परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना ‘प्राणप्रतिष्ठा’ करून आपली मूर्ती घडविली आहे. या देहात प्राण असेपर्यंतच सर्व काही आहे. प्राणाच्या अस्तित्वाशिवाय आपले अस्तित्व ‘शवा’प्रमाणेच आहे. प्राणशक्ती त्याचे ‘शिवा’त रूपांतरण करते.
पाच हा आकडा योगशास्त्रात किती ठिकाणी आहे पाहा. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेद्रिये, शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध या पंचतन्मात्रा, पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ही पंचमहाभूते निर्मितीच्या काळातील पंचीकरण क्रिया, अशा अनेक गोष्टींप्रमाणे पंचप्राण हा शरीराचा मूलभूत आधार आहेत.
प्राण-अपान-व्यान-उदान-समान हे मुख्य पाच प्राण आणि जोडीचे काही उपप्राण देहाच्या साऱ्या क्रिया पार पाडतात. विसर्जनाची क्रिया पार पाडणारा अपान वायू, पक्वाशयाच्या(पोटाच्या) ठिकाणी असणारा समान वायू, ऊध्र्वगामी असणारा उदान वायू, छातीच्या ठिकाणी असणारा प्राण वायू आणि शरीरभर सगळीकडे संचार करणारा तो ‘व्यान’.
एकदा प्राणशक्तीचे अस्तित्व समजून घेतले की ‘प्राण’ संकल्पनेसह श्वासावर नियंत्रण व पर्यायाने मनावर नियंत्रण आणणे समजू शकते.
कपालभाति
आज आपण प्राणायामाच्या पूर्वतयारीचा भाग कपालभाति ही शुद्धिक्रिया करूया. सुखासनात बसा. पाठकणा समस्थितीत ठेवा. डोळे शांत मिटून घ्या. कपाळावर आठी नको. एक खोलवर श्वास घ्या. तो सोडून द्या. आता सावकाश पोटाला आतमध्ये झटक्याने खेचून नाकावाटे जोरात उच्छवास करायचा आहे. प्रयत्नपूर्वक प्रच्छवास, प्रयत्नरहित श्वास या तत्त्वाने जमेल तितकी आवर्तने करावीत. साधारण ३० ते ५० आवर्तनांनंतर थांबावे.
शरीरातील कार्बन डायऑक्साइड वायू पूर्ण निघून गेल्याने एक क्षणभर श्वास पटकन परत घेतला जात नाही. त्याला अॅप्नीया असे संबोधतात. ही शून्यावस्था आहे. या शून्यावस्थेत सृजन आहे. ही जागा पकडणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे विकार असणाऱ्यांनी मार्गदर्शनाशिवाय ही क्रिया करू नये.
खा आनंदाने! : तमसो मा ज्योतिर्गमय
वैदेही अमोघ नवाथे आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली. आपण भारतीयांसाठी तसे सगळेच सण मंगल आणि उत्साहाचे असतात, तरी दिवाळी म्हटली की जणू काही सर्व सणांचा राजा. गणपती-नवरात्रीमुळे आलेल्या आनंदाचे आणि चतन्याचे उधाण द्विगुणित होते. घरातील प्रत्येक जण नवीन कपडय़ांची किंवा इतर काही महत्त्वाची (घर/ दागिने/ वस्तू वगरे) खरेदी करण्यात व्यग्र होतो. घरातील गृहिणी दिवाळी फराळ बनवण्यासाठी लगबग सुरू करतात.
घरामध्ये आजी असेल तर फराळासाठी तिचा ‘हात’भार पण महत्त्वाचा आणि आवश्यक असतो. आजोबा देखरेखीसाठी आणि ‘प्रेमळ सूचनांसाठी’ हवेच असतात. पण काही आजी-आजोबांना मात्र काळजी वाटते ती आरोग्याची! तेलकट/ तुपकट/ गोड पदार्थ खायचे नाहीत तर मग चकली- लाडू- कारंजी नाही तर काय खायचे, हा मोठा प्रश्नच असतो. बरे दात कमजोर असतील तर कडक चकली- कडबोळी चावली जात नाही. चला बघू या यंदाची दिवाळी साजरी करताना आरोग्य सांभाळून मजा कशी अनुभवता येईल?
