मोहन गद्रे
gadrekaka@gmail.com
माझ्या हातात स्मार्ट फोन आला आणि माझी फोटोग्राफी करण्याची हौस उफाळून आली. झाड, पान, पाऊस, निसर्ग, नाना तऱ्हेची, वेगवेगळ्या भावना चेहऱ्यावर असणारी, विविध व्यवसायातील, पेशातील, अगदी रांगणाऱ्या मुलांपासून जख्ख म्हातारे, विचारात पडलेले, तळपत्या उन्हात गाढ झोपलेले, अशा माणसांचे फोटो काढण्याचं मला जणू वेडच लागलं म्हणाना. रोज सकाळी मी आमच्या घराजवळच्या बागेत फिरायला जातो. अर्थात मोबाइल कॅमेरा बरोबर असतोच हे वेगळे सांगायला नको.
बागेत बरेच झोपाळे बसविलेले आहेत. त्यातल्या बऱ्याच झोपाळ्यावर बसून वयस्कर मंडळी झोके घेण्याची हौस भागवून घेत असतात. त्या दिवशी एक वृद्ध जोडपे एका झोपाळ्यावर बसून आरामात कुल्फी खाण्यात अगदी दंग झाले होते. एकमेकांकडे डोळे मिचकावत, जीभ बाहेर काढून एकमेकांना दाखवत कुल्फी खात होते, हे दृश्य मला भलतेच भावले. हा क्षण टिपण्यासाठी मी मोबाइल काढून त्यांच्यासमोर काही
अंतरावर उभा राहिलो आणि चांगल्या क्षणाची वाट पाहू लागलो, इतक्यात वृद्धाचे माझ्याकडे लक्ष गेले, त्यांनी क्षणात आपल्या हातातली कुल्फी फेकून दिली आणि त्वेषाने माझ्याकडे आले. मी घाबरून त्यांची समजूत काढण्याच्या विचारात असतानाच माझ्या हातातला मोबाइल हिसकावून घेतला आणि तिरमिरीत फेकून दिला.
मी अवाक होऊन पाहात राहिलो. माझ्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाले, ‘‘आमच्या सुनेने आमच्या मागावर तुम्हाला पाठवले आहे ना? मला माहीत आहे सगळं.’’ इतक्यात त्यांच्या पत्नीने माझा फोन आणून देत माझ्यासमोर उभं राहून हात जोडून डोळ्यांत पाणी आणून गयावया करत म्हटलं, ‘‘अहो राग मानू नका. फोटो काढला असलात तर तेव्हढा पुसून टाका.’’ मी म्हटलं, ‘‘नाही आजी, मी फोटो काढलाच नाही, पाहा खात्री करून घ्या.’’
त्या दोघांनी माझी परत परत माफी मागत मला जे सांगितले ते ऐकून मी थक्क झालो. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात असतो, सुनेच्या धाकात त्यांना राहावे लागते. साध्या साध्या गोष्टीसाठी जाब द्यावा लागतो. कायम वचकून राहावे लागते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. तो घरी साजरा करायची अजिबात शक्यता नव्हती. नुसता विषय काढला असता तरी आकांडतांडव होईल म्हणून ती दोघं सकाळी फिरायला जाण्याचा बहाणा करून, रिक्षा करून या घरापासून दूर असलेल्या बागेत आली होती. बाकी काही नाही तर दोन लहान वेफर्सचे पुडे आणि कुल्फीच्या दोन कांडय़ा घेऊन आपला लग्नाचा वाढदिवस गुपचूप साजरा करत असतानाच मी समोर टपकलो आणि नुसताच टपकलो नाही तर फोटोही काढू लागलो. याचा आजोबांना मनस्वी राग आला होता. कारण सुनेची पाळत ठेवण्याचा अनुभव त्यांना यापूर्वी आला होता.
मी हतबुद्ध होऊन त्यांच्याकडे अपराध्यासारखा पाहात बसलो. ती दोघं बागेच्या दरवाजाच्या दिशेने निघाली, मी शक्य तितक्या वेगाने बागेबाहेर पडलो, दोन कॅडबरी चॉकलेट घेतली आणि दोघांच्या भर रस्त्यात पाया पडून, ते नको नको म्हणताना त्यांच्या हातात ठेवली.
रिक्षात बसून ती दोघं निघून गेली. मी कानाला खडा लावला. मी ज्याला आनंदाचा क्षण समजतो तो एखाद्यासाठी खोल दु:खाचा पापुद्रादेखील असू शकतो. यापुढे फोटो काढताना, त्या पापुद्रय़ाची मी खात्री करून घेतली पाहिजे.