|| अमर हबीब
आपलं आयुष्य लहान. त्यात संपूर्ण जगाची घडी नीट करायचा इरादा. त्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांला शोषणाची संघर्ष-रेषा समजावून घ्यावी लागते. ही संघर्ष-रेषा नीट समजली की कामाला दिशा मिळते.
काही लोकांनी वर्ग-संघर्ष मानला. त्यांना वाटले की, उत्पादन साधनांचे मालक त्यांच्या कामगारांचे शोषण करतात. म्हणून मालक आणि कामगार यांचा संघर्ष महत्त्वाचा. कामगारांच्या फौजा बनवून सत्ता संपादन करायची आणि शेवटी मालकांना बेदखल करून सर्व उत्पादन साधने समाजाच्या म्हणजेच सरकारच्या मालकीची करायची. सरकार हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे असा त्यांचा ठाम विश्वास. या वर्ग-संघर्षांच्या कल्पनेने संपूर्ण जगाला अक्षरश: भारावून टाकले होते. या कल्पनेचा जनक कार्ल मार्क्स. लेनिन आणि माओ हे या विचाराचे महानायक. औद्योगिक क्रांतीनंतर जन्माला आलेल्या या विचाराचे जगभरातील तरुणांवर गारूड होते. कामगारांच्या शोषणाला प्राधान्य दिल्यामुळे शेतीच्या शोषणाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे तर मूलभूत भांडवल निर्मितीत शेतीची भूमिका आणि मानवी विकासात नफ्याची प्रेरणा या बाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. ८०च्या दशकानंतर संपूर्ण जगात नव्या तंत्रज्ञानाचे वादळ आले. या वादळाने या समाजवादी संकल्पनेचा धुव्वा उडवला. रशिया विखुरला गेला. चीनने आíथक उदारीकरणाचे धोरण स्वीकारून नव्या वाटेने चालायला सुरुवात केली. शेतकरी मालक असतानाही आत्महत्या करताना दिसू लागले. भांडवल निर्मितीची नवी साधने पुढे आली. त्यास नियंत्रित करणे अशक्य झाले. नव्या जगात वर्ग-संघर्षांची हाक आणि समाजवादी विकास संकल्पना निर्थक ठरल्या.
जगात अन्यत्र नसलेली जातिव्यवस्था भारतात असल्यामुळे येथील शोषणाला तो एक वेगळा आयाम आहे. जातिव्यवस्थेने सामाजिक स्वास्थ्य बिघडवले आहे याची जाणीव मध्ययुगात संतांना झाल्याचे दिसून येते. त्यांनी समन्वयवादी, समजूतदार व मानवतावादी भूमिका घेतली. पुढे महात्मा जोतिबा फुले यांनी वर्ण व्यवस्थेवर हल्ला चढवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंताच्या भूमिकेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. अनेक विचारवंतांनी वर्ग-संघर्षांबरोबर वर्ण-संघर्ष अनिवार्य असल्याची मांडणी केली. शोषित जातींचे जागरण आणि संघटन करून हा संघर्ष पुढे रेटणाऱ्या चळवळी पुढे आल्या. जाती जातीच्या संघटना वाढत गेल्या. त्यांना एकत्र करण्यासाठी बहुजन असे नाव देण्यात आले. लोकशाहीत निवडणुका होतात. निवडणुकीत मतदान होते. म्हणून गठ्ठा मतांना महत्त्व येते. जातीचे गठ्ठे करणे सोयीचे जाते. टोळी अवस्थेतून बाहेर येणारा माणूस सोयीने जातीच्या टोळ्या करू लागला. आपल्या जातीची मुले व्यापार-उद्योगात, नोकरीत किंवा सत्तेत गेली तर ती आपले कल्याण करतील ही अपेक्षा फोल ठरली. किंबहुना त्यांनी आपल्याच जातीतील दुबळ्यांना छळले. वर्ग-संघर्षांतून निर्माण झालेल्या सत्तेत जशी सत्ताधारी आणि नोकरशहांची चालती होते तशीच वर्ण-संघर्षांतूनदेखील मूठभर शासक वर्ग तयार होतो व तो समाजाचे शोषण करतो. वर्ण-संघर्षांतूनदेखील शोषण मुक्तीचे उत्तर सापडत नाही.. ८० च्या दशकात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाने लक्षात आणून दिले की, शेतकरी उत्पादन साधनाचा ‘मालक’ असूनही त्याचे शोषण होते. एवढेच नव्हे तर सरकार हे शोषण धोरण ठरवून करते. त्याच बरोबर हेही लक्षात आले की, शोषणाचे धोरण ठरविणारे शोषितांच्या जाती-धर्माचे आहेत. वर्ग-संघर्ष नाही तसा वर्ग-संघर्षही समाधानकारक उत्तर देत नाही. मग शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष-रेषा कोणती? असा प्रश्न पडला. सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मला या प्रश्नाने अस्वस्थ केले.
कोणी म्हणाले, हा जगाचा गोल शेषाच्या शिरावर आहे. कोणी म्हणाले, कामगारांच्या तळहातावर आहे. खरं काय असावं?
ज्या गोष्टी बाजूला झाल्याने जग डळमळेल, कोसळेल, नष्ट होईल, त्या गोष्टींचा जगाच्या अस्तित्वाला आधार आहे असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, जगातल्या सर्व शाळा नष्ट झाल्या तर जग नष्ट होईल का? या घटनेचा जगावर निश्चितपणे वाईट परिणाम होईल. पण जग नष्ट होणार नाही. दवाखाने बंद झाले, कोर्ट, बँका, कारखाने बंद झाले, सरकारी कचेऱ्या किंवा खुद्द सरकारच बंद झाले, असा कोणताही विचार केला तरी उत्तर एकच मिळते. त्याचा जगावर विपरीत परिणाम जरूर होईल, पण जग थांबणार नाही. लंगडत लंगडत का होईना चालत राहील.
या विश्वात आज असे दोन मानव समूह आहेत की ज्यांची खऱ्या अर्थाने काळजी घेणे आवश्यक आहे. पहिला शेतकरी आणि दुसरा स्त्रिया! शेतकरी आत्महत्या करत आहेत. ते नष्ट झाले तर बिकट परिस्थिती निर्माण होईल. माणसाला जगण्यासाठी अन्न खावे लागते. अन्न पिकवितो शेतकरी. तोच राहिला नाही तर पिकणार कसे? खाणार काय? दगड, माती, लोखंड, कोळसा खाऊन उदराची क्षुधा भागविता येत नाही. माणसाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सूर्याच्या प्रकाशकिरणापासून येणारी ऊर्जा आणि प्रक्रिया करणारी हिरवी पाने, यातून तयार होणारे अन्नच खावे लागते. होय, शेतीचा शोध लागण्यापूर्वीही माणसे जगत होती. पण त्या काळात किती माणसे जगू शकत होती? त्या जगात लाखभरदेखील नव्हती. तरी त्यांनाही कंदमुळे आणि शिकार मिळवावीच लागत असे. नसíगक शेतीतील पेरणीचे काम ते करीत नसले तरी खळे तर करावेच लागायचे. अन्नाला पर्याय नाही. या पृथ्वीतलावर अन्न नसेल तर माणूस जगेल कसा? शेतकऱ्याला अन्नदाता म्हटले गेले. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे कायम शोषण होत राहिले. तो मेला नाही पाहिजे, पण त्याला नीट जगताही आले नाही पाहिजे अशी कायम खबरदारी घेण्यात आली.
जगातील सर्व स्त्रियांची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. मानवी वंशाचे सातत्य अबाधित ठेवण्याचे काम स्त्रियांनी केले. एवढेच नव्हे तर मानवी उन्नतीच्या अनेक प्रकारच्या भूमिका स्त्रियांनी बजावल्या. स्त्रियांबद्दल आदर व्यक्त करणारे अनेक संदर्भ पुरातन ग्रंथात आढळतात. ‘मातृ देवो भव’ अथवा ‘माँ के परों तले जन्नत’ असे गुणगान गायले गेले. तरी स्त्रियांची कायम अवहेलनाच होत राहिली. तिचे शोषण केले गेले. कष्ट तिच्या पाचवीला पुजलेले.
जगाचा गोल दोन हातांवर तोलला गेला आहे. एक हात शेतकऱ्याचा आणि दुसरा स्त्रीचा आहे. या दोघांत विलक्षण साम्य आहेत. ज्या प्रमाणे घरात स्त्रीला गृहीत धरले जाते त्याच प्रमाणे समाजात शेतकऱ्याला विचारात घेतले जात नाही. घरात स्त्रीला जसे सगळे सहन करावे लागते तसेच समाजात शेतकऱ्याला. दोघांनाही सतत शोषणाशी सामना करावा लागतो. आपल्या देशात हे दोन्ही घटक आता कडेलोटाच्या टोकाला जाऊन पोचले आहेत. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत आणि स्त्रीची भ्रूणहत्या होत आहे. प्राध्यापकाला वाटते आपला मुलगा प्राध्यापक व्हावा. डॉक्टराला वाटते डॉक्टर व्हावा, अधिकाऱ्याला वाटते अधिकारी व्हावा, बिल्डरला वाटते बिल्डर व्हावा, पुढाऱ्याला वाटते, आपला मुलगा राजकारणात यावा. पण शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे वाटेनासे झाले आहे. बाईला वाटू लागले आहे की, आपल्याला मुलगी झाली नाही तर बरे होईल. हा फरक का पडतो? आपली संतान सुखात राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. दुर्दैवाने आपल्या देशात शेतकरी असणे वा स्त्री असणे सुखाचे राहिलेले नाही. शेतकरी म्हणून सारे आयुष्य निखाऱ्यावर चालावे लागणारा बाप कशाला आपल्या लेकराला आगीत फेकेल. चपराशी झाला तरी बेहत्तर पण शेतीत परत येऊ नकोस, असे त्याला वाटते. ज्या बाईने आयुष्यभर तारेवरची कसरत केली, ओळखीच्या, अनोळखींच्या बोचऱ्या नजरा झेलल्या, सतत असुरक्षेत राहिली, मन मारून जगली तिला आपल्या उदरातून कन्या जन्मावी अशी लालसा कशी होईल?
या दोन्ही घटकांत आणखी एक साम्य आहे. हे दोन्ही सृजनाशी निगडित आहेत. ते केवळ नवनिर्मिती करीत नाहीत तर पुन्हा जन्माला घालू शकतील अशा जीवाचे ते जन्मदाते आहेत. एका दाण्यातून हजार दाणे आणि पुन्हा त्या दाण्यांतून नवे दाणे निर्माण करणारा शेतकरी व पुन्हा जन्माला घालू शकतो असे अपत्य जन्माला घालणारी स्त्री, हे दोन घटक छळले जात आहेत.
लुटारू सर्वात आधी सर्जकांना जायबंदी करतात. शेतकरी आणि स्त्री गुलाम झाले की बाकीची व्यवस्था ताब्यात घेणे फारसे अवघड राहत नाही. धर्मव्यवस्थेने स्त्रीला गुलाम केले व राज्यव्यवस्थेने शेतकऱ्याला. एके काळी या दोन्ही सत्ता याच प्रयोजनासाठी एकत्र नांदत होत्या. ‘रेनेसान्स’नंतर त्या विभक्त झाल्या. तरी स्त्री आणि शेतकऱ्यांची गुलामी संपली नाही. आपल्या समाजातील विकृतीचे मूळ कारण सर्जकांची गुलामी आहे. बांडगुळापासून सर्जकांची मुक्ती झाली तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल आणि स्वातंत्र्याशिवाय मानवी समृद्धी अशक्य आहे. ना वर्ग संघर्ष खरा ना वर्ण-संघर्ष खरा. सर्जक विरुद्ध बांडगूळ हीच शोषणाची खरी संघर्ष-रेषा आहे. भांडवलशाही असो की समाजवाद, हुकूमशाही असो की तथाकथित लोकशाही साऱ्या व्यवस्था सर्जकांना गुलाम बनविणाऱ्या आहेत. म्हणूनच मला वाटते की, सर्जकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा हाच कळीचा मुद्दा आहे. सर्जकांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करणे हे काम आपल्या छोटय़ाशा आयुष्यात करता आले तर कार्यकर्ता म्हणून आपण आपले दायित्व पार पाडले असे मला वाटेल. म्हणून मी शेतकरी आंदोलन आणि किसानपुत्र आंदोलनात सहभागी झालो.
habib.amar@gmail.com
chaturang@expressindia.com