आपल्याकडील दाम्पत्यकेंद्रित विवाहसंस्था नजरेसमोर ठेवून आपल्या पूर्वजांनी काही सेक्ससंबंधित प्रमेये समाजात प्रचलित केली होती. सर्वात महत्त्वाचे प्रमेय होते, ‘पुरुषार्थ ध्येयप्रेरित प्रपंच व्यवस्था’. म्हणजेच संसारकर्त्यांला सुखी संसारासाठी दिलेली काही उद्दिष्टे. या ध्येयांमध्ये धर्म, अर्थ आणि काम अशी उद्दिष्टे जबाबदाऱ्या म्हणून सांगितली गेली. धर्म म्हणजे कुटुंबस्वास्थ्य व समाजस्वास्थ्य यांना पोषक वर्तणुकीची जबाबदारी. अर्थ म्हणजे प्रपंचातील अन्न, वस्त्र व निवारा यांची तजवीज करण्याची जबाबदारी आणि काम म्हणजे जोडीदाराच्या कामपूर्तीची जबाबदारी.
‘व्हॉट इज सेक्स?’ समोरच्या श्रोतृवर्गाला जेव्हा मी हा प्रश्न विचारला, तेव्हा श्रोत्यांमध्ये बरेच चेहरे गोंधळलेले दिसले. मला याचे विशेष वाटले, कारण तो साधासुधा श्रोतृवर्ग नव्हता. त्यामध्ये विविध विषयांवरील तज्ज्ञ वैद्यकीय मंडळी होती. स्त्रिया होत्या तसेच पुरुषही होते. सर्व वयोगटांतील होते. प्रश्न म्हटला तर तसा साधाच होता, पण आश्चर्य म्हणजे सर्वच श्रोते गडबडले होते. ‘इंटरकोर्स’ एका तरुण डॉक्टरने उत्तर दिले. ‘शरीराचं आणि मनाचं मीलन’ त्याच्याच बायकोने पटकन सांगितले. तीही डॉक्टर. तो तरुण तिच्याकडे जरा गोंधळलेल्या नजरेने पाहू लागला. ‘शारीरिक जवळीक’ अजून एका डॉक्टरचे उत्तर. ‘स्त्री-पुरुषाचा शरीरसंबंध’ एकाने ‘तेच पेय दुसऱ्या बाटलीतून देण्याचा’ प्रयत्न केला. तेवढय़ात त्याच्या शेजारच्याने त्याला विचारले, ‘मग होमोसेक्सचे काय?’
थोडक्यात डॉक्टरमंडळी असूनही बायकोचे उत्तर नवऱ्यापेक्षा वेगळे, मित्रामित्रांमध्ये मतभिन्नता असे सर्वसाधारण दृश्य माझ्या एका प्रश्नामुळे त्या वैद्यकीय सभेत दिसू लागले. मी लगेच म्हणालो, ‘आज आपण केवळ हेटेरोसेक्सविषयीच बोलणार आहोत. त्यामुळे आजचा विषय स्त्री-पुरुषांच्या संबंधापुरताच मर्यादित आहे आणि मला शास्त्रीय व्याख्या सांगा, जी कधीही व कुठेही व्यवस्थित लागू करता येईल.’ श्रोते शांत झाले.
मी सांगू लागलो, ‘प्राणिजगतामध्ये सेक्स म्हणजे समागमाची इच्छा, डिझायर टू कॉप्युलेट, पण मानवामध्ये सेक्समध्ये झालेल्या उत्क्रांतीमुळे सेक्स केवळ क्रिया न राहता एक नाते बनले आहे. म्हणूनच मानवात सेक्स हा रोमँटिकपणाचा प्रवास असून त्याचा शेवट िलग-योनी संबंध आहे. (सेक्स इज अ रोमँटिक जर्नी एंिडग इनटू इंटरकोर्स.) म्हणजेच हा एंड पॉइंट आहे; सेंट्रल पॉइंट-केंद्रिबदू नाही.
परंतु हा रोमँटिक प्रवास टाळून जेव्हा इंटरकोर्सला केंद्रिबदू केले जाते, म्हणजे त्याच्याचसाठी सर्व काही केले जाते, तेव्हा लंगिक समस्या उद्भवतात. म्हणजे वेगवेगळ्या लंगिक समस्यांमध्ये संबंधित व्यक्तींमधील रोमँटिक नाते हे मजबूत करणे आवश्यक असते आणि कुटुंबसंमत, अरेंज्ड मॅरेजमध्ये तर त्यासाठी जास्त कष्ट घेणे आवश्यक असते.
आपल्याकडील दाम्पत्यकेंद्रित विवाहसंस्था नजरेसमोर ठेवून आपल्या पूर्वजांनी काही सेक्ससंबंधित प्रमेये समाजात प्रचलित केली होती. सर्वात महत्त्वाचे प्रमेय होते, ‘पुरुषार्थ ध्येयप्रेरित प्रपंच व्यवस्था.’ म्हणजेच संसारकर्त्यांला सुखी संसारासाठी दिलेली काही उद्दिष्टे आणि सर्वसाधारण पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये हा भार असतो त्या कर्त्यां पुरुषावर. म्हणून पुरुषार्थ या ध्येयामध्ये धर्म, अर्थ आणि काम अशी उद्दिष्टे जबाबदाऱ्या म्हणून सांगितली गेली. धर्म म्हणजे कुटुंबस्वास्थ्य व समाजस्वास्थ्य यांना पोषक वर्तणुकीची जबाबदारी. अर्थ म्हणजे प्रपंचातील अन्न, वस्त्र व निवारा यांची तजवीज करण्याची जबाबदारी आणि काम म्हणजे जोडीदाराच्या कामपूर्तीची जबाबदारी.
या तिन्ही जबाबदाऱ्यांमध्ये धर्म आणि अर्थ या मानवनिर्मित कालसापेक्ष कल्पना होत्या, तर ‘काम’ ही एकमेव निसर्गप्रेरित कालातीत मूलभूत प्रेरणा. तिला हाताळण्याची जबाबदारी कर्त्यां पुरुषावर टाकून खरे म्हणजे प्राचीन भारतीयांनी आपल्या बुद्धिप्रगल्भतेचे दर्शनच केले होते. त्या अनुषंगाने आपल्याकडे मग या सर्वाना पोषक शास्त्रव्यवस्था केली गेली. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि कामशास्त्र ही शास्त्रे विकसित केली गेली. शास्त्र हे विचारांचे अपत्य. अनुभव व चिंतन यातून हे विचार समाजोपयोगी कसे ठरतील हे अभ्यासून त्यांची तत्त्वे समाजात ज्ञानरूपाने प्रतिपादन करण्याच्या प्रणालीतूनच ‘तत्त्वज्ञान’ निर्माण झाले. ‘काम’ प्रेरणेला तत्त्वज्ञानाचे कोंदण देऊन प्राचीन भारतीयांनी छचोर वाटू शकेल अशा ‘काम’ला गांभीर्याचे वलय दिले.
‘कामस्ततग्रे समवर्तताधि मनसो रेत प्रथमं यदासित्’ असे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९व्या ‘नासदीय सूक्ता’त या विश्वाच्या निर्मितीचे विवेचन करताना सांगितले आहे. म्हणजेच ‘या विश्वाच्या निर्मात्याच्या मनामध्ये सर्वप्रथम ‘काम’बीजाची निर्मिती झाली’ असे सांगून ‘काम’ हाच सृष्टीचा मूल विकासभाव आहे, असे ठसवले आहे. म्हणून त्याला योग्य तो दर्जा देऊन ‘पुरुषार्थ’ बनवला गेला.
प्राचीन भारतीयांच्या या पूर्वदृष्टीनेच ‘काम’विषयक एक नाही तर दोन शास्त्रे प्राचीन काळी भारतात निर्माण झाली, विकसित झाली आणि आधुनिक काळात ती जगप्रसिद्धही झाली. ती म्हणजे ‘कामशास्त्र’ आणि ‘तंत्रशास्त्र’. इसवी सन चौथ्या शतकात मल्लनाग वात्स्यायन या महर्षीनी ‘कामसूत्र’रूपाने हे कामशास्त्र जरी नावारूपाला आणले तरी त्यांनी ते केवळ त्यांच्या अगोदरील विविध कामशास्त्रज्ञांच्या कामाचा आढावा घेऊन त्यातील उपयुक्त माहिती सूत्ररूपाने संकलित केलेली आहे हे त्यांनीच त्या ग्रंथात नमूद केले आहे.
कामसूत्रात उल्लेखिल्याप्रमाणे महर्षी वात्स्यायनांच्या पूर्वी उद्दालक ऋषीपुत्र श्वेतकेतू याने कामशास्त्र ५०० श्लोकांचे, तर नंतर पांचालदेशवासी बाभ्रव्य यांनी त्याचे २५० श्लोकांमध्ये सात विभागांत संक्षिप्त केले असे आढळते. पाटलीपुत्रातील गणिकांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागाचे विविध आचार्यानी पुन्हा स्वतंत्र वर्णन आणि पृथक्करण केल्याचा उल्लेख कामसूत्रात आला आहे. आचार्य दत्तक यांनी वेश्याविषयक ‘वैशिक’ या विभागाचे, तर आचार्य नारायण यांनी कामशास्त्राच्या सर्वसाधारण माहितीसंबंधित ‘साधारण’, आचार्य सुवर्णनाभ यांनी मथुनविषयक ‘सांप्रयोगिक’, घोटकमुख यांनी कन्या वरण्यासंबंधित ‘कन्यासंप्रयुक्तक’, आचार्य गोनर्दीय यांनी पत्नीविषयक ‘भार्याधिकारिक’, गोणिकापुत्राने परस्त्रीविषयक ‘पारदारिक’ आणि आचार्य कुचुमार यांनी औषधविषयक ‘औपनिषदिक’ अशा विभागांना स्वतंत्रपणे मांडले. हे सर्व ग्रंथ मग संकलित न राहता वेगवेगळे झाले आणि सर्वसामान्य या ज्ञानापासून वंचित झाले. या कारणास्तव महर्षी मल्लनाग वात्स्यायन यांनी बाभ्रव्याचा सात विभागांतील मूळ ग्रंथच अतिसंक्षेपाने सूत्रबद्ध केला.
त्यानंतर काही महत्त्वाच्या ग्रंथरचना संस्कृत भाषेत झाल्या. त्यामध्ये बाराव्या शतकातील कोकापंडितांचे ‘रतिरहस्य’ (जे कोकशास्त्र म्हणून प्रसिद्ध झाले), चौदाव्या शतकातील ज्योíतश्वर यांचे ‘पंचसायका’, तर कामशास्त्राचा शेवटचा ‘मलाचा दगड’ ज्याला म्हणता येईल तो अत्यंत महत्त्वाचा ‘अनंगरंग’ हा ग्रंथ हे आजही उपलब्ध आहेत; परंतु सर रिचर्ड बर्टन आणि आर्बथनॉट यांच्या प्रयत्नांमुळे इंग्रजीतील अनुवाद जगभर पसरून ‘कामसूत्र’ व ‘अनंगरंग’ हे ग्रंथ जास्त प्रकाशात आले.
‘रोमँटिकपणाचा प्रवास’ करण्यासाठी जसे प्राचीन भारतीयांनी ‘कामशास्त्र’ विकसित केले तसेच त्याला तत्त्वज्ञानाची जोड देऊन स्त्री-पुरुष संबंधांना एक वेगळाच स्तर देण्यासाठी ‘तंत्रशास्त्र’ही विकसित झाले, किंबहुना कामशास्त्रापूर्वीच त्याची सुरुवात झाली होती. निरंकुश कामऊर्जेला ‘कुंडलिनी’ शक्ती मानून तिच्यावर काही विचारांचा अंकुश ठेवून तिचा विधायक उपयोग करण्याच्या काही पद्धती विविध आचार्यानी विकसित केल्या. सुदैवाने त्या काळी ज्ञात असलेल्या मानवी शरीरांतर्गत मज्जासंस्थेच्या माहितीचा उपयोग यामध्ये व्यवस्थित केला गेल्याचे आता ‘आधुनिक वैद्यकशास्त्रा’नुसार आढळून येते.
खरे म्हणजे हे ज्ञान सर्वसामान्य सांसारिकाला उपयोगी असूनही त्याला मध्ययुगीन काळात ‘गोपनीय’ मानल्याने सेक्स हा विषय सर्वसामान्यांपासून शास्त्र म्हणून दूरच राहिला. त्यात ‘प्रवृत्तिप्रधान’ तत्त्वज्ञानाकडून ‘निवृत्तिप्रधान’ तत्त्वज्ञानाकडे मध्ययुगीन भारतात भर दिला गेल्याने ‘सेक्स’ विषय त्याज्य, निषिद्ध, टॅबू बनला. त्या काळात भारतीयांवर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे समाजव्यवस्थेवर व कामजीवनाच्या मोकळ्या विचारांवर हा ‘निषिद्धपणा’चा पगडा जास्तच बसला.
अठराव्या शतकातील ‘व्हिक्टोरियन संस्कृती’चा प्रभाव कामशास्त्राला जास्तच घातक ठरला आणि सध्या आपण भारतीय ‘सेक्स’कडे बघण्याचा जो दृष्टिकोन बाळगून आहोत तो आपल्या अगोदरच्या पिढय़ांवर झालेल्या या ‘व्हिक्टोरियन प्रभावा’मुळेच. तोच वारसा आपल्याला मिळाल्याने हस्तमथुनासारख्या नसíगक गोष्टींकडेही आपण अशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहू लागलो. विसाव्या शतकातील मध्यापर्यंत पाश्चात्त्यांवरही व त्यांच्यातील वैद्यकीय व्यावसायिकांवरही याचा प्रचंड प्रभाव होता. आधुनिक सेक्सॉलॉजीच्या उदयानंतर ‘सेक्स’च्या विचारांमध्ये क्रांती झाली.
असो, पण याच सामाजिक कारणांनी आपण भारतीय मात्र आपलाच सांस्कृतिक कामशास्त्रीय व तंत्रशास्त्रीय वारसा विसरून गेलो आहोत. तंत्रशास्त्रासारख्या गंभीरपणे हाताळल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाला छचोरपणाने ‘तांत्रिक-मांत्रिका’चे स्वरूप आले आणि कोणीही याला सर्वसामान्यांमध्ये योग्य व शास्त्रीय पद्धतीने न आणल्याने अजूनही तंत्रशास्त्राची अवहेलना होत आहे.
थोडक्यात, प्राचीन भारतीय ‘तंत्रशास्त्र व कामशास्त्र’ यांच्या वापराने सध्याचा सर्वसामान्यांचा सेक्सविषयीचा दृष्टिकोन बदलून त्यांचे कामजीवन सुधारून त्यांना ‘कामस्वास्थ्य’ लाभेल हे निश्चित आणि मग ‘व्हॉट इज सेक्स?’ या प्रश्नाने त्यांना बावचळल्यासारखे होणार नाही.
shashank.samak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा