परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना ‘प्राणप्रतिष्ठा’ करून आपली मूर्ती घडविली आहे. या देहात प्राण असेपर्यंतच सर्व काही आहे. प्राणाच्या अस्तित्वाशिवाय आपले अस्तित्व ‘शवा’प्रमाणेच आहे. प्राणशक्ती त्याचे ‘शिवा’त रूपांतरण करते.
पाच हा आकडा योगशास्त्रात किती ठिकाणी आहे पाहा. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेद्रिये, शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध या पंचतन्मात्रा, पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ही पंचमहाभूते निर्मितीच्या काळातील पंचीकरण क्रिया, अशा अनेक गोष्टींप्रमाणे पंचप्राण हा शरीराचा मूलभूत आधार आहेत.
प्राण-अपान-व्यान-उदान-समान हे मुख्य पाच प्राण आणि जोडीचे काही उपप्राण देहाच्या साऱ्या क्रिया पार पाडतात. विसर्जनाची क्रिया पार पाडणारा अपान वायू, पक्वाशयाच्या(पोटाच्या) ठिकाणी असणारा समान वायू, ऊध्र्वगामी असणारा उदान वायू, छातीच्या ठिकाणी असणारा प्राण वायू आणि शरीरभर सगळीकडे संचार करणारा तो ‘व्यान’.
एकदा प्राणशक्तीचे अस्तित्व समजून घेतले की ‘प्राण’ संकल्पनेसह श्वासावर नियंत्रण व पर्यायाने मनावर नियंत्रण आणणे समजू शकते.
कपालभाति
आज आपण प्राणायामाच्या पूर्वतयारीचा भाग कपालभाति ही शुद्धिक्रिया करूया. सुखासनात बसा. पाठकणा समस्थितीत ठेवा. डोळे शांत मिटून घ्या. कपाळावर आठी नको. एक खोलवर श्वास घ्या. तो सोडून द्या. आता सावकाश पोटाला आतमध्ये झटक्याने खेचून नाकावाटे जोरात उच्छवास करायचा आहे. प्रयत्नपूर्वक प्रच्छवास, प्रयत्नरहित श्वास या तत्त्वाने जमेल तितकी आवर्तने करावीत. साधारण ३० ते ५० आवर्तनांनंतर थांबावे.
शरीरातील कार्बन डायऑक्साइड वायू पूर्ण निघून गेल्याने एक क्षणभर श्वास पटकन परत घेतला जात नाही. त्याला अॅप्नीया असे संबोधतात. ही शून्यावस्था आहे. या शून्यावस्थेत सृजन आहे. ही जागा पकडणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे विकार असणाऱ्यांनी मार्गदर्शनाशिवाय ही क्रिया करू नये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा