दहा मैत्रिणींनी प्रयोग केला तो एकत्र, सामूहिक शेती करण्याचा. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या या स्त्रियांच्या हातात जमिनीचा वीतभर तुकडाही नव्हता. पण मनात कल्पना आली की त्याला सहजतेने पुढची वाटही दिसत जातेच, तसेच या मैत्रिणींचे झाले. या पहिल्याच प्रयत्नात त्यांना इतकं यश मिळालं की आता या दहा जणींनी पुढील सात वर्षांसाठी एक एकर शेतजमीन भाडेपट्टय़ावर घेतली आहे आणि त्यात धानाची (तांदूळ) लागवड केली आहे- या मैत्रिणींची ही यशोगाथा.
एकेकटय़ा बाईने आपल्यापुरता रोजगार शोधण्यापेक्षा एकत्र येऊन रोजगार कमावणे अधिक बरे ही शिकवण निसर्गानेच या गावाला दिली असावी. धानोरा नावाचे हे जेमतेम ३० कुटुंबाचे आणि सव्वाशे लोकसंख्येचे. नागपूर- गडचिरोली मार्गावरील गाव. गावातील मुलांना शाळेसाठी जंगल पार करत दोन किलोमीटर अंतरावरच्या मरेगावात जावे लागते आणि मुलांच्या आयांना भाकरीचे पीठ दळण्यासाठीही मरेगावमधील चक्कीचा आश्रय घ्यावा लागतो. जंगल पार करायचे म्हणजे एखादे जनावर वाटेत भेटणारच आणि हे जनावर डुक्कर-हरणासारखेअसू शकते तसेच एखाद्या अवचित वेळी वाघासारखेही.. त्यामुळे आडव्या-तिडव्या पावसाचा हंगाम सुरू झाला की मुलं वहीच्या पानांच्या होडय़ा करीत घरीच बसतात आणि बायकाही चक्कीत जायला नाखूश असतात. कोणत्याही कामासाठी एकेकटय़ाने जंगल ओलांडण्यापेक्षा चार सख्या-बाया सोबतीला घेतलेल्या बऱ्या असाच विचार करणाऱ्या या सख्यांनी एकत्र शेतीचा प्रयोग केल्यास नवल ते काय..
जयदुर्गा माता महिला बचत गटाच्या या दहा मैत्रिणींनी प्रयोग केला आहे तो एकत्र, सामूहिक शेती करण्याचा. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या या स्त्रियांच्या हातात जमिनीचा वीतभर तुकडाही नव्हता. पण मनात कल्पना आली की त्याला सहजतेने पुढची वाटही दिसत जातेच, तसेच या मैत्रिणींचे झाले. गावातील बबलू जयस्वाल या शेतकऱ्यांकडील जमिनीपैकी दोन एकरचा तुकडा या दहा बायकांनी भाडेपट्टीवर मागितला. भाडे देण्यासाठी तेव्हा त्यांच्या कडोसरीला काही चिल्लरच असावी, पण प्रयोग करून बघण्याची तीव्र इच्छा मनात होती. चार महिन्यांचे भाडे ठरले आठ हजार रुपये. पण त्यात पिकाला द्यावे लागणारे पाणी आणि जमीन मोकळी करण्यासाठी गरजेचा असणारा ट्रॅक्टर या दोन गोष्टी त्यांना मिळणार होत्या. अर्थात पीक काढण्यासाठी फक्त जमीन आणि पाणी पुरेसे नव्हते. बियाणे आणि खतांचा खर्च होताच. शिवाय शेजारच्या जंगलातील एखाद्या जनावराने येऊन उभे पीक साफ करू नये, यासाठी रात्री रखवालदार नेमणेही आवश्यक होते. मग सगळ्या बायकांनी घरातील गाडग्या- मडक्यात तांदूळ- डाळीच्या डब्यात लपवून ठेवलेल्या नोटांच्या पुरचुंडी मोजल्या आणि सर्वाचे जेमतेम पैसे गोळा केले आणि भाज्यांच्या बिया- रोपे आणली. भाज्या म्हणजे चट्कन येणारे आणि रोख पैसे देणारे पीक. त्यामुळे कांदा, पालक, चवळी, मेथी, लाल भोपळा याच्या बिया- रोपे मातीखाली विसावली आणि बायकांची निगुतीने देखभाल सुरू झाली. औषध- पाणी, तण काढणे, वेलींना मांडवावर चढवणं अशी काम या सगळ्याजणी दिवसभर करीत होत्या. स्वत:च्या बळावर केलेल्या लागवडीची देखभाल करताना एक वेगळा आनंद होता, पण भविष्याची उत्सुकताही होती. बँकेतील पैशाची थोडीही ऊब नसताना मुठीत असलेली चिमूटभर सुरक्षितताही त्या बायकांनी शब्दश: मातीत घातली होती. काय फळ मिळाले या साहसाचे? तब्बल ९२ हजार रुपये! बायकांनी लावलेल्या ३० हजारांच्या रोपांना एवढे घसघशीत फळ लागले होते. भाज्या कापणे, जुडय़ा बांधणे वगैरे प्राथमिक काम या दहा जणींनी केल्यावर सिंदेवाहीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी मात्र त्यांचे पती गेले. गुंतवलेल्या रकमेचा आणि कष्टांचा असा तिपटीने परतावा मिळाल्यावर आपला हा प्रयोग आपल्याला यापुढेही नक्कीच हात देईल, असा विश्वास या बायकांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