शरीरामध्ये वयानुसार जे बदल होतात, उदा. केस पांढरे होणे, थकवा जाणवणे, हात-पाय कंप पावणे, दृष्टी मंद होणे, दात पडणे, हाडे ठिसूळ होणे- हे आपल्याला दिसून येतात किंवा जाणवतात, पण मुख्य कारण आहे की शरीराच्या अवयवांच्या कार्यशक्तीवर परिणाम झालेला असतो- ‘एजिंग’ वा वय होण्याच्या प्रक्रियेमुळे. आता हे बदल प्रत्येक व्यक्तीला कमी-जास्त जाणवतात. कारण बदल तर होतातच, पण ते लवकर होतात की उशिरा, अधिक तीव्र आहेत की सौम्य, हे प्रत्येकाच्या जीवनमानावर अवलंबून असते. म्हणजे आयुष्यभर असलेल्या आहाराच्या सवयी, व्यायाम, झोपेच्या वेळा, तणाव नियोजन वगरे वगरे बाबींवर! यकृत, मूत्रपिंड, हृदय, मेंदू, थायरॉइड वगरे अवयवांच्या परिपूर्ण कार्यासाठी काही अन्नघटक महत्त्वाचे असतात, जेणेकरून त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू राहिले की आजी-आजोबांनो तुम्हालाही मुले म्हणतील- ६० साल के जवान!!
– पॉलिश न केलेली धान्ये, मोड आलेल्या उसळी, सालीसकट डाळी, तीळ, अळशीच्या बिया, अक्रोड, बदाम, जर्दाळू, सफरचंद, केळी, संत्रे, नासपती, गाजर, बीट, पालक, दुधी, कोिथबीर, जेष्टीमध, दालचिनी, लसूण, गरम पाणी इत्यादी आणि असेच नैसर्गिक पदार्थ आहारामध्ये असणे आवश्यक आहेत.
– जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा पाळल्या की शरीराचं काम नियमित चालू राहतं.
– प्रकृतीप्रमाणे जसे जमेल तसे, पण व्यायाम जरुरी आहे- शरीराची हालचाल जरुरी आहे. सवय नसेल तर गुडघेदुखी किंवा थकवा येऊ शकतो. पण एकदा सवय झाली की फायदाही तितकाच होतो. बाहेर नाही तरी निदान घरी- पण चाला!
आता दिवाळीमुळे चार दिवस कुपथ्य होऊ शकते, पण आरोग्य नसेल बिघडवायचे तर हे जरूर करा.
– नेहमीच्या वेळेवरच जेवा. तेसुद्धा पचायला हलके-फुलके. म्हणजे साधे वरण – लाल भात, फुलका- फळभाजी, ताक- सलाड वगरे. रात्री फक्त फळे खाऊन किंवा भाजीचे सूप पिऊन लंघन केले तरी चालेल.
– दिवाळी फराळ- सकाळ आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणून केला तर चालेल. जेवण म्हणून नको.
– प्रमाण महत्त्वाचे! पचायला जड असल्याकारणाने थोडे कमी खाल्लेलेच बरे.
– सर्वच पदार्थ एका वेळी घेण्यापेक्षा चार दिवस दिवाळी आहे मग एक तिखट आणि एक गोड पदार्थ एका वेळी घेतला तरी चालेल.
– पारंपरिक पद्धतीने दिवाळी केल्यास नुकसान काही नाही. उलट त्यामुळे साखर नसलेले लाडू किंवा तेल नसलेली चकली खायची गरज नाही. कारण अन्न हे आपल्या मनाशी जुळलेले आहे. त्यामुळे मन मारून खाणे किंवा मनाकडे दुर्लक्ष करून जिभेसाठी खाणे- दोन्ही घातकच.
फक्त फराळ खाणे म्हणजेच दिवाळी नाही, तर सूर्योदयापूर्वी उठणे, सुवासिक तेलाने मालीश करणे, सुगंधित उटण्याने अभ्यंगस्नान करणे, देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरापर्यंत चालत जाणे, मन आनंदित ठेवणे, दिव्यांची रोषणाई डोळे भरून पाहणे इत्यादी सर्व कार्यामुळे आपण शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकतो आणि शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित ठेवतो.
तिखट-मिठाचे शंकरपाळे –
गव्हाच्या पिठामध्ये लाल तिखट, भरपूर कढीपत्ता, मीठ, धने-जिरे पावडर घालून पीठ मळा. त्याचे शंकरपाळे करा आणि लालसर तळून घ्या.
दातांचा त्रास असल्यास चिवडा चुरून खा, चकली/ कडबोळी दह्यामध्ये भिजवून खा. चकली, कडबोळी, गोड शंकरपाळे, तिखट-मिठाचे शंकरपाळे, पाकातल्या पुऱ्या, चंपाकळी, बेसन लाडू, चुरमा लाडू, रवा लाडू, अनारसे, पोहे चिवडा, मक्याचा चिवडा, ओल्या नारळाची करंजी, ड्रायफ्रुट करंजी (तोंडाला पाणी सुटले ना?) फराळाचा आस्वाद घ्या, पण अतिसाखर/ मीठ/ तेल आणि तुपाने नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. माझे आई-पपा मला नेहमी सांगतात- रोजचा दिवस ‘साजरा’ करता आला पाहिजे. मन आणि शरीर आरोग्यवान असेल तर दिवाळी वर्षांतून एकदाच का येणार?
लोकसत्ताच्या सर्व वाचकांना आरोग्यपूर्ण दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आनंदाची निवृत्ती : जुन्या मुंबईचा ठेवा
आनंद कोल्हटकर
निवृत्तीनंतर काय करावे याची दिशा व प्रेरणा आपल्या ‘लोकसत्ता’नेच करून दिली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण बँकेतून निवृत्त होण्याच्या सुमारास म्हणजेच १९९७-९८ दरम्यानच्या काळात दर आठवडय़ास जुन्या मुंबईचे अर्धे पान भरतील एवढे मोठे फोटो ‘बिंब-प्रतिबिंब’ या मालिकेत छापून यायचे. ते पाहून हा बहुमूल्य ठेवा अपणच का जपून ठेवू नये हा विचार मनात आला. ही कात्रणे जपून ठेवून त्यांचे एक छोटेखानी पुस्तकच बाइंड करून घेतले. नंतर या विषयाची गोडी वाढून त्यावरील अनेक छोटीमोठी पुस्तके मी मिळविली. आज जुन्या मुंबईचा चालता-बोलता इतिहासच मजपाशी आहे.
त्याच प्रमाणे मुळांतच पुस्तकांची आवड असल्यामुळे व ‘विलेपार्ले’च्या रूपाने पुस्तक पंढरी जवळच असल्यामुळे इतिहास, शास्त्र व ललित वाङ्मय या विषयांवरील आवडती पुस्तके विकत घेऊन स्वत:चीच एक छोटेखानी लायब्ररी बनविली आहे. अर्थातच यात जुन्या वाङ्मयावर जास्त भर दिला आहे. अथक प्रयत्नाने खालील जुने व अत्यंत दुर्मीळ असे वाङ्मय मी मिळविले आहे.
उदा. १०५ वर्षांपूर्वीचा १९०९ सालचा ‘मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक (किंमत १ रुपया), ‘मौज’चा १९२४ सालचा ९० वर्षांपूर्वीचा दिवाळी अंक (किंमत ६ आणे), ‘सत्यकथे’चा नोव्हेंबर १९३३ सालचा अंक (किंमत ४ आणे). ‘सोबत’चा मे १९६६ सालचा पहिला अंक (किंमत ३० पैसे), ‘केसरी’चा १ ला अंक (मंगळवार ता. ४ जानेवारी १८८१ किंमत १/२ आणा, ‘मराठा’चा १९५६ सालचा १ला अंक (किंमत १ आणा)
या सर्वाबरोबरच जुन्या मराठी व इंग्रजी चित्रपटांच्या दुर्मीळ प्रती रेकॉर्डरच्या सहाय्याने घरी डीव्हीडीवर स्वत: चित्रित केल्या आहेत. त्यात ‘लाखाची गोष्ट’, ‘गंगेत घोडं न्हालं’ या मराठी व ‘नायगारा’, ‘बेनहर’ इत्यादी इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. जवळ जवळ ४००/५०० चित्रपटांचा संग्रह मजपाशी आहे. यात डिस्कवरी व नॅशनल जिऑग्रफीमधील वेगवेगळय़ा ‘सायन्सवरील’ मालिकांचाही समावेश आहे. यांचा उपयोग शाळांतील विद्यार्थ्यांसाठी करून देण्याचा मानस आहे.
