‘अन्नपूर्णा’ परिवाराने ११ जुलै २०१७ रोजी पंचविसाव्या वर्षांत पदार्पण केलं. या वाटचालीकडे मी वळून पाहाते तेव्हा ‘मी आणि ‘अन्नपूर्णा’ परिवार’ एकमेकांत दूध-साखरेसारखे मिसळून गेलोय असं वाटतं. ‘अन्नपूर्णा’ ही माझी ओळख-अस्तित्व, ध्यास-श्वास बनली आहे. मी बँक सोडून ‘अन्नपूर्णा परिवार’ घडवला नसता तर मी काय केलं असतं, ही कल्पनासुद्धा करता येत नाही, पण मागे वळून पाहताना मी ‘बँक ऑफ इंडिया’तील माझ्या १२ वर्षांच्या कारकीर्दीबद्दल ऋणी आहे. कारण तिथे जे बँकिंग क्षेत्राचं गमभन गिरवलं ते ‘अन्नपूर्णा’ परिवाराची आर्थिक घडी भक्कम करण्यासाठी खूप उपयोगी ठरलं.
बँकांकडून गरीब महिलांना वाटण्यासाठी कर्जाऊ पसे मिळवणं मुळीच सोपं नव्हतं, पण बँकर्सची विचार करण्याची पद्धत ठाऊक असल्यामुळे मी कर्जासाठी प्रस्ताव लिहिण्यापासून बँकांच्या व्याजाच्या दरात घासाघीस करण्यापर्यंतची कामं गेल्या पंचवीस वर्षांत करत आले. हल्ली ४/५ वर्षांपासून माझ्या तरुण सहकाऱ्यांना हे तंत्र शिकवून मी तयार करत आहे. आनंद वाटतो याचा की कोटय़वधी रुपये बँकांकडून मिळवून आम्ही अत्यंत गरीब महिलांपर्यंत पोचवू शकलो. ज्या महिलांकडे तारण, जामीन नाही, त्यांना बँकांनी कधीच एवढं कर्ज दिलं नसतं. पण मेधाताईंचा वैयक्तिक जामीन घेऊन का असेना, ‘अन्नपूर्णा’ परिवाराला बँकांनी कोटय़वधी रुपये कर्जाऊ दिले. व्याजाचा दर मात्र १२ टक्के दर साल दर शेकडा म्हणजे अगदी बाजार भावानेच आम्हाला पसे दिले- देत आहेत. चीडही येते आणि गंमत वाटते की, काही श्रीमंत उद्योगपती कमीत कमी टक्क्यांनी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज मिळवतात आणि बुडवून पसार होतात. पण त्यांच्यावर बँकांचा भरोसा – का? तर त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता असते. आणि गरीब कष्टकरी महिलांवर विश्वास नाही – कारण त्यांची झोपडीसुद्धा स्वत:च्या मालकीची नसते. सगळा विश्वास तारण व जामीन यांवर म्हणजे ज्यांच्याकडे तारण जामीन नाही ते कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत. अजूनही ही मानसिकता बँकांनी बदललेली नाही.
मी बरेचदा आमच्या बँकर्सना म्हणते, ‘‘तुम्ही ५० कोटींच्या कर्जाला मला वैयक्तिक जामीन द्यायला लावता, पण वेळ आली तर मी कुठे भरू शकणार आहे ५० कोटी रुपये एकटी? भरताहेत माझ्या गरीब सभासद महिलाच, पण तुमचा भरोसा अजूनही त्यांच्यावर नाहीच!’’ तरीही या वाटचालीत गरिबात गरीब महिलांपर्यंत भरपूर पसा पोचवला. महिलांच्या नावावर घरं, यंत्रं, मालमत्ता हळूहळू वाढली. त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारला. आर्थिक साक्षरता वाढली. महिला बोलक्या झाल्या. घरात, वस्तीत, गटांच्या बठकांत, प्रतिनिधींच्या सभांमध्ये विचार मांडू लागल्या, निर्णय घेऊ लागल्या. महिलांचं हे सक्षमीकरण टप्प्याटप्प्याने घडत गेलं.
मी या बदलाची साक्षीदार, मध्यस्थ तर आहेच आणि इतका बदल होऊ शकतो हे प्रत्यक्ष अनुभवून कधी कधी थक्कसुद्धा होते. खूप समाधान वाटतं, की मी १९९३ला धाडसाने पहिलं पाऊल टाकलं आणि या अनघड वाटेवर चालू लागले. गेल्या पंधरा वर्षांत ‘लघुवित्त’ क्षेत्राची वाट अनघड, अवघड राहिली नाही. खूप धंदेवाईक मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका या क्षेत्रांत उतरल्या आहेत. परंतु त्यामुळे खूप स्पर्धा वाढली आहे व गरजेपेक्षा, क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेण्याची प्रवृत्ती गरीब कुटुंबांमध्ये वाढत आहे.
