प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे.
दु सऱ्या अध्यायांत भगवंतांनी अर्जुनाला कर्मफळाकडे समत्व दृष्टीने बघ व युद्ध कर असं सांगितलं. त्याबरोबर स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून स्थिरबुद्धी मनुष्य मन:शांती लाभून ब्राह्मोस्थितीप्रत कसा जातो तेही समजावलं. कर्म माणसाला करावंच लागतं, पण कर्मामागील विचार किंवा ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा निश्चयात्मक बुद्धी प्राप्त करून घेऊन शांती मिळव, असा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. दुसऱ्या अध्यायातील संपूर्ण तत्त्वज्ञान हे सांख्य तत्त्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. सांख्य म्हणजे ज्ञान!
भगवंतांचा सर्व उपदेश अर्जुन एकाग्रतेने ऐकत होता. अर्जुन भगवंतांचा सरळ, प्रांजळ मनाचा सखा आहे तसंच भक्तही आहे. अर्जुनाने आधी केलेल्या वैदिक अभ्यासामुळे त्याच्या मनात ज्या शंका निर्माण होत त्या मित्राच्या नात्याने ज्या बेधडकपणे तो कृष्णाला विचारतो त्यावरून त्या दोघांमधल्या ‘सख्य-भक्ती’च्या गोड नात्याची जाणीव होते. अर्जुनाच्या परखड प्रश्नानेच तिसऱ्या अध्यायाची सुरुवात होते. अर्जुनाने भगवंतांना विचारले, ‘हे जनार्दना, तू प्रथम मला युद्ध करणं हेच माझं कर्तव्य आहे, असं सांगितलंस, पण नंतर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानामुळे शांती मिळते असंही म्हणालास. मी त्यामुळे गोंधळलो आहे. तू मला असं घोटाळय़ात न पाडता एक काय ते निश्चित सांग. ज्ञान श्रेष्ठ आहे तर त्यामागे न जाता युद्धासारखं घोर कर्म मी का करू?’
भगवंतांनी या प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्यामधून कर्मयोगाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडतं. भगवंत म्हणाले, ‘अरे अर्जुना, फार पूर्वीच मी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानाचा व दुसरा कर्माचा! पण ज्ञानाचा मार्ग हा सांख्यासाठी म्हणजे ज्ञानी लोकांसाठी आहे तर कर्माचा मार्ग हा सर्वसाधारण योग्यांसाठी आहे.’
 आत्मदर्शन किंवा ईश्वराचा साक्षात अनुभव कसा घेता येईल हे सांगणं हा गीतातत्त्वज्ञानाचा पाया आहे. आपल्या हृदयात धडधडणारी चेतना म्हणजेच आत्मा! या आत्मदर्शनासाठी ज्ञान, ध्यान, कर्म, भक्ती यापैकी कोणत्याही मार्गाने जाता येते. प्रत्येकाने आपल्या मन:स्थितीनुसार मार्ग निवडावा. एखादा श्रीमंत माणूस दिल्लीला जाण्यासाठी विमानाचं तिकीट काढेल तर सर्वसाधारण माणूस इतक्या पैशाअभावी रेल्वेने जाण्याचं ठरवील. दोघांचं ध्येय एकच असूनही परिस्थितीनुसार मार्ग निवडला गेला. मनाची आध्यात्मिक स्थिती व ध्येय गाठण्याची तळमळ या दोन गोष्टींवर कसं जायचं हे अवलंबून होतं. दोन्ही मार्ग एकाच ध्येयाप्रत नेतात.
 सांख्य ऊर्फ ज्ञानमार्गाबद्दल बोलायचं झालं तर समाजात ज्ञानी योग्यांची संख्या कमी असते. असे योगी आत्मनंदांत मग्न असल्यामुळे नैष्कम्र्य स्थितीला पोचतात. ते समाधी स्थितीत शांत बसून असतात. नैष्कम्र्य म्हणजे कर्म नसणे. नैष्कम्र्य म्हणजे ज्ञान, समाधी! पण याचा अर्थ असा नव्हे की सुस्त बसलेला आळशी माणूस नैष्कम्र्य स्थितीला गेलाय-कारण नैष्कम्र्य स्थितीत ज्ञान, शांती, समाधान असते. ज्ञानी योग्यांच्या इच्छा, आकांक्षा, वासना, कमी झाल्याने गरजाही कमी असतात. गरजा कमी म्हणून कर्म कमी! हा सांख्य अथवा ज्ञानमार्ग संन्यास प्रतिपादन करतो. समाजातले अधिकतर लोक हे कर्माचरण करीत सर्वसामान्य जीवन जगणारे असतात. त्यांच्या मनांत सतत उठत असणाऱ्या वृत्ती, इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी ते अविरत कार्यमग्न असतात. सांसारिक जंजालातून सुटावं, असं ज्यांना वाटेल ते कर्मचारीसुद्धा कर्मयोगाचा मार्ग निवडू शकतील.  भगवंत गीतेत सांगतात की देहधारी जीव हा क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. अगदी नैष्कर्म स्थितीला पोचलेला सांख्ययोगी, ध्यानाला जरी बसला असला तरी त्याचा श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी कार्य चालूच असतं. कारण प्रकृतिगुणांपासून उत्पन्न झालेल्या देहाचे व्यापार चालूच असतात. यावरून हे निश्चित की कर्म माणसाला सुटत नाही. कर्ममार्ग हा सर्वाना सामावणारा असल्याने, तसंच कर्म केल्याशिवाय नैष्कम्र्य स्थितीही प्राप्त होत नसल्याने कर्ममार्गच श्रेष्ठ आहे.
