अतुल पेठे

 शाळेच्या सहलीपासून आपल्या आयुष्यात पर्यटनाची सुरुवात होते आणि मग वयाच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर प्रवास होतच असतो. वाढत्या वयातले ट्रेक्स, तरुणाईतल्या साहसी सफरी, कुणी मुद्दाम जंगल अनुभवायला, समुद्रात डुंबायला, ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला जात असतात, तर काही मात्र निवांतपणा देणारे ‘फुरसत के रातदिन’ शोधायला जात असतात. या प्रवासातले काही अनुभव कायमचे ‘मर्मबंधातली ठेव’ होऊन जातात. अशाच काही पर्यटनाच्या आठवणींचा हा कोलाज मान्यवरांच्या शब्दांत दर शनिवारी. ‘पर्यटनावरचे हे अनुभव व्यक्तिगत आहेत. त्याला सार्वत्रिक मूल्य वगैरे काही नाही. तर आधी माझे अनुभव आणि सरतेशेवटी किंचित आलेलं शहाणपण!

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Success story of kamal khushlani owner of mufti jeans once borrowed money now owning crores business
फक्त १० हजार रुपयांच्या कर्जाने सुरू केलं काम, आता आहे कोटींचं साम्राज्य; वाचा कोणता व्यवसाय करतात कमल खुशलानी
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?

अनुभव एक :

 शाळेची सहल जायची. पेशवेबाग,पर्वती, सिंहगड, रायगड अशी चढती भाजणी असायची. खोटं वाटेल, पण सहल आली की माझ्या पोटात खड्डा पडे. मला काहीही पाहायचं नसे आणि प्रवासही आवडत नसे. पेशवे पार्कात थकलेल्या सिंहांना वाकुल्या दाखवणं मला रुचत नसे. ऐतिहासिक स्थळं पाहताना इथं माणसांना चिणून मारलं, तिथं गाडलं किंवा ते सतीस्थळ वगैरेही सोसवत नसे. भव्य वाडय़ातील राण्यांच्या करुण कहाण्या आणि रक्तरंजित इतिहास भयचकित करायचा. एकूण सहल म्हणजे मला संकट वाटे. शाळेच्या मुलींसोबतीत घरचे डबे नेऊन अंगतपंगत आणि भेंडय़ा लावणे तर अजिबात नकोसे वाटे. सारं लक्ष आपल्याला मुली काय म्हणतील यावर असे. त्यात भर म्हणजे मला लाल एसटी बस लागत असे. सतत ओकारी होईल ही भीती. मग ‘अव्होमीन’ची गोळी गिळायची आणि अर्धशुषुम्नावस्थेत पसरणी किंवा वरंधा घाटाची वळणं पार पाडायची. एकदा का सहल संपवून गाडी शाळेशी आली की हुश्श व्हायचं. बरं इथं हे प्रकरण संपत नसे तर सहलीच्या दुसऱ्या दिवशी ‘लक्षात राहिलेली सहल’ यावर निबंध खरडावा लागे. हे जास्तच भयानक. खोटं वागायची भक्कम शिकवण अशी मिळाली!

अनुभव दोन :

खूप वाचा,पाहा, ऐका, याचे डोस वाढत्या वयात आजूबाजूच्या सर्व थोरांनी दिले. त्यामुळे वाचत सुटलो त्याची गोष्ट, पाहात सुटलो त्याची गोष्ट, ऐकत सुटलो त्याची गोष्ट, असलं महत्त्वाचं मानू लागलो. त्यातून भ्रम झाले. वाटलं, की मी आता कशावरही बोलायला मुखत्यार आहे; पण आपण फक्त माहितीचा साठा तयार केलाय हे कळायला खूप वर्ष जावी लागली. इतकं सारं करून नेमकं होतं काय, हा प्रश्न पडे. आमचा एक नातेवाईक जग हिंडला. आखाती देशात नोकरी करून बक्कळ सोने लुटूनी मोरू आला, पण भारतात येताच मुसलमानांबाबत असभ्य भाषा वापरू लागला. धर्माच्या गोष्टी उच्चरवात बोलू लागला. मला प्रश्न पडला, की याला जग फिरल्याचा काय फायदा झाला? हा मोरू नेमकं कशाचं सीमोल्लंघन करून आला? कबीर, ज्ञानेश्वर, तुकाराम, फैज, गालीब आपण गात असू तर आमूलाग्र जाऊ दे, पण किंचित तरी बदलू का? की कोरडे पाषाण राहू? तसंच काहीसं पर्यटनाबद्दल होतं. स्थळं पाहात सुटणं म्हणजे पर्यटन नव्हे हे उशिरा लक्षात आलं. त्यातच पर्यटनाला किमान आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्याची गरज असते हे उमजलं.

