वनस्पतीची अन्नाची गरज भागली की त्या आणखी काही मागत नाहीत. प्राण्यांचीही तीच रीत. जेवण झाले की ते तृप्त होतात. शांत होतात. परंतु आपण गरजेपुरतं अन्न, वस्त्र मिळालं की तृप्त होतो का? शांत होतो का? समाधानी असतो का? कधी याचं कारण शोधायचा प्रयत्न केलाय का?

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत, हे वाक्य आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. माणसाचंच कशाला, आजूबाजूच्या निसर्गातही पाहा. या जगात सजीव व निर्जीव सृष्टी असा पहिला भेद आपल्याला दिसतो. निर्जीव सृष्टीला; म्हणजे दगड, डोंगर वगैरेंना त्यांच्या अस्तित्वासाठी केवळ जागेची गरज असते. त्यापलीकडे कोणतीही गरज त्यांच्या ‘जगण्याला’ लागत नाही. सजीव सृष्टीला मात्र त्याहून जास्त काही तरी लागतं. सर्वात खालच्या स्तरावरची सजीव सृष्टी म्हणून वनस्पतींकडे पाहिलं तर त्यांची अन्न हीच एकमेव गरज असते व ही गरज मातीतल्या खनिजद्रव्यांमधून आणि पाण्यामधून भागवली जाते. त्यावरच्या स्तरावर असते प्राणिसृष्टी. त्यांना अन्न तर लागतंच पण बहुतेकांना निवाराही लागतो व तो निवारा घरटी, बिळं, गुहा वगैरेंमधून मिळतो. परंतु वस्त्राची गरज कोणत्याही प्राण्याला नसते (पाळलेले प्राणी अपवादात्मक). सर्वात वरच्या स्तरावर आपण- मानवप्राणी. त्याला अन्न आणि निवाऱ्याबरोबरच वस्त्राचीही गरज भासू लागली. पण माणसाचं रूपांतर जेव्हा ‘मॉडर्न मॅन’मध्ये झालं, तशी ‘गरज’ या शब्दाची व्याख्याही मॉडर्न झाली.
सध्या मोबाइल फोन आणि इंटरनेट या गोष्टी अन्न आणि पाणीइतक्याच महत्त्वाच्या (गरजा) झाल्या आहेत. नवीन नवीन गरजांचे ‘शोध’ लागत आहेत आणि त्या गरजा पुरविणाऱ्यांचे ओघ लागलेले आहेत. आपण घरात असलो काय किंवा बाहेर असलो काय, जाहिराती हा पर्यावरणाचा एक भागच झालाय. ‘विकत घ्या आणि विकून टाका’ हे जगण्याचे श्वास आणि उच्छ्श्वास झाले आहेत. पण खरी गंमत तर पुढेच आहे. वनस्पतीची अन्नाची गरज भागली की त्या आणखी काही मागत नाहीत. प्राण्यांचीही तीच रीत. जेवण झाले की ते तृप्त होतात. शांत होतात. परंतु आपण गरजेपुरतं अन्न, वस्त्र मिळालं की तृप्त होतो का? शांत होतो का? समाधानी असतो का? कधी याचं कारण शोधायचा प्रयत्न केलाय का? कोणत्याही थोर माणसाच्या चरित्रात आपल्याला आढळतं की, अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा भागल्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागले. कारण शरीराच्या गरजा भागविणं हे त्यांच्या दृष्टीनं मानवी जीवनाचं तरी उद्दिष्ट नव्हतं. पायात घालायला एक चप्पलचा जोड असला की पादत्राणाची गरज भागत होती. आता पादत्राणांची जागा फुटवेअरने घेतली आहे आणि शू-रॅक हे वेगवेगळ्या फुटवेअरचे भांडार झाले आहे.

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

देशरक्षणाच्या गरजा भागल्यानंतर मानवाला आणखीही काही हवं असतं. मानव म्हणजे काय? तर मननशील असणारा तो मानव. आपल्याला मन आहे आणि बुद्धीही आहे. या मनाला आवड आणि नावड असते. काय आवडतं मनाला?
मनाला मी नेहमी सुंदर दिसावं हे आवडतं.
मनाला मी कायम आरोग्यवान असावंस वाटतं.
मी सदासर्वकाळ आनंदात राहावं हे आवडतं.
सौंदर्य : सौंदर्य ही माणसाची पहिली अपेक्षा असते. एक वेळ मोबाइल फोन न वापरणारी व्यक्ती सापडेल, पण आरशासमोर उभी न राहणारी व्यक्ती सापडणं ‘मुश्किलही नहीं, नामुमकीन आहे’. सौंदर्य म्हणजे काय? तर सुंदर चेहरा, नाक, डोळे, ओठ, केस सगळं प्रमाणबद्ध असणं म्हणजे सौंदर्य. ही प्रमाणबद्धता कोणी ठरवली? ती ठरवली मार्केटिंगच्या धूर्त व काही अंशी लबाड लोकांनी. त्यांनीच हे सौंदर्याचे मॉडेल किंवा आदर्श घालून दिले आहेत व आपण झापडं लावल्याप्रमाणे ते ‘फॉलो’ करीत असतो. गोरा रंग चांगला, हे आपण कसं काय ठरवलं? खरं तर आपल्या भौगोलिक रचनेप्रमाणंच आपल्या त्वचेचा रंग किंवा आपले नाक-डोळे असतात. पण एकदा का मनानं गोरा रंग हे सौंदर्याचं प्रतीक मानलं की मग कितीही ‘हार्मफूल’ असली तरी फेअरनेस क्रीम्स लावायला आपण कचरत नाही. इतके दिवस हे स्त्रियांचं क्षेत्र होतं, पण आता तर पुरुषही या ‘रेस’मध्ये आहेत. खरं तर टॉल, डार्क, हॅण्डसम असं पुरुषी सौंदर्य मानतात. पण त्याजागी आता ‘फॅट, फेअर आणि कन्फ्युज्ड पुरुष पाहायला मिळतील की काय अशी भीती वाटते. झाडावरचं ताजं फूल कोणतंही फोटोशॉप न करता सुंदर दिसतं, कारण ते सुंदर असतं. जसं निसर्गाने निर्माण केलं तसंच ते असतं. निरोगी आणि सुंदर. कोऱ्हांटीही सुंदर दिसते. कारण ती कधी स्वत:पुढे जास्वंदीचं फूल ‘मॉडेल’ म्हणून ठेवत नाही. तसंच जास्वंदीही सुंदर (असते आणि म्हणून) दिसते कारण ती गुलाबासारखं व्हायचा प्रयत्न करत नाही. आपण मात्र याच्यासारखं, तिच्यासारखं दिसावं या दडपणात वावरतो. गंमत म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की, मी माझ्या मनाप्रमाणे वागते/वागतो. पण प्रत्यक्षात मात्र जाहिरातदारांच्या मनाप्रमाणे वागतो.
आरोग्य : लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला मन, बुद्धी दिलेली आहे. त्याचा ‘योग्य’ वापर केला तर आरोग्य राहायलाच हवे. कारण आरोग्य हीसुद्धा नैसर्गिक देणगीच आहे (काही जेनेटिक दोष सोडून). लहान बाळांकडे पाहा- आरोग्याचा, सौंदर्याचा तो स्रोतच असतो. ते मूल निरागस, निर्मळ, कोणत्याही निगेटिव्ह किंवा पझेसिव्ह भावना नसलेलं असतं म्हणून ते निरोगी आणि सुंदर दिसतं. त्याच्या डोळ्यातून त्याच्या मनात तळ दिसतो. अजून एक गोष्ट. परीक्षेच्या वेळी आपण मुलांना सांगतो की, आता परीक्षेच्या वेळी आजारपण नको. त्यासाठी बाहेरचं खाणं टाळतो, योग्य तेवढी विश्रांती घेणं, भरपूर पाणी (कोल्ड ड्रिंक्स नव्हे) पिणं, घरचं ताजं अन्न खायचा सल्ला देतो. का? आपल्याला नक्की माहिती आहे की असं करण्यात आरोग्य राखलं जाईल. तसंच एखाद्याला मधुमेह झाल्याचं कळलं की, मनुष्य लगेच खडबडून जागा होतो व हे खा, ते नको- म्हणजे गोड नको, कारलं खा वगैरे सुरू होतं. कशासाठी? तर आरोग्य हातातून निसटून चाललंय, त्याला धरून ठेवण्यासाठी.
सांगायचा मुद्दा म्हणजे आरोग्य हे नैसर्गिक आहे आणि आपण ते समजून घेऊन त्याप्रमाणे वागलं तर आपलाच फायदा होईल. थोडक्यात पोट आणि जीभ सांभाळली पाहिजे. बघा ना, दोन-तीन इंचाची जीभ किती घात करते? नको त्या वेळी, नको ते, नको तेवढे खाते/ बोलते आणि पुढं सगळंच चुकतं.
आनंद : आनंदात असायला प्रत्येकाला आवडते. कंटाळा येईपर्यंत आपण वाचलेलं- ऐकलेलं आहे की आनंद हा कोणत्याही बाह्य़ वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतो. म्हणजेच आनंदाचा संबंध पुन्हा मनाशीच येतो. शांत, प्रसन्न असलेलं मनच माणसाला आनंदाचा अनुभव देते. आनंदी मनुष्य साहजिकच सुंदर दिसतो. राग आलेला मनुष्य कधीही सुंदर दिसत नाही. आनंदी मनुष्य बहुधा आरोग्यवानही असतो. कारण आरोग्याची संकल्पना केवळ शारीरिक स्थितीवरच अवलंबून नसते.

सौंदर्य, आरोग्य आणि आनंद या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? याचं उत्तर नाही. या तीनही गोष्टी एकमेकांस समभुज त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत असं दिसतं. याचं इंटिग्रेशन असतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा पेढा खातो तेव्हा रंग, आकार, वजन, गोडी वेगळ्या काढता येतात का? अगदी त्याचप्रमाणे सौंदर्य, आरोग्य, आनंद या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. शरीर आणि मनाशी यांचा घट्ट असा संबंध आहे. पेढा खरेदी करताना पहिल्यांदा त्याचा रंग आपल्या मनात भरतो आणि नंतर आकार हे खरं, पण कोणता पेढा विकत घ्यायचा हे निश्चित करायचं असतं तेव्हा मात्र आपण ‘जरा चव पाहू’, असंच म्हणतो.
म्हणजेच प्रथम वस्तूचे बाह्य़रूप पाहणारे आपण जेव्हा मन आणि बुद्धीने तीच वस्तू पाहतो तेव्हा बऱ्याच वेळा बाह्य़रूप गौण ठरते. म्हणूनच प्रथमदर्शनी सौंदर्य हवे असले तरी वेळ पडल्यास आरोग्यासाठी एखादी व्यक्ती सौंदर्याचीही किंमत द्यायला तयार होते. केमोथेरपी हे याचे एक उदाहरण म्हणून देता येईल. कर्करोगावरचा उपचार असलेल्या या थेरपीचा साइड इफेक्ट म्हणजे सौंदर्याचं प्रतीक असणाऱ्या केसांना मुकणे. काही काळाकरता हे घडत असले तरी हे नुकसान मोठे असते, हेही खरे.
लेखात म्हटल्याप्रमाणे मानव हा मननशील असतो. मननशीलतेमागे विचार असतो. मनमानी नसते. बुद्धीचा वापर केला जातो. त्यामुळे सौंदर्य, आरोग्य आणि आनंद या क्रमाने न जाता आधी आनंद, त्यानंतर आरोग्य आणि या दोन्हीमागून फुलणारे सौंदर्य या क्रमाने गेले तर नैसर्गिक होईल आणि निसर्गाबरोबर जाणे हे केव्हाही श्रेयस्कर असते.