‘अन्नपूर्णा’ परिवाराच्या ‘लघुवित्त’इतकाच प्रभावी प्रकल्प बनला आहे ‘लघु विम्याचा’! आरोग्य सुरक्षा निधी, जीवन व कुटुंब सुरक्षा निधीच्या रूपाने महिला व त्यांचे कुटुंबीय यांना कोटय़वधी रुपयांची आर्थिक मदत यातून केली जाते. आरोग्याबद्दलचं त्यांचं ज्ञान वाढवलं जातं, त्यांचा आरोग्याचा दर्जा सुधारला जातो. माझी फार इच्छा आहे की हा कार्यक्रम भारताच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी पोचावा. अनेक छोटय़ा छोटय़ा सेवाभावी संस्था हा लघुविमा कार्यक्रम कुठेही राबवू शकतील. पण अजून तरी त्याचा आम्हाला फार प्रसार करता आलेला नाही. लघुविमा क्षेत्र भारतात अजूनही सर्वदूर पोचलेलं नाही.
‘लघुवित्त’ व ‘लघुविमा’ या दोन्ही क्षेत्रांसाठी देशव्यापी कायदा आजही अस्तित्वात नाही व त्या पातळीवर इच्छा असूनही मला काहीच काम करता आलेलं नाही. असंघटित क्षेत्रातील आर्थिक सेवासुद्धा असंघटितच आहेत, ही खंत वाटते. एका बाजूला नफेखोरीसाठी ‘लघुवित्त’ धंदा करणाऱ्या महाकाय मायक्रो फायनान्स कंपन्या व दुसऱ्या बाजूला ‘आर्थिक गरज म्हणून कर्ज घेण्यापेक्षा मिळतं आहे तर घ्या’ अशा भावनेतून अनेक र्कज एका वेळी घेणाऱ्या महिला, त्यांना पुढे करून कर्ज घेणारे व न फेडणारे त्यांच्या घरातील पुरुष यांच्याकडे पाहून, नफेखोरीसाठी चाललेली मायक्रो फायनान्स संस्थांची चढाओढ पाहून महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखं आर्थिक अरिष्ट येऊ घातलंय याची चाहूल मला भासते व चिंतीत करते.
माझ्या बालवयापासूनच माझा पड वाचन, विचार, सामाजिक चळवळींमधील सक्रिय सहभाग यावर पोसला. कपडे, दागिने, छानछौकी यांची आवड कधी लागलीच नाही. गेल्या २५ वर्षांत ‘अन्नपूर्णा’मुळे माझ्या दैनंदिन कार्यक्रमातील १०/१२ तास मी व्यग्र असते. त्यामुळे इच्छा असूनही व सामाजिक, पुरोगामी चळवळींमधील असंख्य गटांशी माझे घनिष्ट संबंध असून ही मला त्यामध्ये सक्रिय सहभाग घेता येत नाही याचं वाईट वाटतं. त्याच वेळी मी कित्येक तरुण कार्यकत्रे ‘अन्नपूर्णा’ परिवाराच्या माध्यमातून घडवत आहे याचं समाधानही वाटतं! समाजसेवेची पदवी घेतलेल्या तरुण-तरुणींना दुर्बल घटकांचं आर्थिक सामाजिक सक्षमीकरण करण्याची व बऱ्यापकी वेतन घेऊन समाजसेवा करण्याची संधी मी ‘अन्नपूर्णा’च्या माध्यमातून देऊ शकले याबद्दल आनंद वाटतो. मी एकटीने बँकेतील सुखवस्तू नोकरी सोडली, पण अक्षरश: लाखो रोजगार उभे राहिले याबद्दल कृतकृत्य वाटतं.
‘अन्नपूर्णा’ची उभारणी व रचना करताना सतत मी ही काळजी घेतली आहे की, ‘अन्नपूर्णा’ परिवार हा एकखांबी तंबू होऊ नये, हे काम व्यक्तिसापेक्ष राहू नये. ही एक चळवळ व्हावी- जोपर्यंत समाजात गरिबी व गरिबीशी निगडित समस्या आहेत तोपर्यंत ‘अन्नपूर्णा’ परिवाराने त्यावर उपाय शोधत राहावे, वेगवेगळ्या आर्थिक व बिगरआर्थिक सेवांच्या जाळ्यांतून गरीब महिला व त्यांचे कुटुंब यांना सुरक्षाचक्र पुरवावे. त्यामध्ये या महिलांच्या विचारांना, भावनांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ असावे. त्यांच्याशी संवाद व्हावा व त्यातून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर मार्ग काढत राहावे. ‘‘इनडिव्हिज्युअल हॅज ए लिमिटेड लाइफ, बट इन्स्टिटय़ूशन शुड लाइव अॅज लाँग ऑज देअर इज अ पर्पज’ हे तत्त्व मनाशी कायम बाळगलं. त्यामुळे मी नसेन तेव्हाही ‘अन्नपूर्णा’ परिवार एक चळवळ, एक लोकशाही रचना असलेली संस्था म्हणून कार्यरत राहावी याकडे मी हरप्रकारे लक्ष पुरवलं आहे. याला यश किती आलं, काय राहून गेलं, काय चुकलं हे काळच सांगू शकेल.