अनुभव तीन :

 खिशात पैसे नसताना सहल आखणी करणे हा एक उपद्वय़ाप असतो. बायको सरकारी नोकरीत होती. तिला ‘पर्यटन सवलत’ ऊर्फ ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ मिळत असे. त्यामुळे घरी पर्यटन नकाशा उलगडायचा आणि स्केचपेननं खुणा करत सुटायचं. आपण जाऊ तिथं काय बघायचं याची यादी करायची हौस आम्हाला लागली. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ची ओढ लागल्यानं दुसऱ्यांची ‘नवनीत प्रवास गाईडं’ वाचण्याचा नाद लागला. ‘एलटीसी’मुळे प्रवास करणं आवश्यक झालं होतं. वाया काहीही जाऊ द्यायचं नाही या संस्कारात मुरलेली आमची पिढी सर्व गोष्टींचे फायदे घेत पुढे सरकली ती अशी! बरं फायदा तरी मोठ्ठा घ्यावा तर आर्थिक कुवत नव्हती. एकदा मुलीला काखोटीला मारून माथेरानला जात असताना कर्जतला उतरलो. तिथले बटाटेवडे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं. त्याच वेळी तिकडे गाडीतले सर्व प्रवासी उतरून पळत सुटले; पण आम्ही निष्ठापूर्वक ठरवलं, की आयुष्यात असं पळायचं नाही. आधी बटाटेवडय़ांचा आस्वाद घ्यायचा ठरवला. मुलीवर जिव्हासंस्कार व्हायला हवेत! कासवगतीनं आम्ही स्टॉलवर गेलो. बटाटेवडे, लाल चटणी, पाव घेऊन  रिकाम्या बाकडय़ांवर विसावलो. वडे पावात खोचलेले असल्यानं कोमट झालेत हे खाताना कळलं. तरीही उमेद राखून नुसतीच तेलकट तिखट चव घेत आजूबाजूची मज्जा पाहात राहिलो. पोटं टर्र झाली. फलाटही शांत झाला. मग आम्ही नेरळ गाडीची चौकशी केली, तर वडे विकणारे थोर गृहस्थ म्हणाले, की पलीकडच्या फलाटावरून जी गाडी गेली ती नेरळची होती. तिथून छोटी ‘फ्येमस’ माथेरानची गाडी ‘कनेक्टेड’ असते वगैरे. आम्ही नि:शब्द झालो. भानावर आलो तेव्हा लक्षात आलं, की लोक त्याच गाडीसाठी सशाच्या वेगानं पळत होते. आम्हाला शांततेत अशांततेचा अनुभव आला. क्षणार्धात वडे पचले. मग त्या वडेवाल्यानं एक जीपवाला गाठून दिला. एका झाडाखाली उभ्या असलेल्या जुन्या गाडीत इतरांबरोबर आम्ही कोंबले गेलो. एव्हाना मला भयानक उकडायला लागलं. कमालीची थंडी असेल या कल्पनेनं मी हिमालयातील जवान घालतात तसं कॉलरमधून गळय़ाला गुदगुल्या करणारं कापूस पिंजारलेलं हिरवं, मऊ, लांब हातांचं जाकीट घातलं होतं. त्या वेशात मी टुंड्रा प्रदेशात निघालेला पर्यटक दिसत होतो. घामाच्या धारा वाहू लागताच मी, लोखंडी गोल कडीतून सर्वाग काढतात तसं आळोखेपिळोखे देत, इतरांना धक्के देत जाकीट काढलं, मागे ठेवलं. गाडीवाला पिसाटल्याप्रमाणे गाडी हाकत होता. मी त्याला हळू चालवायला सांगताच त्यानं गुटका चघळत ‘मरणाला भिता का?’असा तात्त्विक प्रश्न केला. मी भीत असल्यानं गप्प झालो आणि थेट माथेरानच्या एका टेकाडावर एकदाचे उतरलो. सायंकाळ होत असल्यानं खरं तर विषण्णताच दाटून आलेली होती. आम्ही कुठलंही हॉटेल बुक केलं नव्हतं. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन केल्यास परवडणारे असेल हा हिशेब होता. अशा प्रसिद्ध स्थळांवरील राहणं किती महागडं असतं याची त्या वेळेला कल्पनाच नव्हती. मग काय, सत्यजित रेंच्या ‘अपुर संसार’मधील

सौमित्र चटर्जी मुलाला जसा खांद्यावर बसवून निघतो तसा मी मुलीला घेऊन निघालो. गाडीतळापासून माथेरान हे प्रकरण बऱ्यापैकी दूर होतं. त्यामुळे परवडेल असं हॉटेल शोधत चिक्कार तंगडतोड झाली. मुलगी व्याकूळ होऊन, ‘बाबा, आपल्याला घर कधी मिळणार?’ विचारत होती. शेवटी एका बंगल्यातील खोली मिळाली. तिथं गटागटा पाणी पिऊन बसलो तर लक्षात आलं, की ते ‘टुंड्रा जाकीट’ गाडीत राहिलं आहे! ‘आल्या प्रसंगाला तोंड द्यायला पर्यटन शिकवतं.’ हे वचन तोंडपाठ असल्यानं संताप गिळून आम्ही जेवायला बाहेर पडलो. तिखट खाऊन भाजलेल्या जिभेनं हाशहुश्श करत शेवटी आइस्क्रीम खाल्लं. ‘कित्ती मज्जा आली की नाई’ म्हणत सारं हसून साजरं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठवत नसताना गाडीतळावर जाऊन जाकीट हस्तगत केलं. चालताना माथेरानचे मरतुकडे घोडे आणि मी यात कमी फरक उरला होता.

अनुभव चार :

‘चला चला, तिकडे सूर्यास्त होईल. तो चुकवू नका.’ अशी हाळी आली आणि परत मुलीला काखोटीला मारून आम्ही माऊंट अबूला धुळीच्या खकाण्यात एक टेकडी चढू लागलो. जिवाच्या करारानं आम्ही तो ‘विलक्षण सूर्यास्त’ पाहायला पळत होतो. शेवटी तुफान गर्दीत पुढे घुसून तो क्षण डोळय़ांत साठवू लागलो. सूर्य खरं तर नेहमीप्रमाणेच अस्ताला जात होता. त्यात काहीही विशेष दिसत नव्हतं; पण इतक्या खस्ता खाल्ल्यावर हे मान्य करणं म्हणजे पर्यटनात मिठाचा खडा लागणं. अर्थात सूर्य हळूहळू ‘फेड आऊट’ होत असल्यानं  पळत आल्याचा पश्चात्ताप होत होता. बराच वेळ असं बघत बसण्याचा सर्वानाच खूप कंटाळा आला. ‘कधी एकदा तो बुडतोय,’असं  झालं होतं. शेवटी सर्वाचा अंत पाहात तो एकदाचा अंतर्धान पावला. सर्वानी एकमुखानं ‘हुई २२२’ केलं. तेवढय़ात ‘अंधार लवकर होईल. निघा,’ अशी हाळी परत आली म्हणून बोचकीबाचकी पाठीला लटकवून पळत सुटलो. हॉटेलवर आलो तेव्हा दोघांच्याही कंबरेत कळा येत होत्या. बरं, मागील अनुभव लक्षात ठेवून चांगल्या हॉटेलात ‘फुल पॅकेज’ घेतलं होतं. तिथं इतकं खायला होतं, की आमची पोटं बिघडली. शेवटी कंबर आणि पोट आडवे करून दोन दिवस झोपून काढले.

अनुभव पाच :

एकदा आम्ही एका ‘ट्रॅव्हल’ गटाबरोबर परदेशी गेलो. गटात बहुतांश वेळा महाराष्ट्रीय पद्धतीचं खायला काय मिळेल यावर चर्चा झडे. मध्यमवयीन, नव्या जाणिवा जागृत झालेले आणि जागतिकीकरणाचे फायदे लाटलेले आम्ही टकाटक पर्यटक होतो. त्यात एका नवराबायकोंना पर्यटनाचं अफाट वेड होतं. सर्व देश, प्रांत, सीमा उल्लंघून ते जोडपं ज्या गतीनं एकएक स्थळ पाहायचं, ते पाहणं हेच माझ्याकरिता पर्यटन झालं होतं. आम्ही अ‍ॅमस्टरडॅममधील अ‍ॅन फ्रँकचं घर पाहायला गेलो. गाईड गंभीरपणे करुण कहाणी उलगडवत होता. तर हे नवराबायको माणसांच्या कहाण्यांकडे दुर्लक्ष करून लटालटा घर पाहून पुढचं म्युझियम पाहायला निघाले. वर जाता जाता ‘हे घर तर मोठ्ठं आहे की. यात कसली आलीय घुसमट?’ म्हणून गेले. मी समोरच्या भिंतीतील कपाटाच्या आड चिणून लपत असलेल्या अ‍ॅन फ्रँकला शोधत बसलो.

अनुभव सहा :

मी ‘एड्स सोसायटी’त काम करत असे त्या वेळची ही गोष्ट. एक गृहस्थ भेटले. त्यांना समुपदेशन हवं होतं. आम्ही एका बंद खोलीत गेलो. मी त्यांना गोपनीयतेची ग्वाही दिली. काही वेळ शून्यात पाहात मग बांध फुटून रडू लागले.  हळूहळू बोलू लागले. निवृत्तीनंतर ते आणि समवयीन मित्र पर्यटनास गेले. सोना बाथ, मसाज आणि वेश्या वगैरे मनात ठेवूनच गेले. तो देशही त्याकरिताच म्हणे प्रसिद्ध आहे. ‘स्किन करन्सी’, ‘सेक्स टुरिझम’, ‘पीप शो’ इत्यादी शब्द त्यांच्या बोलण्यात येत होते. कुठलीही सुरक्षितता न घेता त्यांनी संग केला होता. गृहस्थ हादरले होते. मग मी सल्ला आणि धीर दिला. तर ते नैतिक-अनैतिक, पाप-पुण्य, धर्म-अधर्म यावर बोलले. शिवाय ‘परत बापजन्मात पर्यटन करणार नाही,’ अशी प्रतिज्ञा करून घरी गेले. बदललेली आर्थिक स्थिती आणि नव्या गोष्टी करून पाहायच्या अनेक शक्यता समोर असलेला हा चकचकीत काळ. ‘आम्ही पावसाचा प्रत्येक थेंबही विकतो,’ अशी जाहिरातच होती. दबलेल्या इच्छा पर्यटनात फसफसून वर येतात. आपला प्रांत सोडला आणि सीमा ओलांडल्या की बंधनं गळून पडतात. खास कपडे, नृत्य, मद्य, गॉगल आणि कुवत ताणून जरा मुक्त चावटपणा करायला मन मुक्त होतं. मात्र मायदेशी परत येताच संस्कृतिरक्षण सुरू होतं. अर्थात इथंच स्पष्ट करतो, की हे प्रत्येकाबाबत घडत नाही. उत्तम पर्यटन करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्या आहेत. बरेच लोक या पर्यटनातून नवी दृष्टी घेऊन येतात. स्वत:ला अनुभवसंपृक्त करतात.

शहाणपण :

तर प्रवास आणि पर्यटन नकोसं झालेला मी नाटकांच्या दौऱ्यांमुळे खूप फिरू लागलो.  राहण्याखाण्याच्या अवस्था बिकट असतानाही मन रमू लागलं. नाटकाचे हे दौरेच माझं पर्यटन बनलं. अनेक गावं, माणसं, प्राणी, पक्षी, झाडंझुडपं, शेतं दिसली. हा ‘माझा प्रवास’ होता. त्या वाटेवर मीही तयार झालो. पोलिसाला कमी पैसे देण्याकरिता ओळख सांगणं, लबाडी करणं, गोड बोलणं, मुद्दाम रागावणं, विनंत्या करणं, प्रेमाने वागणं, लोकांना ऐकणं, समजावून घेणं, दु:खात सहभागी होणं, क्षमा मागणं आणि करणं असल्या विविध गोष्टी मी या प्रवासात शिकल्या. अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याचा अनुभव घेतला. अपघातात आमची गाडी जाळायला निघालेल्या टोळक्याला शांत करणं, सहकलाकाराला फीट येणं आणि पैसे ठकवून पळालेल्या ठेकेदारास पकडणं हे जबरी अनुभव या पर्यटनात मला आले. या पर्यटनात नाटक होतं तसं नाटय़ही!

एक दिवस मी आसामी गायक भूपेन हजारिका यांनी गायलेलं ‘आमी अ‍ॅक जाजाबॉर’(मी एक प्रवासी) हे बंगाली गाणं ऐकलं. त्यात विश्व हिंडून ‘विश्वाचं आर्त’ कळणारा विश्वप्रवासी व्हायचं असतं हे कळलं; पण तसा मी झालो का, या प्रश्नात गुरफटलो. पर्यटन हा शब्द नव्यानं पाहू लागलो हे किंचित आलेलं शहाणपण!

Story img Loader