‘क्ष’ला आता शांत वाटत होतं. आपल्या आतमधल्या विश्वाच्या या ज्ञानामुळे खूपच सकारात्मक व आश्वासक वाटू लागलं. साध्या सात्विक आहारातली जादू कळली. औषधं (जेवण) इतकी चविष्ट असतात, आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या गरजेनुसार (डिझायनर मेडिसिन) टेलर मेड करता येतात हा ‘युरेका’ क्षण त्याला अनुभवता येऊ लागला. आणि तो
भरून पावला..

परवाच ‘य’ भेटला. हा एक उत्साही, सर्वाना मदत करणारा, मृदू बोलणारा, सर्वाना हवाहवासा वाटणारा तरुण. तो भेटल्यावर आमच्याही गप्पा रंगल्या. गप्पांच्या ओघात त्यानं ‘क्ष’ची गोष्ट सांगितली. ‘क्ष’ हा एक तरुण, चाळिशीकडे झुकणारा. करिअर करणारा. घरचा खाऊन पिऊन सुखी. पण तो सतत कसल्या तरी विचारात असायचा. त्याची ही मानसिकता ‘य’ला जाणवली व त्याने त्याबद्दल ‘क्ष’ला विचारले. ‘क्ष’ म्हणाला, ‘‘मित्रा, चांगलं जगण्यासाठी जे हवं, ते बहुतेक सगळं माझ्याकडे आहे. पण परवा सहज चेक अप झाल्यावर डॉक्टरांनी माइल्ड ब्लडप्रेशर आहे असं सांगितलं. त्यामुळे मला चिंता वाटते आहे. उद्या माझ्या जीवाला काही झालं किंवा काही कारणाने मी अधू झालो तर काय?’’
‘य’ने विचार केला आणि ‘क्ष’ कडे लक्ष देण्याची गरज आहे हे त्याला जाणवलं. ‘य’ने मनाशी काहीतरी ठरवलं. त्याने स्वत:च्या घरातल्या हॉलमध्ये काही स्पेशालिस्ट बोलावले. हे स्पेशालिस्ट कोणते तर आय सर्जन, ई.एन.टी. सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, सायकियाट्रिस्ट, युरॉलॉजिस्ट, हिपॅटोलॉजिस्ट, डर्मेटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट आणि इतर किती तरी ‘जिस्ट’ बोलावले. दुसऱ्या हॉलमध्ये ‘य’ने पॅथॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, केमिस्ट वगैरे अलाईड ‘जिस्ट’ बोलावले होते. ‘क्ष’चे फॅशन-प्रेम ‘य’ला ठाऊक होते म्हणून तिसऱ्या हॉलमध्ये त्याने जेन्ट्स टेलर स्पेशालिस्ट, ब्युटी थेरपिस्ट, कुकिंग स्पेशालिस्ट यांनाही आमंत्रित केले होते. इतकेच करून ‘य’ थांबला नाही. तर त्याने फायनान्शियल अॅडवायजर, इन्व्हेस्टमेंट्स कन्सल्टंट, प्रॉपर्टी डीलर आणि सॉलिसीटर यांनाही तिथे यायला सांगितले होते.
सर्व जण जमल्यावर ‘य’ने ‘क्ष’ला तिथे बोलावून घेतले व त्यांची ओळख करून दिली. या सर्वाना पाहिल्यावर ‘क्ष’ला खूपच आनंद झाला. त्याला वाटले, ‘‘येस! या सर्वाच्यामुळे फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि फायनान्शियली मी एकदम सुरक्षित असेन. कारण मला कशाचीही गरज पडली तर हे सर्व जण माझी उत्तम काळजी घेतील, मला सुखी ठेवतील. यांच्यामुळे मला कशाचीच रिस्क वाटणार नाही.’’ ‘य’ म्हणाला, ‘‘मित्रा, तुझं म्हणणं चूक नाही. या सर्वामुळे तुला सेफ वाटणं साहजिक आहे. पण मला आता आठवण झाली की अजून एक ऑप्शन आहे. माझ्या माहितीत एक ‘होल सोल’ (हँ’ी र४’) स्पेशालिस्ट आहेत. त्याचं नाव विवेक प्रकाश. त्यांच्याकडे गेल्यावर तुला इतरांची क्वचितच गरज लागेल. ‘क्ष’ने ‘य’ च्या मदतीने त्या होल सोल स्पेशालिस्टला-विवेक प्रकाशना-भेटायचं ठरवलं. त्यांच्याशी फोनवर बोलला-त्याचं हॉस्पिटल कुठे आहे याची चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘मी तुमच्या घरीच येऊन माझी ट्रीटमेंट देईन. येस, आय डू होम व्हिजिट्स!’’ ‘क्ष’ला फारच आनंद झाला.
