डॉ.रवींद्र कोल्हे ravikolhemelghat@gmail.com
मेळघाटात शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. कारण सगळे लोक एकमेकांशी जवळच्या नात्याने बांधलेले आहेत. एकमेकांना गरज पडेल तेव्हा मदतीसाठी समोर आले आहेत. बैरागडचे आमचे घर आम्हाला आजही आवडते. करण ते लोकसहभागातून उभे झालेले आहे. या घराने आम्हाला लोकसहभागाचा खरा अनुभव दिला.
बैरागडला आल्यावर पहिल्या १५ दिवसांत विहीर खणण्यासाठी लावलेल्या डायनामाइटचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेला रुग्ण आला. मी त्यावेळी स्वत:ला फक्त एमबीबीएस समजत होतो. ‘‘हे तर सर्जनचे काम आहे, तू सर्जनकडे जा म्हणजे योग्य होईल’’, असा सल्ला मी त्याला दिला. मात्र रुग्ण सर्जनकडे न जाता दुसऱ्या दिवशी दगावला असे समजले. मी हादरलो. अनुभवाची कमी, हिमतीची कमी, औजारे आणि औषधांचीही कमी. काय करायला हवे होते हे समजत नव्हते, मात्र जे घडले ते मनाला दु:खी करून गेले. त्या वेदनांवर वरिष्ठांकडून फुंकर घालून घ्यावी म्हणून मी त्यावेळचे जिल्हा शल्य चिकित्सक डी. जी. पाठक यांच्याकडे गेलो. त्यांना वस्तुस्थिती सांगितली, त्यांनी सगळे समजून घेतले. म्हणाले की, ‘‘ तुम्ही जर बुचर सॅमपुटेशन केले असते जसे दुसऱ्या महायुद्धात ते वापरले जात होते व रक्तस्राव थांबवून जंतूरोधके दिली असती तरी रुग्णाचा जीव वाचला असता.’’ सर्जरी करताना संमती घेणे डॉक्टरवर बंधनकारक आहे. इतर सर्व परिस्थिती सापेक्ष आहे. त्यानंतर आम्ही अनेक सर्जिकल इमर्जन्सी हिमतीने सांभाळू लागलो.
एम.डी.ला असताना ‘संवाद’ हा आमचा ग्रुप होता. त्यात वर्गमित्र व इतर मुलेमुली होते. आम्ही दर रविवारी हुडकेश्वर रोडवर पिपरी नावाच्या गावात जात असू. तेथे लोकसहभागातून शोष खड्डे, शुद्ध पेयजल, कंपोिस्टग अशी स्वच्छतेची, पर्यावरणाची आरोग्य शिक्षणाची महिला व बाल आरोग्याची अन् प्राथमिक उपचाराची कामे आम्ही सगळ्यांनी हाती घेतली आणि पार पडली. त्यामुळे गावकऱ्यांशी कसे वागावे यातील ‘डूज अॅण्ड डोन्टस्’ शिकता आले.
२ डिसेंबर १९८८ ला विवाहबद्ध होऊन २६ जानेवारी १९८९ ला स्मितासह पहिल्यांदा ‘घरकुल’च्या गाडीने पोहचलो. काश्मिरातून दहशतवाद्यांचे ध्वजारोहण न करण्याचे आवाहन बैरागडात पोहचले होते. त्या दिवशी बैरागडात ध्वजारोहण झाले नाही. बहाणा होता ग्रामसेवक प्रशिक्षणाला गेल्याने सरपंचांना ध्वज मिळाला नाही. आम्ही पुढाकार घेऊन गावकऱ्यांची सभा घेतली. या पुढे असे घडू नये त्यासाठी ध्वजारोहणाचे गांभीर्य समजावून सांगितले. राष्ट्र, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत म्हणजेच आपले सर्वस्व आहे. राष्ट्रध्वज वाचवताना गोळी खाऊन शहीद होणारी अनेक उदाहरणे आहेत, असे सांगितले. शेवटी सरपंचाने गावकऱ्यांची माफी मागून प्रसंग सांभाळून घेतला.
गावकरी जेव्हा दवाखान्याची झोपडी बांधू लागले तेव्हा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस पाटील याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याने बांधकाम न करण्याची नोटीस बजावली. पुढे तहसीलदारांकडे केस लागल्यावर तत्कालीन एसडीओ फुलकुंडवार यांनी रीतसर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन जागा नावे करून दिली. त्यांनी हेही नमूद केले की, ज्या गावात आमचे ग्रामसेवक, शिक्षक राहायला तयार नाहीत. तेथे एक एम.डी. डॉक्टर ४० किमी पायी जाऊन राहतो त्याला मदत करणे आमच्या कामाचा भाग आहे. त्या घरात आम्ही दोघे राहायला गेल्यावर माझी लहान बहीण सरोज आणि जावई आले. त्यांनी माझ्या वडिलांना माझ्या घराचे वर्णन शहरातील कुठल्याही झोपडपट्टीतील घरापेक्षा खराब घर असे केले. मात्र आम्हाला ते घर आजही आवडते. करण ते लोकसहभागातून उभे झालेले आहे. कोणी धारण, कुणी कामगार, कोणी ओसरीसाठीची लाकडे, कोणी आडे, कडवे, झिंजे, तट्टे, कुणी माती, दगड, गवत, सागाची पाने असा सहभाग दिला. आम्हाला लोकसहभागाचा खरा अनुभव झाला.
गावातील गुराखी सुकलूला सर्पदंश झाला. सुकलूने सापालाच मारून जंगलातून सोबत आणले असल्याने मला सहज निदान व उपचार करता आले, मात्र उपचाराची किंमत जास्त असल्याने आणि सुकलूची हातातोंडाशीच गाठ असल्याने आम्ही गावात झोळी फिरवली आणि गावाच्या सहभागाने सुकलूचा जीव वाचला. कोणी किती पैसे दिले हे जरी महत्त्वाचे नसले तरी देण्याची भावना, मदतीचा विचार आणि सामूहिक कृतीचा सहभाग त्यातून घडला. पुढे ज्यावेळी नंदू शितोळ्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, घरातील भांडीकुंडीही वितळली, संपूर्ण धान्य जळून गेले, कपडे, सामान जळून बेचिराख झाले. त्या वेळी मी पुढे होऊन गावकऱ्यांसोबत दारोदारी फिरून पैसे, धान्य, कपडे, भांडीकुंडी जमा केली. पेरणीसाठीचे बीज ही गावकऱ्यांनी त्याला दिले. कुठल्याही वृत्तपत्रात ही बातमी नसली तरी मला वाटले आज ते नमूद करणे गरजेचे आहे, गावाची शक्ती वाढवण्यासाठी अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मेळघाटात शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. कारण सगळे लोक एकमेकांशी जवळच्या नात्याने बांधलेले आहेत. एकमेकांना गरज पडेल तेव्हा मदतीसाठी समोर आले आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात बैरागड असल्याने सततच वाघ कुणाचे ना कुणाचे जनावर खात असे. एकदा आयएफएस ट्रेनी ऑफिसर भेटायला आले असता याबद्दल मी कैफियत मांडली. त्यांनी नुकसानभरपाई पद्धती समजावून सांगितली त्याप्रमाणे रीतसर अर्ज करून झाले, स्मरणपत्रही रजिस्टर पोस्टाने पाठवले, त्याच्या पोचपावत्याही मिळाल्या. वर्षभराने उपवन संरक्षक मोहन भेटायला आले. त्यांनी वाघाने फाडलेल्या रुग्णाचे प्राण वाचवल्याबद्दल स्मिताचे अभिनंदन केले. त्यांच्यासमोरही मी वाघांमुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते ते मांडले. बलजोडीतील एक बल गेल्याने शेत पडीक होते, कुटुंब देशोधडीला लागते. त्याची नुकसानभरपाई देण्याचे अधिकार असूनही आपण तो वापरत नाही. त्यामुळे स्थानिकांची होणारी दयनीय अवस्था लक्षात आणून दिली. त्यांनी कागदपत्रे तपासली व तातडीने मदत दिली. वाघाने जनावरे मारल्यापोटी १५-१६ जणांना चेकचे वाटप गावात केले गेले. त्यामुळे आज ही जागृती आली आहे की नुकसानभरपाई मिळते. लोक स्वत: अर्ज करू लागलेत. मानव-प्राणी संघर्षकाही प्रमाणात दूर झाला. अन्यथा यापूर्वी मारलेल्या जनावरांवर विष टाकून वाघाला मारल्या जाण्याच्या घटना घडत असत, त्या कायमच्या थांबल्या.
प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यातून मार्ग काढताना गावकऱ्यांची साथ आम्हाला मिळत जरी होती तरी १९९१ मध्ये मला आणि स्मिताला गावकऱ्यांच्या असंतोषाचाही सामना करावा लागला. कारण होतं सक्तीच्या धर्मातराच्या प्रश्नामध्ये आम्ही हस्तक्षेप केला हे. बैरागडमधील कुवारसा नावाच्या एका आदिवासी मुलाचं धर्मातर करण्यात आल्याची घटना स्मिताच्या कानावर आली होती. त्याला परत हिंदू करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत असं तिला वाटलं. धर्म किंवा जातपात यांना मी मानत नाही, त्यामुळे मला स्मिताचं म्हणणं पटत नव्हतं. शिवाय मला सारखं वाटत होतं, की धर्मातराच्या प्रश्नांमध्ये घुसल्यामुळे गावातील जे अनेक इतर धर्मीय होते, ज्यांना आता कुठे आमच्या उपचारांवर विश्वास निर्माण झाला होता त्यांच्या मनात आमच्या सेवाभावाविषयी शंका निर्माण होईल. या मुद्दय़ावरून माझ्यात आणि स्मितामध्ये बराच वाद झाला. पण अखेर खूप विचारांती मला स्मिताचा मुद्दा पटला. कारण कुवारसा सज्ञान नव्हता. त्याचं शुद्धीकरण करून त्याने परत हिंदू व्हावं अशी त्याच्या आई-वडिलांचीही इच्छा होती. याबाबत अनेकजणांचा सल्ला घेऊन आम्ही त्याला परत हिंदू करून घेतलं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला, म्हणजे जवळजवळ संपूर्ण गावाने आमच्यावर बहिष्कार टाकला. आम्हाला ठार करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. पण आम्हा दोघांना आमच्या कर्तव्याविषयी आणि हेतूविषयी शंका नव्हती. त्यामुळे कुणालाही न घाबरता बैरागड न सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचे दोन परिणाम झाले. कुवरसाच्या आधी बैरागडमध्ये पंधराजणांचं धर्मातर झालं होतं. त्यानंतर एकाचंही धर्मातर झालं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अन्याय किंवा जबरदस्ती सहन करायची नाही, ही जाणीव लोकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये निर्माण झाली.
शुद्धीकरणाच्या दिवशी जमलेल्या जनसमुदायातील अनेक स्त्री-पुरुष पुढे येऊन गावातल्या स्त्रियांची कशी टिंगलटवाळी केली जाते, भर बाजारात त्यांच्या पदराला हात कसा घातला जातो आणि काही किलो धान्यासाठी त्यांचा कसा सौदा केला जातो यासंबंधीच्या हकिगती सांगू लागले. स्त्रियांच्या व्यथा-वेदना ऐकताना मला आणि स्मिताला जाणवलं, की आतापर्यंत आपण फक्त शारीरिक आजार दूर करणारेच डॉक्टर होते; पण आज प्रथमच गावकऱ्यांनी त्यांच्या मनातल्या वेदना बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर स्त्री अत्याचार रोखण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पीडित स्त्रियांचं पुनर्वसन करण्यासाठी मी असंख्य वेळा कोर्टकचेऱ्या केल्या. फक्त स्त्री प्रश्नांसाठी नाही, तर सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार, वन तस्करी, वनविषयक कायद्यांचं होणारं उल्लंघन, कुपोषण, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मी आपणहून ठाम भूमिका स्वीकारली. कित्येक वेळा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; परंतु एक-दोन अपवाद वगळता तिथेही आम्हाला न्याय मिळालाय असं झालं नाही. कधी साक्षीदार फुटले तर कधी न्यायाधीश उलटले. कधी कधी तर ज्यांच्यासाठी आम्ही लढायला सिद्ध झालो होतो असे लोकच आमचे ध्येय आणि निष्ठा समजू शकले नाहीत. एवढं करूनही मी माझ्या कर्तव्यापासून हटलो नाही. कुणी मला पैशांत बुडवलं तर कुणी कधी घर पेटवलं, अनेकदा प्राणघातक हल्ले केले; परंतु न थकता, न हरता आम्ही सदसद्विवेकबुद्धीला पटेल त्या मार्गाने लढत राहिलोय आहेत. कारण मला माहीत आहे की आम्हाला त्रास देणारी माणसं आहेत त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक मला मानणारी, मदत करणारी, वाचवणारी माणसं आहेत. म्हणूनच माणसाच्या चांगुलपणावरचा माझा विश्वास कायम आहे.
chaturang@expressindia.com