पुरंदरदासानं भक्तीच्या प्रांतातल्या ढोंगांवर, विसंगतीवर नेमकी टीका केली आहे. सोवळय़ाचं अवडंबर माजवणाऱ्यांना फटकारताना त्यानं म्हटलं आहे, की तुमचा देह जर अस्थी, मांस, कातडं यांनी बनलेला आहे तर तुमचं सोवळं असणार कुठून? तुमचं मन शुद्ध, निर्मळ करा. तेच खऱ्या अर्थानं सोवळं आहे.

चरित्रहीन किंवा अपराधी किंवा अवगुणी माणसाचा उदार, शीलवान आणि उदात्त अशा जीवनाकडे झालेला प्रवास हा संस्कृतीच्या इतिहासातला दुर्मीळ, स्पृहणीय आणि म्हणून आश्चर्यकारक आहे. वाल्या कोळी ते महर्षी वाल्मीकी असा तो जीवनप्रवास आहे. कर्नाटकातल्या संत पुरंदरदासांचं चरित्र याच प्रकारच्या प्रवासाचं दर्शन घडवणारं आहे.
वरदप्पा आणि कमलांबा या विष्णुभक्त जोडप्यानं १२ र्वष केलेल्या तिरुपती व्यंकटेशाच्या उपासनेचं फळ म्हणून त्यांच्या पोटी नारदाचा अंश पुत्ररूपानं जन्माला आला, असं मानलं जातं. तोच श्रीनिवास किंवा तिरुमलैअप्पा. प्रेमानं त्याला तिम्मप्पा म्हटलं जाई. संस्कृत आणि कन्नडबरोबरच संगीताचं उत्तम, शास्त्रशुद्ध ज्ञान आणि कुशाग्र बुद्धी असलेल्या या मुलाच्या आयुष्याचा प्रारंभकाळ इतर चारचौघांसारखाच होता. सरस्वती नावाची गुणी आणि उदार पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी अशी पाच अपत्ये आणि वडिलांसह तसाच वडिलांच्या पश्चातही भरभराटीला आणलेला सराफीचा व्यवसाय. तिम्मप्पाला त्याच्या परिसरात मोठं नाव मिळालं. ‘नवकोटनारायण’ म्हणण्याइतकी संपत्तीही मिळाली.
तो कृष्ण देवरायाच्या काळातला. हंपीजवळच राहणारा. राजदरबारी त्याला सहज मान मिळाला. पण दुर्दैवानं संपत्ती आणि सन्मान यांच्या योगानं हृदयाची उदारता मात्र त्याला मिळाली नाही. उलट तो अहंकारी आणि अत्यंत कंजूष झाला. आख्यायिका अशी आहे, की एकदा पांडुरंग वृद्धाच्या वेषात त्याच्या पेढीवर येऊन मदत मागू लागला. यानं त्याला हाकलून दिलं. तेव्हा पांडुरंग त्याच्या घरी गेला आणि आपली दयनीय अवस्था त्याच्या पत्नीला सांगून मदत मागू लागला. तिच्याकडे त्याला देण्यासाठी धन नव्हतं. कंजूष नवरा ते देईल अशी स्थिती नव्हती. दानाचा तिला अधिकारही नव्हता. पण तिनं आपलं स्त्रीधन- आपली नथ त्याला काढून दिली. पांडुरंग चतुर. तीच नथ त्यानं तिम्मप्पाच्या पेढीवर मुद्दाम विकायला नेली. तिम्मप्पानं नथ ओळखली आणि त्याला दुकानातच बसवून तो घरी आला. सरस्वतीकडे त्यानं तिची नथ मागितली. ती काय करणार? तिनं घरात येऊन विषप्राशनाची तयारी केली. इतक्यात त्या भांडय़ात तिची नथ येऊन पडली. तो चमत्कार तिनं नवऱ्याला सांगितला तेव्हा त्याचा संपूर्ण चित्तपालट झाला. इतका की आपली सर्व धनसंपत्ती दान करूनच तो मोकळा झाला. हंपीला त्यानं वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. दासकूट आणि व्यासकूट या नावांनी वैष्णवांच्या दोन परंपरा ओळखल्या जातात. भक्ती आणि ज्ञान यांच्याद्वारे ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या या दोन वाटा. तिम्मप्पा दासकूट परंपरेचा पाईक झाला. त्याला पुढे पुरंदरदास असं नाव मिळालं.
आपल्या आयुष्यात अनेक आख्यायिकांचा हा धनी झाला. कधी पांडुरंग, तर कधी तिरुपती व्यंकटेश, कधी उडपी तर कधी मदुरा, कधी कांची तर कधी कन्याकुमारी, नाना तीर्थक्षेत्रं पाहात, वेगवेगळय़ा नद्यांचं आणि पवित्र तीर्थाचं दर्शन घेत त्यानं दक्षिणयात्रा केल्या. डोळय़ांना भेटणाऱ्या नाना निसर्गरूपांमधून ईश्वरीय सौंदर्याचा अनुभव त्याला आला. तोच अनुभव भक्तीच्या गाढतेनं आद्र्र होऊन त्याच्या पदांमध्ये उतरून आला. राजा कृष्णदेवराय त्याच्यावर फार प्रसन्न होता. पण त्या नि:संग झालेल्या ईश्वरभक्ताला राजाकडून काही नको होतं. एकेकाळी त्यानं स्वत:चं वैभव स्वत:च दोन हातांनी लुटवलं होतं. आता त्याचं बैरागीपण हेच त्याचं ऐश्वर्य होतं. त्याच्यासाठी कृष्ण देवरायानं हंपीला चक्रतीर्थाजवळ एक मोठा भजनमंडप  बांधवला. आज दासमंडप या नावानं तो ओळखला जातो.
असं म्हणतात, की पुरंदरदासाच्या पदांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. त्यानं रचलेले काही काव्यग्रंथही उल्लेखले जातात, पण ते उपलब्ध नाहीत. त्याची कीर्तनं मात्र उडपीच्या माध्व सांप्रदायिकांनी प्रसिद्ध केली आहेत.
पुरंदरदासाची पदं फार मधुर आहेत. संगीत शब्दांशी एकजीव होतं तेव्हा त्या शब्दांना केवढी श्रुतिसुंदरता प्राप्त होते हे त्याच्या पदांमधून अनुभवता येतं. शिवाय त्या पदांना भक्तीचाही अनोखा सुगंध आहे. देवाला शपथ घालणारं त्याचं एक फार गोड पद आहे-
शपथ असो दोघांना, शपथ तुला, शपथ मला
शपथ परमभक्तांची शपथ असो अपुल्याला

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

नामस्मरण विस्मरलो तर लागो शपथ मला
भवसमुद्र तरताना रक्षिलेस नच मजला, शपथ तुला

तुज त्यागुन दुसऱ्याला स्मरलो तर शपथ मला
पण मधेच हात जरी सोडलास, शपथ तुला

तन-मन-धन योगे केली मी वंचनाच, शपथ मला
पदकमलीं मन माझे स्थिर न करशि, शपथ तुला
पुरंदरदासाची पदं इहलोकीच्या वास्तवापासून दूर असलेल्या एका वेगळय़ाच जगाविषयीची आहेत. ते जग आहे भगवद्भक्ताचं जग. ते भक्तीचं साम्राज्य आहे. अनिर्वाच्य आनंदाचा अनुभव देणारं जग. त्याला वाचेनं वर्णन करण्याचा छंद पुरंदरदासाला आयुष्यभर लागला होता. जे सांगता येणारं नाही ते सांगण्याची, जे अनुभवापलीकडचं आहे ते अनुभवण्याच्या तळमळीची, जे अनुपमेय आहे ते उपमेनं साक्षात करू पाहण्याची त्याची कविता आहे. ही त्याची आंतरिक ओढच त्याला सतत उचंबळून लिहायला लावत असली पाहिजे. म्हणून तर त्याचा पदसंभार फार मोठा आहे.
त्याच्या पदांमध्ये कृष्णाच्या बाललीला आहेत. यशोदेचं आणि वृंदावनवासी गोपींचं भावमोहन आहे, विष्णू-कृष्ण-विठ्ठलरूपांची स्तुती आहे. त्यांच्याशी केलेलं लटकं भांडण आहे. भक्तीच्या वाटेवरचं दु:ख, विरह, तळमळ, तडफड, भेटीची आस, उत्कंठा आणि दर्शनाचा आनंद अशा कितीतरी भावच्छटा मर्मस्पर्शी उत्कटतेनं आणि नवलाईच्या बारकाव्यानं त्याच्या पदांमधून व्यक्त झाल्या आहेत.
पुरंदरदासानं भक्तीच्या प्रांतातल्या ढोंगांवर, विसंगतीवर, दंभावर मात्र जाता जाता नेमकी टीका केली आहे. सोवळय़ाचं अवडंबर माजवणाऱ्यांना फटकारताना त्यानं म्हटलं आहे, की तुमचा देह जर अस्थी, मांस, कातडं यांनी बनलेला आहे तर तुमचं सोवळं असणार कुठून? दुसऱ्याचा स्पर्श झाल्यावर तुम्ही ओवळे कसे होता? आणि गंगेत स्नान केल्यानं तुमचं ओवळेपण नष्ट होत नाही, हेही लक्षात असू द्या. तुमचं मन शुद्ध, निर्मळ करा. तेच खऱ्या अर्थानं सोवळं आहे.
आपण आकंठ जेवून उपाशी अतिथीला हाकलून देणारं सोवळं काय कामाचं? आतले काम-क्रोध-मद-मत्सर तसेच असतील तर सोवळं असणार कुठून? पाप करायचं आणि पुण्याचा आव आणायचा, हे सोवळं नव्हे. वडीलधाऱ्यांचा, गुरूंचा, देवभक्तांचा आदर आणि त्यांच्याविषयी प्रेम-ईश्वरभक्तीसह मनात ठेवणं आणि मन निर्मळ ठेवणं हेच खरं सोवळं!
पुरंदरदासाच्या पदांमधून असा निर्भय उपदेश सहजच होत जातो. पण त्याचं खरं सामथ्र्य त्याच्या संगीतमय अशा भक्तीच्या उच्चारात आहे. कर्नाटक संगीत समृद्ध करण्यात त्याच्या पदांचा फार मोठा वाटा आहे. त्यागराजालाही प्रेरणादायी ठरलेली त्याची पदरचना एकीकडे सुभाषितांची प्रतिष्ठा पावली आहे आणि दुसरीकडे गीतरचनेचं गौरी-शंकर ठरली आहे. कर्नाटकच्या भक्तिसाहित्यात तिचं स्थान अनन्यसाधारण आहे.
शुभ दिन आला आज, आजचा वार असे शुभवार
शुभ तारे, नक्षत्र शुभ असे
आज योग सर्वथा शुभ असे
करण आज अत्यंत शुभ असे
देव पुरंदर विठ्ठलदर्शन झाले मजला आज
शुभ दिन आला आज
..यासारखी उत्कट भक्तीनं भिजलेली पुरंदरदासाची गीतं आजही कर्नाटकाच्या भूमीवर प्रेमभक्तीनं गायिली जातात. काळाचा धक्का त्यांच्या लोकप्रियतेला अद्याप लागलेला नाही.   

Story img Loader