मी पुरस्कार, सन्मानांच्या मागे कधी लागले नाही. आजवर जे पुरस्कार मिळालेत ते अर्ज न करता, पुरस्कार समितींनी स्वत:हून निवड करून दिलेत व त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या कार्यातून मला जो आनंद, जे समाधान मिळतं आहे तोच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे अशी माझी भावना आहे. मी पुणे मुंबई कुठेही असले तरी रस्त्यातून चालताना कुणीतरी साधीसुधी महिला पुढे येते, पायाला स्पर्श करू पाहते, ‘‘तुम्ही मेदाताई ना?’’ असं विचारते. ‘‘आमी तुमच्यामुळे आहोत ताई’’ असं म्हणते आणि मी तिला जवळ घेते. त्या वेळी माझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. आमची ती जीवाशीवाची भेट असते. हाच माझा मोठा सन्मान मला वाटतो, की माझ्या सभासद आणि मी यांच्यात हे अद्वैत आहे.
सामाजिक कार्याइतकीच मला चित्रकला, वाचन, काव्य-कथा लेखन, नाटकं/नाटय़ संगीत/ शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड. पण हल्ली साधं एक पुस्तक वाचायला मला महिनोंमहिने लागतात, लिखाण तर दूरच. नातींना चिऊ माऊची चित्रं काढून दाखवते तेवढाच चित्रकलेशी संबंध उरलाय. सवाई गंधर्व महोत्सवात एखाद्या रात्री तासभर पोचू शकले तर त्यातल्या त्यात ‘हेही नसे थोडके’ म्हणते. ‘अन्नपूर्णा’च्या कामामुळे खूप ठिकाणी मला व्याख्यानं द्यायला बोलावलं जातं. देशात, परदेशात एकटी खूप फिरले. पण कुटुंबासोबत प्रवास, रमतगमत फिरणं राहून गेलंय. धावपळीतच २/३ दिवसांच्या छोटय़ा सहलींना जातो तेवढंच. संध्याकाळी एकत्र चहासुद्धा मी माझ्या नवऱ्यासोबत कैक वर्षांत घेतला नाही. त्याचा व्यवसाय आहे. तो ही खूप व्यग्र असतो. पण तरीही मला चिडवतो. ‘रोज मीच तुझ्याआधी घरी येऊन तुझी वाट पाहात असतो’ म्हणून. त्यातल्या त्यात मी धडपडत राहाते, माझ्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम घालवण्यासाठी, माझ्या दोन नातींसोबत खेळण्यासाठी. रात्रीपर्यंत त्यांना माझी वाट पाहावी लागते.
गेल्या दहा वर्षांपासून माझ्या बाबांच्या नावाने ‘दादा पुरव रिसर्च सेंटर’ आम्ही काढलं आहे. त्या माध्यमातून संशोधन, अभ्यास, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू असतं. पुढच्या ५/७ वर्षांमध्ये त्या रिसर्च सेंटरचा अधिक विस्तार करण्याची माझी इच्छा आहे. ‘अन्नपूर्णा’ परिवाराची वस्ती पातळीवर वित्तसेवा पुरवण्याची धुरा माझ्या तरुण सहकाऱ्यांवर सोपवून ‘दादा पुरव रिसर्च सेंटर’मध्ये जास्त गुंतवून घेण्याची इच्छा मी मनाशी बाळगून आहे. माझ्या निवृत्तीचा तोच संकल्प आहे.
‘अन्नपूर्णा’ परिवारच्या संचालक मंडळावर मी जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत असेन, माझ्या तरुण सहकाऱ्यांना मार्गदर्शन, दिशा देत राहीन. परंतु ६५व्या वर्षांनंतर ‘कार्यकारी संचालक’ या पदावरून बाजूला होईन आणि तरुण रक्ताला संधी देईन हे आधीच ठरलेलं आहे. हो, मात्र माझ्या रक्ताच्या नात्यातील तरुण व्यक्तीला माझ्या जागेवर बसवणार नाही हे ही आवर्जून काळजी घेतली आहे. ‘लघुवित्त’, ‘लघुविमा’ या क्षेत्रातील माझ्या दीर्घ अनुभवाच्या आधारे लिखाण करता आलं, या क्षेत्रातील कायदे अस्तित्वात यावे यासाठी काही काम करता आलं तर मी म्हणेन ‘याचसाठी केला होता अट्टहास’! (समाप्त)
डॉ. मेधा पुरव सामंत
dr.medha@annapurnapariwar.org