ठरल्यावेळी विवेक प्रकाश ‘क्ष’च्या दारात उभे. साधा पोशाख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, हसतमुख. रणांगणावर धनुष्यबाण टाकून म्लान वदनाने बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाच्या शांत व प्रसन्न मुद्रेकडे पाहून जसा धीर आला तसं ‘क्ष’चं झालं. विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘तयार? चला आपण ऑपरेशनला सुरुवात करू या!’’ ‘क्ष’ थक्कच झाला. ऑपरेशन आणि तेसुद्धा घरी? टेस्ट नाहीत, रिपोर्ट्स नाहीत? न राहवून ‘क्ष’ने भीतभीतच विचारलं, ‘‘अनेस्थेटिस्ट, नर्सेस वगैरे येणार आहेत ना?’’ विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘नाही. आपण दोघे मिळून हे ऑपरेशन करणार आहोत. कोणतीही भूल न देता. इन फॅक्ट तुम्हाला पडलेली भूल आपण उतरवणार आहोत व मग उघडय़ा डोळ्यांनी हे ऑपरेशन करणार आहोत. तुमच्या बुद्धीचा वापर करून पहिल्यांदा तुमच्या मनाला झालेलं इन्फेक्शन बाहेर काढणार आहोत.’’ ‘क्ष’ हे सगळं ऐकून गारच झाला.
विवेक प्रकाश ‘क्ष’ला घेऊन शांतपणे स्वयंपाकघरात गेले. ते म्हणाले, ‘‘ऑपरेशनच्या आधी आपल्याला थोडी स्वच्छता करून घ्यावी लागेल. तुमच्या आरोग्याला अपायकारक आणि विषारी (टॉक्सिन्स तयार करणाऱ्या) गोष्टी इथून हलवल्या पाहिजेत. त्यांनी स्वयंपाकघरातील एकेक डबे, बाटल्या, बरण्या उघडायला सुरुवात केली. त्याअगोदर त्यांनी एक मोठी डस्टबिन मागवली व मग बिस्किटे, नूडल्स, पॅक्ड खाद्यपदार्थ, तळलेले, भरपूर मीठ-मसाला असलेले स्नॅक्स, मैद्याचे गोड पदार्थ डस्टबिनमध्ये मेलेला उंदीर टाकावा तसे टाकून दिले. ‘क्ष’ मनात म्हणाला, ‘‘अरे अरे, माझे पाचशे रुपये वाया घालवले या स्पेशालिस्टने!’’ मनातले हे विचार त्याच्या चेहेऱ्यावर पाहून विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘मी तुमचे कित्येक हजारो रुपये आणि मनस्ताप वाचवतोय!’’ त्यानंतर विवेक प्रकाशांनी स्वयंपाकघरातला फ्रीज उघडला आणि सगळी सॉफ्टड्रिंक्स, व्हाइट ब्रेड, मिठाई आणि इतर अनेक पॅक्ड फूडची पॅकेट्स डस्टबिनमध्ये टाकली. विवेक प्रकाश पुढे म्हणाले, ‘‘छान पॅकेजिंगच्या सुटाबुटात संभावितपणे वावरणारे, तुमचे मित्र म्हणवणारे हे खरे शत्रू, आता तुरुंगात टाकलेत. आता या माफिया गुंडांची तुम्हाला भीती नाही. शिवाय मी आता माझ्या ओळखीच्या काही चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही ओळख करून देतो.’’ असे म्हणून त्यांनी त्यांच्या बॅगेतून आणलेल्या ताज्या फळभाज्या व पालेभाज्या, ताजी फळं, मोड आलेली धान्ये वगैरेचा स्टॉक फ्रीजमध्ये ठेवला व म्हणाले, ‘‘या पोलिसांची तुम्ही रोज मदत घ्या. ते तुमचं रक्षण करतील.’ ‘क्ष’ने अधीरतेने म्हटले, ‘‘थॅन्क यू डॉक्टर फॉर ऑल धिस. पण ऑपरेशनचं काय?’’
विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘आपण अगोदर बाहेरून आत येणाऱ्या घुसखोरांचा बंदोबस्त केला. आता आतल्या व्यवस्थेचं ऑपरेशन. या इकडे बसा.’’ विवेक प्रकाशांनी ‘क्ष’ला हॉलमधल्या सोफ्यावर बसवले. डॉक्टर स्वत: त्याच्या समोर बसले व म्हणाले, ‘‘आता डोळे बंद करा.’’ ‘क्ष’ने तसं केलं. विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘काय दिसतंय?’’ ‘क्ष’ म्हणाला, ‘काही नाही!’ मग विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘तर आता आतले डोळे उघडा आणि पाहा काय दिसतंय ते.’’ ‘क्ष’ला कळेना ही काय भानगड आहे. मला आतले डोळे आहेत आणि ते मलाच माहिती नाहीत! विवेक प्रकाशांनी ‘क्ष’चा हा गोंधळ ओळखला. ते म्हणाले, ‘‘अहो, सगळं आतच तर आहे. म्हणतात ना तुझे आहे तुजपाशी. पण आपल्याला लहानपणापासून नेहेमी बाहेरच्या डोळ्यांनी सतत बाहेरचं पाहायची इतकी सवय झाली आहे की अंतर्चक्षू आपल्याला आहेत हे आपण विसरूनच गेलोय. हा दृष्टिदोष जवळजवळ सर्वामध्ये आहे. काळजी करू नका. सवयीने आत पाहणे जमायला लागेल. प्रयत्न मात्र सिन्सिअर आणि नियमित केला पाहिजे. बाहेर गमती-जमती नाहीत इतक्या तुम्हाला आत दिसतील.’’
‘‘आत एक प्रचंड विश्व आहे आणि त्याचे तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात!’’ हे ऐकून ‘क्ष’ सुखावला, पण इतके दिवस हे राज्य आपण का उपभोगलं नाही याचीही खंत कुठेतरी वाटून गेली. ‘‘हे विश्व आतल्या डोळ्यांनीच पाहता येतं. ‘क्ष’, पाहा तुझे साम्राज्य. तुझे मंत्रिमंडळ- मेंदू, हृदय, फुप्फुसे, जठर.. पाहा तुझे प्रजाजन- तुझ्या असंख्य पेशी. सगळे मिळून बिनबोभाट, बिनतक्रार तुझ्या सुखाकरिता रात्रंदिवस काम करत आहेत. पण तुझं त्यांच्याकडे लक्ष आहे का? त्यांच्या कामाबद्दल त्यांना कधी बक्षीस, किमान चार गोड शब्द, देतोस का? तुझे गेटकीपर तोंड आणि विशेषत: जीभ खूपच भ्रष्टाचारी झाले आहेत. सीमेवरून वाटेल त्याला आत घेत आहेत. नको असलेले लोक (स्निग्ध पदार्थ, साखर, प्रोसेस्ड फूड) बिनधास्त केव्हाही आत येऊन तुझ्या राज्यात नासधूस करत आहेत. तुझे प्रजानन व मंत्रिमंडळ तुला वेळोवेळी इशारे देतात पण त्यांचं न ऐकल्याने आतले सैनिक (इम्युनिटी मंत्रालय) यांना काम करणं जड जातंय.’’
‘‘तेव्हा आता तू तुझ्या साम्राज्याच्या सिंहासनावर बैस. सगळा कारभार हातात घे व सगळं साम्राज्य सुखी ठेव. वेळप्रसंगी तुझ्या राज्यावर परकीय आक्रमण (साथीचे रोग, मानसिक धक्का, संसर्ग, शारीरिक अपघात-इजा) होईल. अशा वेळी ‘य’ने सांगितलेल्या योग्य त्या डॉक्टरांची किंवा स्पेशालिस्टची मदत जरूर घे (व काही काळ कारभार त्यांच्याकडे दे) आणि परकीय आक्रमण परतवून लाव. एकदा का अशा आक्रमणातून बाहेर पडलास की राज्यकारभार पुन्हा तुझ्या हातात घे. आता डोळे उघड.’’
‘क्ष’ला आता शांत वाटत होतं. आपल्या आतमधल्या विश्वाच्या या ज्ञानामुळे खूपच सकारात्मक व आश्वासक वाटू लागलं. त्याचं स्वयंपाकघर जणू काही औषधाचं काम करू लागलं. ‘फूड इज मेडिसिन’ किंवा ‘मेडिसिन थ्रू फूड’ हे त्याला पटलं. औषधं (जेवण) इतकी चविष्ट असतात, आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या गरजेनुसार (डिझायनर मेडिसिन) टेलर मेड करता येतात हा ‘युरेका’ क्षण त्याला अनुभवता येऊ लागला. साध्या सात्त्विक आहारातली जादू कळली. प्रत्येक अन्नपदार्थातून ‘व्हॅल्यू-अॅडेड’ पोषक द्रव्ये कशी मिळतील हे त्याने अभ्यासायला सुरुवात केली आणि त्याला निसर्गाचं पहिल्यांदाच कौतुक वाटू लागलं.
होल सोल स्पेशालिस्ट विवेक प्रकाश जायला निघाले. तेव्हा ‘क्ष’ने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि फी संबंधी विचारले. विवेक प्रकाश म्हणाले, ‘‘अरे, मी कुठे काय केलंय? सगळं तूच तर करतोयस. मग फी कसली? तुझं आरोग्य, तुझं तणाव-मुक्त जीवन, तुझा आनंद ही माझी फी मला मिळाली. आता निघतो मी. अजून असे बरेच ‘क्ष’ माझी वाट पाहत आहेत. त्यांच्याकडे जायला हवं.’’
विवेक प्रकाश गेले. ‘क्ष’ पाहातच राहिला. काय चमत्कार! तो ताबडतोब ‘य’कडे गेला. पण त्याला काही सांगावंच लागलं नाही. ‘क्ष’च्या प्रसन्न चेहेऱ्यावरून आणि उत्साही देहबोलीवरून ‘य’ला सगळं कळलं. तो फक्त हसला. तुम्हीही ‘व्हॉट्स-इन’वर विवेक प्रकाशांना कॉन्टॅक्ट करू शकता.
health.myright@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा