्त्री-पुरुषांच्या अनेक पंक्ती जेवायला बसल्या होत्या. अचानक तिथले एक गृहस्थ माझ्यापाशी आले आणि मला त्यांनी सर्वाना ताक वाढण्याची विनंती केली. इतक्या गर्दीतून त्या व्यक्तीनं मलाच का सांगावं, याचं आश्चर्य मला नंतर कायम वाटत राहिलं.. ती व्यक्ती अजूनही असेल का इथे? दर्शन वगैरे घेऊन हे सर्व आठवत, माझ्याच विचारांत मी आजूबाजूच्या परिसरात फिरत होते. एका दरवाजाच्या फटीतून आत रंगीत सुपं (धान्य पाखडण्यासाठी पूर्वी बांबूच्या वेताचं सूप वापरलं जायचं. आजकाल प्लास्टिकमध्ये मिळतात. मात्र आयतं निवडलेलं धान्य मिळू लागल्यापासून सुपाचा वापरसुद्धा दुर्मीळच झाला आहे.) एका रांगेत मांडून ठेवलेली दिसली. प्रत्येक सुपासमोर एक विळीदेखील होती. आपसूकच उत्सुकतेनं डोकावून पाहिलं, तर तिथे कुणी नव्हतं. तिथल्या एका सेवकांकडे चौकशी केली, त्यांनी एका माणसाकडे बोट केलं. मी त्यांच्याकडे गेले आणि आश्चर्य! ती तीच माझ्या लहानपणी मला पंक्तीत ताक वाढायला सांगणारी व्यक्ती होती. मी प्रथम मला जी माहिती हवी होती त्याविषयी विचारणा केली आणि मग सहज त्यांना तो लहानपणीचा प्रसंगही सांगितला.
ते सांगत होते, ‘‘दररोज अनेक लोक इथला प्रसाद ग्रहण करतात आणि याची तयारी पहाटेपासूनच होते. आजूबाजूच्या, गावातल्या स्त्रिया पहाटे इथे येतात. नित्यपाठ म्हणत भाजी निवडणं, चिरणं अशी सेवा त्या गेले अनेक वर्षांपासून देत आहेत.’’ या ठिकाणी खरं तर इतर कुणाला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. परंतु ‘तुझी निष्ठा पाहता तुला हे पाहण्याची परवानगी मिळवून देतो,’ असं म्हणत त्यांनी मदतीचा हात पुढे केला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच मी तिथे पोहोचले. कालच्याप्रमाणेच स्वच्छ अशी लाल-पिवळय़ा रंगांची सुपं आणि विळय़ा एका रांगेत मांडून ठेवलं होतं. जवळच भाज्या मांडून ठेवल्या होत्या. एक एक स्त्री येत होती आणि कुणाशीही न बोलता आपल्या जागेवर जाऊन नित्यपाठ म्हणत कामात तल्लीन होत होती. एकाच वेळी इतक्या स्त्रिया एकत्र असूनही त्या गप्पा-गोष्टी करत नव्हत्या.
गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाबाबत खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. ‘नामस्मरणानं वृत्ती स्थिर होते. मन शांत, समाधानी आणि एकाग्र होतं. नामाला स्वत:ची अशी चव नाही.. त्यात आपणच आपली गोडी घालून ते घेतलं पाहिजे.’ मला नेहमी असं वाटतं, की आपली खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ पदार्थाचा संग्रह नाही. त्यात परंपरांबरोबर भक्ती, अध्यात्म, कला, सर्जनशीलता यांचा सुरेख संगम आहे. दळण-कांडण, नांगरणी-पेरणी किंवा लग्न-पाठवणी, मुंज, बारसं, असे कितीतरी मानवी जीवनातले प्रसंग आहेत, ज्यात गाणी, ओव्या, भक्तिगीतं, अभंग, भारूड, कृषीगीतं गायली जायची. अजूनही अनेक ठिकाणी जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता’सारखी प्रार्थना म्हणूनच जेवणास सुरुवात केली जाते. अन्नछत्र, एखाद्या पूजेचं जेवण असो किंवा आजीच्या हातचं सुग्रास जेवण असो, त्याची चव अगदी छानच असते, असं लक्षात येतं. कदाचित याचं कारण म्हणजे कंठातला भक्तीभाव त्या जेवणात उतरलेला असावा!
डोंगराच्या कुशीतलं गाव. अनेकदा ऐकलेलं, वाचलेलं असतं, मात्र पाहण्यात क्वचितच येतं. महाबळेश्वरजवळचं हे गाव म्हणजे शिंदेवाडी. मी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाचं- उमेशचं हेच गाव होतं. ‘‘तुम्ही इतका प्रवास करत आहात, लिहीत आहात, तर आमच्या गावाकडे पण यायला आवडेल का?’’ त्याच्या इतक्या गोड विनंतीला कोण नाही म्हणेल!
उमेशच्या घरी तो आणि त्याचा भाऊ असतो. आई नसल्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच. मी त्याच्या घरी गेले, तेव्हा त्याचं स्वच्छ, सारवलेलं, भिंती लिंपलेल्या, असं सुंदर घर बघून अक्षरश: अवाक् झाले. स्वयंपाकघरातली चूल तर खूपच सुरेख होती. जेवणाचा आग्रह माझ्याच्यानं मोडवला नाही. त्या सुरेख चुलीवर घरच्या इंद्रायणी तांदळाचा केलेला मऊशार भात, घरचं सायीचं घट्ट दही आणि घरीच बनवलेलं कांदा-लसणाचं तिखट. अहाहा! स्वर्गसुख! वाडीमधल्या सर्व आया-आजी-मावश्यांना त्याची विशेष काळजी. काम आणि घर तो खूप आवडीनं सांभाळतो याचं त्यांना खूप कौतुक. इथल्या सगळय़ा आजी नि मावश्या अगदी चुणचुणीत! आदरातिथ्य करण्यात तरबेज. त्यात त्यांच्या लाडक्या उमेशचे पाहुणे, असं म्हणून माझी काकणभर जास्तच बडदास्त ठेवत होत्या त्या.
लाटी वडी, चुटचुटं किंवा म्हाद्या (झुणक्यासारखं तोंडीलावणं), शेंगोळय़ा, माडगं, धपाटे, दिंडं, झुणका, डांगर, आणि उडदाचं घुटं/ घुट्टं हे सातारा जिल्ह्यातले काही खास पदार्थ. उडदाचे बरेच पदार्थ इकडे बनतात. झुणका, डांगर, घुटं, भाकरी, वरण, लाडू, वगैरे. उडदाच घुटं हा प्रकार खूप चविष्ट. मला तर तो प्रसिद्ध ‘दाल मखनी’च्या जवळपासचा वाटतो. अगदी जुजबी सामग्री वापरून बनवलेलं असलं, तरी घुटं चविष्ट आणि पौष्टिक आहे. उडीद प्राचीन काळापासूनच भारतीय खाद्यपरंपरेतला एक मुख्य आहार राहिला आहे. ‘क्षेमकुतूहलम्’ तसंच राजा सोमेश्वर लिखित ‘मानसोल्लास’ ग्रंथांतदेखील उडदापासून बनणाऱ्या पदार्थाचा उल्लेख आहे.
‘माषसूपोऽथ कुल्माष: स्निग्धो वृष्योऽनिलापह:
उष्ण: संतर्पणो बल्य: सुस्वाद्-रुचिकारक:’ (क्षेमकुतूहलम्, विक्रमसंवत् १६०५. सुदशास्त्र)
(अर्थात, उडदाची डाळ ही स्निग्ध, उष्ण गुणाची, धातुवर्धक, तृप्तीकारक, वातनाशक, बलवर्धक, स्वादिष्ट व रुचकर असते.)
गाव टोरफळ. भेटलेल्या सर्व स्त्रिया साठीच्या पुढच्या. ‘‘एखादं जुनं गाणं वगैरे म्हणून दाखवाल का?’’ मी सुरुवात केली. ‘‘नाय बाय. आता नाई व्हत!’’ गुडघेदुखी सुरू झालेल्या स्त्रिया एका सुरात म्हणाल्या. एका बाईंना मात्र हुरूप आला आणि त्यांनी अक्षरश: इतर जणींना हाताला धरून पंचमीचे खेळ खेळून दाखवायला तयार केलं. मग कुठली गुडघेदुखी आणि काय! मला वाटलं, ही गंमत आहे आठवणींचीच. या साऱ्याजणींनी त्यांच्या तरुणपणी नटूनसजून अनेक गाण्यांवर असा फेर धरला असेल. पंचमीला नदीकाठी झोपाळा खेळल्या असतील. जाताना वटय़ातून (पदराच्या ओटीतून) लाह्या, फुटाणे, खोबरं घेऊन मैत्रिणींबरोबर व्यक्त झाल्या असतील. हवा तसा िधगाणाही तेव्हा घातला असेल. पण ‘आता जुनं नाही चालत,’ या विचारांनी जुने पदार्थ, जुनं लोकसंगीत, खेळ, हे दूर गेलं आहे. आता काही जुने पदार्थ ‘गावरान’ अशा संज्ञेखाली त्यामागच्या विचारसरणीशिवाय आपल्यासमोर येतात. सांगण्याचा उद्देश इतकाच, की आपण केवळ ‘रेसिपींचे संग्राहक’ बनू नये, तर आपल्या या ठेव्याची विचारधाराही समजून घ्यावी, असं मला वाटतं. कारण केवळ ‘उदरभरण’ ही आपली संस्कृती नाही. त्यात अजून पुष्कळ काही आहे.
तिथून निघताना माझ्या मुठीत उडदाच्या डांगराची पुरचुंडी कोंबत बायका म्हणाल्या, ‘‘पुन्हा ये. पुन्हा खेळ खेळू!’ आठवणी अशाच असाव्यात. वाहत्या. एका हातातून दुसऱ्या हातात जाणाऱ्या. तेव्हाच हे पदार्थसुद्धा कायम स्मरणात राहतील..
उडदाचं घुटं
साहित्य- सालीची उडदाची डाळ, हिंग, हळद, लसूण-मिरची-जिरे वाटण किंवा खर्डा, मीठ
फोडणी- तेल, जिरे-मोहरी
कृती- डाळ थोडी भाजून घ्या. चिमूटभर हिंग व हळद घालून पाणी घालून शिजवून घ्या. जिरे-मोहरीची फोडणी करून त्यात वाटण घालून परता. डाळ घोटून फोडणीत घाला व चांगली उकळून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
चुटचुटं/ म्हाद्या/ महाद्या
साहित्य- शेंगदाण्याचं कूट, लसूण-मिरचीचं वाटण, कांदा, जिरे-मोहरी, हळद, मीठ, तेल.
कृती- जिरे-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा, लसूण व मिरचीचं वाटण घालून परतून घ्या. शेंगदाण्याचं कूट घालून परता व पाणी घालून शिजवा.
(प्रवासात नेण्यासाठीदेखील हा पदार्थ केला जातो. कांदा नाही घातला, तर चुटचुटं किंवा म्हाद्या सहज सहा-सात दिवस टिकतो. हा पदार्थ कांदा-लसूण तिखट घालून झुणक्याप्रमाणे किंवा मोकळय़ा बेसनाप्रमाणेही (झुणका) करता येतो.)
parandekar.shilpa@gmail.com