छोटय़ांकडून शिकण्यासारखं काय होतं?.. त्यांच्याकडे होती सुंदर निरागसता! लहान मुलांची निरागसता अज्ञानातून आलेली नसते, तर ती शुद्धतेतून आलेली असते. आपणही जगात वावरताना शरीर, मन आणि बुद्धी ही तीन ‘उपकरणं’ वापरतो. ती जर शुद्ध असतील तर आपले व्यवहारही आनंददायी होतील आणि आयुष्यात जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर निरागसतेइतकी कमीतकमी रिस्क असलेली आणि जास्तीत जास्त रिटर्न्स देणारी दुसरी गोष्ट नसेल.
‘सूर निरागस हो’ या गाण्याने सुरुवात आणि शेवट होणारा ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट पहिला आणि ‘सूर निरागस हो’ हे तीनही शब्द मनात घुसले आणि डोळ्यासमोर आलं एक लहानसं बाळ. लहान बाळाचं असणं, त्याचं हसणं, डोळ्यात पाणी आणून आणि ओठ दुमडून रडणं असंच निरागस असतं. म्हणूनच आपण त्याच्याकडे लगेच आकर्षित होतो. त्याच्या डोळ्यातून, चेहऱ्यातून किंबहुना देहाच्या सर्व हालचालींतच निरागसता असते. हो, त्याला कोणत्याच गोष्टीचं लपवणं किंवा प्रदर्शन करायचं नसतं ना! अशीच निरागसता अनुभवण्याची गोऽऽऽड संधी मला काही काळापूर्वी मिळाली. माझ्या मनात तो अनुभव मी जपून ठेवला आहे.
गेल्या काही काळापासून आमच्या घराजवळचे जुने रस्ते काँक्रीट करण्याचे काम चालू आहे. (आपण चक्क खड्डय़ांविषयी बोलणं टाळून नवीन रस्त्यांबद्दल बोलत आहोत!) आमच्या इमारतीच्या बाजूचा अर्धा रस्ता होत असताना गॅलरीत उभी राहून मी हे रस्ता बांधकाम पाहत असे. अनेक कामगार कुटुंबं त्याठिकाणी होती, म्हणजे आई-वडील आणि त्यांची लहान मुलं, सगळेच जण तिथे असत. त्यांच्यातली पुरुषमंडळी सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी मिक्स करत असत आणि रस्त्यावर पसरलेल्या लोखंडाच्या सळ्यांमध्ये नेऊन टाकत असत. आईवर्ग वाळू उपसून घमेल्यात भरून डोक्यावरून वाहून नेत असे आणि ही छोटी मुलं.. ती तिथेच बाजूला खेळत असत. रस्ता दुरुस्तीमुळे त्याबाजूला वाहतूक नसल्यानं त्यांना खेळायला सगळं रान मोकळं होतं.
हिवाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळी एक गमतीचं दृश्य दिसलं. मी हे रस्त्याचं काम.. खरं तर तिथल्या सर्व लोकांचं काम करणं -पाहत होते. तिथे काही (वर वर्णन केलेली) कामगार कुटुंबं होती. त्यांची चार मुलं (वय वर्षे ३ ते ५ मधली) तिथे खेळत होती. अचानक दोन बायकांनी (त्यांच्या आयांनी) बांधकामाच्या ढिगाऱ्यातून चार-पाच बांबूच्या काठय़ा आणल्या. त्यातल्या दोन काठय़ा घेऊन जवळच पडलेल्या दोरीने इंग्रजी ‘ए’ आकारामध्ये घट्ट बांधल्या, दोन्ही बाजूंना उभ्या केल्या आणि एका आडव्या काठीने त्या जोडल्या. नंतर मधोमध एक दुहेरी दोरी बांधून त्यांनी छानसा झोका तयार केला. त्यावर एक पोतं टाकून खोळ तयार केली. आयांनी काठय़ा गोळा केल्याबरोबर लगेचच ती चारही मुलं खेळणं थांबवून तिथं आली आणि शांतपणे उभी राहून हे झोका बांधणं न्याहाळीत राहिली. (बहुतेक ही सगळी बांधाबांध त्यांना नेहमीच्या अनुभवाने माहिती असावी). झोका तयार झाल्याबरोबर आईवर्ग त्यांच्या नेमून दिलेल्या कामाला निघून गेला आणि इकडे मुलांनी त्यांचा खेळ सुरू केला. एक मूल झोपाळ्यात बसलं. दुसरं एक त्याच्या पाठीमागे उभं राहून हलकेच ढकलत होतं व उरलेली दोन मुलं समोर उभी राहून झोका त्यांच्याकडे येण्याची वाट पाहत होती. तो झोका त्यांच्यापर्यंत पोहोचला की चौघेही जण खिदळत होते, अगदी मनापासून. त्यांना आजूबाजूचं कसलंही भान नव्हतं.
हे दृश्य मी दूरवरून पाहत होते: परंतु आनंद मात्र त्या मुलांइतकाच अनुभवत होते. खरंच मलाही खूपच मजा येऊ लागली आणि ती शेअर करावीशी वाटली म्हणून शेजारच्या फ्लॅटमधल्या गौरवला हाक मारली व ‘गंमत पाहायला ये’ असं सांगितलं. गौरव आठ वर्षांचा. या मुलांपेक्षा मोठा असला तरी अजूनही लहानच म्हणण्याच्या वयातला. नुकतीच त्याची मुंज झाली होती. त्यात त्याला टॅब्लेट मिळाला होता, छोटा संगणकच तो. त्यावर बरेचसे गेम्स त्याच्या पप्पांनी डाऊनलोड करून दिले होते. त्यामुळे गेम्स खेळणं हा त्याचा टाइमपास होता. मी हाक मारल्यावर (नाइलाजाने) तो टॅब्लेट घेऊन टेरेसवर आला आणि ‘कसली गंमत?’ असा प्रश्नार्थक चेहरा केला. मी त्याला रस्त्यावरची ती खिदळणारी चारही छोटी मुलं दाखवली. क्षणभर त्याने तिकडे पाहिलं व लगेच ‘यात काय गंमत आहे?’ असा चेहरा केला. इतकेच नव्हे तर ‘उगीचंच माझा गेम अर्धवट राहिला’ असा त्रासिक चेहरा करून तो त्याच्या घरी परत गेलादेखील. मला खूपच आश्चर्य वाटलं आणि हसूही आलं. आश्चर्य गौरवच्या प्रतिक्रियेचं वाटलं पण हसू का आलं म्हणाल तर या समोर दिसलेल्या दोन्ही गोष्टींमधल्या विरोधाभासाचं. दोन्ही गोष्टी खेळाशी निगडित पण एकीकडे ही चिल्लर पार्टी उघडय़ावर, हिवाळ्यातलं कोवळं ऊन खात खेळत होती तर दुसरीकडे गौरव त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये चार भिंतींच्या आत खेळत होता. चिल्लर पार्टी पडत होती, उठत होती आणि टणक बनत होती. गौरव मऊमऊ सोफ्यावर बसून.. सॉरी आडवं पडून डोळ्यांच्या वर उलटय़ा दिशेने टॅब्लेट धरून गेम खेळत होता. बच्चेकंपनी चौघे मिळून टीम स्पिरिट दाखवत एकत्र खेळत होती (ग्रुप अॅक्टिव्हिटी). गौरव एकटाच.. बच्चेपार्टी त्यांचा आनंद जोरात हसून साजरा करत होती. गौरव मात्र स्पर्धा करत होता – कमीतकमी वेळात जास्तीतजास्त फुगे कसे फुटतील याची स्वत:शीच स्वत:ने केलेली स्पर्धा! आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना टीम स्पिरिट यावं आणि टीम कौशल्य वाढावीत म्हणून विशेष खर्चीक शिबिराचं आयोजन करावं लागतं. स्पर्धेच्या टॉनिकवर वाढलेल्या मुलांना एकत्र कसं यावं याचं शिक्षण द्यावं लागतं.
मला लहानपणी ऐकलेलं एक सुभाषित आठवलं – ‘बालादपि सु-भाषितम् ग्राह्य़म्’ एखादी चांगली गोष्ट असेल तर मोठय़ांनीही ती (मोठय़ा मनाने) लहानांकडून शिकायला काय हरकत आहे? आता प्रश्न पडेल की या छोटय़ांकडे शिकण्यासारखं काय होतं?.. त्यांच्याकडे होती सुंदर निरागसता! ही निरागसता त्या बच्चेपार्टीकडून आपण घेतली तर? लहान मुलांची ही निरागसता अज्ञानातून आलेली नसते, तर ती शुद्धतेतून (प्युरिटी) आलेली असते आणि तसं बघितलं तर आपणही सगळीकडे शुद्धतेचा आग्रह धरतच असतो. हवा शुद्ध हवी, पाणी शुद्ध हवं, अन्न शुद्ध हवं. मग आतमध्ये आपलं मन शुद्ध नको? जुन्या सिनेमातलं एक गाणं आहे, ‘मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथिवीमोलाची’. जगात वावरताना शरीर, मन आणि बुद्धी ही तीन उपकरणं आपण वापरतो. ती जर शुद्ध असतील तर आपले व्यवहारही आनंददायी होतील. आणि आयुष्यात जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर निरागसतेइतकी कमीतकमी रिस्क असलेली आणि जास्तीत जास्त रिटर्न्स देणारी दुसरी गोष्ट नसेल. (कारण व्यवहारात आपण नेहमी नफ्या-तोटय़ाचाच विचार करून निर्णय घेतो.)
संस्कृतमध्ये राग शब्दाचा अर्थ आहे प्रीती, आवड, आसक्ती. (‘राग’ शब्दाच्या विरुद्ध शब्द आहे द्वेष, त्यावरून राग शब्दाचा अर्थ ध्यानात येईल). अशी आसक्ती नसते ती अवस्था असते निराग. त्यावरून निरागसता हा भाव. एखादी वस्तू आपल्याकडे असावी पण (मनाने) तिच्याबद्दल आसक्ती नसावी किंवा मालकीभाव नसावा तेव्हा निरागसभाव असतो असे समजावे. एखाद्या लहान निरागस मुलाला आपण ‘दे मला’ म्हटलं की लगेच हातातली वस्तू आपल्याला देतं कारण त्याच्यात (अजून तरी) मालकीची भावना नसते. अजून एक उदाहरण घेऊ. आपल्याला निसर्गात रमायला आवडतं. का आवडतं तर तो आपल्याकडे काही न मागता आपल्यालाच देत असतो.. आकाशाचे रंग बघायला कोणतंही तिकीट काढावं लागत नाही. सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची शोभा अनुभवायला कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. पौर्णिमेच्या चांदण्यात न्हाण्यासाठी कोणतंही अॅडव्हान्स बुकिंग करावं लागत नाही. या सर्व गोष्टी सदैव आपल्याला त्यांच्याकडे जे आहे ते देण्यासाठी सज्ज असतात. बघा ना, समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत बसून समोर मैलोन् मैल दिसणारा निळाशार समुद्र पाहणं किती मोहक असतं. तसंच हिमालयाची उंचच उंच बर्फाच्छादित शिखरं. यातलं काहीच आपल्या मालकीचं नसून (किंवा म्हणूनच) आपण किती आनंदित होतो. समजा उद्या आपल्याला सरकारने एखाद्या सुंदर समुद्रकिनाऱ्याची मालकी दिली तर? तर तोच समुद्रकिनारा आपल्या चिंतेचा विषय बनेल आणि आनंद मिळणार नाही. समुद्रकिनारा तोच.. पण भावना बदलली. मालकी ही मनातूनच निर्माण होते. म्हणून सोडायची असेल तर ती मनातूनच सोडता येते. जी गोष्ट वस्तूंबद्दल तीच माणसाबद्दलही म्हणता येईल. आपले बरेचसे रिलेशनशिपचे प्रश्न.. मग ते नवरा-बायकोंमधले असोत किंवा पालक पाल्यांचे असोत किंवा मालक कामगारांचे असोत. त्यात मालकीची भावना आली की रिलेशनशिप बदलते. हे व्यावहारिक नाही असे वाटण्याचा संभव आहे. परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला हेच दाखवतं की जिवावर उदार होऊन आणि अथक प्रयत्न करून निर्माण केलेलं राज्य ‘ही श्रींची इच्छा’ म्हणून चालवलं आणि ते आदर्श ठरलं.
हे सगळं ‘सूर निरागस हो’ या गाण्यावरून आठवलं. कारण खऱ्या कवीच्या/संगीतकाराच्या प्रगल्भ विचारातून आणि त्यातून मिळालेल्या उच्च आध्यात्मिक अनुभूतीतून त्याला हे जाणवलेलं असत की सच्चा सूर हा कुठल्याही कलाकाराच्या किंवा घराण्याच्या मालकीचा नसतो आणि असा निरागस सूरच स्वर्गीय आनंद देऊ शकतो. आपली निरागसताही आपलं जीवन सुरेल आणि आनंदमयी करू शकते. प्रश्न आहे तो ती जाणीवपूर्वक जपण्याचा.
अंजली श्रोत्रिय – health.myright@gmail.com