जनाबाईच्या बोलण्याचं मला खूप कौतुक वाटलं. बायकांकडे जाणं, चार चार चकरा मारणं, प्रत्येकीला हसून पटवून सांगणं या तिच्या धडपडीमुळेच तिला एवढे गट मिळाले. म्हणूनच तर तिने केलेल्या मार्केटिंगचं तोंडभरून कौतुक करून आम्ही घरी परत निघालो.
नुकतीच तुळशीच्या लग्नाची धामधूम संपली होती. हवेत थोडासा गारवा जाणवू लागला होता. सकाळी सहाची वेळ.. इतक्यात बेल वाजली.. दारात एक स्त्री उभी होती.
‘‘कोण गं तू? आणि इतक्या सकाळीच काय काम काढलेस?’’ मी विचारलं.. डोक्यावरील पदर खाली घेत तिने मला हसून विचारलं, ‘‘बाई वळखीलं न्हाई का मले, अवो मी जनाबाई कुंबारीण. मागल्या साली तुमी मला लुगडं आणून दिलं व्हतं..’’ तिने मला आठवण करून दिली. ‘‘बरं बरं.. पण आता काय काम आहे तुझं?’’ मी वैतागून विचारलं.
‘‘अवो बाई पुसाचा मयना जवळ आला न्हाई का? मनून मी आले तुमास्नी आठवण द्यायला..’’
‘‘कसली गं आठवण?’’
‘‘मागल्या साली तुमी आतारांचं (हळदी-कुंकवाचं) वाण दिलंत. आता या साली कुंभाराचं वाण करता का मनून पुसाया आले..’’
‘‘अगं, आता कुठे नोव्हेंबर महिना सुरू आहे. आणखी खूप वेळ आहे. तू जा आता. मी नंतर निरोप देते.’’
‘‘नाई वो बाई, तुमाला आता आठवण केली म्हणजे तुमी मीटिंग घेताल.. सगळय़ा बायांचा इचार घेताल. मनून लवकर आले बघा.’’
‘‘बरं बरं सांगते मी.’’ असं म्हणून तिला कसंबसं कटवून मी घरात आले. २/३ दिवसांनी मी सुधाकडे गेले होते. तिनं मला विचारलं, ‘‘अगं संक्रातीच्या वाणाचं काही ठरलं का?’’
‘‘छे गं आत्ताच कुठे? तुमचं काय ठरलं?’’
‘‘आमची झाली ना मीटिंग.. कुंभाराचा आवा (सुगडं) लुटणार आहोत आम्ही.. सगळय़ा मिळून १५ जणी आहोत आम्ही.. प्रत्येकी १०० रुपये खर्च येणार आहे.’’
‘‘अगंबाई अजून खूप वेळ आहे. एवढय़ा लवकर ठरवलंत?’’
‘अगं असं काय करतेस? सुधाने मलाच वेडय़ात काढलं. आता हा महिना निघून जाईल. आणि मग वेळेवर गडबड होते ना. ती कुंभारीण ८/१० दिवसांपूर्वीच येऊन गेली म्हणून बरं झालं.’’
‘‘कोण गं जनाबाई आली होती का? सकाळी सकाळी?’’
‘‘अगं तुला कसं कळलं?’’ सुधानं विचारलं.
‘‘जाऊ दे.. चल निघते मी, आमचं अजून सगळं ठरायचं आहे.’’ असं म्हणून मी तिचा निरोप घेतला. २/३ दिवसांनी आमच्या मैत्रिणींची बैठक झाली व सर्वानुमते कुंभाराचे वाण करायचं ठरलं.. आता त्या जनाबाईला फोन करावा या विचारात मी होते, पण जनाबाईच विचारायला आली. मणी, मंगळसूत्र, जोडवे, जनाबाईला लुगडे, तिच्या नवऱ्याला धोतरजोडा, तिच्या मुलाला कपडे ही सगळी जमवाजमव करण्यात ८/१० दिवस निघून गेले आणि संक्रातीचा दिवस उगवला. सणाच्या दिवशी सगळय़ांचीच गडबड म्हणून आम्ही सकाळी ११ ची वेळ ठरवली आणि पुजेचं साहित्य घेऊन एके ठिकाणी जमलो. जनाबाईने आश्वासन दिल्याप्रमाणे ठीक अकरा वाजता बँडवाला हजर झाला. आणि ठरलेल्या वेळेला आम्ही सगळय़ा मैत्रिणी तयार होऊन वाजत गाजत जनाबाईच्या घरी निघालो. दहा मिनिटांच्या अंतरावरच जनाबाईचे घर होते. जनाबाईने शेणाचा सडा टाकून अंगण स्वच्छ केले होते. समोरच भली मोठी रांगोळी काढली होती. आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला,  कारण आमच्यासारखे २/३ गट असतील असे आम्हाला वाटले होते. पण जवळ जवळ १५/२० ठिकाणी जनाबाईने आवे (सुगडे) रचून ठेवले होते व प्रत्येक ठिकाणी पुजेची जय्यत तयारी करून ठेवली होती.
आमचा ग्रुप गेल्यावर जनाबाईने आमचे हसतमुखाने स्वागत केलं, ‘‘चला बाई बसा सगळय़ा गोल करून.’’ तिने आम्हाला ऑर्डर सोडली. ‘चला जोशी काका, आटपा लवकर लई टाइम झाला.’ तिने जोशी गुरुजींना आवाज दिला. तिचा आवाज ऐकून जोशी काकांनी पहिली पूजा आटोपली व आमच्या गटाला पूजा सांगण्यासाठी येऊन बसले. त्यांनी व्यवस्थित पूजा सांगितली. आमची यथासांग पूजा झाल्यावर सगळय़ा कुंडय़ा आम्हाला मोजून दिल्या. जनाबाईची एक रिक्षा तिथे उभीच होती. त्या रिक्षामध्ये तिने सगळय़ा कुंडय़ा भरल्या व रिक्षावाल्या मामाला पत्ता सांगून घरी पोचवायला सांगितल्या.
निघताना मी जनाबाईला म्हटलं, ‘‘एवढे १५/२० गट झाले त्यामुळे तुला खूप तयारी करावी लागली असेल नाही का?’’ त्यावर जनाबाई हसून म्हणाली. ‘‘मनून तर बाई २/३ म्हयन्यापासून माझी पायपीट सुरूच हाय. तवा कुठं माझी वर्षांची बेगमी होतेय बगा.’’
जनाबाईच्या बोलण्याचं मला खूप कौतुक वाटलं. बायकांकडे जाणं, चार चार चकरा मारणं, प्रत्येकीला हसून पटवून सांगणं या तिच्या धडपडीमुळेच तिला एवढे गट मिळाले. म्हणूनच तर तिने केलेल्या मार्केìटगचं तोंडभरून कौतुक करून आम्ही घरी परत निघालो.
 बँडचा आवाज ऐकू आला. बघते तो काय, सुधाचा ग्रुप वाजत गाजत येत होता. मला हसू आलं. एवढय़ा उशीर ठरवूनही आमचा ग्रुप सुधाच्या ग्रुपच्या आधी जाऊन पूजा करून आलो. या आनंदात मी सुधाकडे विजयी मुद्रेने पाहिलं व तिला हात हलवून घराकडे परतले..    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा