शरीराला इजा झाली तर मदत घेण्यात आणि करण्यात कोणाला काहीही वाटत नाही. याविरुद्ध मनाची इजा मात्र माणूस म्हणून कमीपणाची, लाजिरवाणी आणि लपवण्यासारखी आहे, असं मानलं जातं. या मानसिक वेदनेबाबतच्या गैरसमजुतींचा सामना करण्यासाठी कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी. त्याबरोबरच भावनिक आस्था असणाऱ्या मंडळींनीही सक्रिय होणं गरजेचं आहे. मनआजारांवरचा कलंक पुसायलाच हवा.

मुंबईच्या ‘केईएम’ रुग्णालया- समोरच्या इराण्याच्या दुकानात मी आणि माझे चार मामा बसलो होतो. माझी आजी, म्हणजे या सर्वांची आई, तिला या रुग्णालयात दाखल केले होते. प्रसंग गंभीर होता. माझ्या पाचव्या मामाला ‘स्किझोफ्रेनिया’ हा दुर्धर मानसिक आजार होता. अनेक वर्षं मनोरुग्णालयांमध्ये घालवल्यावर त्याला पुन्हा सर्व कुटुंबीयांसमवेत राहायची संधी या साऱ्यांनी दिली होती.

मानसोपचारशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या माझा, या प्रक्रियेत खारीचा वाटा होता. ठाण्याच्या मनोरुग्णालयातून तो आमच्या ठाण्याच्या घरी ‘राहायला’ आला तेव्हा इंग्रजी ‘टाइम्स’ हातात घेऊन म्हणाला होता, ‘‘कॅलिग्राफी आणि मास्टहेड बदलला यांनी!’’ हे दोन्ही इंग्रजी शब्द म्हणजे त्याच्या, एम.ए. (इंग्रजी साहित्य)चे अवशेष होते. मध्ये दोन दशकांचा अंधार. त्या काळात आमची आजी आणि हा उमामामा अशा दोघांची काळजी घेत होते, माझा अण्णामामा आणि शोभामामी.

‘‘आमच्यातसुद्धा असणार ना रे थोडी थोडी मेंटल डिसऑर्डर?’’ अण्णामामा म्हणाला. सगळे हसले. मी माझ्या आधीपासूनच्या निरीक्षणांवर, मानसोपचारतज्ज्ञाच्या दृष्टीचा ‘स्कॅनर’ लावून बोलायला लागलो. हे मामा आणि त्यांच्या तीन बहिणी (त्यातली एक माझी आई) यांच्यामध्ये दोन वृत्ती प्रबळ होत्या. नेमकेपणाचा हट्ट, व्यवस्थितपणाचा हेका आणि स्वत:चं ‘परफेक्शन’ इतरांनी पाळावं असा जरबयुक्त आग्रह. आम्ही एक ते दहाची मोजपट्टी लावून सर्वांना गुण दिले. ‘पटकन विश्वास न ठेवण्याची वृत्ती’ हा स्वभावातला दुसरा भाग. या गोष्टीचा फायदाही होऊ शकतो, असं मी म्हणताच चौघांनीही कान टवकारले. त्यातले दोन मामा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, एक सैन्य दलात तर एक पोलीस अधिकारी.

एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या वृत्ती, स्वभावविशेष (Traits) कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या तीव्रतेने व्यक्त होतात ते महत्त्वाचे. या वृत्तीचा वास्तवाशी असलेला धागा तुटायला नको. या जगातील विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वृत्ती वापरायला हव्यात. ‘‘तुम्ही चौघांनी या चौकटी सांभाळल्या म्हणून तुम्ही यशस्वी ठरलात… ऐन तारुण्यामध्ये झालेल्या मेंदूतील रासायनिक घटकांनी उमामामाला ग्रासलं. त्यामुळे त्याच्या मनानं स्वत:चं वास्तव निर्माण केलं. अविश्वास वाढत जाऊन त्याचा संशयी दुष्टग्रह झाला. नेमकेपणाच्या स्वभावामधला ‘ताठरपणा’ (Rigidity) त्यामध्ये उतरला.’’ मी बोलत होतो आणि एकचित्त होऊन ते सारे ऐकत होते. त्यानंतर आमची खूप चर्चा झाली, जेनेटिक्सपासून कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांपर्यंत. मी म्हणालो, ‘‘तुम्हा भावंडांच्या स्वभावाचा हा असा तक्ता कोणी केला होता का आतापर्यंत?’’ त्यांनी नकारार्थी माना डोलावल्या. स्वत:ला आणि इतरांना दिलेल्या ‘गुणां’वर मनसोक्त हसून आम्ही पुन्हा ‘आयसीयू’च्या वाटेला लागलो.

तेव्हा मी नुकतीच एम.डी. परीक्षा पास झालो होतो. काही दिवसांतच आजी गेली. उमामामा मात्र अगदी ‘करोना’ काळापर्यंत जगला. माझ्यानंतर मानसोपचारतज्ज्ञ झालेल्या मामेबहिणीच्या रायपूरमधल्या रुग्णालयामध्ये त्याचे शेवटचे दिवसही मायेच्या वातावरणात गेले. मधल्या काळात कुटुंबाने त्याच्यासाठी ‘स्पेशल ट्रस्ट’ करण्यापासून ते जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यापर्यंत सर्व व्यवस्था लावली (नेमकेपणा?) आणि मामे-मावस भावंडांतल्या काही जणांनी ही प्रेमाची जबाबदारी काळजीपूर्वक निभावली. (वंशशास्त्राचा वारसा?)
त्या संध्याकाळचे माझे आणि माझ्या मामांमधले संभाषण हा माझ्यामधल्या ‘मनआरोग्य’ कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा धडा होता. ही घटना ४० वर्षांपूर्वीची आहे. मानसिक आजारांवरच्या गैरसमजुतींचा जोमाने सामना करायचा तर कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी. दुसरी कोणतीच व्यवस्था हे अंगावर घेणार नाहीत आणि कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नव्हेत तर भावनिक आस्था असलेली मंडळी आपापल्या वर्तुळात कार्यरत, सक्रिय होणंही तितकंच महत्त्वाचं.

मानसिक आजारांबद्दलचा कलंक (स्टिग्मा) म्हणजे विचारांची नेमकी कोणती पद्धत? समाज असं समजतो की, ‘मनाचे आजार’ ही गोष्ट माणूस म्हणून कमीपणाची, लाजिरवाणी आणि लपवण्यासारखी आहे. हाच दृष्टिकोन व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळ्यांवर गिरवला जातो. विस्तारभयास्तव इथं या दृष्टिकोनाच्या इतिहासात जात नाही. शरीराला इजा पोहोचली तर मदत घेण्यात आणि करण्यामध्ये ‘शरम’ वाटण्यासारखं काही नसतं. ‘माझं मन माझ्या ताब्यात राहायला हवं,’ असा अवास्तव अट्टहास असल्यानं तसं न झाल्यास ‘कमकुवत मनाचा माणूस’ अशी उपाधी मी स्वत:ला लावतो. माझ्या मामाच्या आजाराबद्दल आम्हा लहान मुलांपर्यंत कोणतीही माहिती येऊ नये ही दक्षता सर्व मोठे घ्यायचे. कुष्ठरोग, त्वचेला येणारे कोड अशा शारीरिक स्थितींबद्दलही हाच ‘स्टिग्मा’ असतो. ‘नकारात्मक दृष्टिकोनाची पकड, तयार करते दुराभिमानाची झापड’, ‘माझा मानसिक ‘नॉर्मलपणा’ हा दागिना आहे आणि जो माणूस भावनांनी दुर्बल टप्प्यामधून जातोय तो जगण्याच्या प्रवासात निरुपयोगी,’ असे विचार मानसिक आजाराचा ‘स्टिग्मा’ म्हणून केले जातात. ‘एमबीबीएस’ उत्तीर्ण झाल्यानंतर मी मनोविकार क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्याला माझ्या आईने कसून विरोध करण्याचं कारण या दृष्टिकोनातून आलं होतं. वेड्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरही त्या दोषामध्ये सापडतात, या विधानाला तिने न तपासता स्वीकारलं होतं.

आताच्या काळात, खासकरून ‘करोना’नंतरच्या वर्षांमध्ये ही पकड आणि झापड काहीशी कमी झालेली जाणवत आहे. मनाच्या त्रासासाठी मदत घ्यायला हवी हे जाणवतं आहे, पण शंका-कुशंका कमी झालेल्या नाहीत. तसेच मनाचं आरोग्य उत्तम राखणं म्हणजे ‘योग-ध्यान’ असा एक सरसकट दृष्टिकोनही प्रबळ आहे. ‘मेडिटेशन करा’ हा सल्ला न ऐकलेले कुणीच नसतील. कोणताही एकांगी विचार स्वास्थ्याकडे नेत नाही. कारण तो समतोल बिघडवणारा असतो, साधणारा नव्हे.

कलंकमुक्तीचा माझ्या घरातला हा प्रवास पुढे संस्थारूपाचा आकार घेणार असं माझं स्वप्न त्या वेळीसुद्धा होतंच. पण नेमके तपशील ठाऊक नव्हते. माझ्या मामासारख्या सर्व मनोरुग्णांना आज आम्ही म्हणतो ‘शुभार्थी’ आणि त्यांच्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कुटुंब सभासदांना म्हणतो ‘शुभंकर’! मामाची आणि कुटुंबाची कहाणी एका संध्याकाळी सुमित्राला (भावे) तपशीलवार ऐकवली होती. ‘शुभार्थी-शुभंकर’ नात्याचे पदर दाखवणारा ‘देवराई’ हा चित्रपट त्यानंतर तयार झाला. सुमित्रा आणि सुनीलच्या (सुखटणकर) या सामाजिकतेला डॉ. जगन्नाथ वाणीकाका, यशवंत ओककाका आणि डॉ. मोहन आगशेसर यांचा पाठिंबा मिळाला. या चित्रपटादरम्यान बनलेले हे दोन शब्द, ज्यांच्या निर्मितीत बाबाचा (डॉ. अनिल अवचट) सहभाग आहे ते शब्द आज भारतातल्या अनेक स्वमदत गटांमध्ये वापरले जातात. एवढेच काय, सिंगापूर आणि अमेरिकेतील काही गटसुद्धा हे शब्द वापरतात.

शब्दांना भावना असतात. वेडा किंवा मॅड माणूस ही विचारांची खालची पायरी. त्यानंतर मेंटल पेशंट किंवा मनोरुग्ण. त्यानंतर येतात हे दोन शब्द – शुभार्थी आणि शुभंकर. आमच्या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘शुभार्थी प्रशिक्षण केंद्रा’मध्ये आज दोन गटांमधले ‘शुभंकर’ कार्यरत आहेत. काहींच्या घरी ‘शुभार्थी’ आहे तर अनेकांच्या घरी ते नाहीत, परंतु मायेचा झरा मात्र त्यांच्याकडे आहे. मनआजारांवरचा काळा ठसा पुसायचा तर आस्था जपणारी कुटुंबं वाढायला हवीत.

चांगली गोष्ट म्हणजे, काळाबरोबर कलंकांनीही नवी वळणं घेतली आहेत. ‘आवाहन आयपीएच’ या आमच्या ‘यू-ट्यूब’ चॅनेलसाठी नाशिकमध्ये ‘झोपेच्या गोळ्या- समजुती भोळ्या’ या शीर्षकाचा एक जाहीर कार्यक्रम करायचा होता. आम्हा डॉक्टर मंडळींसोबत तीन वेगवेगळ्या आजारांचे (स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी) ‘शुभार्थी’ आणि एक ‘शुभंकर’ असा संच होता. ‘मनोविकारांवरच्या गोळ्यांनी हानीच फार होते’, ‘त्या आयुष्यभर घ्याव्याच लागतात’ वगैरे आक्षेपांना तज्ज्ञ मंडळी त्यांची शास्त्रीय उत्तरं देणार होतीच, पण प्रत्यक्ष ज्यांनी या गोळ्या घेतल्या आणि घेत आहेत त्यांचा जाहीर सहभाग महत्त्वाचा ठरणार होता. मुद्दा होता, या सर्वांच्या व्यक्ती म्हणूनच्या गोपनीयतेचा. ‘‘माझ्या अनुभवाने कोणाच्या डोक्यात प्रकाश पडणार असेल तर मी नाही लपवणार चेहरा!’’ असं म्हणत एका ‘शुभार्थी’ने जाहीर कार्यक्रमासाठीच्या अनुज्ञापत्रावर स्वाक्षरी केली.

‘‘शारीरिक आणि मनाच्या आजाराच्या औषधांना समान मानून मी उपचार घेत आहे. जसं मी त्या आजारावर बोलेन तसेच या लक्षणांवरही.’’ ‘ओसीडी’ (ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर) आणि ‘बालमधुमेह’ अशा दोन्ही आजारांना यशस्वीपणे तोंड देणारी दुसरी ‘शुभार्थी’ म्हणाली. माझ्यासाठी हा अनुभव जनजागरणाला पुढे नेणारा होता. हा तीन भागांमध्ये सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ‘यू-ट्यूब’वर जरूर पाहा. आजारांवर वेळच्या वेळी योग्य उपचार व्हायची गरज ठासून सांगणारे कोण आहेत, तर या उपचारांचे लाभार्थी!
‘‘अनेक रुग्णांबरोबर तुमचे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध कसे असतात?’’ विस्मयाने कधी कधी निरीक्षणासाठी बसलेले मनआरोग्य क्षेत्रातले विद्यार्थी विचारतात.

‘‘कारण त्यांच्यामध्ये दडलेला कार्यकर्ता मला दिसत असतो. या व्यक्ती, ही कुटुंबं आपापल्या वर्तुळात कलंकमुक्तीचा दिवा घेऊन जाणार. आपण त्यांच्यामागे भक्कम उभे राहायला नको का?’’ असं मी ठासून म्हणतो. मानसशास्त्रांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘ट्रान्सफरन्स’ हा एक बागुलबुवा सांगितलेला असतो. उपचारकाने रुग्णामध्ये फार गुंतायचं नाही (‘खामोशी’तील वहिदा रेहमान) आणि भावनिक अवलंबन वाढवायचं नाही, अशी ती मर्यादा आखून देणारी संकल्पना.

‘‘कोणत्याही नात्यामध्ये अति गुंतण्याबद्दलचा सावधपणा मला मान्य आहे. पण समाजाचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर व्यावसायिकालाही स्वत: ‘शुभंकर’ नको का व्हायला? तसे झाल्याशिवाय समोरचा ‘शुभार्थी’ कसा प्रेरित होणार?’’ हे बोलत असताना माझ्यासमोर माझ्या मामासारखे अनेक ‘शुभार्थी’ उभे असतात. व्यसनाधीनतेच्या खाईमधून बाहेर येऊन ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’सारखी, आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) मानदंड उभारणारे माझे सहकारी असतात. ‘डिमेन्शिया’ आणि ‘पार्किसन्स’सारख्या व्याधीना तोंड देतानाही जगण्याचा अर्थ न विसरलेले अनेक जण असतात. माणसामधल्या सद्भावनेला प्रधान मानणं आणि आजार, विकार यामधून येणाऱ्या कटुतेला, ‘चुकली वाट’ म्हणून पाहणं अगत्याचं.

आपण सारेच प्रकृती आणि विकृतीच्या सीमारेषेवर वावरलेले असतो, त्या भोज्याला स्पर्शही करून आलेलो असतो… उमामामा असताना एकदा त्याला भेटायला गेलो होतो. तो फार बोलायचा नाही. गोड हसायचा. त्या संध्याकाळी माझा हात हातात घेऊन त्याने माझ्या आईवडिलांची आठवण काढली आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाला, ‘‘खूप केलं तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी…’’