आता या दहा जणींनी पुढील सात वर्षांसाठी एक एकर शेतजमीन पुन्हा भाडेपट्टय़ावर घेतली आहे आणि त्यात धानाची (तांदूळ) लागवड केली आहे. सलामे यांच्या या शेतीत विहीर नाही, पण जवळ असलेल्या तलावाचे पाणी त्यांना या पिकासाठी मिळते आहे. भाजी विक्रीतून मिळालेला सगळा पैसा या धोरणी महिलांनी बँकेत जमा केला. अगदी स्वत:च्या घरातून त्यांनी जो पैसे उभा केला होता तोही त्यांनी परत घेतला नाही. फक्त शेताचे भाडे, २९ हजार रुपये मात्र त्यांनी बँकेत ठेवलेल्या पैशातून काढले. आता पुन्हा लागवडीचा खर्च होता. १२०० रुपयांचे बी, पंधराशेचे खत, शिवाय ट्रॅक्टरचे भांडे १५००, तर नांगरणीचे ३००. पण पुन्हा बायकांनी घराचे कानाकोपरे धुंडाळले. थोडय़ा रोजच्या मजुरीतील पैसे घेत प्रत्येकी ४०० रुपये गोळा केले. आता धानाची लागवड झाली आहे. जानेवारीत पीक कापणीस येईल, तोपर्यंत तण काढण्याचे आणि गरजेप्रमाणे खत देण्याचे काम त्या करतात. शिवाय इतरांच्या शेतात मजुरीसाठी जातात. बबलू जयस्वालचे शेत जवळ होते. त्यावेळी केव्हाही शेतात जाण्याची सोय त्यांना होती. आताची शेतजमीन मात्र गावापासून दूर जंगलाजवळ आहे.
अशी एकत्र शेती करण्याचा हा आत्मविश्वास या स्त्रियांना आला तरी कुठून? तर सगळ्यात आधी त्यांनी केलेल्या पत्रावळ प्रयोगातून..! गावाला रोजगाराच्या नव्या साधनांची ओळख व्हावी म्हणून ..संस्थेचा एक भाग असलेली ‘मित्रा’ संस्था प्रयत्न करीत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मैत्रिणी पत्रावळी टोचायला शिकल्या. रोज सगळ्या एकत्र जमून सरासरी दोन-तीनशे पत्रावळी बनवत. सगळ्यांनी मिळून थोडय़ा थोडक्या नाही तर तब्बल १६ हजार पत्रावळी बनवून त्या एका आदिवासी मेळाव्यात विकल्या. या पहिल्या प्रयोगाने या गटामधील प्रत्येकीला तीन-तीन हजार रुपये जेव्हा मिळाले, तेव्हा जणू या सगळ्या मैत्रिणींना स्वत:ची नव्याने ओळख झाली. गरिबीच्या विळख्यातून मान सोडवून घेत नव्या दमाने श्वास घेण्याइतकी तरतरी त्यांना आली. ‘मित्रा’ची साथ असल्याने भाजीपाला लागवडीचे तंत्र, अडचणी हे शिक्षण मिळणे त्यांना शक्य होते. या बळावरच त्यांनी पहिले पाऊल उचलले.
शेतीची गणिते अशी कागदावर आकडेमोड करून कधीच यशस्वी होत नसतात आणि अपेक्षेएवढे दानही पदरात टाकत नसतात. हे समजण्याइतपत या मैत्रिणी शहाण्यासुरत्या आहेत. पण धोका पत्करल्याशिवाय कोंडी फुटत नाही, वाट दिसत नाही हेही त्यांना ठाऊक आहे. या दहाजणींपैकी पाच मैत्रिणींनी दहावी- बारावीपर्यंत मजल मारली आहे. पण शिक्षणाचा कागद त्यांच्यामध्ये कधी अडथळा होऊन उभा राहिला नाही. या दहापैकी भाग्यश्री, सीता, पुष्पा, निर्मला, कल्पना, लता आणि रंजू या वाकडे कुटुंबामधील आणि गटाच्या अध्यक्ष वंदना, सरस्वती व गीता या दांडेकर परिवारातील. आता शेतात काम करता करता रोज त्या स्वप्नं बघत असतात. तरारून वाढलेल्या धानाचे कारण हेच असावे. छोटय़ा स्वप्नांतूनच मोठी स्वप्नं जन्माला येत असतात ना !    
vratre@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा