योगेश शेजवलकर
yogeshshejwalkar@gmail.com
तो म्हणाला, ‘‘सध्याचं जग हे ‘इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स’चं आहे.. म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या गोष्टी हातात आहेत त्याचा नेमका वापर करून उपाय शोधण्यासाठी जगभर लोक काम करत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘जुगाड’ करत आहेत.’’ तो विचारात पडला, आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला काय ‘जुगाड’ करता येईल?
सकाळी पावणेनऊच्या सुमारास तो घाईघाईनं घरातून बाहेर पडला. त्याला निरोप देण्यासाठी आई-बाबा घराच्या बाल्कनीत येऊन उभेच होते. हे पाहून पलीकडच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या काकूंनी सगळं माहिती असतानाही उगाचच खोटं हसत, ‘‘अगोबाई, अजून तुझे इंटरव्ह्य़ू सुरूच आहेत का?’’ असा त्याच्या वर्मावर घाव घातला. गेल्याच आठवडय़ात त्यांच्या मुलीला नोकरी मिळाली असल्यानं त्यांच्या आवाजात आता पुरेसा बोचरेपणा आलेला होता.
अर्थात तोही कसलेला खेळाडू होता. ‘‘हो.. माझा इंटरव्ह्य़ू घेण्याचा सगळ्यांना चान्स देतोय,’’असं सणसणीत उत्तर काकूंना देऊन बिल्डिंगच्या दारात उभ्या असलेल्या कॅबमध्ये तो बसला. आणि आईबाबांना हात केला. कॅब निघाली. गेले काही आठवडे इंटरव्ह्य़ूसाठी त्याची भटकंती सुरूच होती. गेली दोन वर्ष प्लेसमेंटसाठी कंपन्या कॉलेजमध्ये आल्या नव्हत्या. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशनचा निकाल लागल्यावर नोकरी शोधणं क्रमप्राप्तच होतं. कधी पेपरातल्या जाहिराती बघून.. कधी कोणाच्या ओळखीतून.. कधी करिअर साइटच्या मदतीनं इंटरव्ह्य़ूचे कॉल मिळवायला त्याने सुरुवात केली. आतापर्यंत शहरातली बहुतेक इंडस्ट्रियल पार्क त्यानं अनेक वेळा पालथी घातली होती. दोन-तीन ठिकाणी तर गेटवरचे सिक्युरिटी गार्डही त्याला ओळखायला लागले होते. गर्दीच्या वेळा, कमी ट्रॅफिक असणारे रस्ते त्याला तोंडपाठ झाले होते. त्याच्यासारख्याच इंटरव्ह्य़ूला येणाऱ्या आणखी काही ‘क्यूट’ चेहऱ्यांशी त्याची तोंडओळखही झाली होती. थोडक्यात बरंच काही घडलं होतं.. फक्त नोकरी मिळाली नव्हती.
त्याची कॅब आय.टी. पार्कच्या दिशेनं शक्य तितक्या वेगाने निघाली. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक होताच. तेव्हा पोचायला अजून तासभर तरी नक्की लागेल हे त्याच्या लक्षात आलं. शेवटच्या तासात केलेली तयारी ही आजवरच्या प्रवासातली मुख्य ‘शिदोरी’ असल्यामुळे पुन्हा एकदा त्याने सीव्ही आणि त्याच्या बरोबरीनं लिहून आणलेले काही प्रश्न नीट वाचायला सुरुवात केली. सकाळच्या वेळी इंटरव्ह्य़ू असला की इंटरव्ह्य़ू घेणाराही उत्साहात असतो आणि नेहमीपेक्षा जरा भलतेच प्रश्न विचारतो हे त्याला आता ठाऊक झालं होतं. त्याची ही सगळी लगबग कॅब ड्रायव्हरला मधल्या आरशात दिसत होती. एका क्षणी न राहवून त्याने विचारलं, ‘‘काय सर, तयारी नाही झाली का अजून इंटरव्ह्य़ूची?’’ या प्रश्नावर त्याच्याकडे न बघताच तो म्हणाला, ‘‘अशा गोष्टींची तयारी कधी पूर्ण होते का?’’ असं म्हणल्यानं कॅब ड्रायव्हर पुढे आणखी काही विचारणार नाही असं त्याला वाटत होतं. पण तसं काही होणार नव्हतं. ‘‘सर, खरं सांगू? हे सगळं आपल्या मानण्यावर आहे. आता खरंच नवीन काही वाचू नका. नाहीतर जे नीट लक्षात आहे ते ऐन टायमाला आठवणार नाही.’’
कॅबवाल्याचा तो फुकट सल्ला ऐकून त्यानं त्या कॅब ड्रायव्हरकडे पहिल्यांदाच जरा नीट निरखून पाहिलं. सत्तावीस- अठ्ठावीस वर्षांचा तो कॅब ड्रायव्हर आपल्याला ‘सर’ म्हणतोय याची त्याला मजा वाटली. कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून जाताना गप्पा मारण्यासाठी ड्रायव्हरला कोणीतरी हवं होतं हेही त्याच्या लक्षात आलं. पण तरीही हमखास विचारले जाणारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्न तो वाचत राहिला.
‘‘सर, शेवटच्या क्षणी नक्की कसली तयारी करतात?’’ कॅब ड्रायव्हरचा पुढचा प्रश्न आलाच. पण तो शांतपणे म्हणाला, ‘‘दरवेळी हे इंटरव्ह्य़ू घेणारे लोक काही ना काही विचित्र प्रश्न विचारून तुम्हाला गोत्यात आणतात. आता त्या प्रश्नांसाठी नेमकी किती आणि कशी तयारी करायची? याचा विचार करणं मी बंद केलं आहे. पण काही प्रश्न कधीच बदलत नाहीत. मी त्याची तयारी करतोय.’’
‘‘हो, ते बरोबर आहे. मग तुम्हाला एक सॉलिड आयडिया सांगू का? तुमच्याकडे लिहिलेले काही प्रश्न असतील तर त्याचा कागद मला द्या. तेवढं इंग्लिश मला वाचता येतं. आपल्याला पोचायला अजून तास नक्कीच आहे. तेव्हा जाता जाता मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही तुमचं उत्तर द्या. म्हणजे मग तुमची उजळणी पण होईल. माझा पण वेळ चांगला जाईल.. काय म्हणता?’’
त्याला ड्रायव्हरची ती कल्पना आवडली. कॅब एका सिग्नलला थांबली तसा प्रश्नांचा कागद त्याने ड्रायव्हरकडे दिला. ड्रायव्हरने एकदा त्या कागदावरचे प्रश्न वाचले आणि पहिला प्रश्न विचारला, ‘‘टेल मी समिथग अबाऊट युवर हॉबिज.’’ या प्रश्नावर तो गडबडला. ‘‘अहो पण हा शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला काय आवडतं? हे नेहमी शेवटी विचारतात. सुरुवातीचे प्रश्न हे नेहमीच त्यांना काय हवं आहे, याबद्दलचे असतात.’’ त्यावर हसून ड्रायव्हर म्हणाला, ‘‘खरं आहे. पण समजा प्रश्न विचारणाऱ्यानं आपल्या प्रश्नांचा क्रम बदलला तर त्यासाठी आपली तयारी असायला हवी ना?’’
ड्रायव्हर जे म्हणत होता त्यात तथ्य होतं. इंटरव्ह्य़ू म्हणल्यावर कोणतीच गोष्ट गृहीत धरण्यात काहीही अर्थ नव्हता. मग पुढचा काही वेळ प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण सुरू राहिली. अचानक एका क्षणी त्याला जाणवलं की कागदावर लिहून दिलेले प्रश्न तर कधीच संपले होते. काही प्रश्न कॅब ड्रायव्हरने त्याच्या मनानं विचारले होते. जसं की ‘तुम्हाला एक अवघड प्रश्न विचारू की दहा सोपे?’, ‘रंग न दिसणाऱ्या माणसाला पिवळा रंग कसा समजावून सांगाल?’
एकुणात त्या सगळ्या प्रकारानं त्याला त्या ड्रायव्हरबद्दल कमालीचं कुतूहल वाटायला लागलं. तो ड्रायव्हर नेहमीच्या कॅब ड्रायव्हरच्या व्याख्येत बसत नव्हता. आय.टी. पार्क यायला आता साधारणपणे पंधराच मिनिटं उरली होती. पण ड्रायव्हरकडे अजून बरेच प्रश्न तयार होते. शेवटी एका प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यानंतर तो ड्रायव्हरला म्हणाला, ‘‘तुम्हाला हे इतके सगळे प्रश्न कसे काय माहिती?’’
त्यावर हसून ड्रायव्हर म्हणाला, ‘‘माझ्या दिवसभरात या आय.टी. पार्कला पाच ते सहा फेऱ्या तरी होतच असतात. बरेचदा गाडीत बसलेला पॅसेंजर इंटरव्ह्य़ूसाठी जात तरी असतो किंवा इंटरव्ह्य़ू संपवून बाहेर तरी पडत असतो. काहीवेळा दोन-तीन पॅसेंजर गाडीत असतात. त्यांच्यातली चर्चा कानावर पडते. तर काही वेळा लोक फोनवरून होणाऱ्या किंवा झालेल्या इंटरव्ह्य़ूबद्दल खूप वेळ बोलत असतात. त्या गोष्टी कानावर पडून पडून मलाही पाठ झाल्या आहेत.’’
‘‘वा.. म्हणजे आय.टी. पार्कला इंटरव्ह्य़ूसाठी जाणाऱ्या पॅसेंजरचा पहिला इंटरव्ह्य़ू इथे होतो.’’ आणखी माहिती मिळवण्याच्या उद्देशानं तो म्हणाला. त्यावर कॅब ड्रायव्हर हसून म्हणाला, ‘‘हं म्हणजे इंटरव्ह्य़ू घेण्याची ऑफर मी बऱ्याच जणांना देतो. काही लोक तर माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. काही लोक मला लायकीत राहा, असा प्रेमळ सल्लाही देतात. पण तुमच्यासारखे काही लोक इंटरव्ह्य़ू देतात आणि मग ट्रीप संपल्यावर रेटिंगही झकास देतात. आपल्याला शेवटी तेच हवं असतं नाही का?’’
‘‘फक्त चांगल्या रेटिंगसाठी हे सगळं करावं लागतं. हे उत्तर काही मला पटलं नाही.’’ तो त्याचा अंदाज घेत म्हणाला. त्यावर अर्धवट हसून ड्रायव्हरने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ‘‘आता काय काय सांगणार तुम्हाला. रेटिंग टिकवण्यासाठी असं काहीतरी सगळ्यांनाच करावं लागतं. अरे, महत्त्वाचं विचारायचंच राहिलं, तुम्हाला कोणत्या नंबरच्या गेटपाशी सोडू?’’ ‘‘ते तिथं पोचल्यावर तिथली गर्दी बघून आपण ठरवू. पण मला एक सांगा, रेटिंग इतकं महत्त्वाचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येक कॅबच्या ड्रायव्हरने असे इंटरव्ह्य़ू घ्यायला हवेत नाही का?’’ त्याने आपला मुद्दा लावून धरला. त्यावर ‘‘हं’’ असं अर्धवट उत्तर ड्रायव्हरनं दिलं.
‘‘हा नक्की प्रकार काय आहे?’’ ड्रायव्हरला आता थेट विचारण्याशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं.
‘‘काही नाही हो.. आपली एक गंमत.’’ असं म्हणून ड्रायव्हरने तेव्हाही विषय टाळण्याचा आणखी एक व्यर्थ प्रयत्न केला.
‘‘कसं आहे, मी कागदावर न लिहिलेल्या तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तेव्हा आता माझ्या या एका प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही द्यायला हवं नाही का?’’ त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. ते ड्रायव्हरलाही जाणवलं.
त्यावर दीर्घ सुस्कारा सोडत ड्रायव्हर म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी मी माझ्या गावातून या शहरात आलो. म्हणजे शहरात येऊन आपण नोकरी करावी.. घर घेऊन इथेच राहावं असं मला कधीही वाटलं नाही.. आजही वाटत नाही. पण गावात असताना ज्या कंपनीत काम करायचो ती कंपनी बंद झाली आणि मग शहरात येण्याशिवाय दुसरा काही मार्गच उरला नाही. इथं आल्यावर बाकीचे सगळे जे करतात तेच करायला मी सुरुवात केली. शक्य होईल तितके इंटरव्ह्य़ू द्यायला लागलो.’’
‘‘मग?’’ त्याने उत्सुकतेनं विचारलं. ‘‘पण खूप प्रयत्न करूनही काही जमेना. सगळ्या ठिकाणी रिजेक्ट झालो. कोणाला माझे कपडे आवडले नाहीत. कोणाला माझी भाषा आवडली नाही. कोणाला माझे इंग्रजीचे उच्चार पटले नाहीत. कोणाला मी ज्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं, ते कॉलेज अधिकृत वाटलं नाही. कोणाला मी आजपर्यंत कंपनीत जे काम केलं होतं त्या कामात काही विशेष वाटलं नाही. थोडक्यात, मी देत असलेली उत्तरं त्यांच्या मनासारखी नसल्याने मला नोकरी मिळाली नाही. घरी तर पैसे पाठवणं गरजेचं होतं. शेवटी मग मी एकाची कॅब चालवायला सुरुवात केली.’’
‘‘पण तुमचे स्कील्स पॉलिश करण्यासाठी इथे खास कोस्रेस असतात. तुम्हाला कोणी सांगितलं नाही का?’’ त्यानं ड्रायव्हरचं बोलणं पूर्ण होण्याआधीच विचारलं. ‘‘हो, सांगितलं. मी दोन-तीन ठिकाणी जाऊन भेटूनही आलो. तिथं त्यांनी मला माहितीही चांगली दिली. पण त्या कोर्सची फी माझ्या बजेटच्या कैकपट जास्त होती. मग मी दोन महिने जास्तीत जास्त वेळ कॅब चालवून पैसे बाजूला टाकायला सुरुवात केली. पण त्याच दरम्यान घरी खर्च निघाले आणि ते पैसे तिकडे पाठवावे लागले. शेवटी मी आपली स्वत:ची समजूत घातली की पॅसेंजरला घेऊन कंपनीच्या गेटपर्यंत जाणं हेच आपल्या नशिबात आहे. तेव्हा जास्त विचार न करता कॅब चालवायची.’’
‘‘मग?’’ अजूनही त्याला जे हवं होतं ते ड्रायव्हरने सांगितलं नव्हतं. ‘‘पण अचानक एक दिवस एका पॅसेंजरबरोबर खूप गप्पा झाल्या. त्या गडय़ानं मला बरीच नवीन माहिती सांगितली. तो म्हणाला, सध्याचं जग हे ‘इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स’चं आहे.. म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या गोष्टी हातात आहेत त्याचा नेमका वापर करून उपाय शोधण्यासाठी जगभर लोक काम करत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘जुगाड’ करत आहेत. तेव्हा मी विचार केला, मग आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला काय ‘जुगाड’ करता येईल? या विचाराने माझी बॅटरी चार्ज झाली आणि मला ही इंटरव्ह्य़ूची कल्पना सुचली. कंपनीला मान्य होतील अशी उत्तरं म्हणजे काय? आणि आपल्याला जे म्हणायचं आहे, त्याच्याशी तडजोड न करता.. खोटं न बोलता हे कसं सांगायचं? हे मी लोकांशी बोलून शोधायला लागलो. त्यातून अनेक गोष्टी अशा समजल्या ज्यावर मला खरोखर अभ्यास करावा लागणार आहे.. आणि मी तो चालूही केला आहे. पण अशाही बऱ्याच गोष्टी समजल्या ज्या माझ्यापाशी आहेत फक्त त्या नीट मांडायची गरज आहे.’’
‘‘खरंच इनोव्हेटिव्ह सोल्यूशन!’’ त्याने ड्रायव्हरला दाद दिली. तेव्हा तो हसून म्हणाला, ‘‘जुगाडच म्हणा हो.. शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरीत गेलेला आपला हक्काचा हा शब्द आहे. नशिबाला दोष न देता, कोणाचंही काहीही वाईट न करता, कोणाची संधी हिरावून न घेता हे जुगाड जमवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या, एक दिवस कंपनीच्या गेटमधून आत जाईनही.’’ असं ड्रायव्हर म्हणत असतानाच गाडी आय.टी. पार्कच्या दारात पोचली.
तो गाडीतून उतरायला लागला, पण काहीतरी वाटून मागे वळत त्या ड्रायव्हरला म्हणाला, ‘‘तुमचा नंबर देऊन ठेवा आणि सीव्हीही पाठवून ठेवा. दोन-तीन ग्रुप्सवर सीव्ही शेअर करतो.. आणि समजा एखाद्या कंपनीत जॉइन झालोच, तर तिथल्या पोर्टलवरही तो अपलोड करीन.’’ ‘‘पण त्या आधीच मला कुठे जॉब मिळाला तर?’’ ड्रायव्हरने त्याची फिरकी घेत विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘तेव्हा मी माझा सीव्ही तुम्हाला शेअर करेन.. ते माझं जुगाड असेल.’’ या त्याच्या उत्तरावर दोघंही खळखळून हसले.