माझ्या या संग्रहात आमच्या कुटुंबातील आजोबा/ पणजोबा यांचे अनेक ५० ते १०० वर्षांवरचे फोटो. अनेक जुनी मोडीतील पत्रे (जवळजवळ ८० ते ९० वर्षांपूर्वीची) आहेत व त्यांचेही ८ ते १० अल्बम तयार केले आहेत. संग्रहात स्वातंत्र्यपूर्व काळातील पै-पैसा, रुपया (चांदीचा) व ‘शिवाजीचे’ ३५० वर्षांपूर्वीचे एक तांब्याचे नाणेही आहे.
हे सर्व सांभाळताना व त्यात भर टाकताना आपला निवृत्तीनंतरचा वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते!
नाते आपले औषधांशी
डॉ. अनिल निंबकर -nimbkarsacademy@gmail.com
चाळीस वर्षांपूर्वी औषधशास्त्रातील डॉक्टरेट मिळाल्यानंतर शिक्षकी पेशाबद्दल तीव्र ओढ असल्यामुळे मी फार्मसी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झालो आणि वयाच्या पासष्टाव्या वर्षी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालो. चाळीस वर्षांचा शिकविण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तसेच औषध कंपन्यांशी संपर्क असल्यामुळे तरुण पदवीधरांना औषध विक्रेता (एमआर) म्हणून नोकरी मिळण्याच्या सहाय्यार्थ तसेच औषधोपचार संबंधित जनजागृती करिता मी www.nimbkarsacademy.com ही वेबसाइट सुरू केली आणि त्यायोगे समाजोपयोगी दोन कार्ये सुरू केली त्याची ही कथा.
माझ्या मुलाने पंधरा वर्षांपूर्वी एका औषध कंपनीचा साधा औषध विक्रेता या पदावरून काम करण्यास प्रारंभ केला आणि आज त्या क्षेत्रात तो परदेशात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत असून त्याने खूप नाव कमावले आहे. आजही भारतात एम.आर.च्या नोकरीला लोकांच्या मनात हवा तसा दर्जा नाही. परंतु कुठल्याही औषध कंपनीकरिता एमआर हेच खरे आधारस्तंभ असतात. त्यांच्याशिवाय औषध कंपनी चालूच शकत नाही. एकदा एमआर म्हणून त्यांचा औषध कंपनीमध्ये प्रवेश झाला, की स्वत:च्या कामाची रूपरेषा आखून आणि उत्तम ज्ञान व संवाद-शक्तीच्या जोरावर ते अगदी उच्च पदाला(उपाध्यक्ष) गवसणी घालू शकतात. कोणत्याही विज्ञान शाखेतील पदवीधर (बी.एस्सी./ बी.व्ही.एस्सी /बी.फार्म./ डी.फार्म.) मुला-मुलींकरिता आम्ही सुरू केलेल्या दहा दिवसांच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही विद्यार्थाना केवळ मुलाखतीमध्येच नव्हे, तर मिळालेल्या नोकरीमध्ये यश मिळण्याकरिता लागणाऱ्या सर्व निकषांचे उत्तम प्रशिक्षण देण्याचे काम मी हाती घेतले आहे. त्या योगे पदवीधारकांना नोकरीची एक नवी वाट मिळून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे.
औषधोपचार करताना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे औषधे तारक ठरण्याऐवजी मारक ठरल्याचा अनुभव अनेक जणांना येतो. म्हणूनच या संबंधी जनजागृती व्हावी या एकमेव हेतूने चच्रेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा मार्ग मी अवलंबिला आहे. ही एक जनकल्याणार्थ सेवा असल्यामुळे ती नि:शुल्क आहे.
आजवर अनेकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आज वयाच्या सत्तरीतही ही जनहितार्थ सेवा करत असताना कुटुंबीयांकडून व जनतेकडूनही सतत प्रोत्साहन मिळत असल्यामुळे मला मिळणारे समाधान अवर्णनीय आहे.