मराठी वृत्तपत्रासाठी लिहिण्याचा हा पहिलाच अनुभव असून उत्साह आणि साशंकतेतून सुरू झालेल्या या सदर लेखनाच्या प्रवासाचं रूपांतर प्रगतीत, शिकण्यात आणि लोकांशी जोडलं जाण्यात झाली. या सदरामुळे घडलेला संवाद, ईमेल्स, वाचकांच्या अनुभवांची देवाणघेवाण, ऐकायला मिळालेल्या रंजक कथा यामुळे हे केवळ एक सदर न राहता यातून छानसा लेखकवाचक समूह तयार झाला. वाचकांसोबत या वाटेवर चालताना आलेल्या विविध अनुभवांचा धांडोळा घेणारा हा शेवटचा लेख.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ची दिवाळी माझ्यासाठी खासच होती. लोकसत्ता ‘चतुरंग पुरवणी’त २०२४ मध्ये संपूर्ण वर्षभर एक सदर लिहायचा प्रस्ताव देणारा संपादकांचा दूरध्वनी आला. फोन ठेवल्याक्षणी माझ्या उत्साहाला उधाण आलं. उत्सुकता आणि दडपण अशा संमिश्र भावना माझ्या मनामध्ये प्रतिबिंबित होत होत्या. त्या क्षणी मला आठवलं… संधी ही नेहमी अचानकच येते. फक्त उत्साह आणि धाडस अंगी बाणवत ती योग्य वेळी येणारच याच्यावर विश्वास ठेवायला हवा.

मी रोमांचित झालो होतो का? नक्कीच! घाबरलो होतो? शंभर टक्के! पुस्तकं लिहिण्याचा, वर्तमानपत्रात काही प्रासंगिक लेखन करण्याचा, कोचिंगमध्ये माझं वेगळं स्थान निर्माण करण्याचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला, तरी मराठीत स्तंभ लिहिण्याचा मात्र हा पहिलाच अनुभव होता. मी जरी एक कोच असलो तरी आधी मी एक माणूस आहे. याचाच अर्थ हा की, माझ्याही स्वत:च्या बाबतीत काही समजुती आहेत, ज्या मला आजही मागे खेचतात. माझ्यातही काही विशिष्ट गोष्टींचं भय आहे आणि याचमुळे मी माणूस आहे.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : तणावावरचा उपाय

त्या पुढच्या आठवड्यात संपादक आणि माझं सविस्तर बोलणं झालं आणि सदर सुरू झालं. आजचा ‘चतुरंग’साठी लिहिलेला हा माझा २६वा लेख आहे. एक वर्ष संपत आलं आणि तरीसुद्धा या साऱ्याची सुरुवात अगदी कालच झालीय असंच वाटतंय. उत्साह आणि भीतीतून सुरू झालेल्या या प्रवासाचं रूपांतर प्रगतीत, शिकण्यात आणि लोकांशी जोडलं जाण्यात झाली. ‘जिंकावे नि जगावेही’ या सदराच्या आजच्या शेवटच्या लेखात तुम्हा वाचकांसोबत या वाटेवर चालताना आलेल्या अनुभवांचा धांडोळा घ्यावासा वाटतो. मात्र हे समारोपाचे शब्द नाहीत तर आजवर आपण आपापसांत जे काही वाटून घेतलं त्याचाच हा थोडक्यात परामर्श…

या संपूर्ण वर्षभरात माझ्यापर्यंत ज्या प्रतिक्रिया आल्या त्यांनी मी खरोखर भारावून गेलो. शेकडो ई-मेल्स, त्यात प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आणि प्रत्येक ई-मेल माझ्या शब्दांनी तुमच्यातलं स्फुल्लिंग कसं चेतवलं गेलं, याबद्दल भरभरून सांगणारा…!

सर्वांत पहिला इ-मेल मुंबईतल्या एका वाचकाचा होता. या सदराच्या आधी ३० डिसेंबर रोजी ‘चतुरंग’मध्येच प्रसिद्ध झालेला माझा ‘चिरकालीन यशाच्या दिशेने…’ हा लेख अनेक वेळा वाचल्यानंतर त्याला कसल्या तरी गाढ सुस्तीतून कोणीतरी खडबडून जागं करत असल्याची तीव्र जाणीव झाली, याबद्दल त्यानं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. त्याच्या शब्दांतून केवळ त्याचा अनुभव डोकावत नव्हता, तर एखादी कल्पना जेव्हा अंतरात्म्याला भिडते तेव्हा तिचं सामर्थ्य किती अफाट असतं, हेही त्याच्या प्रतिक्रियेतून प्रकर्षानं जाणवत होतं.

आणखी एक प्रतिक्रिया पुण्यातल्या एका तरुणाची होती. अनिश्चितता आणि संदिग्धतेच्या परिस्थितीत स्पष्टपणे विचार कसा करावा, याबाबत माझ्या लेखनानं त्याला दिशा मिळाल्याचं त्यानं म्हटलं होतं. जालना जिल्ह्यातल्या आणखी एका तरुणाची प्रतिक्रिया मला प्रकर्षाने आठवते. त्याला ‘छायाचित्रण’ आणि ‘नाटक’ या दोन्ही विषयांमध्ये अत्यंत रस होता. तरीही, त्याने पाहिलेली स्वप्नं आणि कुटुंबाच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा यामध्ये इतर अनेक जणांसारखीच त्याचीही रस्सीखेच सुरू झाली. दबावाला बळी पडून त्याने अभियांत्रिकीचं शिक्षण तर सुरू ठेवलं, पण त्याचबरोबर गुपचूप ‘नाट्यशास्त्रा’च्या पदविका अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला. दिवसा अभियांत्रिकीचा अभ्यास आणि रात्री नाट्यशास्त्राचे धडे गिरवण्यात त्याचा वेळा जाऊ लागला. पण दिवस आणि रात्रीच्या दोन वेगवेगळ्या जगांमध्ये तितक्याच सफाईदारपणे वावरणं त्याला कठीण जाऊ लागलं. तो कमालीचा हताश, हरवल्यासारखा आणि निराश झाला. त्याची ही अगतिकता बघून माझ्याही काळजात काही तरी हललं. आपल्यातल्या कित्येक जणांची स्वप्नं, ध्येयं अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरून जातात आणि मग आपण अशा वळणावर येऊन उभे राहतो, जिथून आपली स्वप्नं आपल्यापासून दूर जाताना, धूसर होताना, विखरून जाताना दिसतात.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : खरी संपत्ती

त्याची अतिशय मार्मिक अशी कथा आपल्याला आठवण करून देते की, आपल्यातल्या सर्वाधिक ध्येयवेड्या व्यक्तीलाही कधी कधी वाट चुकल्याचा, भरकटल्याचा अनुभव येऊ शकतो. पण वाट चुकणं हा काही शेवट नव्हे. तर थोडं थांबून, विचार करून, पुन्हा नव्या उमेदीनं इंधन भरून आणि डागडुजी करून प्रवासाला निघण्यासाठी मिळालेला हा एक संकेत असतो. मी त्याला या वास्तवाची फक्त जाणीव करून दिली.

त्याच्या स्वप्नांचा पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्या दिशेनं लहान लहान का होईना, अडखळत का होईना पण पावलं टाकत राहण्यासाठी मी त्याला प्रोत्साहन दिलं. त्यासाठी सर्वप्रथम करायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ची मानसिकता बदलणं आणि स्वत:वर काम करण्यासाठी वचनबद्ध असणं. यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून मी त्याला माझं एक पुस्तक विकत घेऊन वाचायचा सल्ला दिला. पण एका अटीवर, रोज कोणत्याही प्रकरणातलं कोणतंही पान उघडून पंधरा मिनिटं त्याचं वाचन करायचं आणि रात्री त्या वाचलेल्या भागातून आपण काय शिकलो, कोणता धडा घेतला आणि तो प्रत्यक्षात आपण कसा उपयोगात आणू शकतो, याबद्दल लिहून काढायचं. या सगळ्या प्रकाराबद्दल त्याच्या मनात सुरुवातीला फारच अनिश्चितता होती, पण तरीही तो या प्रयोगासाठी तयार झाला. जसजसे दिवस गेले, तसतसं शंका आणि प्रश्नांनी भरलेल्या त्याच्या ईमेल्सचं रूपांतर आशादायक आणि कृतिशील विचारांमध्ये झालं. त्याचा हा सगळा प्रवास थक्क करणारा होता. लहान लहान पण जाणीवपूर्वक पावलं टाकत आपण पुन्हा सुरुवात करू शकतो, याचीच आठवण करून देणारा हा प्रवास होता. बदल कधीच एका रात्रीत घडत नाही. तो टप्प्याटप्प्याने घडत जातो. परिस्थिती कितीही अवघड असली, तरी हार न मानता लढत राहण्याची जिगर दाखवली, की बदल घडू लागतो. त्याच्या या प्रवासातून छोट्या छोट्या, पण जाणीवपूर्वक केलेल्या कृतींचं महत्त्व अधोरेखित होतं. सातत्य आणि लवचीकतेची जोड दिली की छोट्या छोट्या कृतींमध्येसुद्धा कायापालट घडवण्याची ताकद निर्माण होते. त्याच्यासाठी ते २१ दिवस म्हणजे नुसतं वाचायचं आव्हान नव्हतं तर त्याच्या सजगतेनं जगण्याच्या आणि स्वत:चं खरं सामर्थ्य ओळखण्याच्या प्रवासाची ती सुरुवात होती.

अर्थातच, प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्यात समीक्षकांचा सहभागही मोलाचा असतो. माझ्या या सदराच्या सुरुवातीच्या काही दिवसांत मला आलेली एक प्रतिक्रिया अशी होती की, माझं लिखाण हे बरचसं तंत्राच्या अंगानं जाणारं आणि बौद्धिक आहे, त्यात हृदयाला हात घालणारं असं काही सापडत नाही. पहिल्यांदा हे शब्द फार बोचले, अर्थातच टीका बोचतेच! पण यामुळे हिरमोड होऊ न देता याचा खोलवर विचार करून बघू असं ठरवलं. त्या प्रतिक्रियेमुळे माझं लिखाण वाचकांच्या हृदयापर्यंत खरंच पोहोचतंय की नाही हे पडताळून पाहायला मी उद्युक्त झालो. यामुळे माझ्या लेखनशैलीत काहीसा बदल झाला. गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत सांगणं, त्यांच्याशी मिळतीजुळती उदाहरणं देणं, आणि हे लेखन म्हणजे वाचकांशी संवाद आहे अशा स्वरूपाची सहजता त्यात येईल या पद्धतीनं मी लिहू लागलो. काही महिन्यांनंतर त्याच स्त्री वाचकाचा मला पुन्हा इ-मेल आला, आता ती माझी नियमित वाचक तर झालीच होती शिवाय माझ्या लेखनशैलीतले बदलही तिला आवडले होते. हे तिनं त्या मेलमध्ये आवर्जून सांगितलं होतं. त्या क्षणी मला स्पष्ट जाणीव झाली की समीक्षक हे केवळ टीकाकार नसतात, तर आपल्याच अनेक दुर्लक्षित बाजू आपल्याला दाखवणारे आरसे असतात. त्या स्त्री वाचकाच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे.

हे वर्ष अविस्मरणीय करणाऱ्या असंख्य प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया होत्या. आपल्या असुरक्षिततेत, अस्वस्थतेत दडलेलं काही तरी करून दाखवण्याचं बीज, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं धाडस आणि प्रत्येक जण आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून ज्या प्रकारे जात असतो. त्या सर्व गोष्टींची आठवण या प्रतिक्रियांमुळे झाली. यातून हेही अधोरेखित होतं की हे फक्त ‘माझं’ नाही, तर ‘आपलं’ सदर होतं. आपल्यामध्ये घडलेला संवाद, इ-मेल्स, शेअर केलेले अनुभव आणि तुम्हा सर्वांकडून ऐकायला मिळालेल्या वेगवेगळ्या रंजक कथा, यामुळे हे केवळ एक सदर न राहता आपला एक छानसा लेखक-वाचक समूह तयार झाला.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…

या लेखनप्रवासात मला सोबत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. ज्यांनी हे सदर शांतपणे, मूकपणे वाचलं, त्यांची उपस्थिती मला प्रत्येक क्षणी जाणवली. ज्यांनी वेळात वेळ काढून प्रतिसाद दिला, त्यांनी त्यांच्या कथा, संघर्ष आणि त्या संघर्षावर मिळवलेला विजय या साऱ्या गोष्टी शेअर केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अधिकाधिक सशक्त आणि हृदयस्पर्शी लेखन करण्यासाठी मला उद्युक्त करणाऱ्या समीक्षकांचेही आभार.

याशिवाय या प्रवासात मूकपणे पण खंबीर पाठिंबा देणाऱ्या आणखी दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. माझी पत्नी कविता, जी नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली, माझा प्रत्येक लेख बारकाईनं वाचून त्यातून मला जे मनापासून सांगायचंय तोच आशय अधोरेखित होतोय की नाही याकडे तिनं उत्तम लक्ष पुरवलं. तिच्याच बरोबरीने कृतज्ञता व्यक्त करावी अशी आणखी एक व्यक्ती म्हणजे प्राजक्ता टाकसाळे, माझ्या विचारांना अतिशय सुंदर सुबक पद्धतीनं लेखाचं मूर्त रूप देण्यात तिच्या मराठी भाषाकौशल्याचा फार महत्त्वाचा वाटा आहे. तिच्या उत्कृष्ट शब्दांकनामुळेच या लेखांमधल्या प्रत्येक शब्दात ऊर्जा आणि चैतन्य आलं.

या लेखाचा आणि पर्यायाने या सदराचाही समारोप करताना आपण सर्वांनी मिळून जे सजग जीवनाचं बीजारोपण केलंय, ते बीज तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतरात अंकुरेल अशी आशा व्यक्त करतो. हा काही ‘अलविदा’ नाही, उलट सजगतेनं जगण्याचं नि जिंकण्याचं ध्येय जोमानं जोपासत अनोख्या पद्धतीनं मार्गक्रमण करण्यासाठी माझ्या प्रत्येक वाचकाला दिलेलं हे खंबीर प्रोत्साहन आहे. भविष्यात आपल्यापुढं असंख्य शक्यता उलगडत जातील आणि प्रिय वाचकहो, त्या शक्यतांमधून तुमच्या अंतरात्म्याला सर्वार्थानं सुख देणारं, समर्पक, समाधानी आयुष्य घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये निश्चितच आहे, हे कायम लक्षात असू द्या…!!

sanket@sanketpai.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jinkave ani jagavehi last article about mindful life mrj