अशा परिस्थितीत कर्म करता करता आत्मदर्शन कसं होणार? सांसारिक कर्मचाऱ्याने कर्मयोगी कसं व्हायचं? त्यासाठी आपली नित्य कर्मे कशी बदलावीत? काय काय पथ्यं पाळली पाहिजेत? प्रथम म्हणजे कुठल्याही माणसाने कर्म केलं की ‘मी केलं’ ही श्रेयाची जी असक्ती त्याला असते ती जायला हवी. कर्मावरचे आपले लेबल काढायची साधना करायला हवी. प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचे आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. इंद्रियांची वखवख कमी करण्याचा प्रयत्न केला तरच गरजा कमी होतील, कर्मफळाची आसक्ती नको. कर्मफळाकडे समतोल दृष्टीने बघायची साधना करायला हवी.
  गीता पुढे सांगते, नियत कर्म करावे म्हणजे शस्त्रविरहित कर्तव्य असेल तेच करावे. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे, असं उत्तर भगवंतांनी दिलं आहे. कर्म केलं की कर्मबंधनांत अडकायची भीती आलीच. भगवंत सांगत आहेत की यज्ञार्थ कर्मे केली की ती बंधनकारक होत नाहीत. या ठिकाणी गीता यज्ञ कल्पना मांडते. ज्ञानदेवांनी यज्ञाचा अर्थ स्वधर्म असा केला आहे. यज्ञामध्ये ‘इदं न मम’ म्हणून त्यागाची भावना शिकवली जाते. सर्वात प्रमुख आहुती द्यायची अहंकाराची- नंतर वासनांची! नियत कर्मविहित कर्म, स्वकर्म ही सगळी कर्मे, निष्कामतेने, अनासक्तपणे केली की कर्मबंधन टळतं. यज्ञसंकल्पना बरीच तपशिलांत जाऊन गीतेने मांडली आहे, कारण त्या गीतेच्या काळांत यज्ञकर्माला अनन्यसाधारण महत्त्व होतं.
 अशा तऱ्हेने कर्म करता करता सर्वसामान्य माणूसही कर्मयोगी होऊ शकतो. जो माणूस जीवनांतील श्रेष्ठ चैतन्याचा, ज्ञानमयतेचा शोध घेईल, आत्मविकास साधेल तो समाजात निश्चितच श्रेष्ठता पावेल. अशा श्रेष्ठता पावलेल्या योगिजनांनी लोकसंग्रह केला पाहिजे, असंही गीता पुढे सांगते. आपल्याला साधलेला कर्मयोग दुसऱ्यांनाही समजावून ‘आपल्यासारिखे करिती तत्काळ’ अशी भूमिका ज्ञान्यांनी घेतली पाहिजे. समाजविकासाचे कार्य श्रेष्ठांनी केले पाहिजे.
  भगवंत म्हणतात, ‘‘हे अर्जुना! मला या तीनही लोकांत काहीही कर्तव्य नाही, काहीही मिळवायचं नाही तरीही मी कर्म करीतच असतो. ‘‘यद्यकदाचरति श्रेष्ठस्तजदेवेतरो जन:।’’ या श्लोकानुसार श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो तसेच इतरेजन करीत असतात. म्हणून मला अतिशय सावध राहून कर्मे करावी लागतात, कारण लोक माझं अनुकरण करतात मी जर कर्मे केली नाहीत तर ही सर्व माणसे निष्क्रिय होऊन प्रजेचा घात होईल. लोकांना योग्य मार्गदर्शन करायला हवे.’’
 त्याचबरोबर अज्ञानी लोकांच्या बुद्धीत कर्म न करण्याचा भ्रमही घुसडू नये. उलट स्वत: शास्त्रविहित नियत, स्वधर्मरूप कर्मे, योगस्थ राहून उत्तम प्रकारे करून लोकांकडूनही तशी कर्मे करून घ्यावीत. कर्म करताना परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे करून ती मलाच समर्पण करावीत. माणसाने स्वधर्म कधी टाकू नये. परधर्म चांगला वाटला तरी स्वीकारू नये. आपल्याच धर्मात मरणे हेही कल्याणकारी असतं.’
हे सर्व ऐकल्यावर अर्जुनाने पुन्हा विचारले की मनुष्य स्वत:ची इच्छा नसतानाही, जबरदस्तीने करावयास लावल्यासारखे कुणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो?
भगवंत उतरले, ‘‘अरे अर्जुना, काम व क्रोध हे दोन माणसाचे शत्रू आहेत. ‘काम’ हा या मार्गातील मोठा वैरी आहे. माणसाला ज्ञानापासून लांब करण्याचे कामालाच शक्य आहे. इंद्रिये, मन, बुद्धी ही त्याची निवासस्थाने आहेत. त्यांच्याद्वारा ‘काम’ ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतात. तेव्हा ‘काम’ या शत्रूला तू मारून टाक.’’  स्थूल शरीरापेक्षा इंद्रिये बलवान, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनाहून बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा थोर होय. तेव्हा या आत्म्याला आपलंसं करून कामरूपी शत्रूला मारणे हेच सर्वात श्रेयस्कर. असा स्वधर्म, स्वकर्तव्य, नियत, विहित कर्म करणारा कर्मयोगीच शेवटी श्रेष्ठ ठरतो.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा