घरातल्या मोलकरणीच्या मुलीच्या शिकवण्याचं निमित्त घडलं आणि त्यातून स्फूर्ती मिळाली ती झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याची. मग काही समविचारी मैत्रिणींना एकत्र करून सुरू झाली ‘जागृती सेवा संस्था’. त्यातून हजारो मुलं शिकली. त्यांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं. आज इथे शिकलेली मुलं पुढच्या पिढीसाठी ज्ञानार्जनाचं काम करीत आहेत. ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आजपर्यंत फक्त ‘घेणारे’ हातही हळूहळू ‘देणारे’ होत असल्याचा सुखद अनुभव घेणाऱ्या विंदांच्याच कन्या जयश्री काळे यांचे हे अनुभव..
माझी आई सुमा करंदीकर आणि वडील विंदा करंदीकर, त्या दोघांनाही सामाजिक जाणिवेचं प्रचंड भान होतं म्हणूनच आम्हालाही लहानपणापासून ते होतं. ते दोघंही दोन वेळेला बस बदलून अंधशाळेत शिकवायला जात, कार्यकर्त्यांना, अनेक संस्थांना जमेल तशी मदत करत. मीही मग कॉलेजात असताना सुट्टीत श्रद्धानंद महिलाश्रमातल्या मुलींचा अभ्यास घ्यायला आणि धारावीतल्या आरोग्य केंद्रात मदत करायला जात असे. लग्नानंतर पुण्याला सासरीही वातावरण पोषक होते. सासूबाई प्रभावती आणि सासरे श्री. वा. काळे यांनाही सामाजिक कार्यात रस होता. संसार संभाळून बँक ऑफ बडोदात अधिकारी म्हणून काम करताना जमेल तसे थोडेफार सामाजिक कामे करीत होते; परंतु कामाला निश्चित दिशा मिळाली ती मात्र एका छोटय़ाशा घटनेच्या निमित्ताने.
मी माझ्या दहावीतल्या मुलीला अवघड वाटणारी गणितं समजावून सांगत होते. तेवढय़ात माझी कामवाली तिच्या १३-१४ वर्षांच्या चुणचुणीत मुलीला घेऊन आली आणि म्हणाली, ‘‘हिला दोन घरची कामं बघा, सातवीला नापास झालीय. आता बास झाली शाळा. पुढच्या वर्षी लग्नाचं बघाया घेणार.’’ मला वाईट वाटलं. तिची फी, पुस्तकं, अभ्यास याची सगळी जबाबदारी मी उचलते, असं सांगून बाईला मनवलं. हा प्रयोग यशस्वी झाला. मुलगी चांगल्या मार्कानी दहावी पास झाली तेव्हा हुरूप आला आणि वाटलं वस्तीत अशा अनेक मुली असतील, त्यांच्यापर्यंत आपण का पोहोचू नये? मग अलका साठे, मंगला पाटील, रेखा बिडकर, शीला कर्णिक अशा काही समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन काही ठोस करण्याचा निर्णय घेतला. आम्ही जनवाडी, किष्किधानगर, पांडवनगर, वैदूवाडी, इंदिरानगर या जवळपासच्या वस्त्यांची घराघरांत जाऊन, लोकांशी बोलून रीतसर पाहाणी आणि त्याबद्दलच्या नोंदी केल्या. शहराची समृद्धी मिरवणारे आलिशान मॉल, उंच मनोऱ्यांचे हाऊसिंग कॉम्प्लेक्स, आय.टी. कंपन्या यांच्यामागे दडलेलं, अस्वस्थ करणारं वास्तव समोर आलं. गर्दी करून एकमेकांना चिकटलेल्या अंधाऱ्या, त्यातच पोटमाळा काढलेल्या, छोटय़ा खोल्यांतून कमीत कमी सहा-सात जणांचं कुटुंब राहात होतं. घरांतून टी.व्ही. होते, पण शिक्षण नव्हतं. दारू सहजपणे मिळत होती, पण पाण्यासाठी झगडावं लागत होतं. स्त्रियांच्या नशिबी कायमचे कष्ट, नको इतकी बाळंतपणं, दारुडय़ा नवऱ्याची मारहाण आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची हेळसांड. चांगली गोष्ट म्हणजे जवळपासच्या महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना घातलं जायचं, पण सत्तर-ऐंशी मुलांना अधूनमधून एक शिक्षक! मुलगी नापास व्हायचं निमित्त करून तिचं लवकर लग्न केलं जायचं, त्यामुळे पुन्हा तिच्या नशिबी तेच भोग! हे दुष्टचक्र थांबवायचं तर शाळागळती थांबवून मुलींनी किमान दहावी व्हावं एवढय़ाच उद्देशाने प्रथम वस्तींतूनच पूरक अभ्यासवर्ग सुरू केले. सुरुवातीला लोक साशंक होते. आपण हातातली कामं सोडून धावतपळत शिकवायला जावं तर कोणी मुलंच आलेली नसायची. मात्र आमच्या चिकाटीची फळं हळूहळू दिसू लागली. मुली दहावी पास होऊ लागल्या. पालकांचं सहकार्य वाढलं. ‘‘आमच्या उनाडक्या करणाऱ्या मुलांनापण शिकवा,’’ असा आग्रह होऊ लागला. शाळा सोडलेली ही मुलं समाजकंटक हाताशी धरत. तेव्हा त्यांनाही समजावून सामील करून घेतलं. संख्या वाढू लागली, तेव्हा बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन १९९७ साली ‘जागृती सेवा संस्था’ या नावाने संस्थेची रीतसर नोंदणी केली. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विश्वस्त मंडळी – सी.ए. मेडदकर, कर्नल पवन नायर, विश्वास काळे, उषा मेडदकर, रूपा मुळगुंद यांचे मार्गदर्शन मिळू लागले.
वस्तीचा अधिक जवळून परिचय होऊ लागला तेव्हा लक्षात आलं की, अशीही बरीच मुलं आहेत ज्यांना शाळेत कधी घातलेलंच नाहीये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मुलांचे जन्मदाखले नाहीत. घरीच गावाकडे बाळंतपणं झालेल्या आयांना जन्माची निश्चित तारीख सांगता येत नाही. त्यामुळे ही मुलं मुख्य शिक्षणप्रवाहापासून कायमची दूर गेलेली. बालवयातच या मुलांना एकत्र आणण्यासाठी प्रथम वस्तीतच बालवाडय़ा सुरू केल्या. त्यांना सिव्हिल सर्जनकडे नेऊन त्यांचे जन्मदाखले काढून आणले. सुरुवातीला वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या जवळपासच्या प्रथितयश शाळा आज ‘जागृती’च्या मुलांना आग्रहानं बोलावताहेत. अनुभवी, बालशिक्षणाची मनापासून तळमळ असणाऱ्या शामा आंबेडकर आणि प्रीता पाठक या शिक्षिका मुलांना आनंददायी वैविध्यपूर्ण शिक्षण मिळावं म्हणून झटत असतात. बालवाडीपासून ते बारावीपर्यंत दरवर्षी पाचशेच्या वर मुलं ‘जागृती’च्या वर्गातून शिकत असतात.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या निकोप, सुसंस्कारित वाढीसाठी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, लंगिक समस्या, मुलामुलींची मत्री यांसारख्या अनेक विषयांवर चर्चासत्रं, व्याख्यानं घेऊ लागलो. वाचनालय सुरू झालं. मुलांना रोजचा पौष्टिक नाश्ता, वैद्यकीय तपासण्या आणि लसीकरण यामुळे मुलांचं आरोग्य सुधारू लागलं. खेळ आणि सहलींतही मुलं उत्साहात भाग घेऊ लागली. अभ्यास घेताना काही अतिशय बुद्धिमान मुलं समोर आली. ‘जागृती’तून त्यांना उच्चशिक्षणासाठी सर्वतोपरी मदत होत असते. ‘जागृती’तून शिकलेली, पुढे गेलेली अनेक मुलं आहेत, पण काहींच्या आठवणी मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. प्राजक्ता ही त्यापैकीच एक. प्राजक्तानं गणितात पकीच्या पकी मार्क मिळवून हट्टानं इंजिनीअिरगला प्रवेश घेतला, पण दोन-तीन महिन्यांनी रडत-रडत कॉलेज सोडते म्हणायला लागली. चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या वडिलांनी तिला घेऊन दिलेली ९०० रुपयांची वह्य़ा-पुस्तकं ५० रुपयांच्या दारूच्या बाटलीसाठी रद्दीवाल्याला विकली! भरीत भर म्हणून शेजारी दिवसभर मोठय़ांदा टी.व्ही. लावून ठेवत. कसा होणार अभ्यास.. या भीतीनं पोर घाबरून गेली. मग तातडीनं आम्ही तिच्यासाठी योग्य निवासाची सोय केली. ही मुलगीही जिद्दीनं अभ्यास करून पहिल्या वर्गात उत्तीर्ण होत इंजिनीअर झाली. नोकरीला लागल्यावर आपला पहिला पगार स्वेच्छेने ‘जागृती’ला दिला आणि संध्याकाळच्या अभ्यासवर्गात येऊन मुलांना गणित शिकवू लागली. या मुलीनं आम्हाला नवीन उमेद दिली आणि तिच्यासारख्या चाळीस मुलींची पूर्ण काळजी घेणारं निवासगृह उभं राहिलं. आज ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलीही त्यामुळे आपलं उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करू शकत आहेत.
झोपडपट्टी, चाळी, टेकडय़ा अशा समाजातील निम्नस्तरातील मुलांसाठी शाळा चालवण्याचं शिवधनुष्य पेलताना नवनवीन प्रश्न समोर येत होते आणि त्यांची उत्तरं शोधताना ‘जागृती’चं काम अनेक अंगांनी वाढत होतं, पण सगळ्याच समस्यांना नेहमीच उत्तरं मिळतात, असं नाही. तसंच मिळालेली उत्तरं आपलं समाधान करू शकतात, असंही नाही. नववीत शिकणारी हुशार आशा एकाएकी येईनाशी झाली म्हणून काही दिवस तिची वाट पाहिली. मग तिच्या घराचा पत्ता शोधून तिच्या घरी गेलो. परोपरीनं आईला समजावलं, पण आई काही बोलेना. शेवटी जरा दरडावून बोललो तसा त्या माऊलीला बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. म्हणाली, ‘‘मी कामावर गेले की सकाळच्यानं आशा येकटीच घरात असते. बाप लई पितो अन पोटच्या पोरीशीबी काईबाई वागतो. काय तरी इपरीत व्हायच्या आत गावाकडचा चांगला मुलगा पायला न त्याच्याशी लगीन लावून दिलं.’’ हे ऐकून आम्हाला अक्षरश: पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. अशा वेळी हतबल व्हायला होतं आणि आपल्या मर्यादाही जाणवतात.
मुलं दहावी पास होऊ लागली, पण बऱ्याचशा मुलामुलींना उच्च शिक्षणाचा अभ्यास झेपणारा नसतो. तेवढी बौद्धिक कुवत त्यांच्याकडे नसते. अशा वेळी त्यांना उपजीविकेसाठी काही व्यवसाय कौशल्य आत्मसात करून देऊन त्यांना पायावर उभं करावं, असं वाटलं. म्हणून ‘वनस्थळी’च्या सहभागाने एक प्रकल्प सुरू केला. यामध्ये बालवाडी शिक्षिका आणि नर्स-एड (दायी) प्रशिक्षण वर्ग सुरू केले. कमी शिकलेल्या मुलीदेखील हे कोर्स करून कमावत्या झाल्या. न्यूनगंडाची भावना दूर होऊन एक नवाच आत्मविश्वास आणि समज त्यांच्यात निर्माण झाली. शिवणकाम- फॅशन डिझायिनगचे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक जणी घरबसल्या आपल्या मशीनवर शिवणकामं करून उत्तम कमाई करत आहेत आणि उसवलेल्या अनेक संसारांची वीण यामुळे घट्ट होते आहे. संगणक प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी ‘जागृती’तून शिकून पुढे गेलेला भीमा आत्मीयतेने सांभाळतो आहे. वस्तीतल्या बुरखाधारी महिलाही इथे सहजपणे प्रशिक्षिण घेऊन पुढे जातायत.
व्यावसायिक शिक्षण घेऊन लहानमोठय़ा नोकऱ्या करणाऱ्या आणि स्वत:चे छोटे छोटे उद्योग करणाऱ्या अनेकांना आíथकदृष्टय़ा साक्षर करून स्वयंपूर्ण करण्यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँकेचे मोठेच सहकार्य आम्हाला लाभले. गेली काही वष्रे बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सर्वसमावेशक विकासाच्या बँकेच्या उद्दिष्टपूर्तीच्या खुणा ‘जागृती’त जवळून पाहाताना समाधान वाटते. ‘इंडसर्च’सारखी ख्यातनाम मॅनेजमेंट संस्था जागृतीतील महिलांनादेखील व्यवस्थापन शास्त्रातील मूलभूत संकल्पना शिकवण्यासाठी पुढाकार घेते आहे हे विशेष! या महिलांच्या व्यवसायाच्या आणि वैयक्तिक तातडीच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना सावकारांच्या आहारी जायला लागू नये म्हणून सुरू केलेल्या ‘हिरकणी’ योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. सुरुवातीला वेळ, नियम पाळण्यात उदासीन असणाऱ्या महिला रेखाताईंच्या कुशल नियोजनामुळे वक्तशीररीत्या प्रामाणिकपणे पैशांची परतफेड करतात.
आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत हे जाणवत होते. सुदैवाने डॉ. संगीता जगदाळे ‘जागृती’ परिवारात दहा वर्षांपूर्वी सामील झाल्या आणि आरोग्यविषयक उपक्रम सुरू झाले. आज तज्ज्ञ, अनुभवी डॉ. सुनीता सोमण आरोग्य केंद्राची जबाबदारी डॉ. गोपाळ गावडे आणि डॉ. शिल्पा पाटील यांच्या साहाय्याने समर्थपणे सांभाळत आहेत. रोज ७०-८० रुग्णांना नाममात्र शुल्कात औषधोपचार केले जातात. डायबेटिक असोसिएशनच्या साहाय्याने ७५० मधुमेही रुग्णांची पूर्ण काळजी घेतली जाते. बिगारी काम आणि पापड लाटून मान, कंबर दुखणाऱ्या कष्टकरी स्त्रियांना फिजिओथेरपी सेंटरमध्ये संस्थेतूनच उच्चशिक्षण झालेली अश्विनी आराम देते आहे, हे पाहून समाधान वाटते.
वस्तीमध्ये क्षयरोग आणि एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय आहे, हे दिसून आलं आणि पुणे महानगरपालिकेच्या साहाय्यानं ऊडळ सेंटर व समुपदेशन केंद्र सुरू झालं.
एका घटनेनं आम्ही बरेच दिवस बेचन होतो. एक अकरा वर्षांची मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे लक्षात आलं. वडील एड्सनी गेले होते तेव्हा आई पॉझिटिव्ह असणार. तिलादेखील मुलीबरोबर औषधोपचार करावे म्हणून बोलावलं तर ती निरोगी! खोदून खोदून चौकशी केली तर कळलं आई स्वत:ला वाचवायला रात्री दारू पिऊन नवरा आला की मुलीला त्याच्यापुढे उभी करत असे! माकडिणीच्या गोष्टीची आठवण झाली! असेही अनुभव घेतले. पण काम चालत राहिलं.
अनेक र्वष संस्थेशी जोडल्या गेलेल्या वस्ती पातळीवरील कामाचा मोठा अनुभव असलेल्या मंगलाताई पाटील वस्तीतूनच आरोग्यशिक्षिका तयार करून त्यांच्यामार्फत व्यसनाधीनता, कुटुंब नियोजन, कौटुंबिक अत्याचार याबाबत समुपदेशन आणि साहाय्य करत असतात. केव्हाही कसलीही अडचण आली तर त्या धावून येतील असा वस्तीतील लोकांचा विश्वास आहे. त्यांच्या शब्दाला मान आहे. आज त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे सन्मान प्राप्त झाले आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदांतून मानाने बोलावलं जात आहे. वस्तीतूनच नवे कार्यकत्रे घडत आहेत. संस्थेतूनच पुढे गेलेली मुलंमुली स्वत:च्या नोकरी-व्यवसायात प्रगती करताना जागृतीतील जबाबदाऱ्या उचलत आहेत. त्याच आधारावर पाळणाघर, महिलागृह या योजना आखत आहोत.
‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ या िवदा करंदीकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आज सामाजिक बांधीलकी जपणारे अनेक दानशूर ‘देणारे’ हात ‘जागृती’ला भक्कमपणे आधार देत आहेत. त्यांच्या दातृत्वामुळेच ‘जागृती’चे काम विस्तारते आहे. आजपर्यंत फक्त ‘घेणारे’ हातही हळूहळू ‘देणारे’ होत आहेत. हे पाहून ‘जागृती’च्या कामाची दिशा योग्य असल्याची खात्री पटते आणि पुढे जाण्यासाठी मोठेच बळ लाभते.
शब्दांकन- भावना प्रधान
संपर्क-जयश्री काळे   
पत्ता- सावित्री, ८२३/सी, प्रा. व्ही. जी. काळे पथ,भांडारकर इन्सिटय़ूट मार्ग, पुणे ४११ ००४
दूरध्वनी-०२०-२५६५४१३८ /२५६५५३०२
Email – info@jagrutiseva.org Website – http://www.jagrutiseva.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा